हवामान बदलाने भारतात उष्णतेची लाट

हवामान बदलाने भारतात उष्णतेची लाट

सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात एक दिवस उष्णतेची लाट अपेक्षित असताना प्रत्यक्षात ती तीन दिवस आली. तसेच एप्रिलमध्ये तीन दिवसांऐवजी दहा दिवस उष्णतेची लाट आली. उष्णतेच्या लाटेची तीव्रताच नव्हे तर तिचा दीर्घ कालावधी मानवी क्षमता आणि प्रशासन यांची परीक्षा बघणारा होता. अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान ४४-४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते. काही ठिकाणी पारा ४७ अंशांपर्यंतही पोहोचला होता.

व्यवस्थेला जागं करण्यासाठी आम्ही संप पुकारला आहे!
राज्य वातावरणीय बदल परिषदेची स्थापना
हिंदुकुश हिमालयातील दोन तृतियांश हिमनद्या २१०० सालापर्यंत वितळून जाऊ शकतील

सध्या भारताला उष्णतेच्या लाटांचा मोठा तडाखा बसत आहे. या लाटेचा तडाखा देशातील जवळपास १५ राज्यांना बसला आहे. भारत आणि शेजारील पाकिस्तानात येणार्‍या उष्णतेच्या लाटा हा हवामान तज्ज्ञांच्या दृष्टीने चिंतेचा विषय झाला आहे व त्याची चर्चाही प्रसार माध्यमांत होताना दिसत आहे. भारतात १९०१ ते २०२२ या १२२ वर्षांच्या काळातील सर्वाधिक उष्णता यंदा मार्चमध्ये अनुभवास आली. एप्रिलमध्येही अशी स्थिती अनुभवास आली.

सर्वसाधारणपणे मार्च महिन्यात एक दिवस उष्णतेची लाट अपेक्षित असताना प्रत्यक्षात ती तीन दिवस आली. तसेच एप्रिलमध्ये तीन दिवसांऐवजी दहा दिवस उष्णतेची लाट आली. उष्णतेच्या लाटेची तीव्रताच नव्हे तर तिचा दीर्घ कालावधी मानवी क्षमता आणि प्रशासन यांची परीक्षा बघणारा होता. अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान ४४-४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते. काही ठिकाणी पारा ४७ अंशांपर्यंतही पोहोचला होता. असे तापमान अनेक दिवस कायम होते.

मे आणि जून या उन्हाळ्याच्या मुख्य महिन्यांपेक्षा मार्च आणि एप्रिल वेगाने तापत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. देशभरातील तापमानाच्या स्थितीवर जागतिक तापमानवाढीचा मोठा परिणाम होत असल्याचे सध्याच्या दीर्घकालीन उष्णतेच्या लाटांवरून स्पष्ट होते. गेल्या काही दशकांत उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

वातावरण बदलामुळे केवळ तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटा वाढत नसून यामुळे हवामानाचे स्वरूप बदलत आहे. याचा परिणाम म्हणून भविष्यात भयंकर प्रकारचे उष्मासंकट सोसावे लागू शकते. पश्चिमी प्रकोप निवळण्याची प्रक्रिया विस्कळीत होत आहे. परिणामी, चक्रीवादळे अधिक बळकट होत आहेत. आर्क्टिकमधील उष्णतेच्या लाटा आणि एलनिनो (ENSO) यांचे विचित्र अस्तित्व जाणवत आहे.

भूमध्य समुद्र भागातील उद्रेक : भूमध्य समुद्रात वादळे निर्माण होतात. याचा परिणाम म्हणून उत्तर भारत आणि मध्य भारतात अवकाळी पाऊस पडतो. डोंगराळ आणि मैदानी प्रदेशातील हवेच्या स्थितीवर आणि एकूणच वातावरणावर भूमध्य समुद्र भागातील उद्रेकाचा परिणाम होतो. हे प्रदेश उन्हाळ्यात अधिक जोखमीचे असतात कारण तेथे उष्णतेच्या लाटांचा तडाखा बसतो. भूमध्य समुद्र भागातील उद्रेकामुळे वायव्य भारतावर आर्द्रतायुक्त वारे वाहतात. त्यांचा संबंध अरबी समुद्रावरून येणार्‍या पूर्वीय आर्द्र वार्‍यांशी येतो. त्यामुळे वार्‍याची चक्राकार स्थिती निर्माण होते आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो.

वातावरण बदलामुळे भूमध्य समुद्र भागातील उद्रेकामध्ये अनेक बदल होतात.

या संदर्भात भारतीय भूचुंबकीय विज्ञान संस्थेचे संचालक ए. पी. डिम्री म्हणाले, यासाठी जागतिक तापमानवाढ काही प्रमाणात कारणीभूत ठरलेली असू शकते. वाढत्या तापमानामुळे आर्द्रतेचा अंश कमी होऊन भूमध्य समुद्र भागातील वादळे सौम्य होत आहेत. उष्णतेमुळे ही वादळे उंचावर फेकले जातात आणि काराकोरम प्रदेशात पोहोचतात. हवामान बदलाचा परिणाम म्हणून भूमध्य समुद्र भागातील उद्रेकाच्या स्वरुपात गतिमान बदल झाले आहेत.

गेल्या दोन महिन्यांत देशात केवळ दोन वादळे पश्चिम हिमालयात दिसून आली. त्यांचा परिणाम पर्वतीय भागापुरताच मर्यादित राहिला. उत्तरेतील मैदानी प्रदेशात हलका पाऊस आणि काही प्रमाणात धुळीचे वादळ असा अल्प परिणाम दिसून आला. याचा वातावरणाच्या स्थितीवर काहीही परिणाम झाला नाही.

दरम्यान, या प्रदीर्घ कोरड्या काळात प्रतिचक्रवाताच्या संयोगाने रखरखीत प्रदेशातून उष्ण वायव्य वाऱ्यांच्या सतत प्रवाहाचा मार्ग मोकळा केला. हे उष्ण वारे वायव्य भारत आणि मध्य भारतातील काही भागांवर अनियंत्रितपणे वाहतात आणि पूर्व भागांमध्येही पोहोचतात. पाकिस्तान आणि लगतच्या राजस्थानच्या अतिउष्ण प्रदेशातून हे वारे आधीच वाहत होते. त्यामुळे तापमानात कमालीची वाढ झाली होती.

प्रतिचक्रवात स्थिती : वातावरणाचा उच्च दाब असलेल्या प्रदेशाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर चक्राकार स्थिती निर्माण होते. वादळे स्वतःकडे वारे खेचून घेतात. याउलट प्रतिचक्रवात स्थितीमध्ये वारे सर्व दिशांना फेकले जातात.

प्रतिचक्रवात स्थितीची निर्मिती असामान्य नसून अशी स्थिती वायव्य भारतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नेहमीच निर्माण होत असते. पण या प्रतिचक्रवात स्थितीचे दीर्घकालीन अस्तित्त्व भारतात उष्णतेची लाट निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. यंदा प्रतिचक्रवाताचे केंद्र राजस्थान आणि जवळच्या पाकिस्तानात दिसून आले. सर्वसाधारणपणे पश्चिम हिमालयात येणाऱ्या पश्चिमी प्रकोपांच्या येण्याने ही प्रतिचक्रवात स्थिती पुढे सरकत राहाते. त्यामुळे हवेच्या दिशेवर परिणाम होतो. पण पश्चिमी प्रकोप वरच्या स्तरात असताना प्रतिचक्रवात स्थिती दीर्घकाळ राहाते. त्यामुळे वायव्य आणि मध्य भारतात उष्ण वारे पसरतात.

या संदर्भात मेटिओरॉलॉजी अँड क्लायमेट चेंज, स्कायमेट वेदरचे उपसंचालक महेश पलवट यांनी सांगितले की, प्रतिचक्रवातामुळे उष्ण वारे वायव्य भारतातून मध्य आणि पश्चिम भारतात दीर्घकाळासाठी पाठवले जातात. परिणामी, उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. पाऊस नसताना वाळवंटात उच्च तापमान असते. तसेच जागतिक तापमानवाढीमुळे वाऱ्यांची उष्णता वाढली असून त्यामुळे उष्णतेच्या लाटांची तीव्रताही वाढली आहे. केवळ पश्चिमी प्रकोपच प्रतिचक्रवाताला पुढे ढकलू शकत असल्यामुळे ते वायव्य भारतासाठी अधिक महत्त्वाचे ठरतात,

हवामान बदलामुळे आर्क्टिकमधील उष्णतेचा भारतातील उष्णतेच्या लाटेवर परिणाम :

आर्क्टिकमध्ये यंदा विक्रमी उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. १९७१ ते २०१९ या काळात येथे भूपृष्ठाजवळील हवेचे तापमान ३.१ अंशांनी वाढले आहे. हा वेग जागतिक सरासरीच्या तीनपट आहे. येथे समुद्रातील बर्फ वितळण्याच्या आणि जंगलांतील आगींच्या वारंवारतेत आणि तीव्रतेत वाढ झाली आहे. तीव्र उष्णतेत वाढ झाली असून तीव्र शीतलतेत कमतरता आली आहे. थंडाव्याची स्थिती पूर्वी १५ दिवसांपेक्षा अधिक राहात होती. २००० सालापासून ही स्थिती आर्क्टिकवरून नष्ट झाली आहे.

या बाबत पलवट सांगतात, आर्क्टिकमधील सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा थेट परिणाम आशियावर परिणाम करणाऱ्या चक्रीवादळ स्थितीवर होत असल्याने ही चिंतेची बाब आहे. आर्क्टिक प्रदेश तापल्याने हवा वर ढकलली जाते व कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे उपध्रुवीय प्रदेशात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते. यंदा अशीच स्थिती निर्माण झाली आहे. आर्क्टिकमधील तीव्र होणाऱ्या उष्णतेच्या लाटा हवेच्या स्थितीवर परिणाम करतात. उत्तरेतील पश्चिमी प्रकोपाला उंचावर प्रवास करण्यास भाग पाडतात. त्यामुळे भारतातील वातावरणावर परिणाम होत नाही.

नियमानुसार ऑक्टोबरपासून पश्चिमी प्रकोपांची तीव्रता आणि वारंवारता वाढत आहे. यंदापासून पश्चिमी प्रकोप खालच्या स्तरातूनही वाहू लागले आहेत. मार्चपासून त्यांची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मेपासून वारंवारताही कमी झाली असून त्यांचा प्रवास उंचावरून सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांचा परिणाम हिमालयाच्या उंचावरील प्रदेशावरच अधिक दिसून येत आहे. वर सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा थोपवण्यासाठी पश्चिमी प्रकोप वायव्य भारतासाठी महत्त्वाचे असतात. तज्ज्ञांच्या मते जर आर्क्टिकमधील उष्णतेच्या लाटा सुरू राहिल्या तर आपल्याला अधिकाधिक उष्ण दिवस अनुभवावे लागतील.

Arctic Climate Change Update 2021: Key Trends and Impacts या अहवालानुसार आर्क्टिकवरील मे-जूनमधील बर्फाचे आच्छादन १९७१ ते २०१९ या काळात २१ टक्क्यांनी घटले आहे. यातील सर्वाधिक घट युरेशियावर २५ टक्के आणि उत्तर अमेरिकेवर १७ टक्के झाली आहे. आर्क्टिकमधील Annual mean surface air temperature १९८५ ते २०१४च्या तुलनेत ३.३ ते १० अंश सेल्सिसने वाढणार आहे.

ला निना – ENSO (El Nino Southern Oscillation) आणि उष्णतेच्या लाटा यांच्यातील संबंधाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. सातत्याने तापणाऱ्या वातावरणामुळे प्रादेशिक पातळीवरील ईएनएसओ पर्जन्य परिवर्तनशीलता तीव्र होत जाणार आहे अशी सूचना The IPCC WGI Report ‘Climate Change 2021: The Physical Science Basis’ मध्ये देण्यात आली आहे.

हिवाळ्यातील ला निनामुळे उत्तर-दक्षिण दिशेतील हवेच्या दाबाचे पट्टे तयार होतात. वसंत ऋतूमध्ये ला निना दाबाचा नमुना कायम राहिल्याने अभूतपूर्व धुळीचे वादळ आणि उष्णतेच्या लाटा दक्षिणेकडे भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहोचल्या आहेत. भारतीय उपखंडावरील कमी दाबाची विसंगती मध्य-पूर्वेतून भारत आणि पाकिस्तानात पश्चिमी वारे आणि उष्ण वारे घेऊन येते. ला निना स्थितीमुळे अरबी समुद्र, दक्षिण भारताचा पश्चिम भाग आणि पाकिस्तान-भारताचा उत्तर भाग येथे उष्ण वारे पसरत आहेत.

ला निनाचा संबंध साधारणपणे भारतातील तीव्र हिवाळा आणि पावसाळा यांच्याशी असतो. ला निना स्थितीमध्ये उष्णकटिबंधीय पॅसिफिकवरील सरासरीच्या तुलनेत समुद्रपृष्ठावरील तापमान कमी होते. समुद्रपृष्ठावरील तापमानामुळे महासागरावरून वाहणाऱ्या व्यापारी वाऱ्यांमध्ये घट होते. परिणामी जगभरात विचित्र उन्हाळा निर्माण होतो.

२०२२ च्या वसंत ऋतूपर्यंत ला निना नाहीसे होईल असा अंदाज होता पण तो खोटा ठरला. उष्णकटिबंधीय पॅसिफीकमध्ये समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीच्या तुलनेत कमी राहिले आहे. परिणामी ला निना स्थिती वसंत ऋतूपर्यंत कायम राहिली आणि २०२२च्या मोसमी पावसाच्या आगमनापर्यंत लांबणार आहे. सध्याची ला निना स्थिती २०२०च्या मोसमी पावसादरम्यान सुरू झाली आणि अद्याप कायम आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते थंड पाण्याचे थर पूर्वीपेक्षा अधिक स्थिर दिसत असल्याने ला निना नष्ट होण्याची शक्यता नाही. परिणामी महासागराचे तापमान अपेक्षेप्रमाणे वाढण्यास विलंब होणार आहे.

पॅसिफिकवर ला निना स्थिती कायम राहण्यासह हवेच्या दाबाचा उत्तर-दक्षिण पट्टा भारतावर कायम राहणार आहे. याचा भारताच्या वातावरणावर नक्कीच परिणाम झाला आहे. असा परिणाम १९९८ ते २००० या काळातही दिसला होता. यावेळी ला निना स्थिती तीन वर्षे कायम होती. मुंबईवरील धुळीचे वादळ, तीव्र कमी दाबाचा पट्टा ज्याचे सौम्य चक्रीवादळात रुपांतर झाले आणि उष्णतेच्या लाटा या विचित्र वातावरणीय घटना म्हणजे ला निनाच्या दीर्घकालीन स्थितीचा परिणाम आहे, असे मेरिलँड विद्यापीठातील हवामान व सागरशास्त्र विभागातील प्रा. रघु मुर्तुगुड्डे यांनी सांगितले.

अर्थ सायन्स मंत्रालयाच्या Assessment of Climate Change over the Indian Region या अहवालानुसार उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटांची देशभरातली सरासरी वारंवारता २१व्या शतकाच्या मध्यात प्रतिऋतू २.५ घटनांनी वाढेल. मध्यम उत्सर्जन स्थितीमध्ये २१व्या शतकाच्या शेवटी ही वारंवारता ३ घटनांनी वाढेल. उष्णतेच्या लाटांचा एकूण सरासरी कालावधी २१व्या शतकाच्या मध्यात आणि शेवटी अनुक्रमे प्रतिऋतू  १५ आणि १८ दिवसांनी वाढेल असे दिसत आहे.

हरितगृह वायूंचे दीर्घकाळ जागतिक उत्सर्जन, जैवविविधतेचे घटते आयुर्मान आणि जमिनीचा वापर यांचा परिणाम म्हणून Representative Concentration Pathway (RCP) ४.५ इतका निर्माण झाला आहे.

दक्षिण भारतावर सध्या उष्णतेच्या लाटांचा परिणाम दिसत नसला तरीही एकविसाव्या शतकाच्या शेवटी येथे मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. उष्णकटिबंधीय अरबी समुद्राचे वाढते तापमान आणि तीव्र एल निनो स्थितीची वारंवारता यांचा परिणाम म्हणून येत्या काळात वारंवार आणि दीर्घकालीन उष्णतेच्या लाटा भारतीय उपखंडात उद्भवणार आहेत.

या सर्व मानकांचा परस्पर संबंध असून IPCC WG2 Report ‘Climate Change 2022: Impacts, Adaptation and Vulnerability’मध्ये दिलेल्या सूचनेनुसार आपली वाटचाल अतिशय कठीण काळाकडे सुरू झाली असून भविष्यात उष्णतेच्या लाटांची वारंवारता, तीव्रता आणि दीर्घकालीनता यांत वाढ होत राहणार आहे.

कार्तिकी नेगी या वातावरण परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संशोधक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: