वर्षभरात अदानींच्या संपत्तीत ३४ अब्ज डॉलरची भर

वर्षभरात अदानींच्या संपत्तीत ३४ अब्ज डॉलरची भर

भारतातील एक बडे उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती गेल्या वर्षभरात १६.२ अब्ज डॉलरवरून ५० अब्ज डॉलर इतकी वाढल्याचे ब्लूमबर्ग बिल्येनियर्स इंडेक्सने म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. गेल्या वर्षभरात अदानींच्या संपत्तीत झालेली ही वाढ जगातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे उद्योगपती जेफ बेझोस व एलन मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीपेक्षा अधिक आहे, असे ब्लूमबर्गचे म्हणणे आहे. अदानी यांच्या समुहातील एक कंपनी वगळता सर्व कंपन्यांच्या शेअर्स किमतीमध्ये यंदा ५० टक्क्यांहून वाढ झाली आहे.

अदानी हे भारतातील उदयोन्मुख बडे उद्योजक म्हणून ओळखले जात असून गेल्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत वेगाने वाढ होत आहे. अदानी यांच्या व्यवसायाचा पसारा बंदरे, विमानतळे, डेटा सेंटर्स, कोळसा खाणी असा विविध क्षेत्रात असून द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशांतही त्यांच्या मालकीच्या कोळसा खाणी आहेत. ऑस्ट्रेलियातील कॅर्मिशेल कोळसा प्रकल्प हा वादग्रस्त असून या प्रकल्पाविरोधात पर्यावरण संघटना व नागरी संघटना कित्येक महिने आंदोलन करत आहेत.

बाजारपेठेत लवचिक उद्योग समजल्या जाणार्यांमध्ये अदानी समूह आपली गुंतवणूक करत असल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. त्यांनी डेटा सेंटर्सच्या क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर तंत्रज्ञान संबंधित अन्य क्षेत्रांमध्ये ते गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.

अदानी एंटरप्राइज लिमिटेडने गेल्या महिन्यात १ गिगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटर उभे करण्याच्या करारावर स्वाक्षर्या केल्या आहेत.

या वर्षात अदानी टोटल गॅस लिमिटेडचा व्यवसाय ९६ टक्क्याने तर अदानी एंटरप्राइजचा व्यवसाय ९० टक्क्याने वाढला आहे. त्याच बरोबर अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ७९ टक्के. अदानी पॉवर लिमिटेड व अदानी पोर्टस, स्पेशल इकॉनॉमी झोन्स लिमिटेडचा व्यवसाय ५२ टक्क्याने वधारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा व्यवसाय गेल्या वर्षी ५०० टक्क्याने वाढला होता.

मूळ बातमी

COMMENTS