‘व्यंगचित्र दुनियेतला अमिताभ’

‘व्यंगचित्र दुनियेतला अमिताभ’

सबनीसांचं सगळ्यांना कळेल असं सोपं कार्टून असायचं. प्रत्येक व्यक्तीवर, गोष्टीवर छान लेबल लावलेली असायची. स्वच्छ नीटनीटके त्यांचं रेखाटन असायचं. चित्रातली प्रत्येक गोष्ट टापटीप असायची. अगदी त्या चित्रातले त्यांचे लिहिलेले संवादही ते आकर्षक पद्धतीनं चित्रातल्या शैलीप्रमाणेच सुंदर असायचे. त्यांच्या चित्रातला गुंड गुन्हेगार आडव्या रेषांचा टी शर्ट घातलेला जाडजूड मिशांचा गुंड गोड वाटायचा.

‘भारत हल्ला करेल या भीतीने पाक लष्करप्रमुख घाबरले’
कमला हॅरिसः डेमोक्रेट्सतर्फे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार
कोरोनाशी लढू, पण या राजकीय व्हायरसचं काय?
विकास सबनीस यांचे एक व्यंगचित्र.

विकास सबनीस यांचे एक व्यंगचित्र.

ही गोष्ट असेल १९९५/९६ची. त्यावेळी नुकतंच जे. जे. पूर्ण करून मी कुलाब्याच्या ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये काम करत होतो. तो काळ होता व्यंगचित्रकारांचा. बाळासाहेब ठाकरे, आर. के . लक्ष्मण आणि विकास सबनीस यांचा. मी काम करत असलेल्या ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये त्यावेळी विकास सबनीस यांची कार्टून छापली जात होती. त्यांचं रोज एक पॉकेट कार्टून आणि आठवड्यातून दोन तीन मोठी पोलिटिकल कार्टून प्रसिद्ध होत. मी आर्ट डिपार्टमेंट काम करत होतो. त्याच काळात मी सुद्धा व्यंगचित्र करत होतो. कारण आर. के . लक्ष्मण यांचा माझ्यावर मोठा पगडा होता. माझी चित्र बाहेरच्या साप्ताहिकात मासिकात टोपण नावाने प्रसिद्ध होत होती. त्यावेळी तुम्ही एका ठिकाणी पूर्णवेळ काम करत असताना दुसरीकडे तुम्हाला काम करता येत नसे. त्यामुळे तीन-चार ठिकाणी वेगवेगळी नाव वापरून मी गुप्तपणे बाहेर वावरत होतो. माझी व्यंगचित्रांची खाज भागवत होतो. इथेच या ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये माझी ओळख सबनिसांशी झाली. ती पण अचानक झाली.

सबनील ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये कधी यायचे त्याचा मला कधी पत्ता लागत नसे. आजसारखी मेलवर नाहीतर व्हॉट्सअपवर चित्र पाठवली जात नव्हती. हातांनी काढलेली चित्र त्या त्या पेपरात प्रत्यक्ष जाऊन द्यावी लागत. पेपरचा पूर्णवेळ व्यंगचित्रकार फार कमी ठिकाणी असत. तर मला कधी ते सबनीस दिसत नसायचे. त्यांची चित्र रोज दिसत. मी बाहेर चित्र करतो हे इथं काही जणांना कळलं होत. आणि ही गोष्ट ‘फ्री प्रेस’च्या संपादकांकडे म्हणजे जनार्दन ठाकूर यांच्याकडे गेली होती. त्यांनी एकदा बोलावून माजी काही व्यंगचित्र पाहून पुढे ती ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये छापायला सुरुवात केली. आणि ही चित्र पाहून एकदा विकास सबनीस यांनी मला ठाकूर यांच्या केबिनमध्ये बोलून माझे कौतुक केलं. साक्षात सबनीस यांनी कौतुक केल्यांनी मी एकदम हवेत गेलो होतो. माझ्यासाठी तो मोठा सुखद धक्का होता. ही होती सबनीस यांची माझी पहिली भेट. पुढे मग त्यांची चित्र मी काळजीपूर्वक पाहायला लागलो.

बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सबनीस

बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सबनीस

तीसेक वर्षांपूर्वीचा तो व्यंगचित्रकारांचा सुवर्णकाळ असावा. प्रत्येक दैनिकात कुणी ना कुणी व्यंगचित्रकार गाजत होता. ‘फ्री प्रेस’नंतर सबनीस मला वाटत ‘मिड डे’मध्ये गेले असावेत. त्यांची कार्टून मराठी, इंग्रजीत गाजत होती. कितीतरी महत्त्वाच्या मराठी दैनिकात ते ठाण मांडून होते. अगदी अलीकडच्या ‘महानगर’ दैनिकात ते दिसत होते. पूर्वी त्यांचं एक कार्टून वेगवेगळ्या भाषेत फिरत होत. ते गाजत होत कारण त्यांचं जबरदस्त काम. त्यांची स्वतःची सुंदर सोपी शैली होती. सगळ्यांना कळेल असं त्यांचं सोपं कार्टून असायचं. प्रत्येक व्यक्तीवर, गोष्टीवर छान लेबल लावलेली असायची. स्वच्छ नीटनीटके त्यांचं रेखाटन असायचं. चित्रातली प्रत्येक गोष्ट टापटीप असायची. अगदी त्या चित्रातले त्यांचे लिहिलेले संवादही ते आकर्षक पद्धतीनं चित्रातल्या शैलीप्रमाणेच सुंदर असायचे. त्यांच्या चित्रातला गुंड गुन्हेगार आडव्या रेषांचा टी शर्ट घातलेला जाडजूड मिशांचा गुंड गोड वाटायचा मला. सुंदर काम असायचं त्यांचं. आणि यामुळेच त्यांची व्यंगचित्र सगळ्यांना आवडायची. ती चित्र लोकांना आपली वाटायची.

असं म्हटलं जात की व्यंगचित्रकार हा समाजाचा वाहक-ड्रॉयव्हर असतो. समाजाची मतं, विचार, त्यांचा आतला आवाज तो कागदावर रेखाटत असतो. बातमी मागची बातमी तो दाखवत वाचकांना दाखवत असतो. यासाठी त्याच वाचन निरीक्षण उत्तम असावं लागत. रोजचा रेखाटण्याचा सराव कायम ठेवावा लागतो. तेव्हा कुठे तुमची स्वतःची एक वेगळी शैली विकसित होते. सबनीस या सगळ्यात पार बुडून गेलेले होते.

राज ठाकरे आणि विकास सबनीस.

राज ठाकरे आणि विकास सबनीस.

सबनीस शरीराने चांगलेच उंच होते. ती उंची त्यांनी व्यंगचित्रातही गाठली होती. कुणीतरी एकदा त्यांच्याबद्दल त्यावेळी लिहिलं होत, की विकास सबनीस हे व्यंगचित्र दुनियेतले अमिताभ आहेत. आणि ते खरं होत. ते अमिताभच होते. खूप साप्ताहिक, मासिकात दैनिकात, इंग्रजी दैनिकात वगैरे धुमाकूळ घालत होते. जिकडे तिकडे सब कुछ सबनीस होते. इतकं काम हे कसं करतात या बद्दल नवल वाटायचं.

व्यंगचित्रकारासारखे परिस्थितीचे भान सामान्य माणसाला नसते त्यामुळे बऱ्याचदा व्यंगचित्रकाराच्या सृजनशीलतेवर मर्यादा येतात. एखादा संदेश त्याला पोहोचवायचा असतो तो नीट पोहचेल याची खात्री नसते. तरीही त्याला समाजाचा आरसा दाखवावा लागतो. इथे सबनीस कामी येत असतं. समाजातल्या छोट्या-छोट्या घटना ते व्यंगचित्रात उत्तम रेखाटत. रस्त्यावरचे खड्डे असोत. गर्दीचा रेल्वे प्रवास असो. पावसाळ्यामुळे पाणी भरलेलं असो. सबनीसांचा शिरस्राण चिलखत घातलेला सामान्य माणूस बऱ्याचदा त्यांच्या चित्रात दिसायचा. सबनीस यांची या सामान्य घटनांवर बारीक नजर असे. वाचकांशी ते थेट संवाद साधत. सामान्य वाचकाला आकर्षून घेण्याची ताकद म्हणूनच सबनीसांच्या रेषेत होती.

चारएक महिन्यापूर्वी सबनीसांचा व्यंगचित्रकलेत ५० वर्ष कामगिरी केल्यामुळे सत्कार करण्यात आला होता. इतकी मोठी कामगिरी करणारे भारतात सबनीस एकमेव असावेत. व्यंगचित्राच्या माध्यमातून कोरडे ओढण्याचे काम जरी व्यंगचित्रकाराचे असले तरीही त्याला सामाजिक भान जपावे लागते. आपल्या ५० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत सबनीस कधीच वादात सापडले नाहीत. तसं मी कधी ऐकले नाही. व्यंगचित्र हे दुधारी शस्र असते. सबनीस यांनी कधी तेढ निर्माण केला नाही. त्यांच्या सुंदर रेषांनी कधी खळबळ माजवली नाही अलीकडच्या वादग्रस्त सोशल मीडियात सबनीस कधी अडकले नाहीत. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जपताना स्वनियंत्रण जपणे व्यंगचित्रकारासाठी महत्त्वाचे असते.

वयाच्या ६९व्या वर्षी सबनीसांचे जाणे धक्कादायक आहे. ते आजारी असल्याचं ऐकलं होतं. पण ते अचानक कार्टूनची चौकट मोडून जातील असं कधी वाटलं नव्हतं. त्यांच्या जाण्याने राजकीय व्यंगचित्रकलेच मोठं नुकसान झालंय. मुळात मराठीत व्यंगचित्रकार कमी आहेत. ही कला संपून जातेय की काय असं वाटू लागलंय. म्हणूनच सबनीसांसारख्या मोठ्या कलाकाराचं निघून जाणं महाराष्ट्राला, व्यंगचित्रकलेला मोठा धक्का आहे. हे नुकसान कधीही भरून न येण्यासारखं आहे.

‘प्रहार’ दैनिकात असताना पाच-सहा वर्षांपूर्वी सबनीसांच्या ‘व्यंगनगरी’ या पुस्तकावर लिहिण्याच्या संधी मला मिळाली होती. सबनीसांचं हे एकमेव पुस्तक असावं. त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यांची हजारो व्यंगचित्र आहेत. बरीच पुस्तक तयार होतील आणि नवीन व्यंगचित्रकारांना ती मोठी मार्गदर्शक ठरतील. असो विकासजी तुम्हाला ब्रश खाली ठेऊन अखेरचा सलाम …!

प्रदीप म्हापसेकर, हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0