छुटनी देवीः स्त्रीसन्मानाचा एक संघर्ष…!

छुटनी देवीः स्त्रीसन्मानाचा एक संघर्ष…!

झारखंडमधील छुटनी देवी यांना गावाने चेटकीण समजले आणि त्यांच्यावर अत्याचार केले. या अत्याचारात छुटनी देवी यांच्या नवर्यापासून सर्व समाज सामील होता. पण त्याने त्या गडबडल्या नाहीत. उलट पुढे अत्यंत निर्धाराने, स्वतःच्या स्त्रीत्वाचा स्वाभिमान दाखवत त्यांनी गावातल्या या अघोरी प्रथेविरूद्ध लढा दिला व ६२ महिलांची सुटका केली. गेल्या जानेवारी महिन्यात भारत सरकारने छुटनी देवी यांच्या कार्याला सलाम करत त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

बलात्काराच्या गुन्ह्यांत २० टक्क्याने वाढ, सर्वाधिक बलात्कार राजस्थानमध्ये
रेस्तराँ रात्री १२ तर दुकाने ११ पर्यंत सुरू राहणार
फेसबुक खुला व पारदर्शी प्लॅटफॉर्म : मोहन

झारखंडच्या छुटनी देवी यांना चेटकीण समजून गावाने मैला अंगावर फेकला, दार मोडून बलात्काराचा प्रयत्न केला, झाडाला बांधून मारहाण केली, मुलांसह गावातून हाकलले, नवऱ्याने साथ दिली नाही तरीही न डगमगता चेटकीण विरोधी प्रथेविरूद्ध लढा उभारून समाजाने चेटकीण घोषित करून छळ सुरू केलेल्या ६२ महिलांची छळातून सुटका केली. देशाने २०२१जानेवारी ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला.

झारखंड राज्यातील सरायकेला खरवसा जिल्ह्यात राहणाऱ्या व दिसायला सुंदर असणाऱ्या छुटनी देवी यांचे वयाच्या १२व्या वर्षी महताड गावातील धनंजय यांचेशी लग्न झाले. वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तीन मुले झाली. १९९५ मध्ये शेजारची कुभोजहरी मुलगी आजारी पडली म्हणून छुटनी देवी या चेटकीण आहेत म्हणून शंका घेतली.  छुटनी देवी जादूटोणा करतात म्हणून मुलगी आजारी हा आरोप केला गेला. छुटनी देवी जादूटोणा करतात म्हणून गावात पंचायत भरली. मी काही करत नाही हे सांगूनही त्यांना ५०० रूपये दंड केला. त्रास नको म्हणून त्यांनी दंडही भरला, तरीही त्रास थांबेना. गावात वाईट घडते ते छुटनी देवी यांच्यामुळे म्हणून दार तोडून बलात्काराचा प्रयत्न केला. तरीही प्रतिकार करून स्वत:ला वाचविले. नवऱ्याला गावातच राहायचे होते म्हणून तो बायकोची बाजू घेत नव्हता.

गावात मांत्रिकास बोलावून आणले. मांत्रिकाने छुटनी देवी यांनी मैला खाल्ला तर चेटकीण उतरेल हे सांगितले. छुटनी देवी यांनी नकार देताच पकडून मैला अंगावर ओतला. तोंड धरून मैला तोंडातही घातला. पतीने कसलाही विरोध केला नाही. पतीने हे सर्व होऊन घरातही घेतले नाही. उपाशी मुलांना घेऊन रात्रभर छुटनी देवी झाडाखाली झोपल्या. गावातील एकाही माणसाला दया आली नाही.

छुटनी देवी माहेरी आल्या. माहेरी भाऊ हिमायलासारखे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. भावाने कसण्यास जमीन व पैसे दिले. माहेरच्या गावातही लोक दरवाजा बंद करून घेत. त्यांना वाटे ही चेटकीण जादूटोणा करेल. धाडस करून सासरच्या गावातील लोकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी आमदारांना भेटली, त्यांनी मदत केली नाही. गम्हरिया पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मैला पकडून तोंडात घालणाऱ्या व झाडाला बांधून मारहाण करणाऱ्यांना अटक केली. जामीनावर सर्व सुटूनही आले. पोलिस केस झाल्याने कायद्याची भीती वाटू लागली.

माहेरी गेल्यावरही ५ वर्षे सर्व विसरण्यात गेली. ५ वर्षांनी स्थिर झाल्यावर चेटकीण ठरवून त्रास देणाऱ्या प्रथेविरूद्घ त्यांनी लढा द्यायचा निर्णय घेतला. “पुनर्वसन केंद्र असोसिएशन फॉर सोशल एंड ह्युमन अवेयरनेस (आशा) संस्था स्थापन केली. समाजसेवी व पुरोगामी लोक सदस्य झाले.

गावाने, समाजाने एखाद्या महिलेस चेटकीण घोषित केल्याचे समजले की पीडितेस सुरक्षा देऊन पुनर्वसन केंद्रात आणले जाई. संबंधितांवर पोलिस केस दाखल करून पाठपुरावा केला जाऊ लागला. काहींना तुरूंगात पाठविले. पोलिस संरक्षण मिळवून दिले. प्रथेविरूद्ध निदर्शने, मोर्चे काढले. समाजात जाणीव जागृती केली. पीडित महिलांना सुरक्षा देऊन घरी पोहचविले. अघोरी प्रथेतून मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नाला यश येऊन संस्थेमार्फत ६२ चेटकीण ठरविलेल्या महिलांना मुक्ती दिली.  सन्मानजनक जीवन जगण्याचा हक्क आणि आनंद मिळवून दिला.

झारखंडमध्ये २० वर्षात १,६०० महिलांना चेटकीण ठरवून मारण्यात आले आहे. २०१२ ते २०१४ या दोन वर्षात राज्यात १२७ चेटकीण समजून हत्या झाल्या होत्या. गेल्या १० वर्षात समाजातील वाईट प्रथेविरूद्ध लढा दिल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये छुटनी देवी यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराबद्दल काय वाटते विचारता छुटनी देवी म्हणाल्या, ‘चेटकीण घोषित केल्यामुळे अमानवी त्रास सहन केलेल्या स्त्रीला त्रासातून मुक्त केल्यावर तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहणे हा सर्वात मोठा पुरस्कार वाटतो’.

छुटनी देवी तुम्ही अघोरी प्रथेविरूद्ध लढत आहात. तुमच्या कार्याला सलाम…

संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

जागर’ या त्रैमासिकातून साभार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: