बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू

बीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू

मुंबई:  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये  सर्वसामान्य जनतेला त्यां

बीडीडी चाळींची नावे ठाकरे, पवार
बीडीडी चाळीतील पोलिसांना बांधकाम दराने मिळणार घरे
बीडीडी मूळ सदनिकाधारकांसाठी मुद्रांक शुल्क १ हजार

मुंबई:  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये  सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर  मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी वरळी येथील जांबोरी मैदानावर झाला.त्यावेळी ते बोलत होते.

चाळीतील कष्टकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, बीडीडी चाळीचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले. वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णन केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील  कष्टकऱ्यांचा  मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे .आपण कितीही मजली इमारत आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकणार नाही.  

चाळीतील संस्कृती, मराठीपण जपून ठेवा

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या  हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते. या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृतीची नाळ तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्यांना जन्माला घातले आहे, त्याच ठिकाणी आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामीण भागात ५ लाख घरे

गेल्या काही महिन्यात सुमारे पाच लाख घरं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून बांधली, गिरणी कामगारांना देखील घर देण्यास सुरुवात केली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच होते, मी त्यांच्याकडे लहानपणी जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. 

कष्टाचा ठेवा विकू नका-शरद पवार

ज्येष्ठ नेते व  माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार म्हणाले, बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते. महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते. अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकत्रितपणे येथे राहत आहेत.अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही  दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असेही पवार यांनी सांगितले.

मुंबईच्या विकासात श्रमिकांचा वाटा-बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले, अनेक विकासाचे प्रकल्प राज्यात सुरू आहेत. ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमाफी या शासनाने दिली. समृद्धी महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. तसेच मुंबईतील कोस्टल रोड, स्कायवॉक, मोनोरेल ही कामही वेगाने सुरू आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे त्यात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांच्या ज्या मागण्या होत्या, त्या मान्य झाल्या असून या पुनर्विकास प्रकल्पातील अडथळे त्यामुळे दूर झाले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईच्या विकासात श्रमिकांचा वाटा मोठा आहे. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे व मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही. मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. 

३६ महिन्यात काम पूर्ण करणार- डॉ.जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अनेक क्रांतिकारक, साहित्यिकांसह रामनाथ पारकर यांच्यासारखे क्रिकेटपटूही या बीडीडी चाळीमध्ये वास्तव्याला होते. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. करारनामा, विस्थापितांचे प्रश्न अशी अशी अनेक आव्हाने होती. परंतु त्यातून मार्ग काढला. पुढील ३६ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुमारे तीन हजार पोलिसांना घरे देण्याचे प्रस्तावित असून येथील निवृत्त पोलीस तसेच २०१० पूर्वीपासून ज्यांचे वास्तव्य आहे अशा पोलिसांनाही घरे देण्याचे नियोजन आहे.कामाठीपुरा व कुलाबा येथील झोपडपट्टीचाही समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे. 

प्रत्यक्ष कृतीवर भर-अस्लम शेख

वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले,  मुंबईतील विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. कोस्टल रोडसह अनेक विकास कामे मुंबईत प्रगतीपथावर आहेत. आणि या शासनाचा प्रत्यक्ष कृतीवर भर असून आज होत असलेला समारंभही त्याचेच द्योतक आहे. सर्वांचे गृह स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

चाळींचे संग्रहालय व्हावे-आदित्य ठाकरे

पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रलंबित विकासकामांची आम्ही माहिती घेतली. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आणि रविवारी होत असलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ हा त्याचाच भाग आहे. बीडीडी चाळींना एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. येथे पुनर्वसनानंतर नवीन इमारती बांधल्या जातील. यातील एका चाळीचे संवर्धन करावे व त्याचे संग्रहालयात रुपांतर करावे. जेणेकरून भावी पिढ्यांना या चाळींचा इतिहास जाणून घेता येईल. येत्या ३६ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पात ९ हजार ६८९ पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून केवळ घरेच नाही तर इतर सुविधाही देण्यात येणार आहे.

आगामी प्रकल्पात आरोग्य केंद्र-सतेज उर्फ बंटी पाटील

गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील म्हणाले, सर्वसामान्य जनतेला हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. गेल्या दीड वर्षात १० हजार लोकांना लॉटरी पद्धतीने म्हाडाने हक्काचे घर दिले आहे. पारदर्शकता व विश्वासार्हता ही म्हाडाची ख्याती आहे. बीडीडी पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या आणि आगामी सर्व प्रकल्पांमध्ये आरोग्य केंद्र आणि इतर सुविधाही देण्याचा शासनाचा विचार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली. त्याचप्रमाणे लोकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ‘माझे कुटुंब माझे घर’ अशा पद्धतीचा उपक्रम राबविला जावा.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0