सूर निरागस हो..

सूर निरागस हो..

सगळ्या प्रकारचं संगीत मुलांना बालपणापासून ऐकायला मिळालं तर मुलांचा सांगीतिक आणि वैयक्तिक विकास उत्तम होऊ शकेल. लहानपणापासून जे संगीत किंवा काव्य कानावर पडते, त्यातून मुलांच्या भाषेचा विकास होऊन त्यांच्या भाषेतून मिळणाऱ्या प्रतिमांचा, शब्दांचा, कल्पनांचा आकृतिबंध बालमनात तयार होत जातो.

बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू
हरिद्वार कुंभ मेळ्यात १००० कोरोना रुग्ण आढळले
आंदोलन तीव्र करण्याची शेतकऱ्यांची रणनीती

एक एप्रिलपासून वर्तमानपत्रं सुरू झाली. ताबडतोब एक दोन दिवसापासून ती तत्परतेने बंदही झाली. मग सहा तारखेपासून पुनः सुरू झाली. परंतु माझी आवडती शब्दकोडी सोडल्यास त्यात फक्त कोरोना – कोरोनाच होता! पण मोठ्ठा टोला हाणला कॉलनीतल्या दोन छोट्यांनी ! “आजी, तुम्ही कशा बाहेर पडलात? हं, आणि कोरोनाबद्दल अजिबात बोलायचं नाही हां. बोsssर झालोय आम्ही.” “नाही बाबा बोलत, पण तुम्ही आत जा बघूं!” असं मी म्हणेपर्यंत त्यांना घरातून हाका आल्याच.

तुमचंही तेच झालं असणार म्हणून मी वेगळ्याच छान विषयाकडे वळते. तरुण आईबाबांना आणि असलेच त्यांच्याबरोबर त्यांचे आईबाबा, तर त्यांनाही आवडेल. लहान मुलांसाठी संगीत हा आजचा विषय.

बालसंगीत

मानवी मनाच्या पहिल्या आविष्कारासाठी संगीतकलेचा वापर झाला असे मानतात. हे खरंही असावं. लहान बाळ – अगदी तान्हं म्हणजे दोन – तीन महिन्यांचं – पाहता आल्यास ही गोष्ट सहज लक्षात येते. घशातून, तोंडातून चित्रविचित्र नाद काढत बाळ मजेत पहुडलेलं असतं. स्वतःसाठी स्वतःच संगीत निर्माण करीत असतं असं वाटावं इतकं त्यात ते दंग झालेलं आपण पाहतो. वेगवेगळे आवाज काढत ते हळूहळू शब्दांपर्यंत येऊन पोचतं आणि यथावकाश भाषा बोलूही लागतं. पण त्याधीच ते फुरफुर आणि बमबम असे आवाज करत तो त्याचा प्रथम आविष्कारच असतो. शिवाय तान्हेपणीच, ते गाण्यांतला आनंद अनुभवायला शिकतं. त्याशिवाय अंगाई गीतांची लयबद्ध निर्मिती झालीच नसती. आईचं गाणं गुणगुणणे बाळाला मनापासून आवडतं आणि सुखावह वाटतं.

गर्भातून बाहेर आल्यानंतर मूल श्वास घेतं, डोळे उघडतं आणि त्याचं इतर चलनवलन सुरू होतं. त्याचे कान मात्र गर्भावस्थेतही सक्षम असतात. कृष्णाने सांगितलेली चक्रव्युहाची कथा आणि गर्भावस्थेतही हुंकार देणारा अभिमन्यू आपल्याला माहित आहेच. पन्नास वर्षांपूर्वी डॉ. वेर्गीस नावाच्या अमेरिकन प्रसुतीशास्त्रज्ञ डॉक्टरांनी काही प्रयोग केले. त्यांचं म्हणणं असं आहे, की गर्भातील मूल सहा महिन्यांचं झालं की त्याला बऱ्याच गोष्टींच्या संवेदना होतात आणि त्याच्या कानाला तर खूपच गोष्टी ऐकू येतात. प्रसुतीपूर्वीच्या काळात रेकॉंर्डिंग करून त्यांच्या असं लक्षात आलं की मुलाच्या कानानं डॉक्टर-नर्सचे आवाज, उपकरणांचा खणखणाट, आणि मुद्दाम वाजवलेले शास्त्रीय संगीत, येवढं सगळं सहजतेने टिपलं होतं. हे सगळं लिहायचा उद्देश असा की श्रवणेंद्रिय हे फार लवकर तयार होत असतं आणि त्याच्याद्वारे मिळणारं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता मानवाच्या मुलात लौकर येते.

कानांचा – श्रवणेंन्द्रियांचा – आणखी एक विशेष असा आहे की ते सदैव, सर्वकाळ सजग असतात. सर्व दिशांकडून ध्वनी ग्रहण करण्याची क्षमताही त्यांच्यात असते. रात्री, दिवसा, जागेपणी आणि झोपेतसुद्धा आपल्याला आवाज ऐकू येऊ शकतात. डोळे जसे सहज बंद करता येतात तसे सहज कान बंद करता येत नाहीत. इच्छा असली तरी बंद करून घेता येत नाहीत. कानांच्या या वैशिष्ट्यांमुळे जसा आपल्याला त्रास होऊ शकतो, तसंच कानांमुळे आपल्याला ज्ञान प्राप्ती होऊ शकते. श्रवण भक्ती नसलेल्या माणसाची अवस्था खरं म्हणजे अंधांहून बिकट असते. ते आपल्याला अजिबात खरं वाटतं नाही, त्यामुळे तर त्यांची समस्या जास्त तीव्र बनते. साधी गोष्ट घेऊ. अंधाबद्दल सर्वसाधारण माणसाला जेवढी सहानुभूती सहजतः वाटते, तेवढी बधिरांबद्दल वाटत नाही. उलट “ए बहिरटा” असं लोक सहज म्हणून जातात. शिवाय केवळ ऐकू न आल्यामुळे बोलता येत नाही हा एक गैरफायदा असतोच. कान हे अतिमहत्त्वाचं, ज्ञानसाधनेचं इंद्रिय आहे आणि मुलांना संगीतातून ज्ञानप्राप्ती होते हे मोठ्या माणसांना जेवढ्या लौकर कळेल तेवढं उत्तम.

आपल्या देशात, संगीत हे आपल्या विविध धर्मांसारखे आहे असं मला वाटतं. सगळ्या प्रकारचं संगीत मुलांना बालपणापासून ऐकायला मिळालं तर मुलांचा सांगीतिक आणि वैयक्तिक विकास उत्तम होऊ शकेल. लहानपणापासून जे संगीत किंवा काव्य कानावर पडते, त्यातून मुलांच्या भाषेचा विकास होऊन त्यांच्या भाषेतून मिळणाऱ्या प्रतिमांचा, शब्दांचा, कल्पनांचा आकृतिबंध बालमनात तयार होत जातो. हे सगळं अगदी साध्या-साध्या गोष्टींनी तयार होतं जातं, आणि आपोआप होतं. मुळात लहान मुलांची छोटीछोटी गाणी त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देत असतात. अगदी लहान वयात खूप आणि वेगवेगळी गाणी ऐकणाऱ्या मुलांना बहुदाः आपली ओळी-दोन ओळींची गाणी तयार करण्याचा छंद जडतो. शिवाय येणाऱ्या गाण्यातल्या संगीतिकतेमुळे [म्युझिकॅलीटी] संगीत ह्या कलेशी अगदी बालपणी आपोआप नाते जडते. बालपणापासून जांच्या कानांवर संगीत पडते, त्यांच्यासाठी मग संगीत रसग्रहणाचे वर्ग मोठेपणी घ्यायला लागत नाहीत. जवळजवळ ९९% टक्के मुलांना संगीत ऐकायला आवडते असे मी आतापर्यंतच्या अनुभवावरून सहज म्हणू शकेन आणि जेवढे वय लहान तेवढे जास्तीत जास्त प्रकारचे विविध संगीत ऐकवावे, ऐकण्याची संधी मिळवून द्यावी असेही म्हणेन.

संगीतीकतेच्या जाणिवेबरोबर सहजतः गाणी म्हणता आली की व्यक्तीमत्वाविकासालाही मदत होते. आपल्या आवाजावर थोडीफार हुकुमत मिळवून आपण सादर करत असलेलं लहानसंच गाणं ह्यातून लहान मुलांना जो आनंद मिळतो, त्यानं साहजिकच त्यां मुलांना आत्मविश्वास येतो. त्याच्या गाण्याचे त्यानं चारचौघांसमोर येताजाता प्रदर्शन केलं पाहिजे असं अजिबात नाही. पण खेळता-खेळता, अंघोळ करताना, सायकल चालवताना, लहान मुलं स्वतःशीच गाणी म्हणत असतात, त्यावेळची त्यांची तन्मयता आणि त्याचा आनंद ह्यातूनही त्यांना आत्मविश्वास मिळतो. काहीकाही मुलांना आल्यागेल्यांसमोर अशी गाणी म्हणून दाखवण्याची हौस असते, नाही असे नाही. पण बहुसंख्य मुलांच्या आईबाबांना ही हौस जास्त असते. मारून-मुटकून मुलांना सभाधीट बनविण्याचे प्रयत्न करू नयेत. सभाधीटपणाखेरीजही अनेक गुण असतात.

लहान मुलांच्या गाण्याचा त्यांना होणारा एक अत्यंत मोठा फायदा म्हणजे स्मरणशक्तीची वाढ. स्मरणशक्ती हा बुद्धिमत्तेचाच एक पैलू आहे आणि इतर अनेक पैलूंप्रमाणे तो महत्त्वाचा आहे. शिवाय तो घासूनपुसून लखलखीत ठेवून आपल्या बुद्धीच्या वाढीसाठी वापरणं ह्यात कोणताही कमीपणा नाही. शिक्षणात येणाऱ्या नवनवीन प्रवाहांमुळे काही जुन्या परंतु उपयोगी गोष्टींची कुचेष्टा करण्याची फॅशन पडते आहे. त्यातच स्मरणशक्तीचा उपहास ही बाब येते. स्मरणशक्तीला घोकंपट्टी म्हणून कमी लेखण्यात येते. स्मरणशक्ती ही चांगलीच गोष्ट आहे. तिचा उपयोग कमीपणाचा किंवा उच्च ठरू शकतो. उदा. धड्यावरची प्रश्नोत्तरे पाठ करून लिहिणे हा स्मरणशक्तीचा दुरुपयोग आहे, परंतु पाढे, श्लोक, कविता, उतारे, नाटकातील वाक्ये पाठ करणे हा स्मरणशक्तीचा सदुपयोगच आहे. बाळपणी जी असंख्य गाणी मुलें शिकतात किंवा शिकू शकतात त्यांनी ह्या स्मरणशक्तीला व्यायाम होतो. बालगीतांमुळे, लहानपणी सतत गाणी गात राहिल्यामुळे, असंख्य गाणी शिकल्यामुळे स्मरणशक्ती पक्की होत जाते, तिला व्यायाम मिळतो.

गाण्यामुळे मुलांचा शब्द संग्रह वाढत जातो. कित्येक नवनव्या शब्दांची ओळख मुलांना गाण्यातून सहजी होते. आपण गात असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मुलाला कळतो अथवा कळावा असा माझा दावा नाही. अजिबात नाही. परंतु अर्थाच्याही पलीकडे जाणारी एक प्रचीती असते, ती संगीतामुळे मुलाच्या मनात हळूहळू मूळ धरू लागते, त्या मुलाच्या मनोभूमितच आणखी मुळे फुटतात आणि ती मुलांच्या मानसिकतेत घट्ट बसून हळूहळू अर्थाचे धुमारे फुटतात. त्यामुळे ह्या वयात आपण जी काही गाणी, काव्ये, श्लोक, बालगीतं मुलांना शिकवितो ती मुलांच्या मानसिक आणि सांस्कृतिक विकासावर परिणाम करतात असे मला वाटते.

एकदा पंडित भास्कर चंदावरकर त्यांच्या व्याख्यानात म्हणाले, “कपडे, जेवण-खाण, दागदागिने, बाह्य-राहणी आणि भाषासुद्धा आपण इतरांकडून जितक्या सहजतेने आत्मसात करतो, तेवढ्या लवकर आपण इतरांचं संगीत घेत नाही. आपले संगीत आपल्या अस्मितेचा, व्यक्तीमत्वाचा अत्यंत आंतरिक मूळ गाभा असतो. ह्या बालगीतातून, लहानपणी ऐकल्या जाणाऱ्या आणि मनावर ठसणाऱ्या गाण्यातून सांस्कृतिक-अभिसरण होत असतं म्हणून भारतीय मुलांनी बालपणी आपल्या भाषेतील गाणी, हिंदी गाणी, जुन्या कविता आणि श्लोक, काही लोकगीतं, काही शास्त्रीय संगीत हे सगळं ऐकावं अशी माझी अपेक्षा असते.”

भाषाज्ञान, शब्द संग्रह याबरोबरच बालसंगीतामुळे मुलांना तालाचं आणि लयीचंही ज्ञान मिळते. असं म्हणतात की लय ही अंगभूत असते. ती शिकवून येत नाही. ताल शिकवता येतो. काही थोड्याच मुलांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांना लय जमत नाही. बहुसंख्य मुलांना इतरांबरोबर ताल पकडता येतो. परवा एका ठिकाणी मराठी संस्कृती जपण्यासाठी लहान मुलांना बालपणापासून मराठी बडबडगीत – गाणी शिकवायलाच हवी यावर चर्चा चालली होती. मुळात आपण संस्कृतीला जपत नसून संस्कृती आपल्याला जपत असते असं मला वाटतं. त्या चर्चेत  भाषाज्ञान, शब्दसंग्रह आणि संगीत ह्या मुद्यांवर मी बोलायला लागल्यावर तिथल्या अधिकारी व्यक्ती मला म्हणाल्या, “हे सगळं नको बरं का, आपण त्या गाण्यांचा मराठी संस्कृतीशी कसा संबंध आहे एवढ्यापुरतच बोलायचं.” शेवटी संस्कृती म्हणजे काय? ती प्रामुख्याने आपल्या भाषेशी निगडीत आहे, ती भाषा आपण कशी बोलतो, कशी वापरतो हिच्याशी संस्कृतीचा अविभाज्य संबंध नाही का?

कधी कधी मला गम्मत वाटते – गम्मत की विषाद कोण जाणे – की हल्ली कित्येक तीन वर्षांच्या मुलांना “ये रे ये ये पावसा” गाणं म्हणता येत नाही की जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही. ह्यातल्या कशात संस्कृती आहे नि कशात नाही म्हणायचं?

मला खूप वाटतं की मराठी मुलांना बालपणापासून “अडगुलं-मडगुलं”, “इथे इथे बस रे मोरा”, “ही माझी सोन्याची सखुबाई बरं का”, “अटक-मटक चवळी चटक”सारखी बडबडगीतं आणि गाणी कानावर पडावीत. या वयात ऐकू आलेलं सगळं; मुलं पटकन उचलतात, म्हणतात. लहान मुलांना त्यांच्या मातृभाषेतले थोडं जुनं काव्य, जे सहज गेय असेल, ते शिकवावं असंही मला वाटतं. म्हणजे मुलांना गाणी, बडबडगीतांच्या बरोबरीने मोरोपंतांची आर्या, बहिणाबाईंची ओवी आणि तुकारामाचा अभंग बालपणीचा शिकवावा. तीन वर्षांचं मूल हे सहजपणे आणि आनंदाने म्हणते, फक्त ते कानावर पडायला हवे. आमच्या बालशाळेतील पाच-साडेपाच वर्षाची दोनशे मुलं ज्ञानेश्वरांचे पसायदान एकेकट्याने किंवा सगळ्या वर्गाबरोबर अगदी सहज म्हणतात. मी जर मद्रासच्या शाळेत शिकवत असते तरी तिथल्या मुलांनी बालपणी सुब्रमण्यम भारतीयार याचं थोडं तरी काव्य पाठ करावं असा हट्ट धरला असता. आमच्या बालशाळेत ऑगस्टमध्ये दोन-सव्वादोन वर्षाची मुलं प्ले-ग्रूपमध्ये येतात. त्यांचा वर्ग सुरक्षिततेसाठी आणि विपुल जागेच्या अभावी पहिल्या मजल्यावर आहे. त्यांना खेळताना जास्त उन्ह लागू नये म्हणून शाळेच्या मागच्या अंगणात आम्ही एक छोटंसं स्पेस-structure  [मध्ये खांब नसलेलं छप्परवजा बांधकाम] बांधलेलं आहे. त्या जागेला आपण सगळ्याजणी “स्पेस-structure” असेच म्हणत जाऊ म्हणजे मुलंही आपोआपच म्हणतील असं ठरवून आम्ही तसाच उल्लेख करत असू आणि खरोखरच दोन- अडीच वर्षाची बहुसंख्य मुलं त्या जागेला सर्रास “स्पेस-structure” असं अगदी व्यवस्थित म्हणत असत. ज्यांना ऐकून-ऐकून “स्पेस-structure”  असं म्हणता येतं त्यांना “सुसंगति सदा घडो” म्हणता येणार नाही का? चांगले शब्द सुस्वरासाहित मुलांच्या तोंडी रुळले की त्यांना शब्दाचं सौदर्य आणि नादमाधुर्य कळायला लागते. हळूहळू वाढत्या वयाबरोबर भाषेचा अर्थ प्रतीत व्हायला लागतो.

मधला मराठीच्या दृष्टीने खंडित झालेला प्रवाह पुढे न्यायचा असेल तर घरातून प्रयत्न व्हायला हवेतच, आणि शाळा ह्या परिणामकारक संस्थेने त्यात भाग घेतलाच पाहिजे असं मला वाटतं.

प्रत्येक बालशाळेने सुंदर पारंपरिक गीतं आणि बडबडगीतं मुलांपर्यंत पोचवायलाच हवीत. हल्ली प्रत्येक बालशाळांतून “ट ला ट, री ला री” “जन म्हणे काव्य करणारी” अशा कवियित्रींच उदंड पीक आलंय. गरीब बिचाऱ्या बालकांच्या कानांवर आणि मनांवर या बाया आपली सुमार गाणी आणि भिकार कविता थोपत असतात. त्यांना आवर घालायचा कोणी? त्यातला एखादीचे एखादं गाणं चांगलं असतं पण एकंदरीत काव्यगुण आणि गीतसंगीत पाहू गेल्यास आनंदच असतो! जुनी, पारंपरिक, किंवा नवी चांगली खूप गाणी-गीतं शिकवल्यानंतर एखादं आपलं गीत, कविता शिकवायला हरकत नाही. परंतु सदानकदा नवीच गाणी मुलांच्या माथी मारली, तर ज्याला आपण आपलं सांगीतिक काव्यधन म्हणतो, त्याचा वारसा मुलांपर्यंत पोचणार कसा? शिवाय आपल्याकडे  विंदा करंदीकर, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पदकी, लीला भागावत यांच्यासारखे मुलांसाठी उत्तम गीत लिहिणारे कवी-कवयित्री आहेत. त्यांच्या गीतांची भर जुन्या गाण्यात घालून जर ती आपण मुलांना शिकवली ते ते खरं सांगीतिक आणि सांस्कृतिक अभिसरण होईल. “सारखं आपलं दर वर्षी ‘बा – बा – ब्लाकशिप’ असं शिकवून तुम्हला कंटाळा नाही का हो येत?” असा प्रश्न मला विचारला जातो. “Ba Ba Blackship’ आणि “Jack and Jill” सारख्या गाण्यांना “ये रे ये रे पावसा”, “चांदोबा चांदोबा भागलास का” ह्या गाण्यांसारखे वजन त्यांच्यातील अभिजातपणामुळे आलेलं असतं. ते प्रत्येक मुलापर्यंत पोचवणं, तो वारसा मुलांच्या हवाली करणं हे बालशिक्षिकेच एक उत्तरदायित्व असतं. “नाच रे मोरा, आंब्याच्या वनात” सारखी उत्तम काव्य आणि संगीत असलेली गाणी हळूहळू  “ये रे ये रे पावसा” सारख्या गीतांच्या पंगतीत जाऊन बसतात  आणि हे सांगीतिक धन समृद्ध करीत असतात.

अशी ही बालशाळेतील तीन-चार वर्षाची सांगीतिक शिदोरी असते. ही शिदोरी जन्मभर पुरणार नाहीच, पण ही केवळ पायाभरणी आहे. अशा बाल संगीताच्या पायावर पुढची भक्कम उभारणी करता येणे शक्य आहे. त्यातून पुढे सांगीतिक आनंद, सृजनशीलता आणि आपली मराठी संस्कृती जोपासली जाईल.

मीना चंदावरकर या बालशिक्षणतज्ज्ञ असून, पुण्यातील अभिनव विद्यालय (इंग्रजी माध्यम) व न्यू इंडिया स्कूलमार्फत त्यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गेली ४० वर्षे विविध उपक्रम चालवले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0