शांतता! खेळ सुरू आहे…

शांतता! खेळ सुरू आहे…

जन्मापासून बालकाची वाढ वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी होते, बुद्धी, भावना, तर्क, विचार हे कसे विकसित होत जातात. त्यावर बालकाचे व्यक्तिमत्त्व घडते. मुलांच्या वाढीत ‘अनुकरण’ या घटकाचा प्रभाव सर्वात जास्त आढळतो. बालदिनाच्या निमित्ताने..

गणेश आगमन- विसर्जन मिरवणूका नकोः राज्य सरकार
एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतनः ५०० कोटी तातडीने वितरित
मोहम्मद अखुंड अफगाणिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

दोन मुलांच्या खेळातील चढाओढ या विषयावर सत्यजित राय यांची ‘Two’ नावाची शॉर्टफिल्म आहे. १३ मिनिटांच्या या मूकपटातून सत्यजित राय यांनी मुलांच्या खेळण्यातून भोवतालच्या सामाजिक पर्यावरणावर तीव्र भाष्य केले आहे. या कथेला अनेक कंगोरे आहेत. हा लघुपट प्रतिकात्मक असून जागतिक राजकारणावर भाष्य करणारा आहे. असे जाणकारांचे मत आहे. खेळण्याच्या चुरशीतून मुलांच्या मनोव्यापाराचे अचंबित दर्शन या गोष्टीला इथे प्राधान्य दिले आहे.

संक्षिप्त कथानक-

एका मोठ्या बंगल्यात एक मुलगा एकटा आहे. नुकताच एखादा समारंभ होऊन गेल्याच्या खुणा दिसतात. मुलगा कोकोकोलाची बाटली पीत घरात इकडे-तिकडे फिरतो. वेळ घालविण्यासाठी आजूबाजूला पडलेले फुगे तो काडीपेटीच्या काडीने फोडतो. त्याचाही कंटाळा आल्याने तो  दुसऱ्या खोलीत येतो. तिथे अनेक विशेषतः परदेशी खेळण्याची रेलचेल दाखवली आहे. मुलगा लाकडी मनोरा रचतो. मग माकडाला किल्ली देतो. ते गिटार वाजवायला लागते आणि तेव्हाच त्या आवाजात बासरीचे सूर मिसळतात. बाहेरून येणाऱ्या बासरीच्या आवाजाच्या दिशेने जेव्हा हा मुलगा खिडकीतून बघतो तर समोरच्या मोकळ्या जागेवर असलेल्या झोपडीतला एक बारका मुलगा बासरी वाजवत असतो. त्याला बघून बंगल्यातील मुलाचा अहंकार उफाळून येतो. तो कर्कश वाजणारी पिपाणी वाजवतो. अचानक झालेल्या या हल्ल्याने गरीब मुलगा भांबावून जातो. आपल्या बासरीचा निभाव लागणार नाही, हे लक्षात येऊन तो झोपडीतून छोटासा ड्रम आणून वाजतो. ते बघून श्रीमंत मुलगा छद्मी हसतो. त्यानंतर विविध खेळण्याचे प्रदर्शन करत गरीब मुलाबरोबर स्पर्धा सुरू करतो. श्रीमंत मुलाच्या पुढे गरीब मुलाचा टिकाव लागणं अवघड असते. हे बघून श्रीमंत मुलगा अधिक, आक्रमक होतो. हिंस्त्र पद्धतीने खेळण्यातील बंदूक, मशिनगनचे भयभीत करणारे, कानठळ्या बसणारे आवाज काढत तो बारक्या मुलाला नामोहरम करतो. त्याचा आवेश, अहमहमिका टोकाला पोहचते. गरीब मुलाचा हिरमोड होतो. माघार घेत, तो निमूटपणे आकाशात पतंग उडवायला लागतो. श्रीमंत मुलाला ते सहन होत नाही. तो छऱ्यांच्या बंदुकीने पतंग फाडून टाकतो. गरीब मुलगा हताश होतो. इकडे श्रीमंत मुलगा सर्व खेळण्यांना चावी देऊन विविध वाद्यांच्या जोरजोरात आवाजात आपला विजयोत्सव साजरा करतो. पण त्याचा हा उसना आनंद फार काळ टिकत नाही. इतक्या वाद्यांच्या गोंगाटात परत बाहेरून बासरीचा आवाज येतो. आधी रचलेल्या मनोऱ्याला किल्लीवर चालणारा रोबोट पाडतो. बंदिस्त घरातील श्रीमंत मुलाची ईर्षा पार कोलमडून पडलेली असते. मोकळ्या वातावरणात गरीब मुलगा मुक्तपणे बासरी वाजवत असतो. जय विजयाचे समीकरण पूर्णपणे बदललं असतं..

मुलांचे मनोव्यापार आपण समजतो, तितके निष्पाप नसतात. हे  फ्रॉइडने फार पूर्वीच जगाला सांगितले होते. आनंदाचा भाग असणारा खेळ त्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची कृती असते. खेळण्यातला आनंद आपापल्या परीने घेत असताना, त्यातून त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यं आपोआपच दिसतात. त्यांच्या भावी व्यक्तिमत्त्वाची चुणूक असते ती!

गिरीश कर्नाड यांच्या ‘वो घर’ या फिल्ममध्ये बाहुलीच्या लग्नासाठी मुलंमुली एकत्र जमतात. त्या बाहुलीच्या लग्नाच्या खेळातून मोठ्या व्यक्तीच्या स्वभावाचे पैलू आणि सामाजिक प्रथा याचे दर्शन होते. खमकी विहिण, लाचार आईवडील आजूबाजूचे नातेवाईक, गांवकरी अशा अनेक व्यक्तिरेखा खेळातून दिसतात. मुलांच्या खेळातून आपल्यासमोर विवाह, हुंडा याचे भीषण स्वरूप दिसायला लागते. मुलं मोठ्याचे वागणे कसे आत्मसात करतात, हे बघून भयचकित व्हायला होते.

अशा खेळाकडे बघितल्यावर मुलाच्या वर्तनाला निष्पापतेचा, निरागसतेचा शिक्का मारण्याची हिंमत निश्चितच कोणी करणार नाही. मुलांमध्ये हे सर्व येत कुठून? हा प्रश्न अस्वस्थ करतो.

जॉन लॉक हा तत्वज्ञ म्हणतो, ‘लहान मुलांचं मन हे कोऱ्या पाटीसारखं  असतं.’ मुलांच्या या कोऱ्या पाटीवर नेमके कोणत्या चांगले, वाईट घटक परिणाम करतात, या विषयी बाल मानसशास्त्रात अजूनही संशोधन सुरू आहे. जन्मापासून बालकाची वाढ वेगवेगळ्या टप्प्यांवर कशी होते, बुद्धी, भावना, तर्क, विचार हे कसे विकसित होत जातात. त्यावर बालकाचे व्यक्तिमत्त्व घडते. मुलांच्या वाढीत ‘अनुकरण’ या घटकाचा प्रभाव सर्वात जास्त आढळतो.

प्रा. अल्बर्ट बंडुरा यांचा ‘बो बो डॉल’ या नावाचा प्रसिद्ध असा प्रयोग आहे. बंडुरा यांनी मुलांचे तीन गट केले. त्यातील पहिल्या गटाला एक व्हिडिओ क्लिप दाखवली. त्यात एक मोठा मुलगा बो बो डॉलला मारतो, उचलून फेकतो, तिच्यावर बसून ठोसे लगावतो. दुसऱ्या गटाला जी क्लिप दाखवली गेली त्यात बो बो डॉल बरोबर हा माणूस खूप प्रेमाने वागतो, तिच्याशी काळजीपूर्वक खेळतो.

तिसऱ्या गटाला काहीच दाखवले नाही. नंतर पहिल्या गटातील एक एक मुलाला स्वतंत्रपणे बो बो डॉल असलेल्या खोलीत पाठवण्यात आलं तेव्हा मुलांनी त्या बो बो डॉलला अधिक जोशाने बदडून काढलं. तिथे त्यांना दिसेल असा हातोडा ठेवला होता. तेव्हा मुलांनी चेव येऊन त्या हातोड्याने देखील डॉलला जोरजोरात मारलं.

दुसऱ्या गटातील एकेकट्याला सोडले असता, त्यांचा बो बो डॉल सोबतचा व्यवहार अतिशय प्रेमाचा, स्नेहाचा होता. आणि तिसऱ्या गटातील मुलं जेव्हा खोलीत गेली तेव्हा ते इतर खेळण्यांशी खेळत राहिली. बो बो डॉल ही इतर खेळण्याप्रमाणे त्यांना वाटल्याने तिच्यावर खास असे लक्ष केंद्रित झालं नाही.

माणूस म्हणून, समाज म्हणून आपण मुलांसोबत वागतानां अधिक परिपक्व, सजग, सतर्क असायला हवे, हे या प्रयोगातून प्रखरपणे जाणवते.

‘Two’ ची मोठ्या माणसाची आवृत्ती असलेली फिल्म म्हणजे ‘नेबर्स’. दोन शेजारी अंगणात जवळ खुर्च्या टाकून पेपर वाचत असतात. एकाच्या पेपरचा मथळा असतो ‘पीस सर्टन इफ नो वॉर’ तर दुसऱ्याच्या पेपरचा मथळा असतो ‘वॉर सर्टन इफ नो पीस’. दोघांमध्ये हसून विडीकाडीची देवाण घेवाण होते. सख्खे शेजारी कसे असायला हवे याचे आदर्श चित्र उभं राहते. तितक्यात दोघांच्या अंगणाच्या मधोमध एक फुल उमलतं. दोघे एकाच वेळी तिकडे बघतात. चालत जातात. त्या फुलाला न्याहाळता, त्याचा वास घेतात. त्याला कवेत घेण्यासाठी धडपडतात. त्यासाठी एकमेकांना ढकलतात. हे फुल कोणाचं? या वरून वादाला सुरवात होते. त्या नंतर दोघे हमरीतुमरीवर उतरतात. त्याचे रूपांतर किती भयानक होते. हे फिल्म बघून कळेल. नॉरमन मॅक्लारेनने युद्धविरोधी भूमिका मांडण्यासाठी हा लघुपट केला होता. त्याचा इथे संबंध असा की मुलं ही भावी नागरिक असतात. असल्या आक्रमक, असंवेदनशील भूमिकां घरापासून सुरू होतात. खेळातल्या अरेरावीला वेळीच आळा घातला नाही तर पुढे शाळा- कॉलेज, गाव, राज्य, देश, कुटुंब, समाज या सर्वच बाबतीत अशा लोकांच्या मनोभूमिका कायम आततायीपणाच्या असतात. सुदृढ समाजमन तयार होण्यासाठी अशा भावना विषवल्ली ठरतात. मुलांमधील वाढती आक्रमकता, हिंस्त्र वृत्ती हा सद्यस्थितीतला सर्वात मोठा प्रश्न आहे.

आता फारशी जत्रा भरत नाही,

भरलीच तरी मुलं पुंग्या विकत घेत नाहीत,

घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक

मुलं कुठं खेळतात खेळपाणी

खेळतात युद्ध युद्ध

बैठकीतल्या उशांचा बांध रचून

पोरांनी एकदा माझ्यावरच रोखली स्टेनगन,

गोळीला घाबरलो नाही पण

चिमुकल्या डोळ्यांत हिंस्रतेचा आविर्भाव पाहून,

हातातली खोटी बंदूक कधीही खरी होण्याची

भीती मेंदूत आरपार घुसत गेली.

 – दासू वैद्य

ही भीती कमी करण्याचा उपाय म्हणजे मुलांच्यातील भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे. मुलांना पुढे कोणत्या स्वरूपाचा माणूस बनायला आवडेल? या प्रश्नाला मुलं वेगवेगळ्या स्वरूपाची उत्तरे देतात. बुद्धिमान, बलवान, धाडसी, शूर वगैरे. ही उत्तरं पालकांना- शिक्षकांना देखील आवडतात. पण ‘सहृदय’ हे उत्तर सहसा कोणी देत नाही. या गुणांची जोपासना व्हायला हवी, हा आग्रह आपणच तर धरायला हवा.

खेळ, परीकथा, अद्भुतरम्यता ही मुलांच्या विचारक्रियेची, सहृदय भावनांची सद्भावपूर्ण हेतूंची जीवनदायी उगमस्थाने आहेत. न्याय व अन्यायाचे पहिले ठसे हे खेळण्यातून व परीकथांतून उमटतात. भावनिकरित्या आतून उमजलेलं आणि बाहेर दिसत असलेलं वास्तव याचा ताळमेळ त्यांना घालता येत नाही. त्यामुळे ते गोंधळून जातात. खूपदा सहृदय वागण्याच्या इच्छेवर भीती, असुरक्षता या आदिम भावना वरचढ ठरतात. अशा वेळी त्यांचा हा गोंधळ कमी करण्याची जबाबदारी आपल्यावर असते.

अब्बास कियारोस्तामी यांची ‘Two Solutions For One Problem’ नावाची अफलातून शॉर्ट फिल्म आहे. यात वर्गात दोन मुलं बसलेली असतात. एकाचे नाव दारा तर दुसऱ्याचे नादर. दोघे चांगले मित्र असतात. दाराने नादरचे पुस्तकं वापरण्यासाठी घेतलेलं असते. तो ते परत करतो. पुस्तकं दाराकडून फाटले आहे, हे नादरच्या लक्षात येतं. तो जाऊन दाराचे पुस्तकं फाडतो. त्या नंतर दोघे एकमेकांच्या गोष्टी तोडतात. त्याचे पर्यावसान हाणामारीत होते. त्या नंतर फळ्यावर दोघांच्या नांवाखाली त्यांचे झालेले नुकसान दाखविले आहे. परत पहिल्या शॉटपासून सुरवात होते. दारा नादारचे पुस्तकं त्याला परत करतो. पुस्तकं फाटल्याचे लक्षात आल्यावर, तो दाराकडे जाऊन पुस्तकं दाखवतो. दारा गमच्या साह्याने पुस्तकं व्यवस्थित चिटकून देतो. प्रश्न निकाली लागलेला असतो. दोघे गळ्यात गळे घालून दाखवले आहेत. प्रत्येक वेळी आरे ला कारे करण्याची गरज नसते. हे मुलांना सहजरित्या समजून सांगता येत. मुलांच्या कोणत्या भावनांना खतपाणी द्यायचे या बद्दलचे उत्कृष्ट भाष्य या शॉर्टफिल्ममधून केलं आहे. 

खरं तर खेळ हा मुलांच्या निकोप वाढीसाठी अत्यावश्यक असतो. खेळातून सामंजस्य, खेळकरपणा, सामूहिक भावना, परस्परांबद्दलचा आदरभाव, सृजनशीलता, मैत्रीभाव असे अनेक गुण वाढीस लागतात. पण त्या ऐवजी वैर भावना, समोरच्याला तुच्छ लेखणं, दुसऱ्याचं सुख ओरबाडून विकृत आनंद मिळवणे हे सुरू झालं की खेळ या निरोगी संकल्पनाला तडा जातो. पण मुलांना हे शिकवायला लागणारे शहाणपण मोठ्यांमध्ये किती असते? हाच कळीचा मुद्दा आहे. कारण लहान मुलांच्या खेळासारखाच खेळ मोठी माणसं खेळत असतात. अनेकदा ते रडीचा डावच खेळत असतात. खेळाच्या नावाखाली आपल्या दांभिक भूमिका लपविण्याची हुशारी मोठ्यांमध्ये असते.

असाच एक खेळ विजय तेंडूलकरांनी आपल्याला दाखवला होता. वेळ जाण्यासाठी कोर्टाच्या खेळाच्या आड बेणारे बाईंचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या लोकांची मानसिकता अशीच लहानपणापासून घडलेली असते. खेळातून अशा लोकांचा समाजाबद्दलचा दृष्टिकोन आणि त्यांचे मानसिक कौर्य यांचे प्रत्यकारी दर्शन जेव्हा दिसते तेव्हा मनाला घेरी येते. म्हणून मुलांच्या खेळाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याकडे जागरूकतेने बघणे जरुरीचे. Play is serious activity for children.

देवयानी पेठकर शॉर्टफिल्म दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0