३ वर्षात चीनकडून सीमेवर लष्करी क्षमतेत वाढ

३ वर्षात चीनकडून सीमेवर लष्करी क्षमतेत वाढ

नवी दिल्लीः डोकलाम प्रकरणानंतर गेल्या तीन वर्षांत चीनने भारतीय सीमेनजीक विमानतळ, हवाई संरक्षण यंत्रणा व हेलिपॅडच्या उभारणीत दुपट्टीने वाढ केली आहे. ही माहिती अमेरिकेतील स्ट्रॅटफोर या जिओपोलिटिकल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मने दिली आहे. एनडीटीव्हीने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

२०१७मध्ये अरुणाचल प्रदेशमधील डोकलाम सीमावादावर तणाव निर्माण झाल्यानंतर चीनने आपली संरक्षणव्यवस्था अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्या दृष्टीने चीनने आपल्या लष्करासाठी पायाभूत रचना तयार केली. यात सॅटेलाइट इमेजिंग प्रणालीचाही समावेश असून याने भारतविरोधी कारवाया करण्यास त्यांना मदत होणार आहे.

स्ट्रॅटफोरचे जागतिक घडामोडीचे वरिष्ठ विश्लेषक सिम टॅकच्या मते, चीनने आपली लष्करी यंत्रणा मजबूत करण्याचे एक कारण म्हणजे चीन आता भारताला लागून असलेल्या आपल्या सीमानिश्चित करणार असून त्या आपल्या ताब्यात, नियंत्रणात असाव्यात म्हणून त्यांनी लडाखमध्ये भारतीय सैन्याला विरोध करण्यास सुरूवात केली आहे.

स्ट्रॅटफोरच्या माहितीनुसार चीनने आपल्या लष्करासाठी पायाभूत सोयींवर लक्ष दिले असले तरी हे काम पूर्ण होण्यास काही कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे भारताविरोधात उघडलेली आघाडी ही चीनला दीर्घकालिन स्वरुपाची ठेवायची इच्छा आहे. एकदा पायाभूत सोयी पूर्णत्वास आल्यास चीनच्या लष्कराला सीमारेषा प्रदेशात अनेक हालचाली व कारवाया करता येणे शक्य होणार आहे.

मूळ बातमी

लेखाचे छायाचित्र साभार स्ट्रॅटफोर 

COMMENTS