‘यिन्तु शांग पाओ’ अखेर बंद पडले !

‘यिन्तु शांग पाओ’ अखेर बंद पडले !

कोरोना प्रादुर्भावाचा फटका अनेक उद्योगांना आणि अनेक भारतीय वृत्तपत्रांना बसला. तसाच तो भारतातील चिनी वृत्तपत्राला पण बसला. १९६९ मध्ये सुरु झालेलं चिनी वृत्तपत्र २०२० मध्ये बंद पडलं.

पिगॅसस हेरगिरीः प. बंगाल सरकार करणार चौकशी
बंगाल विधानसभाही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात
सीआरपीएफचा गोळीबार हे हत्याकांडः ममतांचा आरोप

भारतातून प्रकाशित होणारं एकमेव चिनी भाषेतलं वृत्तपत्र ‘यिन्तु शांग पाओ’ हे मार्च २०२० मध्ये बंद पडलं. कोरोना प्रादुर्भावाचा फटका अनेक उद्योगांना आणि अनेक भारतीय वृत्तपत्रांना बसला. तसाच तो भारतातील चिनी वृत्तपत्राला पण बसला. १९६९ मध्ये सुरु झालेलं चिनी वृत्तपत्र २०२० मध्ये बंद पडलं.

हिकीचे बंगाल गॅझेट किंवा मूळ कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर हे भारतातील पहिलं वृत्तपत्र त्या काळातील ब्रिटिश भारताची राजधानी असलेल्या कलकत्ता येथे सुरू झालं होतं. इंग्रजी भाषेतील हे साप्ताहिक वृत्तपत्र होतं आणि हे आशियातील पहिलं वृत्तपत्र होतं. जेम्स ऑगस्टस हिकी याने हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. हिकी या वृत्तपत्रातून त्यावेळचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याच्यावर टीका करायचा. त्याचमुळे या वृत्तपत्राचा छापखाना ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतला आणि १७८० मध्ये सुरू झालेले हे वृत्तपत्र १७८२ मध्ये बंद पडलं.

गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज १७७२ ते १७८५ या काळात बंगालचा गव्हर्नर-जनरल म्हणून काम करत होता. याच वॉरन हेस्टिंग्जच्या काळात चिनी लोक मोठ्या प्रमाणावर भारतात आले आणि पुढे याच कलकत्यामध्ये चिनी वृत्तपत्र सुरू झालं.

‘यांग ताओ च’ हे चिनी व्यापारी जहाज बंगालच्या उपसागरातून प्रवास करत असताना वादळात अडकलं. त्यावेळी त्यांनी तेव्हाच्या कलकत्ता बंदरात जहाजं वळवली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याने त्यावेळच्या कलकत्ता शहरातील अचिपुरा भाग चिनी व्यापऱ्यांना दिला. या भागात त्यांनी ऊसाची लागवड केली. साखरेचा कारखाना सुरू केला. यासाठी त्यांनी चिनमधून कामगार भारतात आणले होते.

भारतीय जनगणनेनुसार त्यावेळी कोलकात्यामध्ये ३० हजार चिनी स्थलांतरित होते. स्थलांतरित चिनी नागरिकांनी दोन वसाहती कोलकात्यामध्ये वसवल्या. या वसाहतींमध्ये चिनी मंदिरं आणि चिनी भाषिक शाळाही सुरू केल्या होत्या.

‘यिन्तु शांग पाओ’ म्हणजेच भारतातील चिनी व्यवसायाचे वृत्तपत्र यालाच इंग्रजीमध्ये ‘ओव्हरसीज चाइनीस कॉमर्स ऑफ इंडिया’ असंही म्हणत होते. कोलकात्यामध्ये गेली अनेक वर्ष वसलेल्या चायना टाऊन मधील चिनी नागरिकांसाठी हे वृत्तपत्र चालवलं जात होतं. मार्च १९६९ मध्ये ली यौन चीन यांनी हे वृत्तपत्र सुरु केलं होतं.

चिनी समाज त्यावेळी चामड्याचा व्यवसाय करत असे,  या व्यावसायिकांना चामड्याच्या उद्योगविषयी माहिती मिळावी म्हणून हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं. सुरुवातीला चामड्याच्या उद्योगाशी संबंधित बातम्या दिल्या जात होत्या. नंतरच्या काळात स्थानिक चिनी नागरिकांच्या समस्या, त्यांच्या व्यवसायाच्या समस्या याबाबत बातम्या दिल्या जाऊ लागल्या. वृत्तपत्र सुरू झालं, त्यावेळी टंकलेखन किंवा टायपिंगची सोय नसल्याने, हस्तलिखित स्वरूपात ते प्रकाशित केलं जात होतं.

ली यौन चीन स्वतः वृत्तपत्राचं संपादन करत असत. यासाठी चिनी सुलेखनकला जाणणारे काही कर्मचारीही त्यांनी घेतले होते. यामध्ये एक संपादक आणि त्यांचा मदतनीस, एक कारकून जो हिशोब आणि वितरणाचं काम बघत असे. तर काही वार्ताहर आणि भाषांतरकार होते, जे घरूनच काम करत असत. भाषांतरकार टीव्ही आणि रेडिओच्या बातम्या ऐकून त्यावरून चिनी भाषेत बातम्या लिहून देत असत. चार पानी टॅब्लॉइड आकारातील २ हजार अंक काढले जायचे आणि चिनी नागरिकांच्या घरांमध्ये त्यांचं वितरण होत असे. ‘यिन्तु शांग पाओ’ सुरु झालं त्यावेळी त्याला अधिक मागणी होती.

१९८८ पर्यंत ‘यिन्तु शांग पाओ’ हस्तलिखितच होतं. १९८८ मध्ये हे चित्र बदललं. तैवान मधून चिनी भाषेत टाईप करता येईल असा संगणक आला आणि ‘यिन्तु शांग पाओ’ छापील स्वरूपात प्रकाशित होऊ लागलं. कोलकात्याच्या चायना टाऊन मधून तैवानमध्ये स्थलांतरित झालेल्या एका व्यावसायिकाने हा संगणक वृत्तपत्राला भेट म्ह्णून दिला होता. संगणक आल्यावर ‘यिन्तु शांग पाओ’मध्ये छायाचित्रंही छापली जाऊ लागली. १९९७ मध्ये ‘यिन्तु शांग पाओ’चा स्वतंत्र छापखाना सुरु झाला. स्थानिक बातम्यांबरोबर चीनमध्ये सुरु असलेल्या घटना घडामोडींची माहितीही या वृत्तपत्रातून दिली जाऊ लागली. भारतात जन्मलेल्या चिनी पिढीला चिनी भाषा वाचता यावी, हाही या वृत्तपत्र प्रकाशनामागचा हेतू होता.

ली यौन चीन यांच्यानंतर १९८० मध्ये काओ छंग हे ‘यिन्तु शांग पाओ’चे संपादक झाले. चिनी भाषेबद्दल असलेल्या प्रेमामुळे छंग हेही तितक्याच उत्साहाने वृत्तपत्र प्रकाशित करत असत. छंग आणि त्यांचे काही सहकारी सकाळी ८ ते ११ या वेळेत कार्यालयात येऊन वृत्तपत्राचं काम करत असत. सोमवार ते शनिवार रोज वृत्तपत्र छापले जात होते आणि वृत्तपत्राची किंमत अडीच रुपये इतकी होती. ‘यिन्तु शांग पाओ’च्या पहिल्या पानावर आंतरराष्ट्रीय बातम्या असायच्या, दुसऱ्या पानावर स्थानिक चिनी समाजाविषयीच्या बातम्या असायच्या, तिसऱ्या पानावर आरोग्यविषयक आणि लहान मुलांसाठी गोष्टी असत आणि चौथ्या पानावर हाँगकाँग, मकाऊ तैवान मधील बातम्यांचा समावेश होता. वृत्तपत्रांत काही जाहिरातीही असायच्या आणि या जाहिराती वृत्तपत्राच्या उत्पन्नाचा स्रोत होत्या. वाढदिवस, लग्न, शोकसंदेश, सार्वजनिक कार्यक्रम अशा जाहिराती यामध्ये असायच्या.

२०२० पर्यंत चिनी नवीन वर्षाचा विशेषांकही काढला जात असे. चिनी समाजाविषयी केल्या जाणाऱ्या घोषणांची माहिती यामधून मिळत असल्याने वृत्तपत्राला मागणीही होती. ८० च्या दशकात ‘यिन्तु शांग पाओ’चा खप साडेतीन हजार इतका होता. स्थानिक चिनी समाजात वृत्तपत्राचं वितरण केलं जात असे. इतकंच नाही तर चेन्नई आणि मुंबईत राहणाऱ्या चिनी नागरिकांनाही पोस्टाने वृत्तपत्र पाठवलं जात असे. रोजचा अंक टपालाने पाठवला जात नसे. पण विशेषांक मात्र आठवणीने मुंबई आणि चेन्नईला पाठवला जात असे.

पण हळूहळू वृत्तपत्राचा खप कमी झाला. मार्च २०२० पर्यंत वृत्तपत्राचा खप पार २०० पर्यंत खाली आला. कोरोना टाळेबंदीमध्ये पहिल्यांदा वृत्तपत्राची छपाई बंद पडली आणि जुलै २०२० मध्ये छंग यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वृत्तपत्रही बंद पडलं. ‘यिन्तु शांग पाओ’ हे खरं तर भारतातील पाहिलं चिनी वृत्तपत्र नव्हतं. तर त्याआधी म्हणजे १९३५ मध्ये ‘चायनीज जर्नल ऑफ इंडिया’ हे वृत्तपत्र सुरु झालं होतं. पण अंतर्गत अडचणींमुळे ते २००१ मध्येच बंद पडलं. कोलकात्यामधील चिनी नागरिकांची लोकसंख्या आता कमी झाल्याने शाळाही बंद झाली आहे.

२००२ कोलकता शहरातील लोकसंख्या कमी करण्यासाठी २३० चिनी नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने शहरापासून २५ किलोमीटर दूर स्थलांतरित होण्याचे आदेश दिले. अनेक चिनी नागरिकांनी व्यवसाय बदलले, काहींनी रेस्टॉरंट सुरु केले, तर काही स्थलांतरित झाले. आता कोलकात्यामध्ये सुमारे दोन हजार चिनी नागरिक असतील. त्यातील अनेक जणांना चिनी भाषा वाचता येत नाही. अनेक वर्ष भारतात राहिल्याने अनेक जण हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलतात. त्यामुळे ‘यिन्तु शांग पाओ’ परत सुरू करावं असं कोणालाही वाटलं नाही.

श्रद्धा वारडे, या चीनच्या अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: