धर्मांतराचा आरोपः युवकाची २०० किमीची ‘न्याय्य पदयात्रा’

धर्मांतराचा आरोपः युवकाची २०० किमीची ‘न्याय्य पदयात्रा’

नवी दिल्लीः पोलिसांनी इस्लाम धर्मात प्रवेश केल्याचा आरोप लावल्याने व गावातल्या लोकांनी सामाजिक बहिष्कार टाकल्याने उत्तर प्रदेशातील स्वतःला कट्टर हिंदु

धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी मधु किश्वर यांच्यावर गुन्हा
‘कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करता येत नाही’
जंतरमंतर चिथावणीखोर घोषणा; ६ जणांना अटक

नवी दिल्लीः पोलिसांनी इस्लाम धर्मात प्रवेश केल्याचा आरोप लावल्याने व गावातल्या लोकांनी सामाजिक बहिष्कार टाकल्याने उत्तर प्रदेशातील स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणारा एक तरुण २०० किमी अंतराची पदयात्रा करत सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. या युवकाचे नाव प्रवीण कुमार असून तो सुमारे २०० किमी चालत दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाकडे निघाला आहे. हा तरुण ६ ऑगस्टला दिल्लीत पोहचण्याची शक्यता आहे. आपण हिंदूच असून इस्लाममध्ये प्रवेश केल्याचे आपल्यावर खोटे-नाटे आरोप लावण्यात आले आहेत, त्याचबरोबर ग्रामस्थांनी सामाजिक बहिष्कार टाकल्याने आपण दुखावले गेलो असल्याचे प्रवीण कुमारचे म्हणणे आहे.

काही दिवसांपासून उ. प्रदेशमधील दहशतवादविरोधी पोलिसांचे एक पथक धर्मांतर प्रकरणी अब्दुल समाद या तरुणाचा शोध घेत आहेत. या चौकशीत २३ जूनला पोलिसांचे एक पथक सहारणपूर येथील शीतला खेडा गावांत अब्दुल समाद याच्या घरापर्यंत पोहचले पण त्या पत्त्यावर प्रवीण कुमार राहात असल्याचे लक्षात आले. पण पोलिसांचा दावा आहे की प्रवीण कुमार याने इस्लाम धर्मांत प्रवेश केला असून या धर्मांतराच्या मागे मोठे जाळे राज्यात कार्यरत आहे. हे जाळे तयार करण्यामागे इस्लामी दावाह सेंटर (आयडीसी) ही संघटना असून तिचे मुख्य संचालक मुफ्ती काझी जहांगीर कासमी व मोहम्मद उमर गौतम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मागे उ. प्रदेश पोलिसांनी तयार केलेली धर्मांतर झालेल्यांची एक यादी उघडकीस आल्याने खळबळ माजली होती. या यादीत अब्दुल समद याचे नाव आहे. या अब्दुल समदच्या नावापुढे प्रवीण कुमार याचे छायाचित्र लावण्यात आले असून अन्य माहिती ही प्रवीण कुमारचीच आहे.

पोलिसांनी प्रवीण कुमारची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले पण शीतला खेडा गावांतील ग्रामस्थ प्रवीण कुमारला माफ करण्यास तयार नाहीत. त्यांच्यामध्ये प्रवीण कुमारने इस्लाम धर्म स्वीकारल्याचा संशय आहे. या संशयावरून ग्रामस्थांनी प्रवीण कुमारवर सामाजिक बहिष्कार घातला आहे व त्याचा मानसिक छळही सुरू केला आहे. काही अज्ञातांनी प्रवीण कुमारच्या घरावर ‘पाकिस्तान जाओ’ असेही लिहिले आहे.

प्रवीण कुमार हा पीएचडीचा विद्यार्थी असून त्याने अत्यंत दुःखद शब्दांत टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, तो अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून सर्व देशाला वस्तुस्थिती कळावी म्हणून त्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत पदयात्रा काढण्याचा निश्चय केला आहे.

गेल्या २७ जुलैला प्रवीण कुमारने आपले घर सोडले. त्याने आपल्या पदयात्रेचे नाव सामाजिक न्याय यात्रा असे ठेवले आहे. माझ्यावर जो कलंक लावला गेला आहे तो पुसण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात असल्याचे त्याने सांगितले.

प्रवीण कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पुस्तकही लिहिले आहे.

प्रवीण रोज सुमारे ३० किमी चालत असून ३० जुलैला तो दादरी येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी थांबला होता, त्यावेळी काही पोलिसांनी त्याचे स्वागत केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: