नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर ईशान्य भारत अस्वस्थच

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर ईशान्य भारत अस्वस्थच

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध म्हणून संपूर्ण ईशान्य भारतात हिंसाचार पसरला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ख्रिसमस नंतर या क

पत्रकाराला गायब करण्याची भाजप नेत्याकडून धमकी
आसाममध्ये भाजीविक्रेत्याचा झुंडबळी
‘लाल सलाम’, ‘कॉम्रेड’ म्हटल्यास गुन्हा

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध म्हणून संपूर्ण ईशान्य भारतात हिंसाचार पसरला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ख्रिसमस नंतर या कायद्यात बदल करण्यात येतील असे संकेत दिले आहेत. रविवारी धनबाद येथे विधानसभा प्रचारसभेत त्यांनी ईशान्य भारतातील एक राज्य मेघालयचे मुख्यमंत्री नागरिकत्व कायद्याबाबत चर्चा करण्यास आले असता त्यांना ख्रिसमसनंतर या कायद्यावर काही तोडगे काढण्यात येतील असे आपण आश्वासन दिल्याचे शहा यांनी सांगितले. या कायद्यावरून लोकांनी रस्त्यावर येऊन हिंसाचार करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

दरम्यान, गेले तीन दिवस ईशान्य भारत व आसाममध्ये काही भागात भडकलेला हिंसाचार रविवारी आटोक्यात आलेला दिसला. गोहाटी, दिब्रुगड, शिलाँगमध्ये दिवसात संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. दिब्रुगडमध्ये सकाळी ७ ते दुपारी ४पर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. गोहाटीमध्ये संचारबंदी काही तासांसाठी शिथिल करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी या शहरात हिंसाचार उफाळला होता. त्यात दोन तरुणांना पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या.  रविवारी इस्पितळात उपचार घेत असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. या तरुणांची नावे ईश्वर नायक व अब्दुल अलिम असून गुरुवारी या दोघांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. एका व्यक्तीचा ट्रकला लागलेल्या आगीत मृत्यू झाला.

अरुणाचल प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांचा परीक्षांवर बहिष्कार
नागरिकत्व दुरुस्ती कायदाचा निषेध म्हणून रविवारी अरुणाचल प्रदेशमध्ये राजीव गांधी विद्यापीठ विद्यार्थी संघ व स्टुडंट युनियन ऑफ एनआयआरआयएसटी या संघटनेच्या हजारो विद्यार्थ्यांनी सुमारे ३० किमी अंतराचा मोर्चा काढला. हे विद्यार्थी राजभवन येथे पोहोचले व त्यांनी राज्यपालांना आपले निवेदन दिले. या विद्यार्थी संघटनांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला.

मोदींचा काँग्रेसवर आरोप
ईशान्य भारतातील हिंसाचाराला काँग्रेस व विरोधी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथील धुमकामध्ये झालेल्या प्रचारसभेत केला. दंगा करणारे लोक कपड्यांवरून लक्षात येतात असेही विधान त्यांनी केले.

दिल्लीत दोन बस जाळल्या
रविवारी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांबरोबर अन्य निदर्शक होते. त्यांनी संसदेपर्यंत आपला मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना अगोदरच रोखले. यावेळी निदर्शकांनी तीन बसेसना आग लावली. काही बसेसची तोडफोडही केली.

पण या हिंसाचारात आमचा कोणताही हात नसल्याचा दावा जामिया विद्यार्थी व शिक्षक संघाने दावा केला आहे. बसेसना आग लावण्यात समाजकंटकांचा भाग असल्याचे शिक्षक व विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे.

आसाम गणपरिषदेची सर्वोच्च न्यायालयात धाव
संसदेत वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने मत देणाऱ्या आसाम गणपरिषदेने रविवारी मात्र या कायद्याच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आसाममध्ये भाजपसमवेत सत्तेत असलेल्या आसाम गणपरिषद पक्षाने जाहीर केले. वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा आसाम राज्यात लागू केला जाणार नाही, त्यासाठी आमचा कडाडून विरोध असल्याचे मत आसाम गणपरिषदेचे ज्येष्ठ नेते रामेंद्र कलिता यांनी मांडले. तर मुख्यमंत्री सोनोवाल यांनी आसाममधील प्रत्येक नागरिकाचे हित सांभाळण्याचे सरकारचे प्रयत्न राहतील असे आश्वासन दिले. ते लवकर पंतप्रधान व गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत रवाना होणार आहेत. आसाम गणपरिषदेचे तीन सदस्य राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदावर आहेत.

राष्ट्रीय पारितोषिक विजेता मल्याळी दिग्दर्शकाचा सोहळ्यावर बहिष्कार
‘सुदानी फ्रॉम नायजेरिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक झाकरिया मोहम्मद यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सामील होणार नसल्याचे जाहीर केले आहे. झाकरिया मोहम्मद यांच्यासमवेत ‘सुदानी फ्रॉम नायजेरिया’ या चित्रपटाचे पटकथाकार व निर्मातेही आहेत. या चित्रपटाला २०१८सालचा मल्याळी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: