चीनी कंपनीची उच्चपदस्थ भारतीयांवर ‘देखरेख’

चीनी कंपनीची उच्चपदस्थ भारतीयांवर ‘देखरेख’

नवी दिल्ली: चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाशी घनिष्ट संबंध असलेली एक चिनी तंत्रज्ञान कंपनी भारतातील १०,०००हून अधिक व्यक्ती व संस्थांवर लक्ष ठेवून आहे, असे इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत म्हटले आहे.

शेन्हुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी को लिमिटेड ही या वादाच्या केंद्रस्थानी असलेली कंपनी अनेक सार्वजनिक स्रोतांकडून माहिती काढून घेऊन तिचा वापर व्यक्तिगत माहिती व नातेसंबंध यांच्या खोलात जाण्यासाठी करते, असे बातमीच म्हटले आहे.

कंपनीच्या ‘अोव्हरसीज की इन्फोर्मेशन डेटाबेस’चे (ओकेआयडीबी) अन्वेषण केले असता, ती भारतातील अनेक प्रभावशाली व्यक्तींवर लक्ष ठेवून असल्याचे लक्षात येते, असा दावा बातमीत करण्यात आला आहे. या व्यक्तींमध्ये आघाडीचे राजकीय नेते, सनदी अधिकारी, न्यायाधीश, वैज्ञानिक, पत्रकार, अभिनेते व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

ओकेआयडीबीच्या लक्ष्यस्थानी निश्चितपणे असलेल्या काही व्यक्तींमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, नवीन पटनायक आणि शिवराजसिंह चौहान या मुख्यमंत्र्यांचा मागही ठेवला जात आहे. लष्करप्रमुख बिपिनसिंग रावत यांच्यापासून ते किमान १५ माजी भूदल, नौदल व हवाईदल प्रमुखांपर्यंत; सरन्यायाधीश शरद बोबडे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्यापासून ते महालेखापाल जी. सी. मुर्मु यांच्यापर्यंत; भारतपेचे (भारतातील पेटीएम अॅप) संस्थापक निपुण मेहरा आणि ऑथब्रिजचे अजय त्रेहन या स्टार्टअप उद्योजकांपासून ते रतन टाटा व गौतम अदाणी यांसारख्या आघाडीच्या उद्योजकांपर्यंत अनेक जण या कंपनीच्या लक्ष्यस्थानी आहेत, असे बातमीत म्हटले आहे.

गोळा केली जाणारी माहिती

या बातमीत म्हटल्यानुसार, शेन्हुआ डेटा इन्फर्मेशन टेक्नोलॉजी को लिमिटेड ही कंपनी आर्टिफिशिअल इंटलिजन्स व बिग डेटा तंत्रज्ञानांचा वापर करून लक्ष्यस्थानी असलेल्या व्यक्तीचे सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवरील “डिजिटल फूटप्रिंट”चा माग ठेवते आणि त्या माहितीची लायब्ररी राखते. यामध्ये केवळ बातमीच्या स्रोतांतील नव्हे तर निबंध, पेटेंट्स, लिलावाची कागदपत्रे आणि नियुक्तीच्या जागा यांचा समावेश होतो.

दुसऱ्या शब्दांत, शब्दाचा अत्यंत काटेकोर अर्थ घेतला, तर कोणत्याही स्वरूपाच्या ‘व्यक्तिगत’ डेटावर देखरेख ठेवली जात नाही. ही त्रयस्थ सार्वजनिक माहिती संकलित करण्याची व एकत्रित करण्याची प्रक्रिया आहे. मात्र, ही कंपनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे भौगोलिक माहिती प्राप्त करत असू शकते.

हा सगळा सार्वजनिक डेटा आहे, तर या प्रकाराला एवढे महत्त्व देण्याची गरज का आहे? एक कारण म्हणजे, शेन्हुआला ‘रिलेशनल डेटाबेस’ उभा करायचा आहे. हा डेटा व्यक्ती, संस्था व माहिती यांच्यातील संबंधांचे वर्णन करतो व त्याची नोंद ठेवतो. अशा प्रकारे महाकाय डेटा संकलित करणे व या लक्ष्यांच्या सभोवती सार्वजनिक किंवा भावनाधारित विश्लेषणाची गुंफण करणे या माध्यमातून शेन्हुआ ‘थ्रेट इंटलिजन्स’ सेवा देऊ करत आहे, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीत म्हटले आहे.

“हा रुढार्थाने डेटा नाही पण त्याची कक्षा व संभाव्य वापर यांमुळे धोक्याची शिट्टी वाजत आहे. शेन्हुआचा ट्वेंटीफोरबायसेव्हन वॉच लक्ष्यव्यक्तीसंदर्भातील सर्व वैयक्तिक माहिती सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून गोळा करतो; लक्ष्याच्या मित्रमंडळी व नातेसंबंधांचा माग ठेवतो; पोस्ट्स, लाइक्स व कमेंट्सचे विश्लेषण करतो; आर्टिफिशिअल इंटलिजन्स साधनांच्या माध्यमातून भौगोलिक हालचालींची खासगी माहितीही ठेवतो.”

शेन्हुआ स्वत:चे काम “हायब्रिड वॉरफेअर”ची सहाय्यक असे सांगते, यामध्ये तुटक तुटक माहिती एकत्र करून व्यूहरचनात्मक युक्त्यांसाठी एक ढोबळ चौकट तयार केली जाते.

मूळ बातमी

COMMENTS