‘आपल्याला सहा सुख मिळो !’

‘आपल्याला सहा सुख मिळो !’

आपलं अख्खं आयुष्य त्या पाच सुखाच्या भोवती फिरत असतं. संपत्ती, आरोग्य, समंजस जोडीदार, चांगली मुलं, नावलौकिक ही ती पाच सुख. पण हे सहावे सुख मात्र काहीसं गोंधळात टाकणारे, चकवणारं..

गली बॉयचे संगीत स्ट्रीट रॅपिंगचे श्रेय हिरावून घेत नाही!
आमार कोलकाता – भाग १
१८८२ मध्ये करून ठेवलेली “स्त्रीपुरुषतुलना” – आज ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन!

हल्की-फुल्की सी है जिंदगी.
बोझ तो .. ख्वाहिशों का है…    

‘रोझबड’ हा शेवटचा शब्द उच्चारून,अमेरिकन वृत्तपत्रजगाचा अनभिषिक्त सम्राट चार्ल्स केन मरण पावतो. ‘सिटीझन केन’ या सिनेमात चार्ल्स आयुष्यभर एक चांगला माणूस, नागरिक बनू पाहतो आणि त्या मनिषेपोटी सर्व चुकीची काम करत सुटतो. पैसाअडका, सत्ता अमाप मिळतं पण वाट्याला येत एकाकी आयुष्य.
एक तरुण वार्ताहर ‘रोझबड’ या शब्दांमागील रहस्य शोधण्याच्या मागे लागतो. केनचा आख्खा भूतकाळ खणून काढतो, तरीही ‘रोझबड’ हे काय प्रकरण आहे हे गुपितचं राहते. सिनेमाच्या शेवटी केनच्या भव्य प्रासादातील अडगळीचं सामान जाळण्याचे काम सुरू असते आणि कॅमेरा स्थिरावतो तेव्हा आगीत भस्मसात होत असतो, बर्फात खेळायचा केनचा बालपणीचा स्केट बोर्ड ज्यावर लिहिले असतं ‘रो झ ब ड’ ..
सुखाच्या कल्पना वरकरणी ज्याच्या-त्याच्या वेगवेगळ्या भासत असल्या तरीपण बहुतांश लोकांच्या सुखाच्या, यशाच्या कल्पना या साचेबद्ध असतात. ‘सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे’ अशी अवस्था सर्वत्र अनुभवायला मिळते. चीनमध्ये ‘आपल्याला सहा सुख मिळो!’ अशी अर्थपूर्ण शुभेच्छा देण्याची एक नितांत सुंदर प्रथा आहे. ही सहा सुख कोणती ? या त्यापैकी पाच सुख आपल्याला अतिपरिचयाची. किंबहुना आपलं अख्खं आयुष्य त्या पाच सुखाच्या भोवती फिरत असतं. संपत्ती, आरोग्य, समंजस जोडीदार, चांगली मुलं, नावलौकिक ही ती पाच सुख. पण हे सहावे सुख मात्र काहीसं गोंधळात टाकणारे, चकवणारं.. सहावे सुख म्हणजे आपल्याला निर्भळ, निखळ सुख कशातून मिळते, ते उमजणे आणि त्याचा आनंद मिळवणे, ही ती सहाव्या सुखामागील कल्पना.

आपण पहिल्या पाच सुखाच्या पूर्तीलाचं सुखी आयुष्य समजतो. आणि मग गोष्टीतल्या राजकन्येसारखा मऊ सात गाद्यांच्या खाली असलेला एक छोटासा वाटाणा आपल्याला कायम बोचत राहतो.. कारण जगणं आपलं असतं, पण स्वतःच्या रंगापेक्षा इतरांचे गडद तीव्र रंग जास्त मिसळलेले असतात. तिचं बोच खुपत असते.. मग कुठे तरी वरवर मन रमवण्याचा केविलवाणी धडपड सुरू होते.

तीच..तीच..ती पाहून पाहून
शिणले, विटले, किटले अंतर;
याहुन काही नवे दिसावे
ताण मनाला असा भयंकर..
(इंदिरा संत)

मार्क ट्वेनने एके ठिकाणी म्हटलं आहे, अस्वस्थ मन हे तोंडात अडकलेल्या केसासारखे असते. पण ही अवस्थता का? याचा थांबून विचार करावा, असं किती जणांना वाटतं. सध्या शांततेमुळे आपल्याला पक्ष्याचे स्वर ऐकू येतात.. त्यांचा आनंद  होतो ना! अशीच शांतता आपल्याला हवी असते. ती शांतता आतल्या मूल स्रोताकडे घेऊन जाईल. थोडं थांबून आपण मनाला विचारतो का? काय रे, तुला काय हवं? ‘कशासाठी पोटासाठी’च्या तालावर नाचतांना नेमका कोणत्या गोष्टीचा विसर पडतोय?

आयुष्य वेंचूनि कुटुंब पोसिलें।
 काय हित केले सांग बापा।।

अर्थात भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या लोकांना हे वेडगळ, अव्यवहारी वाटेल.. हे असलं सहावे सुख वगैरे कवी कल्पना वाटेल.
डेव्हिड थोरोला जंगलात एक चमकता दगड सापडला होता. आपल्या झोपडीत त्याने लिखाणाच्या मेजावर तो ठेवला, खिडकीतून येणारे प्रकाशकिरण त्यावर पडले की विविध रंगछटा खूप सुरेख दिसत असे. पुढे थोडे दिवस जंगलात निरीक्षणासाठी मुक्काम केल्यानंतर, खूप दिवसांनी आपल्या झोपडीत आला. त्याला जाणवले की तो दगड चमकत नाहीये, मग त्याच्या लक्षात आले की अरे, यावर धूळ बसली आहे.. क्षणार्धात त्याने दगड घेतला आणि दूर जाऊन भिरकावून दिला.. कारण काय माहिती आहे? केवळ शोभेची ही वस्तू मी जवळ बाळगली तर तिची निगा राखावी लागेल..एकातून एक अशा वस्तू जमा करण्याचा मोह मला होईल. त्यांची निगा राखत बसलो तर निसर्गाची किती रूप बघणं निसटून जातील.. निसर्गाचे बदलते आविष्कार अनुभवणं म्हणजे ब्रह्मानंदी टाळी.. त्यामुळे हा मोह नकोच.. थोरो जीवनवादी होता व त्याने  जगण्यातलं सौंदर्य भरभरून अनुभवलं.
जगतानां सहजता हवी..सहजता ही सहाव्या सुखाकडे जाण्याची गुरुकिल्ली.
या सहाव्या सुखाचं रुपडं तसं एकदम साधंसुध ..
माळरानावर उमललेल्या छोट्याशा गवतफुलासारखं.. हवेच्या झुळकीने सहज डोलणार..पावसाळ्यात वाहणाऱ्या छोट्या ओहळाच्या सिंफनी सारखं.. अचानक येणाऱ्या आल्हाददायक हवेच्या झुळकीसारखं, न दिसणाऱ्या फुलांच्या मंद सुवासाने प्रफुल्लित करणारं.. एक अज्ञात सुख..
असे एक वेगळे सुख अस्तित्वात आहे, याचाच मुळी बहुतेकांना पत्ता नसतो. काहींना शेवटपर्यंत याचा शोध आणि बोध दोन्हीही होत नाही. बेसावधपणे, अचानक एखाद्या संवेदशील मनाची या सहाव्या सुखाशी गाठभेट होते. आणि मग सुरू होतो एक चिरंतर आनंदयात्रा!

फ्रेंच लेखक मार्सेल प्रुस्तला हे सहावे सुख चहा पिताना सापडलं. एकदा तो बाहेरून आल्यावर, आईने त्याला चहा आणि त्या बरोबर फ्रान्समध्ये विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या केक ज्याला ‘मॅडलीन’ म्हणतात, तो दिला. चहा सोबत केकचा तुकडा तोंडात टाकला आणि विसरून गेलेली एक चव त्याच्या जिभेला जाणवली. ती चव त्यांच्या रंध्रारंध्रांत पसरली.. एक वेगळी अनुभूती शरीर, मन, बुद्धी घेत होत.. अचानक त्याला आपलं बालपण, संगवडी, शाळा, रस्ते, झाड पानंफुलं…असं लख्ख दिसायला लागलं. त्याला सुखाचा, आनंदाचा स्रोत उमजला. त्यामुळे अशा अनुभूतीला ‘मॅडलीन मोमेंट’ म्हणतात नंतर प्रुस्टने अतिशय तरल अशी महाकादंबरी ‘रिंमेंब्रन्स ऑफ थिंग्ज पास्ट’ लिहिली.

‘काळजातले अनेक अज्ञात प्रदेश
ज्यांचे अस्तित्वही ठावूक नव्हते आजवर,
हलके हलके दिसत आहेत मला
पावलांखाली नव्याच वाटा, आतबाहेर, सर्वभर…’

(शांता शेळके)

जीवन सहज आहे, ते सतत बुद्धीच्या चष्म्यातून बघितलं तर.. बुद्धीला मर्यादा आहेत, जगणं त्याहून विस्तीर्ण आहे. त्यासाठी खेळकर वृत्ती हवी.. एखाद्याला हे सहावे सुख स्वार्थी वाटण्याची शक्यता आहे. आनंदी नसणे हे नि:स्वार्थी आहे, आनंदी असणे स्वार्थी आहे हा समज आहे. कारण आपली जडणघडण तशी आहे. आनंद असो दुःख चारचौघाची साथ हवी. काही अनुभूती, काही सुखदुःखाचा अनुभव केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता असतो. हे समजून घेणं गरजेचं..

सुखी माणसाच्या सदऱ्याचं माप ज्याचं त्याचं.. प्रत्येकाचं बेट वेगळं.. प्रत्येकाचा युरेका, आहा क्षण वेगळा.. सहावे सुख हे छानसं व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहे. स्वतःची व दुसऱ्याची स्पेस अदबीने जपणार.

सहाव्या सुखाचा हा शोध घेत असताना एखाद्यावेळी असं ही जाणवू शकतं अरे! ज्याला आपण सहावे सुख समजतो होतो, त्यापर्यंत पोहचण्याचा प्रवासच जास्त रसरशीत, उल्हासपूर्ण आहे.. मग सहाव्या सुखाच्या प्राप्तीपेक्षा झालेल्या प्रवासचं सहावे सुख बनून जाते.. ‘राह बनी खुद मंजिल..’

पॉल गॅलिकोच्या एका कथेतली एका आजीबाईंच्या मनात एक अपुरं स्वप्न दाबलेलं असतं. तिला एक विशिष्ट महागडा ड्रेस आवडलेला असतो. खरं तर तो घालावा असं वय ही राहिलेलं नसतं पण पैशाअभावी राहून गेलेली एक सुप्त इच्छा पूर्ण करायची ओढ असते. आयुष्यभर काटकसर करून ती तो खास ड्रेस घ्यायला लांब पॅरिसला निघते. प्रवासात तिला वेगवेगळी माणसं भेटतात. तिच्या निरपेक्ष, प्रेमळ, आपुलकीच्या वागण्यामुळे खूप जणांना तिची मदत होते. तिचा लोकसंग्रह वाढतो.. पुढे ती खास ड्रेस विकत घेते, पण ड्रेसपेक्षा तिला खरा आनंद मिळतो तो प्रवासात भेटलेल्या लोकांच्या सहवासात, प्रेमात.. बारीक सारीक असे सहाव्या सुखाचे नाजुक पदर.. कधी देण्यात तर घेण्यात मज्जा आणणारे.

दुसऱ्याला गवसलेल्या सहाव्या सुखाचे साक्षीदार, रसिक व्हायला पण एक दिलदारपणा हवा. खूप साधी, स्वच्छ मनाच्या लोकांची श्रीमंती कुबेराला लाजवणारी असते. त्यांना स्वतःच्या मर्यादांच भान असते. स्वसमाधानासाठी एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा त्यांचे आयुष्य उजळवून टाकते..

कुब्जा अशीच…पहाटेच्या वेळी गंगेत उभी असते. ऐकू येतो श्रीकृष्णाचा मंजुळ पावा.. सर्व गोकुळ झोपले असताना, राधा निद्रिस्त असतांना हा पावा कुणासाठी?

तिथेच टाकून आपुले तनमन
विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्यायली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे,
“हे माझ्यासत्व..हे माझ्यासत्व..”

(इंदिरा संत)

अशा सहाव्या सुखात जगणारी काही माणसं आहेत जगात.. काहींना मान मिळतो तर काहींना वाट्याला उपेक्षा येते. ‘आहार, निद्रा, भय, मैथुन’ अशा मूलभूत गरजा माणसांना एकमेकांशी बांधून ठेवतात. त्यामुळे लोकांची आयुष्याकडून तितकीच अपेक्षा असते. जगण्याबद्दलची स्वच्छ वैचारिक जाणीवचं आपल्याला समृद्ध करत राहाते. नाहीतर या गुंत्यात अडकून होणारी घुसमट प्रचंड भयानक. वेळप्रसंगी अशी ही फरफटत थांबवणे हे सुद्धा सहावे सुख ठरू शकते. ही आनंदयात्रा हळूहळू अंतर्मुख करून  जाते.. तेव्हा आत्मशोधाची गरज तीव्र होते. खळखळत्या पाण्याचं विसर्जन शांत नदी होतं..

‘उंबरठा’ सिनेमातील शेवट हा स्वतःच्या पलीकडील असलेल्या सहाव्या सुखाची प्रचिती देणारा. रेल्वेच्या खिडकी बाहेर मोकळेपणाने बघणाऱ्या सावित्रीच्या चेहऱ्यावर एक अनोखं समाधान असते..तिला गवसलेल्या सहाव्या सुखाच्या पलीकडच्या प्रदेशाचा पत्ता तिच्या चेहऱ्यावर वाचता येतो.. गाडी पुढे पुढे जात असते आणि झाडं, डोंगर,शेत मागे मागे…

‘तारांवरी पडावा केव्हा चुकून हात;
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा…’

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0