आव्हान कोरोना व्हायरसचे

आव्हान कोरोना व्हायरसचे

कोरोना व्हायरस कशापासून उत्क्रांत झाला हे अजून उघडकीस यायचे आहे. तोपर्यंत फक्त काळजी घेणे एवढेच आपण करू शकतो.

भय, अनिश्चितता : लॉक डाऊनचा पहिला दिवस
स्वप्नांचा उलटा प्रवास
कोरोना आणि राजकारण

सध्या चीनमध्ये कोरोना विषाणूच्या साथीने हाहाकार उडाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे अधिकृत नामकरण ‘COVID-19’ असे केले आहे. तर कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या आजाराचे ‘सिव्हीयर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस 2’ किंवा ‘सार्स –को व्ही-2’ असे बारसे केले आहे.

या साथीशी संबंधित पहिला रुग्ण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आढळला. ८ जानेवारीला या साथीचा कारक कोरोना विषाणू असल्याची खात्री झाली. ८ मार्च २०२०पर्यंत या साथीची लागण जगभरात १,०५,५८६ जणांना झाली असून या साथीचे मृत्यू ४,०२७ इतके झाले आहेत. चीनमधील हुबेई प्रांतात उद्भवलेला हा संसर्गजन्य रोग १०० देशांच्या सीमा ओलांडून गेला आहे. भारतामध्ये केरळमध्ये या कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून आणखी ९ जणांना लागण झाल्याची माहिती आहे.

गेल्या २० वर्षात SARS-Co-V2 (सार्स कोव्ही)हा आढळलेला तिसरा साथ पसरवणारा विषाणू आहे. २००३ साली SARS-CoV, मुळे सार्स हा जीवघेणा नेहमीपेक्षा वेगळा न्यूमोनिया जगभर पसरला होता. त्यानंतर १० वर्षांनी मध्य पूर्वेत MERS-CoV (मर्स कोव्ही- मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिन्ड्रोम) हा विषाणू दिसून आला. या विषाणूची लागण २,४९४ जणांना झाली असून या विषाणूमुळे सुमारे ९०० मृत्यू झाले आहेत. सार्स को व्ही अधिक वेगाने पसरला पण त्यापासून झालेल्या मृत्यूची संख्या तुलनेने कमी होती. ८००० बाधित रुग्ण व ८०० मृत्यू.

‘मर्स- कोव्ही’चा प्रादूर्भाव प्राण्यांमधून झाला आहे. याला ‘झूनोसि’ – प्राण्यामधून उद्भवलेला आजार म्हणतात. हाच प्रकार ‘सार्स कोव्ही 2’ बद्दल आहे. ‘झूनोसिस’ची लागण प्राण्यांमधून मानवामध्ये संक्रमित होते. मर्स को व्ही आणि सार्स को व्ही हे आजार उंट आणि ऊद मांजर (सिव्हेट कॅट) यांच्याद्वारे मानवामध्ये संक्रमित  झाले.

‘सार्स को व्ही 2’च्या जनुकीय विश्लेषणातून मिळालेल्या माहितीनुसार या विषाणूंचे अत्यंत जवळचे साम्य वटवाघळातल्या विषाणूत आढळून आले आहेत. याचे नाव कोरोनाव्हायरस.

वटवाघूळ व मानव यामधील मध्यस्थ प्राणी खवल्या मांजर. खवल्या मांजर त्याच्या विचित्र दिसणाऱ्या खवल्यामुळे आणि स्वत:चा जीव धोक्यात आल्यावर त्याच्या गुंडाळून घेण्याच्या सवयीमुळे सर्वांना माहिती आहेत पण या मांजरावरच्या खवल्यासाठी व त्यांच्या मांसासाठी त्यांची चीनमध्ये चोरट्या मार्गाने तस्करी होते.

प्राण्यांमधून मानवात होणाऱ्या विषाणू संक्रमणामध्ये मध्यस्थ असतो. एखादा विषाणू मानवी पेशीपर्यंत पोहोचावा लागतो. तो विषाणू पेशीवरील  प्रथिनांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक पेशीवर काही खुणेची प्रथिने असतात. या प्रथिनांना ग्राही प्रथिने म्हणतात. उदा. एचआयव्ही विषाणू फक्त सीडी 4 लसीकापेशीशी संबंध प्रस्थापित करतो. एकदा खुणेच्या प्रथिनाबरोबर संबंध आला म्हणजे विषाणू पेशीमध्ये शिरकाव करतो. पेशीमध्ये विषाणूचे विभाजन होते. अशा तऱ्हेने आश्रयी पेशी संसर्गग्रस्त होते. हे जर झाले नाही तर विषाणू पेशीमध्ये शिरकाव करू  शकत नाही.

‘सार्स-को व्ही2’ हा गेल्या २० वर्षातील इतर प्राण्यामधून मानवामध्ये संक्रमित झालेला तिसरा विषाणू आहे.

SARS-Co-V2 विषाणूमधून डोकावणारी स्पाईक प्रथिने

पेशीवरील AC2 ग्राही प्रथिन व विषाणू प्रथिन एकत्र आल्याशिवाय संसर्ग होत नाही.

पेशीवरील AC2 ग्राही प्रथिन व विषाणू प्रथिन एकत्र आल्याशिवाय संसर्ग होत नाही.

 

 

 

कोरोनाव्हायरसने आश्रयीच्या पेशीमध्ये कसा प्रवेश मिळवायचा याचा अत्यंत सोपा मार्ग शोधून काढला आहे. विषाणूच्या पृष्ठभागावर असलेले ग्लायकोप्रोटीन काटेरी स्पाईक (बर्फावर चालण्यासाठी तळव्यावर अणकुचीदार खिळे असतात त्याला स्पाईक म्हणतात) सतत पृष्ठभागापासून बाहेर डोकावत असतात. यांना ग्लायकोप्रोटीन म्हणतात. कारण या प्रथिनाबरोबर शुगरचा रेणू असतो. बाहेर आलेल्या ग्लायकोप्रोटीनमुळे विषाणू काटेरी मुकुटासारखा दिसतो. यामुळे या विषाणूला कोरोनाव्हायरस नाव पडले आहे.

स्पाईकप्रोटीन प्रत्यक्ष आश्रयी पेशीबरोबर जोडले जाते. याला ‘S1 युनिट’ असे नाव आहे. ‘S1 युनिट’च्या रचनेमध्ये एवढी विविधता आहे की अनेक सस्तन प्राण्यांच्या पेशी बरोबर ‘S1 युनिट’ जोडले जाते. ‘सार्स को व्ही2’ विषाणूचे ‘S1 युनिट’ कोणत्या अंत:त्वचेचा पेशी प्रथिनाबरोबर नेमके जोडले जाते हे वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. हा जोड सात तरफा असलेल्या कुलुपाच्या नेमक्या किल्लीसारखा असतो. माणसाच्या श्वसन मार्गाच्या पृष्ठभागाच्या पेशी वर चिकटणे कोरोना व्हायरसच्या दृष्टीने अगदीच किरकोळ बाब आहे. ‘सार्स को-व्ही2’ विषाणू ग्राही पेशीवरील ‘ACE2’ या प्रथिन भागास आपलेसे करतो व त्याने पुढे आजार होतो.

आणखी एक काळजी करण्यासारखा विषाणू म्हणजे एन्फ्लुएंझा. सर्व एन्फ्लुएंझा विषाणू बदक, गीझ, टर्न, गल आणि त्यासारख्या पाणपक्ष्यांमधून उगम पावलेले आहेत. पक्ष्यांमधून मानवापर्यंत पोहोचणे त्यांच्या दृष्टीने जवळचा मार्ग आहे. कारण पक्षी आणि मानव हे उष्ण रक्ताचे असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सारखे असते. बऱ्याच वेळा परजीवीच्या दृष्टीने नव्या आश्रयीमध्ये टिकून राहणे हा न परतीचा मार्ग असतो. ‘बर्ड फ्लू’ हा पक्ष्यामधून मानवात पसरला गेला पण एका मानवातून दुसऱ्याकडे तो सहसा पसरला नाहीय याला अपवाद २००९ साली आलेली ‘एच1एन1’ ही स्वाइन फ्लूची साथ. याचा विषाणू एवढ्या झपाट्याने मानवामध्ये संक्रमित झाला की स्वाइन फ्लूची साथ सर्वव्यापी म्हणून जाहीर करावी लागली. १९१८ मध्ये बर्ड फ्लूची साथ जागतिक होती.

डीएनए विश्लेषणावरून केलेल्या अभ्यासात ‘सार्स –को-व्ही२’ चा सर्वात जवळचा विषाणू वटवाघळात आहे. डुक्कर आणि वटवाघूळ यांच्या विषाणू मिश्रणातून मूळच्या बर्ड फ्लूचा विषाणू बदलून मानवी श्वसन मार्गात आजार पसरवत आहे. त्याच्या आश्रयीमध्ये उड्या मारण्याच्या पद्धतीमुळे कोरोनाव्हायरस आणि एन्फ्लुएंझा आजार सार्वत्रिक  (pandemic)ठरले आहेत.

काय काळजी घ्यावी

या आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा उपाय म्हणजे हात स्वच्छ धुणे. चेहरा आणि डोळे यांना हाताने स्पर्श न करणे. फ्लू आणि कोरोनाव्हायरस यापासून वाचण्याचा सध्या हा एकच प्रतिबंधक उपाय आहे. विषाणू हवेतील सूक्ष्म कणातून पसरतात. श्वसनमार्गात असे सूक्ष्म कण आल्यास श्वसनमार्गाच्या पेशीमध्ये त्यांची वाढ होते. त्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावणे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरले आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रवास करायचा असल्यास तोंडावर स्वच्छ रुमाल बांधणे पुरेसे आहे. लोकल, बस , सिनेमागृहे, यात्रा शक्यतो टाळा. स्वत:च्या वाहनातून प्रवास करताना वाहने स्वच्छ ठेवा. भरपूर पाण्याने व साबणाने हात धुवा. साबण जंतुनाशकच हवा असा आग्रह नाही.

दरवर्षी संशोधक फ्लू प्रतिबंधक लस विकसित करत असतात. पण आज  कोरोनाव्हायरसवर प्रतिबंधक अशी लस उपलब्ध नाही. नजीकच्या काळात ती तयार होण्यासाठी मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा व संशोधनावरील निधी त्यावर हे अवलंबून आहे. एकदा लस तयार झाली तरी त्याच्या प्राण्यावर आणि मानवी चाचण्या होईपर्यंत दुसरा विषाणू मानवी संसर्गाची वाट पाहात असतो.

जैविक उत्क्रांतीमध्ये ज्या सजीवांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते त्यांना विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. प्रतिक्षमता क्षीण होण्याचे एक महत्त्वाचे कारण आंतर प्रजनन. एकाच समुदायामध्ये बंदिस्त प्रजनन. ‘बर्ड फ्लू’ चीनी बदकांमध्ये आला व मानवांमध्ये पसरला. बंदिस्त बदक पालन केंद्रामध्ये लाखो बदके अंडी व मांसासाठी पाळणे हा फायद्याचा धंदा होता. तोच प्रकार चिकनचा बंदिस्त प्रजनन. स्वाईन फ्लू पाळीव डुकरांमधून जेव्हा आला त्यावेळी डुकरांनी पाळीव पक्ष्यांची विष्ठा खाल्ल्याने पक्ष्यांच्या विषाणूमध्ये बदल होऊन स्वाइन फ्लू विषाणू तयार झाला. कोरोनाव्हायरस कशापासून उत्क्रांत झाला हे अजून उघडकीस यायचे आहे. तोपर्यंत फक्त काळजी घेणे एवढेच आपण करू शकतो.

मोहन मद्वाण्णा, हे प्राणिविज्ञान मराठी विश्वकोशाचे समन्वयक आहेत.

आधार

How Do Animal Viruses Like Coronavirus Jump Species …

www.quantamagazine.org › how-do-animal-viruses-lik…

Why does the coronavirus spread so easily between … – Nature

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: