कोरोनाचे संकट कायम, जबाबदारीची गरजःमुख्यमंत्री

कोरोनाचे संकट कायम, जबाबदारीची गरजःमुख्यमंत्री

मुंबई: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने

लॉकडाऊन : ईपीएफ खातेधारक पैसे काढू शकणार
करोना थकून मरावा, माणसं जिवंत रहावीत
‘तरीही आमचा लढा सुरूच’ : शाहीनबाग आंदोलकांचा निर्धार

मुंबई: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहे, असे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. या परिषदेस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री, अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य सर्वश्री, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर्स, नागरिक आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले, आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात मग आज ही चर्चा कशासाठी? तर कारण स्पष्ट आहे. जगभरातील  देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटू आहे, आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल टाकले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून ही परिषद त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे  जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत, तर डॉक्टर, नर्सेस, पोलिस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपणही सज्ज राहण्याची आवश्यकता ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

रुग्णालयांनी ऑडिट करून घेण्याचे आवाहन

आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करून घेण्याचे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट

महाराष्ट्राने ज्या वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तेवढी क्वचितच एखाद्या राज्याने केली असावी. पण आजही ऑक्सिजनची आपल्याकडे कमी आहे आपण रोज ३ हजार मे.टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. काही यंत्रसामग्री बाहेरून आणावी लागत आहे, त्यात काही वेळ जाणार आहे असे सांगून आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहे, सव्वा लाख  ऑक्सिजन बेड वाढवले म्हणजे आपण  या सगळ्या रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकतो का याचा विचार करण्याची आवश्यकताही ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली. 

ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज

गेल्या अनुभवातून आपण काय शिकलो हे महत्त्वाचे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी अधिक अडचणीची ठरली. आपली ऑक्सिजनची गरज अचानक वाढली. राज्याची ऑक्सिजनचे उत्पादन दररोज १२०० ते १३०० मे.टन असून ही गरज मागच्यावेळी १७०० ते १८०० मे.टन एवढी वाढली. इतर राज्यातून हजारो कि.मी. वरून ऑक्सिजन आणावा लागला, त्यातून आपण ऑक्सिजनची गरज भागवली. पण त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला त्या राज्यातून ऑक्सिजन मिळत नाही, तो ऑक्सिजन ते राज्य त्यांच्या राज्यातील रुग्णांसाठी वापरतात ही वस्तुस्थिती आहे अशावेळी आपल्या ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे.  

राज्यात १४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन

आज १४०० मे.टन ऑक्सिजनचे उत्पादन राज्यात होत आहे. त्यात स्टील आणि लघु उद्योगासाठी ऑक्सिजन वापरतात. औषध क्षेत्रात, लस तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मागच्यावेळी सर्वच आपण ऑक्सिजन मेडिकल कारणासाठी वापरला म्हणजे इतर गोष्टींसाठी लागणारा ऑक्सिजन आपण बंद केला. आजही १४००  मे. टन ऑक्सिजनपैकी ३०० ते ३५० मे. टन ऑक्सिजन आपण रुग्णांसाठी वापरत आहोत. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ येऊ नये हा आपला प्रयत्न असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनाविरुद्ध आंदोलन करण्याचे आवाहन

राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना? याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्हीही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर ते कोरोनाविरुद्ध करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केले. 

विक्रमी लसीकरणाबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी एकाच दिवसात १२ लाख नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने नवा विक्रम केला असून त्याबद्दल ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे कौतुक केले. जसजशी लस उपलब्ध होईल तसे लसीकरण गतीने करण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  

गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन

आता सणवाराचे दिवस आहेत, गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे हे सांगतानाच  नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी शासनाची तयारी- मुख्य सचिव

प्रास्ताविकात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वैद्यकीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता वाढवत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मुख्य सचिवांनी सांगितले. गरज पडल्यास इतर राज्यांमधून ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वाहतूकव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही बाहेरून ऑक्सिजन मागविण्याची वेळ येऊ नये यावर भर देण्यात येत असल्याचेही कुंटे यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या उपचार मानकानुसार औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि हाफ़किनला सूचना दिल्या असून कोविड चाचण्यांची क्षमता प्रतिदिन ३ लाखांवर गेली आहे, त्यात आरटीपीसीआर दोन लाख तर एक लाख ॲटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्यांसठी ४१० शासकीय आणि २०२ खाजगी प्रयोगशाळा कार्यन्वित असून रुग्णांसाठी ४ लाख ८० हजार खाटा वाढविण्यात आल्या आहेत. १ लाख २० हजार ऑक्सिजनयुक्त खाटा, ३६ हजार आयसीयू आणि १४ हजार व्हेंटिलेटर्स बेड्सची तयारी प्रशासनाने केली आहे. राज्यात लसीकरणाची कामगिरी अतिशय उत्तम असून काल एकाच दिवशी १२ लाख लसींच्या मात्रा देऊन देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व उपस्थित फॅमिली डॉक्टरांनी आपल्या रुग्णांची तसेच नागरिकांची योग्य तपासणी करावी आणि त्या अनुषंगाने तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सीताराम कुंटे यांनी केले.

‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन परिषदेत डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, डॉ. सुहास प्रभू, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता यांनी कोविडच्या संदर्भात नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0