मुनव्वर फारुकीचा शो रद्द करण्याची बजरंग दलाची मागणी

मुनव्वर फारुकीचा शो रद्द करण्याची बजरंग दलाची मागणी

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने रायपूर प्रशासनाला धमकी दिली असून, म्हटले आहे, की जर कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या शोला परवानगी दिली, तर ते त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम थांबवतील. हा शो १४ नोव्हेंबरला होणार आहे.

बडोदा विद्यापीठाची सूडबुद्धी
मुनव्वर फारुखीचा कर्नाटकातील कार्यक्रम रद्द
वाराणसीत बिगर हिंदूंच्या प्रवेशास बंदीची पोस्टर

नवी दिल्ली: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या शोला परवानगी दिल्यास आंदोलन करण्याची धमकी छत्तीसगडमधील उजव्या हिंदू गटांनी रायपूरच्या स्थानिक प्रशासनाला दिली आहे.

हा शो १४ नोव्हेंबरला होणार आहे आणि विश्व हिंदू परिषदेसह इतर गटांनी तो रद्द न केल्यास, बंद करण्याची धमकी दिली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, विहिंप आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी सोमवारी ८ नोव्हेंबरला स्थानिक पोलिसांची भेट घेतली आणि शो रद्द करण्याची मागणी केली.

व्हीएचपीचे नेते संतोष चौधरी म्हणाले, “फारूकी यांनी यापूर्वी आमच्या देवांची खिल्ली उडवली होती आणि अशा हिंदूविरोधी लोकांना राजधानीत परवानगी दिली जाऊ नये. प्रशासनाने परवानगी दिली तर याला प्रशासन जबाबदार असेल कारण आम्ही आमच्या पद्धतीने कार्यक्रम बंद पाडू.”

रायपूरमधील कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले, की ते अद्याप शोच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

रायपूरचे जिल्हाधिकारी सौरभ कुमार यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले, “आम्हाला या शोसाठी परवानगी मागणारा अर्ज मिळाला आहे, ज्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. हॉटेलमध्ये होणाऱ्या या शोसाठी सुरक्षेची मागणीही आयोजकांनी केली आहे. हा अर्ज पोलिसांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.”

गेल्या महिन्यातही, हिंदुत्ववादी गट बजरंग दलाच्या सदस्यांनी गुजरातमधून मुंबईत येऊन कार्यक्रमस्थळाच्या मालकांना धमकावल्याने फारुकीचे दोन शो रद्द करण्यात आले होते.

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच उजव्या विचारसरणीच्या गटांनी फारुकी यांना लक्ष्य केले आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमधील भाजप आमदार मालिनी लक्ष्मण सिंह गौर यांचा मुलगा एकलव्य सिंह गौर यांच्या तक्रारीनंतर या वर्षी १ जानेवारी रोजी इंदूर पोलिसांनी फारुकी आणि नलिन यादव, एडविन अँथनी, प्रखर व्यास, प्रियम व्यास आणि नलिन यादव अशा इतर पाच जणांना अटक केली केली होती.

एकलव्य सिंह गौर यांनी गुन्हा नोंदवताना आपल्या कार्यक्रमात हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मुनव्वरला अटक करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी नंतर कबूल केले की फारुकीने असे कोणतेही विधान केले नव्हते.

एक महिन्याहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर मुनव्वर फारुकी यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

तत्पूर्वी, फारुकीचा जामीन अर्ज फेटाळताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले होते, की सौहार्द आणि बंधुभावाची भावना वाढवणे हे प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य आहे. “अशा लोकांना सोडले जाऊ नये”, असेही न्यायालयाने म्हटले होते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: