काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा नेत्याकडे जाणार ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा नेत्याकडे जाणार ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आता औपचारिक हालचाली सुरू झाल्या असून बाळासाहेब थोरात यांच्या जागी आता बिगर मराठा नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.

आसामात ‘एनआरसी’, केरळात ‘न्याय’!
आर्थिक अटींवर १०% आरक्षण समानतेच्या तत्त्वाचा भंग ?
जत्रेतल्या आरशातले प्रकाशराव

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आता औपचारिक हालचाली सुरू झाल्या असून बाळासाहेब थोरात यांच्या जागी आता बिगर मराठा नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.

गेली काही दिवस देशभरात काँग्रेसने विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचे खांदेपालट होणार हे अपेक्षित होते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दिल्लीमध्ये पक्ष श्रेष्ठीना याबाबत भेटले होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या चर्चेत थोरात यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आले. कारण थोरात हे राज्यात मंत्री असून त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सुद्धा आहे.

आता काँग्रेस प्रभारी यांनी राज्यातील काँग्रेस नेते आणि पदाधिकारी यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन नावे सुचवावीत असे आवाहन केले आहे.

सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, तसेच मंत्री यशोमती ठाकूर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार आणि राहुल ब्रिगेड टीममधील राजीव सातव ही नावे प्राधान्याने चर्चेत आहेत. अन्य काही नावांची सुद्धा चर्चा होत आहे.

राज्यात मराठा समाजाचे असलेले प्राबल्य आणि पक्षात असलेली ताकद पाहता आजवर बहुतांशी प्रदेशाध्यक्षपद हे या समाजातील नेत्याला देण्यात आले आहे. पण यावेळी बिगर मराठा समाजातील नेत्याला हे पद देण्याबाबत पक्ष श्रेष्ठीमध्ये एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान प्रदेशाध्यक्ष पद कोणाला देण्यात यावे यासाठी राज्याचे काँग्रेस प्रभारी पाटील यांनी गुरुवारी राज्यातील तीन माजी मुख्यमंत्र्याबरोबर सविस्तर चर्चा केली. यामध्ये अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी आपली मते पाटील यांच्याकडे नोंदवली. पाटील यांनी बाळासाहेब थोरात, मुंबई अध्यक्ष भाई जगताप तसेच चरणसिंग सप्रा यांच्याशी सुद्धा नवीन प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची चर्चा केली.

बिगर मराठा नेत्यांमध्ये राज्यसभा खासदार राजीव सातव, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये राजीव सातव हे तरुण आणि युवा नेतृत्व असून ते राहुल गांधी यांच्या खास विश्वासातील मानले जातात. तर नाना पटोले यांनी भाजपचे खासदार असताना ज्या तडफेने दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारण्याचे धाडस केले होते त्या कृतीचे काँग्रेस वर्तुळात स्वागत झाले होते. त्यानंतर काँग्रेसवासी झालेले पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी
प्रबळ दावेदार मानले जातात. वडेट्टीवार यांचे नावही चर्चेत असताना एका जुन्या प्रकरणातून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे ओबीसीचे नेतृत्व आपणाकडे घेण्याच्या वडेट्टीवार यांच्या प्रयत्नावर पाणी पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष पद तरुण नेतृत्वाकडे दिले तर त्याचा पक्षाला फायदा होईल. आम्ही सर्व जण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे सांगून विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजीव सातव यांच्या नावाला एक प्रकारे होकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रदेशाध्यक्ष पदावरून बिगर मराठा नेत्यांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असून त्यामध्ये एकमेकांना चेकमेट करण्याचे प्रकार घडत आहेत.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0