दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये परस्परविरोधी मते

दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये परस्परविरोधी मते

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला एकूण मतदानापैकी केवळ ४ टक्के मते मिळाली व या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही

सत्तेवर पकड
काँग्रेसची सूत्रे सध्या सोनियांकडेच
राज्यसभेच्या ३ जागांमुळे बदलले म. प्रदेशचे राजकारण

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला एकूण मतदानापैकी केवळ ४ टक्के मते मिळाली व या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. एवढेच नव्हे तर या पक्षाच्या ६६ उमेदवारांपैकी ६३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एखाद्या उमेदवाराला एकूण झालेल्या मतदानापैकी १६.६७ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते.

आश्चर्याची बाब म्हणजे याच काँग्रेसला २००८च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांत ४० टक्के मते मिळाली होती. पक्षाची दिल्लीतील ही सर्वात उत्तम कामगिरी समजली जाते. त्यावेळी शीला दीक्षित यांनी काँग्रेसचे सरकार स्थापन केले होते. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सलग तीन वेळा सत्ता मिळवली होती. पण गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय अशी होताना दिसली.

मंगळवारी दिल्ली विधानसभेचा निकाल आल्यानंतर आणि आम आदमी पक्षाला बहुमत मिळाल्याचे जवळपास सिद्ध झाल्यानंतर काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिल्लीच्या मतदारांचे अभिनंदन केले. दिल्लीसारखे  मतदान (भाजपाविरोधात) यापुढे २०२१ व २०२२ मध्ये अन्य राज्यातल्या विधानसभा निवडणुकांत व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. चिदंबरम यांच्या अशा म्हणण्याचा अर्थ हा होता की, दिल्ली विधानसभा निवडणुकांत भाजपने अत्यंत विषारी असा हिंदू-मुस्लिम विभाजनवादी प्रचार केला होता, त्याला मतदारांनी चोख उत्तर देऊन देशाची सेक्युलर मूल्यांची पाठराखण केली.

पण चिदंबरम यांच्या या ट्विटवर दिल्ली महिला काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी तीव्र नाराजी प्रकट केली. चिदंबरम आपच्या विजयाचे का कौतुक करत आहेत काँग्रेस पक्षाच्या दारुण अवस्थेविषयी ते का बोलत नाहीत, असा प्रतिप्रश्न शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केला होता. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसने बाहेरचा पक्ष आउटसोर्स केलाय का, असा थेट सवाल त्यांनी चिदंबरम यांना उद्देशून केला होता. त्यावर कोणाचीही प्रतिक्रिया आली नाही.

त्यानंतर काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या पराभवाची तुलना कोरोना विषाणूच्या संसर्गाशी केली. जर दिल्लीचे निकाल कोरोना विषाणू सारखे असतील तर त्याने पक्ष जर्रर झाला असल्याचा त्यांच्या ट्विटचा अर्थ होता. रमेश यांनी पक्षाच्या अंतर्गत रचनेमध्ये लवकरात लवकर बदल करावेत. ज्येष्ठ नेत्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा, अनेक नेते आजही मंत्री असल्यासारखे वागतात अशी टीका केली होती.

रमेश यांच्यानंतर पक्षाचे आणखी एक नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी रमेश यांच्या विधानाशी सहमती दर्शवत दिल्लीचे निकाल अत्यंत निराशाजनक असून आपणाला नव्या दृष्टीकोनाची गरज व काम करावे लागेल असे ट्विट केले होते.

दुसरीकडे पक्षाचा दारुण पराभव झालेला दिसत असूनही दिल्ली काँग्रेसचे प्रभारी पी. सी. चाको यांनी काँग्रेसच्या पराभवाला शीला दीक्षित जबाबदार असल्याचा आरोप केला. शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना २०१३ सालापासून काँग्रेसचे पतन सुरू झाले होते. आपसारख्या नव्या पक्षाने काँग्रेसचा मतदार हिसकावून घेतला व तो पक्षाला पुन्हा मिळवता आला नाही, असे ते म्हणाले.

चाको यांच्या टीकेनंतर अस्वस्थ झालेल्या शीला दीक्षित यांचे निकटचे सहकारी पवन खेरा यांनी चाको यांच्यापुढे काँग्रेसच्या कामगिरीची आकडेवारी सादर केली. २०१३मध्ये काँग्रेसचा पहिला पराभव झाला तेव्हा पक्षाला २४.५५ टक्के मते मिळाली होती. २०१५ च्या निवडणुकांपासून शीला दीक्षित दूर राहिल्या होत्या, त्यावेळी मतदान टक्केवारी ९.७ टक्क्यांपर्यंत घसरली. २०१९मध्ये जेव्हा शीला दीक्षित पुन्हा दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाल्या तेव्हा लोकसभा निवडणुकांत काँग्रेसची टक्केवारी २२.४६ टक्के इतकी झाली असा दावा पवन खेरा यांचा होता.

पवन खेरा यांच्या काही मुद्द्यांशी सहमती दाखवत काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते अभिषेक मनुसिंघवी यांनी शीला दीक्षित यांची उणीव पक्षाला भासली असे विधान केले. त्यांचे निधन झाल्याने दिल्ली काँग्रेसला त्यांच्या उंचीएवढे दुसरे नेतृत्व मिळाले नाही. आता रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज काँग्रेसला आहे असे मनुसिंघवी यांचे मत होते.

काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षातील नेत्यांकडून वेगवेगळी विधाने, प्रतिक्रिया आल्या त्याचा उगाच गवगवा करू नका असे प्रसारमाध्यमांना सांगितले. दिल्लीच्या पराभवावर पक्षातील सर्वजण नाराज व चिंतेत आहे. अनेकांना संतापही आला आहे. पण परस्परविरोधी प्रतिक्रिया देण्याचा अर्थ एकमेकांचा पाय ओढणे नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: