'द ग्रेट डिक्टेटर'मधून हिटलरचे 'अरुप' जगापुढे आणण्याची हिंमत फक्त एकांडा शिलेदार चार्ली चॅप्लिनंच करू शकला.
‘इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडवला त्यांची देखील कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्तिस्तंभावरला
पिंडास कावळा अजून नाही शिवला’
(रॉय किणीकर)
“तुझ्या आणि हिटलरच्या मिश्याची ठेवण एकदम सारखी आहे. “अलेक्झांडर कोर्डा चार्ली चॅप्लिनला म्हणाला. ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या धर्तीवर चार्ली म्हणाला, ” हिटलरनेच माझ्या मिश्या चोरल्या.”
मिश्यांच्या साम्यावरून सुरू झालेल्या चर्चेतून हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यातील अनेक साम्य या दोघांना जाणवायला लागली. शरीरयष्टी, वजन, उंची इतकंच काय १८८९साली जन्माला आलेल्या या दोघांच्यात केवळ चार दिवसांचे अंतर चार्ली १६ एप्रिल तर हिटलर २० एप्रिलचा. (मृत्यू ३०एप्रिल) दोघांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले, दोघांचा भावनिक प्रवास न्यूनगंडातून आक्रमकतेत झालेला. पण दोघांच्या आक्रमकतेची धार परस्परविरोधी. एक जो आपल्या कलेतून आजही जगावर साम्राज्य करत आहे आणि एक ज्याने फाजील महत्त्वाकांक्षेपोटी स्वतःचा, जगाचा नाश केला.
चार्लीच्या डोक्यात कथाबीज रुजलं गेलं आणि त्याने बोनार्ड बेरकोविकीला घेऊन दोन वर्षे कथा, पटकथा यांवर काम केलं. विडंबन ते ही हिटलरसारख्या क्रूरकर्माचं ! जमलं तर सुदृढ हास्यविष्कार होईल नाही तर वाताहतीला आमंत्रण ! याची पुरेपूर जाणीव चार्लीला होती.
चार्ली चॅप्लिन हिटलरवर सिनेमा काढतोय समजल्यावर युनायटेड आर्टिस्ट, हॉलिवूड, अमेरिका, न्यू यॉर्क सर्वांनी उगाचच हिटलरशी पंगा घेण्याची गरज नाही, त्यामुळे अनाठायी रोष का ओढून घ्यायचा? असा भीती वजा इशारा चॅप्लिनला दिला. पण ऐकेल तो चार्ली काय? इतकं चांगलं कथानक त्याला वाया जाऊ द्यायचं नव्हतं. स्वतःचा स्टुडिओ आणि पैसा यांच्या साह्याने, आपल्या प्रतिभेच्या अस्त्राच्या जोरावर तो हिटलरशी सामना करायला सज्ज झाला.
त्याला आईने लहानपणापासून रुजवलेला मानवतावादी दृष्टिकोन सर्वत्र पोचवायचा होता. आपला हा सिनेमा बघून हिटलरचे हृदयपरिवर्तन कदाचित होऊ शकेल, असा (भाबडा) आशावाद त्याने आपल्या भावाजवळ बोलून दाखवला. झाले उलटंच चित्रपटाची प्रिंट मिळवून एकट्याने हा सिनेमा बघितल्यावर, हिटलरच्या अंगाचा तिळपापड झाला होता.
‘द ग्रेट डिक्टेटर’च्या कथानकाचा प्रभाव अगदी काल-परवापर्यंतच्या हिंदी सिनेमावर जाणवतो. दोन सारख्या चेहेऱ्याची माणसं. एक भला, एक बुरा. एक सामान्य ज्यू बार्बर पहिल्या महायुद्धात सक्तीच्या सैन्यभरतीमुळे युद्धावर गेलेला. नेहमीच्या ट्रॅम्पसारखी गोंधळ उडवून देणारी बार्बरची व्यक्तिरेखा. आपल्याही नकळत तो एका लष्करी अधिकाऱ्याचा जीव वाचवतो आणि अपघातात बेशुद्ध होतो. शुद्धीवर येतो, त्याला बराच काळ उलटून गेलेला असतो. तो आपल्या गावी परततो. मधल्या काळात खूप बदल झालेला असतो. ‘टोमानिया’ देशाच्या हुकूमशहा हिंकलची राजवट तिथे असते. या हिंकलचा चेहेरा बार्बरसारखा हुबेहुब दिसणारा. हिंकल अत्यंत आत्मकेंद्री, विषारी मनोवृत्ती असलेला हुकूमशहा असतो. हिटलरची देहबोली, मानसिकता पेश करताना चार्लीने परकाया प्रवेश केला आहे. ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुन्दर.’ म्हणावसं वाटावं इतका अप्रतिम. लाखोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायासमोर मग्रूर तितकाच नाटकी आविर्भावात जनतेच्या भावना भडकवणारा, भावनातिरेकामुळे मध्येच हंबरणारा, कर्कश आवाजात बोलणारा, जनतेच्या कमजोर मानसिकतेचा फायदा घेणारा हुकूमशहा उभा करतांना, त्याच्या क्षुद्र मनोवृत्तीच दर्शन दाखवायची एक संधी चार्ली चॅप्लिनने सोडली नाहीये.
दोन्ही पात्रातील फरक चार्लीने इतका अफलातून दर्शविला आहे की, आपण बघतानां बऱ्याचवेळा विसरून जातो की हे काम एकाच व्यक्तीने केलं आहे. पुढे हिंकलचे असुरी मनसुबे, जनतेची परवड. या परिस्थितीतही बार्बर व मैत्रिणी ऍना यांच्यातले फुलत जाणारं प्रेम. हिंकलची मत न पटणाऱ्या एक अधिकारी बार्बरला हाताशी घेऊन सत्तापरिवर्तन करू पाहतो पण त्याआधीच ती दोघे पकडली जातात. आणि ऍनाशी ताटातूट होते. मग अजून एका हुकूमशहाचं आगमन होत. मुसोलिनीवर बेतलेल्या या पात्राचं नाव नापालोनी. हिंकल आणि त्याच्यातील वरवरच्या मैत्रीच्या आड वर्चस्वाबद्दलची सुप्त चढाओढ सुरू असते. त्याचं रूपांतर शेवटी भांडणात होतं. पण जगाला टाचेखाली ठेवायचा दुष्ट हेतू, दोघांच्यात परत मैत्री व्हायला कारणीभूत ठरतो. दोघे मिळून अजून एक प्रदेश काबीज करतात. परराष्ट्र खात्याच्या गाठीभेटीच्या प्रदर्शनाची एक प्रकारे खिल्ली उडवली आहे.
इकडे बार्बर आणि तो अधिकारी जेल मधून सुटका करून घेतात. आणि नेमका त्यावेळी हिंकल सुट्टीवर गेलेला असतो. सैनिक हिंकलला बार्बर समजून पडतात आणि इकडे बार्बर हिंकलची जागा घेतो. हुकूमशहा अफाट जनतेसमोर भाषण करणार असतो. बार्बर सुरवातीला अडखळतो, गांगरतो पण मनातल्या सद्भावनां व्यक्त करतांना त्याला त्याचा नव्हे सर्वसामान्यांचा आवाज सापडतो. वैश्विक सत्याचे मर्म त्याच्या भाषणातून सर्वदूर झिरपत, पसरत जाते.
‘द ग्रेट डिक्टेटर’ काढतानां चार्लीने बारीकसारीक तपशीलांवर खूप भर दिला आहे. हिंकल भाषण करतो, तेव्हा त्याच्या कर्कश आवाजामुळे माईक सुद्धा घाबरून, दचकून मागे जातात. उंच स्टेजवरून खाली उतरत असतांना पायऱ्यांवरून हिंकल घरंगळत खाली येतो. अहंकारी माणसाचे अध:पतन व्हायला, तो स्वतःच कसा जबाबदार असतो, त्याची चुणूक दाखवली आहे. जनतेबद्दलचा कळवळा दाखवण्यासाठी गर्दीतल्या लहान बाळाला दांभिक हिंकल उचलून घेतो. अत्यंत प्रेमळ चेहऱ्याने, पोज देऊन फोटो काढतो. फोटो काढल्या काढल्या बाळाला परत करून त्रासिक चेहेऱ्याने हात साफ करतो. रस्त्यावर लोकं एक हात वर हिटलर खास स्टाईलची मानवंदना देत असतात तेव्हा दिसतात रस्त्याच्या बाजूला काही पुतळे. जगप्रसिद्ध ‘व्हेनिस द मिलो’ ( Venus de Milo) ग्रीक देवता जी प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, या स्टेच्युला एक हात बसवलेला आहे, ‘थिंकर’ पुतळा विचारवंताचे प्रतिनिधित्व करतो, तो ही एका हाताने मानवंदना करतांना दर्शविले आहेत. हुकूमशहा केवळ जनतेचीचं नव्हे तर कलावंताची, सौंदर्याची, प्रेमाची, विचारवंतांची कशी मुस्कटदाबी करतात, हे छोट्या, छोट्या गोष्टीतून दाखवलं आहे.
एका प्रसंगात हिंकल पत्र लिहून पाकिटात घालतो, तर पाकीट चिटकवण्यासाठी एक लाचार अधिकारी आपली जीभ बाहेर काढतो.
नापालोनीबरोबर खुर्ची उंच उंच करण्याचा अट्टाहास असो किंवा पृथ्वीच्या फुग्याबरोबर खेळत आत्मप्रौढीचं प्रदर्शन दर्शवणारे सीन्स तर जगप्रसिद्ध. आपल्या राजप्रसादात वेगवेगळ्या दालनात वेगवेगळ्या गोष्टी करत असताना अस्थिर, चंचल मनाचा, आत्मलुब्ध व्यक्तिमत्वचा हिंकल रंगवताना चार्ली चॅप्लिनची प्रतिभा ओसंडून गेली आहे. ऑफिसच्या कपाटाच्या आत वस्तू, फाईल नव्हे तर वेगवेगळ्या अँगलने आरसे बसवले असतात. कामं सुरू असतांना मध्येच कपाट उघडून स्वप्रतिमा न्याहाळत बसणारा नार्सिसीस्ट डिसऑर्डरने पछाडलेला हुकूमशहा.
‘आरशात पाहती कोण कोणाचे रूप
देहात दिसे का तुजला तुझे स्वरूप
बघ गेला पारा फुटला आरसा जाड
दिसले रे दिसले ‘ अरुप’ आरशाआड’
(रॉय किणीकर)
हिटलरचे हे ‘अरुप’ जगापुढे आणण्याची हिंमत फक्त एकांडा शिलेदार चार्ली चॅप्लिनचं करू शकला.
नकली हिंकलचे (बार्बरचे) शेवटचं नऊ मिनिटांचे भाषण हा मानवतावादी भूमिकेचा अर्क आहे. अजूनही ती मानवतेची हाक जगाला उपयोगी आहे, हे मात्र आपलं दुर्दैव! कुठलाही अभिनिवेश नसलेलं भाषण करतानां चार्लीचा सद्सद्विवेकी सच्चा चेहरा दिसतो. विश्वशांतीचा संदेश पोचवण्याची इतकी जास्त तळमळ चार्लीत होती की त्याने ते भाषण हजारवेळा ऐकलं.. त्यात दुरुस्ती केल्या. लोकांच्या अंत:करणात समानतेचा, लोकशाहीचा, शांततेचा प्रकाश पोहचायला हवा, त्यासाठी त्याची धडपड समजून घ्यायला हवी.
‘द ग्रेट डिक्टेटर’ हा चार्ली चॅप्लिनचा पहिला बोलपट. चित्रपटाला आवाजाची जोड मिळाली तरी चार्ली चॅप्लिनने आपल्या चित्रपटाला मूक ठेवणं पसंद केलं होतं. चेहेऱ्याची भाषा ही सर्वाना समजणारी, भाषेची जोड दिली तर मर्यादा येते, असे चार्लीचं मत होतं. पण आपलं मत चार्लीने ‘द ग्रेट डिक्टेटर’बाबत बाजूला ठेवलं.
मूळ ९ मिनिटांचे भाषण ऐकणं ही विवेकी मेजवानी आहे.
भाषणाचा सारांश – “मला माफ करा, मला सम्राट व्हायचं नाही, ती माझी इच्छा ही नाही, खरं तर ते माझं काम नाही. मला कोणावर हुकूमत, आक्रमण करायचं नाही. उलट मनुष्यजातीला मदत करायला मला आवडेल, ते करतांना मी ज्यू किंवा काळे- गोरे असा भेदभाव करणार नाही. कोणाचाही द्वेष, मत्सर करता कामा नये, ही भूमी सर्वांची आहे. लोभाने माणसाचे आत्मे पोखरलेत, जगभर द्वेष पसरलाय. माणसाने गती वाढवली पण तो स्वतःच कैद झाला, ज्ञानामुळे आपण खूप विचार करायला शिकलो आणि माणुसकी विसरलो. यंत्रापेक्षा मानवतावादाची जास्त गरज आहे. बुद्धिमत्तेपेक्षा दयाळूपणा आणि सभ्यता याची जास्त गरज. त्याच्या नसण्याने आयुष्य आणि पर्यायाने मानवजात संपून जाईल. माणसाला काम मिळेल, तरुणांना भविष्य आणि वृद्धांना सुरक्षितता देईल असे जग आपल्याला हवं आहे. एकत्र येऊ. तुम्ही दुष्ट लोकांची साथ देऊ नका. जे तुम्हाला तुच्छ लेखतात, गुलाम समजतात. शिस्तीच्या नावाखाली तुमचं विचारस्वातंत्र्य हिरावतात, लोकांचा द्वेष करायला लावतात अशा स्वार्थी लोकांना साथ देऊ नका. आपण मानवतेसाठी आणि लोककल्याणासाठी एकत्र येऊ.. एकजुटीने जगू..”
पडद्यावर काळ्या ढगाच्या आडून सूर्याची किरणे चमकत असतात, आकाश निरभ्र होत जातं.. पांढऱ्या रंगाने पडदा व्यापतो.. विश्वशांतीचा पांढरा झेंडा आपल्या मनात फडकवत राहतो..
देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.
COMMENTS