पुण्यात केमिकल कंपनीला आग – १८ मृत्यू

पुण्यात केमिकल कंपनीला आग – १८ मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात पिरंगुट जवळ औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस अॅक्वा या कंपनीला काल दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

शीला दीक्षित यांचे निधन
मेधा पाटकर यांनी उपोषण सोडले
आपले प्रजासत्ताक आणि त्यांचे रिपब्लिक

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात पिरंगुट जवळ औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस अॅक्वा या कंपनीला काल दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुळशीमधील उरवडे औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या केमिकल कंपनीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत ३७ कामगार होते. रात्रीपर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

रात्रीपर्यंत काही कामगार बेपत्ता तर १९ कामगारांना वाचवण्यात आल्याचे वृत्त होते. या कंपनीत सॅनिटायजर बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समजते.

आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब दाखल झाले होते. याशिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झाली होती. कामगारांचा शोध घेण्यासाठी कंपनीची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली.

आतल्या बाजूला असलेल्या महिला कामगार आगीत सापडल्याचे वृत्त असून, बाहेरील भागात असणारे कामगार बाहेर पळाल्याने वाचले. मात्र १८ मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून, त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. यापूर्वी या कंपनीत काही दिवसांपूर्वीच याच स्वरूपाची घटना घडल्याचेही समजते. दरम्यान आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता.

“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0