काँग्रेस हरली – बरं झालं!

काँग्रेस हरली – बरं झालं!

धर्म जात-पात त्यांच्यावर निवडणुका जिंकणे सोपे असते. पण सरकार चालवण्यासाठी हे मुद्दे मदतीस येत नाहीत. त्यामुळे पाच वर्षाच्या नंतर किंवा त्याच्या आधीच कदाचित भारतात राजकीय स्थित्यंतर घडणार हे नक्की! फक्त राजकिय नव्हे तर सामाजिक सुद्धा!

लोकपालला स्वत:चे कार्यालय नाही
नकवींच्या निवृत्तीनंतर भाजपचा एकही मुस्लिम सदस्य संसदेत नाही
पिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून एक्झिट पोलमध्ये जेवढे दाखवलं होतं त्यापेक्षाही कितीतरी कमी जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. आता अनेक राजकीय पंडित विश्लेषक – विचारवंत त्याचे विश्लेषण करतील.
२०१३ची निवडणूक आणि २०१९ची निवडणूक मी  जवळून बघितली आहे आणि या दोन्ही निवडणुका पाहता, काँग्रेसचा पराभव होण्याची काही महत्त्वाची कारणे मला दिसून आली.

सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे, सध्याच्या काँग्रेसकडे, इंग्रजीत ज्याला मास बेस म्हणतात तो अजिबात नाही. म्हणजेच इथल्या जनतेशी त्याची नाळ जोडलेली नाही. २०१३ मधील राहुल गांधी, आणि २०१९मध्ये जे दिसले ते, दोघांतही जमीन-अस्मानाचा फरक आहे राहुल गांधींनी स्वतःला बदलवले, पण काँग्रेस बदललेली नाही हे येथे आवर्जून नमूद करावे लागते. याला कारण काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष ठिय्या देऊन बसले काहीही काम न करता आपली संस्थाने सांभाळण्यात गर्क असलेले मातब्बर राजकीय नेते!

या लोकांचे योगदान काय आहे? तर काहीही नाही! फक्त स्वतःची जागा पक्की धरून ठेवणे, पक्षांतर्गत कटकारस्थाने करणे, नव्या रक्ताला संधी न देणे, या दोषामुळे खरंतर काँग्रेस लयाला गेली, किंवा हा पराभव पदरी आला. कितीही कटू वाटलं तरी हेच सत्य आहे

काही दिवसापूर्वी योगेंद्र यादव म्हणाले होते काँग्रेस नष्ट झाली पाहिजे, आणि ते मला पूर्ण पटते. कारण ती नष्ट झाल्याशिवाय किंवा  पूर्ण नवीन संरचना झाल्याशिवाय काँग्रेसला तरणोपाय नाही, इथं काँग्रेस नष्ट होणे म्हणजे ती विनाश पावणे असे नव्हे, तर तिने संपूर्ण कात टाकली पाहिजे.

नोटबंदीचे नंतर देशांमधील आर्थिक परिस्थिती विकासदर प्रचंड ढासळलेला आहे, छोटे उद्योगधंदे बंद पडले, शेतकऱ्यांची विपन्नावस्था आहे, आणि आता तर दुष्काळ येऊ घातलेला. यापरते दलित, आदिवासी, मजूर, कष्टकरी आणि मुसलमान या वर्गांची आर्थिक सामाजिक स्थिती तर अत्यंत भयानक आहे.
आता इतकं असूनही कांग्रेस का निवडून आली नाही ? त्याचं महत्त्वाचं कारण आहे जो ओपिनियन मेकर वर्ग, किंवा मतदार आहे, त्या वर्गावर भाजप चे असणारे पूर्ण वर्चस्व!

या वर्गात कोण आहेत?

इंग्रजीत ज्याला मिलेनियम म्हणतात, म्हणजे १९९० नंतर जन्माला आलेली पिढी. या पिढीने काँग्रेसने जे आर्थिक उदारीकरण केले, संगणक क्रांती आणली, त्याचे सर्व फायदे घेतले, ज्याचा वापर तिने आपल्या आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी पुरेपूर करून घेतला. जसे वामनाने बळीला पाताळात ढकललं तसे काँग्रेसला दूर केले.

हा वर्ग आहे, तो तद्दन स्वार्थी, कुठल्याही मूल्यांची चाड नसलेला असा आहे. त्याच्याबरोबर दुसरा वर्ग आहे ज्याला आपण उच्च मध्यमवर्गीय किंवा सुखवस्तू म्हणू, तो म्हणजे वरील मिल्लेंनिअल्सचे  पालक जे साधारण ४५/६०या वयातील असतात. या पालकांची  एक किंवा दोन मुले! एक अमेरिकेत आणि एक तत्सम ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये स्थायिक असतो. किंवा इथेच भारतात मोठ्या पदावर असतो. आर्थिक दृष्ट्या हा वर्ग अत्यंत संपन्न आणि सुरक्षित असतो, बऱ्यापैकी पैसे गुंतवलेले असतात, सेकंड होम असतं. आणि शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी वावर असतो.

हे जे दोन वर्ग आहे ते निवडणुकीमध्ये कळीचे ठरतात.

आणि या वर्गाला भाजपने स्वतःसोबत घेऊन ठेवलंय. आणि काँग्रेसने त्याच्याकडे लक्ष दिले नाही.
काँग्रेसने आप सोबत आघाडी न करून बरंच नुकसान करून घेतलं, किंबहुना अनेक जागांवर संयुक्त आघाडी करून त्यांना पूर्ण विजय नव्हे, तरी इतका अपयशही पदरी पडलं नसतं, तुम्ही कष्टकरी, मजूर, दरिद्री, वंचित, अनुसूचित आदिवासी, अल्पभूधारक, अल्पसंख्याक, यांच्या नावाने कितीही गळे काढले तरी, हे लोक किंवा हा वर्ग भरभरून मतदान करताना आढळत नाही.

निवडणुकीचा कौल पालटण्याची क्षमता वरील दोन वर्गातच प्रामुख्याने असते, ज्याला भाजपने आपल्याकडे वळवून घेतलेला आहे.

मतदारांमध्ये आणखीन एक प्रवाह दिसतो, तो म्हणजे साधारणपणे ४५ ते ६०च्या वयातील  स्त्रिया. या मोदींच्या खंद्या समर्थक असलेल्या आढळतात. याचं कारण गुलदस्त्यात आहे, कारण संघ परिवार किंबहुना उजवी विचारसरणी ही स्त्रियांच्या विरोधात आहे, असे असूनही बहुसंख्य स्त्रिया मोदीना का पाठिंबा देतात हे खरंतर शोधणे भाग आहे. इंग्रजीत ज्याला स्टॉकहोम सिंड्रोम म्हणतात तो कदाचित असू शकतो, आणि हा स्त्रियांचा वर्ग बहुतांशी शहरी, निमशहरी आहे, या स्त्रिया उच्च मध्यमवर्गीय आहेत. त्यामानाने मजूर कष्टकरी वर्गातील स्त्रिया या निर्णायक ठरत नाहीत.

काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत राफेल, नोटबंदी, विकासदर, या मुद्यांवर लक्ष केंद्रित केलं, जे बहुसंख्य जनतेच्या जवळचे आहेत. तरीही त्याच्या पदरी अपयश का आले? महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या दशकापासून काँग्रेस पक्षाचे तळागाळात कार्यकर्ते नाहीत, की ना त्यांचा भक्कम पाया आहे.

भाजपने निवडणूक जिंकली ती लोकांच्या दुःखावर नाही, तर लोकांच्या भावनांचे भांडवल करून!

इंग्रजीत एक म्हण आहे, Patriotism is last refuge of the scoundrels आणि भाजपने नेमका हाच मुद्दा उचलला. जेव्हा पोट भरलेलं असतं तेव्हा देशभक्तीचे उमाळे काढणे अत्यंत सोपं असतं, तेव्हा युद्ध हवं असं वाटतं. आणि जनमत बहुतांशी असंच व्यक्त होतं. भाजपने नेमकं तेच करून प्रथम देशभक्ती, आणि नंतर धर्म या मुद्द्यावर उच्च मध्यमवर्ग आणि तरुण वर्गाला आपल्या बाजूला वळवून घेतले.

राहुल गांधी यांनी राफेल ,नोटबंदी, ढासळलेला विकासदर, या मुद्द्यापेक्षा ही तरुण वर्गासोबत ज्याच्यामुळे संवाद साधता येईल असे मुद्दे उचलायला हवे होते, तसं न करता त्यांनी फक्त राफेल आणि अन्य गोष्टींवर भर दिला. आणि नेमकी हीच संधी साधून भाजपने बालाकोट, हवाई हल्ले ,सॅटॅलाइट सोडणे असे लोकप्रिय मुद्दे भरपूर फिरवले.

एक लक्षात घ्यायला हवं ती भारतीय जनता किंवा मतदार म्हणा आजही अत्यंत अपरिपक्व आणि भावनिक आहे. किंबहुना भारतीय समाज मनाचा मोठा दोष आहे की, तार्किक विचार करणे त्याला पटत नाही, कोणाची कविता आहे माहित नाही,  ज्यात म्हटललेलं की, देशाला ओळखायचं असेल तर त्यामधील तरुण वर्गाच्या ओठावरची गाणी काय आहेत ती पहा!!

आणि भारतातील शहरी तरुण वर्ग हा देशभक्तीच्या जोश मध्ये आहे !! त्याला युद्ध हवे आहे, त्याला मुसलमान नको, त्याला आरक्षण नको, त्याला मंदिर हवंय!! आणि निमशहरी आणि ग्रामीण तरुण, भगवा झेंडा घेऊन मंदिर वही बनायेंगे, किंवा संभाजी भिडेच्या मागे शिवज्योत घेऊन धावताना धन्यता मानताना दिसत आहे, आणि उर्वरित वर्ग टिक टॉक वर थिल्लर व्हिडिओ करतोय. यावरून मतदारांचा कौल खरंतर ओळखायला हवा, जे काँग्रेसने केले नाही.

आणि याच बटबटीत देशभक्तीच्या भावनेचा पुरेपूर वापर भाजपने करून घेतला. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, तळागाळात कार्यकर्त्यांचे जाळे आहे, प्रसार माध्यमावर, सोशल मीडियावर मजबूत पकड आहे. त्यांचा पुरेपूर वापर त्यांनी करून घेतला.

काँग्रेस ने आता पक्षांतर्गत रचनात्मक बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. या निवडणुकीतील एकूण कामगिरी बघून जे  अपयशी ठरले, अशा नेत्यांना आता घरी पाठवायला हवं. सर्वात मोठे उदाहरण राधाकृष्ण विखे पाटील यांचा देता येईल आणि दुसरं अशोक चव्हाण! या दोन्ही नेत्यांची कामगिरी काय हा मोठा यक्षप्रश्न आहे, तरीही काँग्रेसच्या खास वर्तुळातले म्हणून ते ओळखले जातात.

वास्तविक पाहता संजय निरुपम यांचा चांगला वापर मुंबईमध्ये करून घेता आला असता, पण तो केला गेला नाही, उर्मिला मातोंडकर हरणार हे निश्चित होते, तरीही तिला अधिक मतं मिळवून देता आली असती जे काँग्रेस नेतृत्वाने केलं नाही. कारण एकच, पक्षांतर्गत राजकारण.

राज ठाकरे यांच्या ज्या सभा गाजल्या त्या निव्वळ मनोरंजन म्हणून होत्या, सभांना होणारी गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद यावर यश कधीही अवलंबून नसते.

काँग्रेसची सर्वात मोठी घोडचूक म्हणजे भाजपकडे जो आक्रमक पवित्रा आहे तो त्यांच्या नाही. पारंपारिक भारतीय मतदाराला आपला नेता हा नेहमी जाज्वल्य लागतो. भावनेला आव्हान घालणारा ,लोकानुनय करणारा, प्रसंगी डोळ्यातून पाणी काढणारा, भारतीय मूल्यं ,संस्कृती यांचा उदोउदो करणारा असा नेता भारतीय जनमानसाला सतत भुरळ घालतो. गांधीवादावर, अहिंसेवर, निवडणुका जिंकण्याचे दिवस आता गेले आहेत, ही मूल्य कालबाह्य झाली आहेत असे अजिबात नाही. पण आजूबाजूची परिस्थिती बदललेली आहे,  त्यामुळे आपल्याला आपले धोरण बदलावे लागणार. आता जर युद्ध करायचे तर धनुष्य बाण आणि तलवारी वापरल्या जातात का?नाही.तोच न्याय इथं हवा. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख या न्यायाने काँग्रेसने आता गौरवशाली भूतकाळाचे उमाळे न काढता वास्तवाकडे अधिक गांभीर्याने बघायची गरज आहे आणि त्यासाठीच काँग्रेस संपायला हवी.

काँग्रेस सारखेच आता डाव्या पक्षांनीही बुद्धिवादी, आणि हस्तिदंती मनोऱ्या मधून बाहेर येऊन, थोडं सामान्य माणसाच्या नजरेने बघायला हवं. फक्त तत्त्वांवर राजकारण चालत नाही ,तसं असतं तर राजकारणच राहिलं नसतं. काँग्रेसचा सुस्तपणा ,डाव्यांची बौद्धिक मग्रुरी, आणि वंचित बहुजन आघाडीचा संधिसाधूपणा यामुळे या निवडणुकीचा तोंडवळा बऱ्यापैकी पालटला. एक लक्षात ठेवा राजकारणात कुठलाही पक्ष कधीही संपला असे होत नाही. खरं तर सतत बहुमताने जो पक्ष निवडून येतो त्याच्यामध्ये नकळत एक उन्मत्तपणा येतो, तो काँग्रेस पक्षात आलेला होता, आणि आता भाजपमध्ये तो आढळून येऊ लागलेला आहे. आणि हीच त्यांच्य विनाशाची सुरुवात आहे. आणि विरोधी पक्षांवर अधिक जबाबदारीयेऊ घातलीय. या देशांमधील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर, त्यासाठी पूर्ण बदल होणे आवश्यक आहे. शेतातील तण पूर्णपणे जाळून, जमीन नांगरल्या शिवाय नवीन बियाणे पेरता येत नाही, भाजपच्या या विजयामुळे तण जळण्याची सुरुवात झालेली आहे.

खरं तर काँग्रेस निवडून आली नाही हे एकापरीने फायद्याचे झाले, कारण देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे ,आपण दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, बेरोजगार, महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, उद्योगधंदे लयाला चालले आहेत, आणि नवीन सरकारसमोर हे मोठे आव्हान आहे.

एक लक्षात घ्या धर्म जात-पात त्यांच्यावर निवडणुका जिंकणे सोपे असते. पण सरकार चालवण्यासाठी हे मुद्दे मदतीस येत नाहीत. त्यामुळे पाच वर्षाच्या नंतर किंवा त्याच्या आधीच कदाचित भारतात राजकीय स्थित्यंतर घडणार हे नक्की! फक्त राजकिय नव्हे तर सामाजिक सुद्धा! आणि ते फार मोठ असेल. मी आधी म्हटलेला मोदीचा मतदारवर्ग या कालावधीत बऱ्यापैकी होरपळून निघणार, त्यांच्या बुडाला जेव्हा चरचरीत चटके बसतील, तेव्हा त्यांना वास्तवाचं भान येईल.

पण त्यासाठी आता मोदी सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात  येणे गरजेचे आहे.
माझ्या मते खरं तर झालं हे उत्तम झालं, पाच वर्षानंतर परिस्थिती पालटली असेल अशी आशा करू.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0