चीन कम्युनिस्ट पार्टीची शक्तिशाली यंत्रणांमध्ये ‘घुसखोरी’?

चीन कम्युनिस्ट पार्टीची शक्तिशाली यंत्रणांमध्ये ‘घुसखोरी’?

नवी दिल्ली: जगभरात पडसाद उमटवणाऱ्या अभूतपूर्व अशा डेटा लीकमध्ये चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या (सीसीपी) सदस्यांनी जगातील काही सर्वांत शक्तिशाली व प्रभाव

‘ओपन’ व्यापार आणि मानवी प्रगती
भारतीय ठाण्यानजीक चीनचे शस्त्रसज्ज सैन्य तैनात
गलवान खोऱ्यातील हिंसेला चीन जबाबदार

नवी दिल्ली: जगभरात पडसाद उमटवणाऱ्या अभूतपूर्व अशा डेटा लीकमध्ये चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या (सीसीपी) सदस्यांनी जगातील काही सर्वांत शक्तिशाली व प्रभावी यंत्रणांमध्ये घुसखोरी केल्याची माहिती पुढे येत आहे. यांमध्ये पाश्चिमात्य राष्ट्रांच्या वकिलाती, सुरक्षा यंत्रणा, बँका, ऑटोमोबाइल फर्म्स, संशोधन संस्था, विद्यापीठे आणि कोविड-१९वरील लशींचे उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांचाही समावेश आहे.

या लीक्ड डेटाबेसमधून सीसीपीच्या २० लाख सदस्यांची तसेच जगभरातील ७९,००० कार्यस्थळांची तपशीलवार माहिती पुढे आली आहे. २०१६ मधील हा डेटाबेस शांघायमधील ब्रिटिश वकिलातीतील एका चीनविरोधी व्यक्तीने लीक केल्याचे वृत्त आहे. मुळात हा डेटा टेलीग्राम या इनक्रिप्टेड मेसेजिंग अॅपवर लीक करण्यात आला आणि तो इंटर-पार्लिअॅमेंटरी अलायन्स ऑन चायनाला (आयपीएसी) यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये पाठवण्यात आला. आयपीएसीमध्ये जगभरातील १५०हून संसदसदस्यांचा समावेश आहे. डेटाचे सत्यापन केल्यानंतर आयपीएसीने ही माहिती द ऑस्ट्रेलियन, यूकेतील द मेल ऑन संडे, बेल्जियममधील दी स्टांडार्ड आणि एका स्वीडिश संपादकाला पाठवली.

या यादीतील सीसीपी सदस्य चीनसाठी हेरगिरी करत होते याचा पुरावा नसला, तरीही चीनच्या गुप्तहेर यंत्रणेला ही संवेदनशील माहिती पुरवली जात असावी अशी शक्यता जगभरातील संरक्षण तज्ज्ञांना वाटत आहे. सीसीपीच्या सदस्यांना अशा पद्धतीने काम करण्यास परवानगी दिल्यामुळे अनेक कंपन्यांचे तंत्रज्ञान, शस्त्रप्रणाली व गुप्तचर यंत्रणांशी संबंधित क्षमता धोक्यात येऊ शकतो, असे एका गुप्तचर अधिकाऱ्याने म्हटल्याचे द ऑस्ट्रेलियनच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे. हा डेटा लीक शांघायमधील ब्रिटिश वकिलातीतून झाल्याचे पुढे आल्याने यूकेमध्ये हाहाकार झाला आहे. ३० ब्रिटिश खासदारांनी यावर त्वरित चर्चा घेण्याची मागणी केली आहे. चीनमधील सर्व ब्रिटिश वकिलातींमधून सीसीपी सदस्यांना निष्कासित करण्याची मागणीही होत आहे.

दरम्यान, माहितीच्या संरक्षणासाठी आपल्याकडे दमदार सुरक्षा यंत्रणा आहे असा दावा ब्रिटिशांच्या हिताची जगभरात काळजी घेण्यासाठी जबाबदार असलेल्या फॉरेन ऑफिस या यूके सरकारच्या खात्याने केला आहे. सीसीपीच्या सदस्यांना नोकरीवर ठेवल्याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे असेही या खात्याने स्पष्ट केले आहे. शांघायच्या कॉन्सुलेटमधील एका अधिकाऱ्याचे नाव या यादीत आल्याने लंडनमधील व्हाइटहॉल या प्रशासकीय मुख्यालयातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या यादीतील २४९ सदस्यांनी शांघाय फॉरेन एजन्सी सर्व्हिस कॉर्पोरेशन या सरकारी मालकीच्या एम्प्लॉयमेंट एजन्सीशीही २०१६ मध्ये करार केल्याचे समजते.

जागतिक नेटवर्क

सदस्यत्व यादीत एअरोस्पेस इंजिनीअरिंगमधील रिसर्च फेलोचाही समावेश आहे. एअरोस्पेस इंजिनीअरिंगला विद्यापीठातील सर्वांत संवेदनशील अशा सात विषयांपैकी एक समजला जातो. या डेटाबेसमधील अनेक सीसीपी सदस्य संरक्षण किंवा औषधनिर्माण उद्योगात काम करणारे आहेत. रोल्सराइस, बोइंग, एअरबस आणि फ्रेंच संरक्षण काँट्रॅक्टर थेल्स आदी फर्म्समध्ये अनेक सीसीपी सदस्य आहेत. यातील शेकडो एचएसबीसी व स्टॅण्डर्ड चार्टर्डसारख्या बँकांमध्ये काम करत आहेत. फायझर आणि अॅस्ट्राझेनेका या कोरोनाविषाणूवर लस विकसित करणाऱ्या दोन महाकाय औषधनिर्माण कंपन्यांमध्ये सीसीपीचे एकंदर १२३ निष्ठावान सदस्य काम करत आहेत. यातील काही कंपन्यांनी सीसीपी सदस्य पेरोलवर आहेत याची माहिती असल्याचे सांगितले. मात्र, संवेदनशील माहितीच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सीसीपी सदस्यांना कामावर न घेण्याचा प्रश्नच नाही, असेही कंपन्यांतर्फे सांगण्यात आले.

डेटा लीकची वेळ

अमेरिकेने चीनमधील विद्यार्थी व अधिकाऱ्यांबाबत सावध पवित्रा घेतला असतानाच हा डेटा लीक झाला आहे, हे महत्त्वाचे आहे. सप्टेंबर २०२०पर्यंतच्या नऊ महिन्यांत १४ चिनी नागरिकांना हेरगिरीच्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली आहे. सीसीपी सदस्य व त्यांच्या कुटुंबियांना अमेरिकेत वास्तव्याचा किंवा प्रवासाचा व्हिजा १ महिन्याहून अधिक काळासाठी दिला जाऊ नये, असा नियम डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी चीन हे लोकशाहीवरील सर्वांत मोठे संकट असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. ऑस्ट्रेलियानेही सप्टेंबरमध्ये चीनमधील दोन प्राध्यापकांचा व्हिसा ते हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून रद्द केला होता. यातील एकाचे नाव लीक झालेल्या सदस्यत्व यादीत आहे.

अर्थात, यूकेतील चिनी एम्बसीच्या प्रवक्त्याने माध्यमांना पूर्वग्रह व शीतयुद्धाची मानसिकता टाळण्याचे आवाहन केले आहे. 

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0