राजकीय भूमिका घेतल्याने कलाकारावर चॅनेलची कारवाई

राजकीय भूमिका घेतल्याने कलाकारावर चॅनेलची कारवाई

मुंबईः मराठी भाषेतील मनोरंजन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने यांना ते सोशल मीडियावर राजकीय मते व्यक्त

सरकारच्या अट्टाहासामुळे भारतीय कंपनी संकटात?
यंदाच्या दिवाळीत फटाके दणाणणार का?
बिहारच्या विकासासाठी प्रशांत किशोर यांचे व्यासपीठ

मुंबईः मराठी भाषेतील मनोरंजन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने यांना ते सोशल मीडियावर राजकीय मते व्यक्त करतात म्हणून त्यांना या वाहिनीकडून मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्याचा प्रकार घडला. या घटनेचे सोशल मीडियात व राजकीय वर्तुळात गुरूवारी व शुक्रवारी तीव्र पडसाद पाहावयास मिळाले. खुद्द किरण माने यांनी आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेतून काढून टाकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

एखाद्या अभिनेत्याला त्याच्या राजकीय भूमिकेमुळे कामावरून काढून टाकण्याचा हा पहिलाच प्रकार घडला आहे.

मराठी सिनेमा जगतात व मालिका जगतात यापूर्वी अनेक कलाकारांकडून राजकीय व सामाजिक मते व्यक्त करण्याचे प्रकार घडले आहेत. पण त्यांच्या राजकीय व सामाजिक भूमिकांचा त्यांच्या व्यावसायिक जगतावर परिणाम दिसून आला नाही. मराठीतील शरद पोंक्षे, विक्रम गोखले हे बडे कलाकार जाहीरपणे उजव्या विचारसरणीचे, सावरकरवादाचे समर्थन करताना दिसून आले आहेत. मध्यंतरी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताला ब्रिटिशांकडून भीक मागून स्वातंत्र्य मिळाल्याचे विधान केले होते. या विधानावर आपण सहमत असल्याची पत्रकार परिषद विक्रम गोखले यांनी घेतली होती. विक्रम गोखले यांनी भारताला २०१४ नंतर खरे स्वातंत्र्य मिळाले असेही वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आपण ठाम आहोत असेही त्यांनी म्हटले होते. पण त्यांच्यावर कुणा सिने निर्मात्याने, वाहिनीने अशी कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही.

पण किरण माने यांना ते जाहीरपणे उजव्या विचारसरणीविरोधात, देशातील राजकीय-सामाजिक विषयांवर उघडपणे भूमिका मांडत असल्याने त्यांना मालिकेतूनच काढून टाकण्याचा प्रकार घडला आहे.

आपल्याला मालिकेतून बाहेर काढल्याचे कळाल्यानंतर किरण माने यांनी फेसबुकवर ‘काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. त्याच्यावरही शेकडो प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता.

या सगळ्या घटनेनंतर किरण माने यांनी एका दैनिकाला प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी ‘ही झुंडशाही अशीच सुरू राहणार आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही. आम्ही जेव्हा नाटकात काम करायचो तेव्हा काँग्रेसवर इंदिरा गांधी, राजीव गांधींवर टीका करायचो. तेव्हा काँग्रेसी नेते पण येऊन टाळ्या वाजवायचे. असं नव्हतं की तुम्ही आमच्यावर टीका करू नका वा अशाप्रकारची दहशत नव्हती. पण आता एक वाक्य जरी लिहिलं तरी ‘तुम्ही असं कसं लिहू शकता’ म्हणत दहशत माजवली जातेय,’ असे म्हटले आहे.

स्टार प्रवाहाविरोधात सोशल मीडियावर तीव्र संताप 

स्टार प्रवाहाच्या या निर्णयावर सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया गेल्या दोन दिवसांत दिसून आल्या आहेत. #istandwith_KiranMane या हॅशटॅगच्या माध्यमातून अनेक सोशल मीडिया यूजरनी मराठी मालिका जगतातील सांस्कृतिक दहशतवाद, मक्तेदारीविरोधात आवाज उठवला आहे. एका सोशल मीडिया यूजरने ही सरळसरळ दडपशाही असून कलाकार वैयक्तिक आयुष्यात स्वतंत्र विचारांचा असतो. त्याच्या वैयक्तिक राजकीय भूमिकेशी चॅनेलला काहीच देणंघेणं नसावं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बहुतांश यूजरनी मराठी मालिका जगतात ब्राह्मणी सांस्कृतिक दहशतवाद पसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया

किरण माने प्रकरणाच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातूनही गुरुवारी दिसून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाविकास आघाडी सरकारमधील विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहितो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले गेले. या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु. ल. देशपांडे, निळु फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही.’

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही, ‘अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्याबाबतीत जो प्रकार घडला तो बंद झाला पाहिजे. महाराष्ट्रात असली दडपशाही चालू दिली जाणार नाही. संविधानाच्या चौकटीत आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. एखादी विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जात असेल तर काँग्रेस पक्ष तो कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या एकूण प्रकरणाबद्दल स्टार प्रवाह वाहिनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

द वायरने किरण माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो अद्याप होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यास या वृत्तामध्ये ती समाविष्ट करण्यात येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0