भाजपच्या सारीपाटावर धर्मयुद्धाचे ढग

भाजपच्या सारीपाटावर धर्मयुद्धाचे ढग

पंकजा मुंडे यांनी थेट धर्मयुद्धाची ललकारी दिल्याने येत्या काही काळात भाजपच्या पटावर महाभारत रंगणार आहे. आणि या पटावर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे अनेक राजकीय सोंगट्याचा वापर करत एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न होणार आहे.

विरोधकांचा अभाव असता…
कर्नाटकात विद्यार्थ्यांकडून बाबरी मशीदीचा प्रतिकात्मक विध्वंस
भाजप नेते चिन्मयानंद यांना अटक

राज्य भाजपमधील देवेंद्र फडणवीस यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली तर पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि काही प्रमाणात गिरीश महाजन यांची कुचंबणा सुरूच आहे. आशिष शेलार यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाला कधीही आव्हान देण्याचा प्रयत्न केला नसला तरी त्यांच्याकडे सर्वपक्षीय नेत्यांच्या मॅनेजमेंटचे कसब आहे. पण या धर्मयुद्धात अति घुसमट झाल्याने आता पंकजा मुंडे यांनी थेट धर्मयुद्धाची ललकारी दिल्याने येत्या काही काळात भाजपच्या पटावर महाभारत रंगणार आहे. आणि या  पटावर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे अनेक राजकीय सोंगट्याचा वापर करत एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली त्या दिवसापासून त्यांनी पद्धतशीरपणे मुंडे गटाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये असलेल्या आणि मुंडे यांच्याच घरातील धनंजय मुंडे यांचा आधार घेतला. आपल्या मार्गातील संभाव्य दावेदार कायमचे बाजूला करण्यासाठी फडणवीस यांनी अनेक राजकीय खेळी करून स्वतःचे स्थान भक्कम केले. पण हे करताना त्यांनी भाजपमधील मुंडे गटाचे प्राबल्य कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.

भाजपमधील ओबीसी गटाचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने गोपीनाथ मुंडे हे करत होते. ओबीसी मताची ताकद हा त्यांचा ‘प्लस पॉइंट’ होता. पण त्याच्या पश्चात फडणवीस यांनी मुंडे गटाचे म्हणजे पंकजा मुंडे यांचे महत्त्व कमी करताना आयात झालेल्या गोपीचंद पडळकर, रासकर आदी ओबीसीमधील नेत्यांना पद्धतशीरपणे ताकद दिली आणि त्यांना मोठे केले. त्याच वेळी त्यांनी दुसरे एक शक्तिशाली नेते आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे देव उठवले. त्यामुळे खडसे यांना पक्ष सोडण्याऐवजी पर्याय उरला नाही.

२०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे सहकार्य केल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्यातील ‘याराना’ सर्वश्रुत आहे. सातत्याने मिळेल त्यावेळी पंकजा मुंडे यांचे राजकीय अस्तित्व कमी करण्यासाठी झालेले प्रयत्न आणि त्यातून निर्माण झालेल्या धर्मयुद्धाची ललकारी पाहावयास मिळाली. याचाच एक भाग म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज मुंडे गटाची खदखद पंकजा मुंडे यांच्या बोलण्यात जाणवली. आपले नेते हे नरेंद्र मोदी, अमित शाह, नड्डा हे असल्याचे सांगत त्यांनी जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्याचे टाळले. धर्मयुद्धात माझे कार्यकर्ते आडवे पडत आहेत, ही त्यांची बोलकी प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. ज्या दिवशी इथे राम नाही असे वाटेल त्या दिवशी निर्णय घेऊ या वाक्यात फडणवीस यांच्या एककल्ली नेतृत्वावर पंकजा मुंडे यांचा असलेला संताप जाणवतो. पंकजा यांनी कार्यकर्त्याबरोबर बोलताना त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा हे आपले नेते असल्याचे वारंवार सांगितलं. पण जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करणे टाळले.

एकेकाळी पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्री होण्याची मनीषा व्यक्त केली होती आणि त्यानंतरच भाजपामध्ये अंतर्गत धर्मयुद्ध सुरू झाले. मुंडे यांना सर्व पातळीवर अस्तित्वहीन करण्यात आले. ही सल पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. फडणवीस यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेबाबत सवाल उपस्थित करत हे चालते तर मी बोलल्यावर नाकाला का मिरच्या झोंबल्या असे अपत्यक्षपणे विचारले. याच वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी धर्मयुद्ध टाळायचं आहे, असं म्हटलं. या धर्मयुद्ध शब्दाबद्दल त्यांनी भाष्य केलं. मला डावलले जात आहे, अशी लोकांच्या मनात भावना आहे आणि ती तीव्र होत चालली आहे. डावलूनही मी काही करत नाही, असं लोकांना वाटतं. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक आहेत. मुळात गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकर्ता आक्रमक आहे. आम्ही खूप संघर्ष केला. खूप संघर्षातून जावे लागलं. धर्मयुद्ध हे आहे की, माझ्यात आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आहे, हे वाक्य बरंच काही सांगून जाते. कोणत्याही स्थितीत येथे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आपल्याला मान्य नसल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल करताना मी राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या कोणत्याच पदावर नाही. माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच आहेत या पंकजा मुंडे यांच्या वाक्यात आगामी धर्मयुद्धाच्या संघर्षाची झलक पाहावयास मिळते.

दरम्यान राज्यातील ओबीसीच्या नेतृत्वावरून राजकीय साठमारी सुरू असताना छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची अलीकडेच झालेली भेट ही आगामी राजकारणची नांदी ठरू शकते.

भाजपाच्या सारीपाटावर खेळल्या जाणाऱ्या या धर्मयुद्धांत कोणाची सरशी होणार आणि कोण युधिष्ठिर ठरणार हे कृष्ण ठरवणार आहे. कृष्णाने रचलेल्या चाली आगामी काही काळात महत्त्वाच्या ठरणार आहेत. पण हा कृष्ण नेमका कोण याचा शोध प्रत्येकाने आपल्या आकलनानुसार घ्यावा.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: