चेन्नईमधील पाणीसंकट व मान्सूनचे उशीरा आगमन

चेन्नईमधील पाणीसंकट व मान्सूनचे उशीरा आगमन

पाण्याचा योग्य वापर जर वर्षभर केला गेला तर जून महिन्यात पावसाची वाट पाहत बसावे लागणार नाही. मान्सून थोडा उशीरा जरी आला तर प्रशासनाला काळजी करण्याचे कारण उरणार नाही.

माणसाच्या आयुष्याचे सरकारला मोल नाही – उच्च न्यायालय संतप्त
तामिळनाडूत दलित युवकाची जमावाकडून हत्या
पलानीस्वामींकडे अण्णाद्रमुकचे नेतृत्व

पूर्ण देश पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. केरळमध्ये मान्सून उशीरा  पोहचल्याने महाराष्ट्रातही तो विलंबाने येत आहे. मान्सून लांबल्याने चेन्नई व बंगळुरूसारख्या मोठ्या शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे व तेथील रहिवाशी पाण्यासाठी वणवण भटकू लागले आहेत. पावसाअभावी चेन्नईत फारच बिकट परिस्थिती उद्भवली होती. चेन्नईला पाणी पुरवणारे तलाव व नद्या पूर्णपणे आटून गेल्या होत्या. गेल्या गुरुवारपासून तिथे संततधार सुरू आहे त्यामुळे थोड्याफार प्रमाणात तिथे पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे. पण पूर्णांशाने तळे व तलाव भरण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची गरज आहे. भारतीय वेधशाळा आणि ‘स्कायमेट’नी नेहमी इतका किंवा थोडा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. देशातल्या इतर भागातही बळीराजाला पीक लावायची घाई झाली आहे.

शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर का बनतोय?

मुंबई व दिल्लीची सध्याची लोकसंख्या सुमारे २ कोटी, चेन्नईची ९१ लाख, कोलकाताची ४६ लाख आणि बंगळुरूची १ कोटी ४० लाख इतकी आहे. मुंबईला पाणीपुरवठा विहार, तुलसी, भातसा, वैतरणा, तानसा आणि मोडक तलावांतून होतो, जे ठाणे व नाशिक जिल्ह्यात वसलेले आहेत. चेन्नईला वीरनाम तलावातून व इतर योजनांतून पाणी मिळते. वीरनाम तलाव चेन्नईपासून सव्वादोनशे किमी दूर आहे. इतर मोठ्या शहरांचीसुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे. शहरांची वाढती लोकसंख्या व त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची व्यवस्था करण्यासाठी नैसर्गिक ड्रेनेजवर पहिला घाला घातला जातो. मुंबई, नवी मुंबई, पुणे व इतर अनेक ठिकाणी कसे नदीच्या पात्रात किंवा खारफुटीच्या जमिनीवर भराव टाकून पाण्याचा निचरा करणाऱ्या जागांना नष्ट करण्याचे षडयंत्र उरकण्यात येत आहे हे सर्वांच्या पाहण्यात आहेच. मान्सूनपासून मिळणारे पाणी दरवर्षी समसमान नसते, त्याचे प्रमाण कमीअधिक होत असते. त्यामुळेच मिळालेल्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. जर नियोजनात काही तफावत राहिली तर त्याचा प्रतिकूल परिणाम पाण्याच्या वापरावर होतो व चेन्नईसारखी परिस्थिती उद्भवते. विजेसारखी पाणीकपात सुद्धा फक्त उन्हाळ्यातच केली जाते. पाण्याचा योग्य वापर जर वर्षभर केला गेला तर जून महिन्यात पावसाची वाट पाहत बसावे लागणार नाही. मान्सून थोडा उशीरा जरी आला तर प्रशासनाला काळजी करण्याचे कारण उरणार नाही.

ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य का आहे?

महाराष्ट्रातील उत्तरपूर्व भागातील लातूर, नागपूर, सोलापूरसारख्या ठिकाणी, व इतर ठिकाणच्या ग्रामीण भागात पाण्याचे संकट वाढत चालले आहे. ग्रामीण भागात टँकरने पाणी पुरवले जाते. शहरी भागात लोकं दाटीवाटीने राहत असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवणे सोपे असते. पण आपली खेडी विखुरलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत नळाने पाणी पोहोचवणे फार खर्चाचे होऊन जाते. तिथे विहिरी व बोरवेल खणून पाण्याची व्यवस्था केली जाते. पण तिथेही लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची गरज वाढते आहे. मान्सूनवाटे जितके पाणी भूस्तराखाली झिरपते त्यापेक्षाही जास्त पाणी बाहेर उपसले जाते. तसेच, ज्या ठिकाणी मान्सून सक्रिय नसतो किंवा अल्प प्रमाणात बरसतो तिथेही लोकवस्ती वाढल्याने पाण्याची कमतरता जाणवते आहे.

तंत्रज्ञानाचा उपयोग

गेल्या वर्षी द. आफ्रिकेतील ‘केप टाऊन’चा डे झीरो लोकांच्या लक्षात आहे. तिथेही चेन्नईसारखीच परिस्थिती उद्भवली होती. पाण्याचा पूर्ण बोजवारा वाजला होता. पाण्यासाठी तिथले रहिवाशी वणवण भटकत होते. चेन्नईच्या काही भागातच पाण्याचा अभाव होता व परिस्थिती तितकीशी हाताबाहेर गेली नव्हती. पण चांगला मान्सून झाला नाही तर देशात कित्येक ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते टाळायचे असेल तर पाण्याचे योग्य नियोजन व वापर करणे गरजेचे आहे. नासाचे उपग्रह अवकाशात फिरत तर आहेतच पण इसरोचे उपग्रह सुद्धा आपल्या देशावर अवकाशातून लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी देशाच्या अखत्यारीत असणाऱ्या साऱ्या भूस्तरीय बिंदूंचे छायांकन केले आहे. वेगवेगळ्या कालावधीचे नकाशे नजरेखालून घातल्यानंतर त्यांच्यातील बदल आपल्या लक्षात येतात.

काही दशकांपूर्वी एखाद्या धरणात किती पाणी जमा किंवा शिल्लक आहे याचे मूल्यमापन प्रमाणपट्टी बघून केले जायचे. पण आज त्याची गरज नाही. धरण भरल्यानंतर त्याची व्याप्ती व प्रमाण उपग्रहाने चित्रित करता येईल. हे केल्यानंतर त्या धरणाचे हिवाळ्यात दर महिन्याला, व उन्हाळ्यात प्रत्येक आठवड्याला किती पाणी उरलेले आहे त्याचे मूल्यांकन व मूल्यमापन करून, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली तर नियोजन करायला सोपे जाईल. यामुळे पारदर्शीपणा वाढेल व लोकं अधिक जबाबदारीने पाण्याचा वापर करतील. महाराष्ट्रात व देशात प्रत्येकी ३-४ जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ देण्यात आले आहे. या साऱ्या विद्यापीठात GIS व रिमोट सेन्सिंगचा अभ्यासक्रम शिकवला जातो. इथल्या शिक्षकांना व विद्यार्थ्याना त्यांच्या जिल्ह्यातील धरणांवर किंवा तलावांवर लक्ष ठेवण्यास सांगितले तर पाण्याचे नियोजन अधिकच सोपे व परिणामकारक होऊन जाईल. महाविद्यालयीन युवक युवतींनाहि या उपक्रमात सामावून घेता येईल.

पाऊस येतो कुठून?

पाऊस आपल्यासोबत पाणी, वीज, हिरवळ, गारवा व सुखसमाधान घेऊन येतो. तो आपल्याबरोबर पूर, महापूर, ओला दुष्काळ व भीती सुद्धा घेऊन येतो. प्रमाणात पाऊस पडला तर आनंदीआनंद व कमी किंवा प्रमाणाबाहेर पडला तर जीवाला घोर लावून जातो. भारतात पावसाला मान्सून म्हणतात व सामान्यपणे याचे आगमन ठराविक वेळेतच इथे होत असते.

५ ते १० जूनपर्यंत मान्सूनचे आगमन केरळात होत असते व तेथून मान्सून योग्य कालावधीत संपूर्ण भारतभर पोहोचतो. मान्सून हा ‘मौसीईम’ या एका अरबी शब्दाचा अपभ्रंश आहे. जमीन व समुद्रातील पाण्याचे साठे सूर्याची ऊर्जा समसमानपणे स्वतःमध्ये अधिग्रहित करत नसतात. त्यांच्यात ऊर्जा साठवण्याची क्षमता एकसारखी नसते. जमीन लवकर तापते व ऊर्जेचा स्रोत संपल्यानंतर ती लगेच थंड होते. पाण्याची मात्र ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता व कालावधी जरा जास्त असतो. त्यामुळे आपल्या अवतीभोवतीच्या परिक्षेत्रातील जमीन व समुद्रातील ऊर्जा साठवणुकीत कमालीचा फरक अस्तित्वात असतो.

पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरत असते तशीच ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. या फिरकीदरम्यान पृथ्वी काही अंशाने कललेली असते. त्यामुळे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा साऱ्या ग्रहावर समप्रमाणात पसरलेली नसते. त्याचबरोबर या कलण्यामुळे सूर्याचे पृथ्वीसापेक्ष स्थान बदलत राहते. या बदलत्या स्थानामुळे कधी सूर्य कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या माथ्यावर पूर्ण तेजाने तळपत राहतो. अशावेळी तिथली जमीन व पाणीसाठा इतर ठिकाणांपेक्षा जास्त तापतो. साहजिकच तिथे तापमान विसंगती तयार होते व कमी दाबाचा पट्टा तयार होतो व आजूबाजूची थंड हवा तिकडे झेप घेते.

भारताची भौगोलिक स्थिती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. महासागराच्या पाण्याने तिला ३ दिशांनी वेढलेले आहे व हिमालयाच्या पर्वतशृंखलेने तिला एका बाजूने कुंपण घातलेले आहे. तर एका कोपऱ्यात थारचे वाळवंट दबा धरून बसलेले आहे. मान्सूनउत्पत्तीसाठी हि भूसंरचना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. हवेचा प्रवाह जमिनीकडून सागराकडे होत असताना त्याच्यात आर्द्रता कमी प्रमाणात असते, पण जेव्हा हाच प्रवाह सागराकडून जमिनीकडे वाहतो तेव्हा त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात आर्द्रता सामावलेली असते. वातावरणातील ही आर्द्रता जेव्हा पाण्याच्या स्वरूपात खाली पडते तेव्हा पाऊस पडला असे आपण म्हणतो.

मान्सून उद्गमाचे सिद्धांत

जमीन व पाण्याच्या तापमान विसंगतीमुळे मान्सूनची उत्पत्ती होते. भारतीय महासागरावरून वाहणारे वारे जमिनीकडे प्रवास करताना स्वतःबरोबर आर्द्रतेच्या रूपात महासागराचे पाणी घेऊन येते. तापमान विसंगतीमुळे ही स्थिती निर्माण होते. जमिनीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महासागराचे पाणी हवेच्या प्रवाहाबरोबर मान्सूनच्या रूपात भारतावर पडते. एडमंड हॅले यांनी मान्सूनसंबंधी तापमान विसंगतीचा पहिला सिद्धांत मांडला होता. पण आधुनिक विज्ञानाच्या आधारे या सिद्धांतात अनेक बदल घडलेले आहेत.

अलीकडच्या एका सिद्धांतानुसार कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या संगमामुळे वातावरणात एक पट्टा तयार होतो ज्याला ‘इंटरट्रॉपिकल कन्व्हरजेन्स झोन’ म्हणतात. या क्षेत्राच्या निर्मितीमुळे मान्सून तयार होतो. या सिद्धांताला भारतीय शास्त्रज्ञांनी अनुकूलता दर्शवली आहे.

जर्मनीचे सेहेरहग यांनी सांगितले आहे की, वातावरणात ज्या अनेक पातळ्या आहेत त्यांच्यात गतिकीय बदल घडत असतात ज्यामुळे मान्सून निर्माण होतो. फ्लोण यांच्यानुसार वातावरणात हवेचे व विषम दाबाचे पट्टे निर्माण होत असतात. या पट्ट्यांना जमीन व पाण्याची तापमान विसंगती प्रभावित करू शकत नाही, पण सूर्याची ऊर्जा निश्चितच प्रभावित करू शकते.

जेट स्ट्रीम हा एका नवा सिद्धांत सध्या मांडला जातोय. या सिद्धांतानुसार वातावरणाच्या अगदी कमाल उंचीच्या क्षेत्रात विषुवृत्ताच्या समांतर रेषेत वारे वाहत असते. या हवेचा प्रवाह एका सरळ रेषेत नसतो तर वेडावाकडा असतो. हिवाळ्यात हे वारे हिमालयाकडे कूच करते. पण तिथे या वाऱ्याला तिबेटीय पठाराचा अडथळा होतो व तो दोन तुकड्यात विभागला जातो. कालांतराने तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो व पाऊस पडू लागतो.

जागतिक गतिकीय हालचालींचा मान्सूनवर प्रभाव

मान्सूनची निर्मिती जागतिकस्तरावर घडणाऱ्या घडामोडींशीसुद्धा निगडित आहे. वातावरणात व भूस्तरावर, तसेच तिच्या गर्भात घडणाऱ्या अनेक क्रियाप्रक्रिया, मान्सूनवर आपला प्रभाव टाकत असतात. प्रशांत व अटलांटिक महासागर भारतापासून हजारो किमी अंतरावर वसलेला आहे. पण या महासागराच्या पृष्टीय तापमानाचा अनुकूल-प्रतिकूल परिणाम इथल्या पावसावर होत असतो. पेरू देशाजवळील प्रशांत महासागराच्या पृष्ठीय तापमानाचा फायदा व फटका इथल्या मान्सूनवर पडत असतो. ‘एल निनो’ व ‘ला नीना’चा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव भारतात दुष्काळ निर्माण करण्याची ताकद आपल्या अंगी बाळगून असतात.

सूर्यडागांचाही प्रभाव मान्सूनवर पडत असतो. जेव्हा सूर्यावर जास्त प्रमाणात काळे डाग असतात तेव्हा तिथे मोठया प्रमाणात गतिकीय हालचाली सुरु असतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर सूर्यापासून ऊर्जा बाहेर फेकली जाते. पृथ्वीवर ही अधिकची ऊर्जा अनेक नैसर्गिक प्रक्रियांना प्रभावित करते. वातावरणातील अनेक पातळ्या तापमानवाढीमुळे आपल्या प्रवाहापासून विचलित होतात. ‘फोनी’ व ‘वायू’ चक्रीवादळाचा परिणाम आपण अनुभवतच आहोत. जो मान्सून आपल्याला एका आठवड्यापूर्वी न्हाऊन काढणार होता तो अजूनही गायब आहे.

या वर्षी पावसाचे प्रमाण पूर्णपणे समाधानकारक असावे ही आशा धरूनच पाण्याचे नियोजन करावे लागेल.

प्रविण गवळी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओसायन्समध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0