पाठींब्याबाबत काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही

पाठींब्याबाबत काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही

सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ मागितला पण अधिक वेळ देण्यास राज्यपालांचा नकार.

आपण इतके रक्तपिपासू का होतोय?
गेहलोत सरकारने बहुमत सिद्ध करावेः भाजप
लोकांचा मूड ओळखण्यात उदारमतवादींचे अपयश

शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेस अजूनही निर्णय घेऊ शकलेली नाही. त्यामुळे आज संध्याकाळी शिवसेनेने राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापन करण्यासाठी दोन दिवसांचा वाढीव अवधी मागितला. मात्र राज्यपालांनी अधिक वेळ देण्यास नकार दिला आहे.

कॉंग्रेसने आज दिवसभर बैठका केल्या. सकाळी वर्किंग कमिटी नंतर अहमद पटेल-सोनिया गांधी अशा बैठका झाल्या. त्यानंतर दुपारी ४ वाजल्यापासून काँग्रेस आमदारांबरोबर सोनिया गांधी यांची बैठक झाली. त्यानंतरही काही निर्णय झाला नाही.

शरद पवार यांच्याशी बोलून, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दोन दिवसांत निर्णय घेतील, असे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खर्गे, राजीव सातव यांनी सांगितले.

दरम्यान कॉंग्रेसचा निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवसेना आज राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापनेचा दावा करू शकलेली नाही.

राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होणार आहे, तर काँग्रेस सरकारला बाहेरून पाठींबा देणार आहे, या स्वरूपाच्या चर्चा दिवसभर सुरु होत्या, पण त्यावर अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत झाला नाही.

महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आज दुपारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्र्याच्या हॉटेल ताजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने पाठींब्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिल्याचे समजते.

उद्धव यांच्याबरोबर आदित्य ठाकरे उपस्थित होते, तर राष्ट्रवादीच्या बाजूने शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित होते.

भाजप काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर सरकार स्थापन करू शकते, तर महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस का बरोबर येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

“खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे’, अशा शब्दात ट्वीट करून शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

भारतीय जनता पक्षाने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे राज्यपालांना सांगितल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. सावंत यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ‘एनडीए’मधून बाहेर पडणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0