कर्नाटकात कोरोनाने एक मृत्यू, महाराष्ट्रात रुग्ण संख्या १५

कर्नाटकात कोरोनाने एक मृत्यू, महाराष्ट्रात रुग्ण संख्या १५

नवी दिल्ली : देशात कर्नाटक राज्यात कोरोनाने बाधित झालेल्या एका ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती कलबुर्गी येथील असून त्यांचा मृत्यू मंगळवारी झाला होता पण मृत्यूचे निदान कोरोनामुळेच झाले आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. पण हा रुग्ण कोरोना बाधित होता असे सरकारने सांगितले. ही व्यक्ती २९ फेब्रुवारीला सौदी अरेबियातून भारतात आली होती व हैदराबाद विमानतळावर त्यांचे स्क्रिनिंगही झाले होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाली नव्हती
दरम्यान, देशात गुरुवारी १३ नवे रुग्ण आढळून आले असून संक्रमण झालेल्यांची संख्या ७३ झाली आहे. या १३ रुग्णांपैकी ९ रुग्ण हे महाराष्ट्रातील असून दिल्ली, लडाख, उ. प्रदेशातील एका रुग्णाचा समावेश आहे. एका विदेशी नागरिकालाही करोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली. तर पुण्यात गुरुवारी संध्याकाळी करोनाचा एक रुग्ण आढळला. त्यामुळे पुण्यातील करोना रुग्णांची संख्या ९ झाली आहे व राज्यातील संख्या १५ झाली आहे.
पुण्यातील हा रुग्ण अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले त्यात एक रुग्ण ठाण्याचा असून तो फ्रान्सहून आला होता.

दिल्लीत ३१ मार्च पर्यंत शाळा बंद
करोनाच्या संसर्गाची भीती पाहता दिल्लीतील केजरीवाल सरकारने येत्या ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत, त्या परीक्षा चालू राहणार आहेत पण सरकारने सर्व कार्यालये, खासगी कार्यालये, शॉपिंग मॉल व अन्य सार्वजनिक ठिकाणे संक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आंतरराष्ट्रीय साथ म्हणून घोषणा
जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी ‘कोव्हिड १९’ला (करोना) आंतरराष्ट्रीय साथीचा रोग म्हणून जाहीर केले. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनिव्हा येथे बोलताना करोनाची साथ जगभर पसरल्याचे मान्य करत अशी साथ अगोदर पाहिली नसल्याची कबुली दिली. पण ही साथ आटोक्यात येईल व प्रत्येक देश त्या संदर्भात उपाययोजना करत आहे, असे ते म्हणाले.

COMMENTS