कोरोना, तेलबाजार; शेअर बाजारांत ऐतिहासिक घसरण

कोरोना, तेलबाजार; शेअर बाजारांत ऐतिहासिक घसरण

मुंबई : करोना विषाणूची जगभरात पसरत चाललेली साथ आणि कच्च्या तेलावरून पेटलेल्या जागतिक राजकारणाचे पडसाद सोमवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये उमटले. जागतिक

भारतातील कोविडचे वृत्तांकन; ४ छायाचित्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर
दुसऱ्या लाटेने ‘कोवॅक्स’चा पुरवठा मंदावला
गुलजार अहमद पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

मुंबई : करोना विषाणूची जगभरात पसरत चाललेली साथ आणि कच्च्या तेलावरून पेटलेल्या जागतिक राजकारणाचे पडसाद सोमवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये उमटले. जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने भारतातील शेअर बाजारांमध्ये दिवसभरात गेल्या ३० वर्षांतील सर्वांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स एका दिवसातील घसरणीचा विक्रम गाठत २,४०० अंकांनी कोसळला. त्यानंतर थोडासा सावरत सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत १९४१ अंक खाली, ३५,६३४.९५ अंकांवर, बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीही दिवसभरात तब्बल ६ टक्के घसरला आणि अखेरीस किंचित सावरत १०,४५१.५० अंकांवर बंद झाला.

करोना विषाणूमुळे जगभर पसरलेल्या घबराटीचा तसेच तेलावरून पेटलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परिणाम म्हणून सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ३५,००० आणि १०,५०० या टप्प्यांच्या खाली घसरले. दिवसाखेर ते किंचित सावरले.

आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम म्हणून झालेल्या जोरदार विक्रीमध्ये भारतीय गुंतवणूकदारांना ७ लाख कोटी रुपये मूल्याचे नुकसान सोसावे लागले.

आर्थिक बाजारांसाठी सोमवार हा काळा दिवसच म्हणावा लागेल, असा सूर शेअर बाजारात होता. कच्च्या तेलाच्या किमती २५ टक्के कमी झाल्याची बातमी अाल्यानंतर इक्विटी, कमोडिटी आणि करन्सीजमध्ये प्रचंड घसरण झाली. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला आखाती देशांतील युद्धाच्या (गल्फ वॉर) पार्श्वभूमीवर झालेल्या घसरणीनंतर ही शेअर बाजारातील एका दिवसात झालेली सर्वांत मोठी घसरण आहे. सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात पेटलेल्या ओपेक ‘प्राइस वॉर’मुळे गुंतवणूकदारांनी तळ गाठण्यासाठी शर्यत लागल्याप्रमाणे विक्रीचा सपाटा लावला होता, असे केडिया अॅडव्हायजरीचे अजय केडिया यांनी सांगितले.

निफ्टीचे सर्व विभागीय निर्देशांत धोक्याच्या क्षेत्रात आले होते. या घसरणीचा फटका सर्वाधिक (४ टक्के घट) बसला तो निफ्टीच्या धातू निर्देशांकाला. मुंबई शेअर बाजारातील ढोबळ चित्र बघता, मिडकॅप इंडेक्स ६५५ अंकांनी (४.६ टक्के), तर स्मॉलकॅप इंडेक्स ५९२ अंकांनी (५.५ टक्के) कोसळला. ७७०हून अधिक समभागांनी त्यांचा ५२ आठवड्यांतील नीचांक गाठला.

दिवसभरातील व्यवहारांमध्ये मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग १२ वर्षांतील नीचांकावर पोहोचले. या घसरणीमुळे टीसीएस ही आयटी कंपनी मुंबई शेअर बाजारातील भांडवलीकरणाबाबत (कॅपिटलायझेशन) मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाला मागे टाकत आघाडीच्या स्थानावर पोहोचल्याचे दिसते.

करोनामुळे घबराट

त्यातच करोना विषाणूच्या साथीचा आर्थिक परिणामही आता दिसू लागला आहे. युरोपात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. इटलीमध्ये या साथीमुळे कोट्यवधी लोकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. चीनमधून होणाऱ्या निर्यातीत जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्के घट झाली आहे, असे गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक बाजार ‘येस बँके’च्या प्रकरणातून सावरत असतानाच हे सगळे झाल्याने शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण झाली आहे.

कच्च्या तेलाचे राजकारण

ओपेक आणि रशिया यांच्यातील करार मोडल्यामुळे जागतिक बाजारांमध्ये घसरण सुरू झाली. त्याचा परिणाम भारतातील बाजारांवरही झाला.

कच्च्या तेलाच्या किमती सोमवार सकाळपासून घसरतच होत्या. त्यातच ओपेक आणि रशिया यांच्यातील करार मोडल्यामुळे जागतिक बाजारांमध्ये जोरदार घसरण सुरू झाली. त्याचा परिणाम भारतातील बाजारांवरही झाला. रशियाने ओपेक उत्पादन करारातून माघार घेऊन अमेरिकेतील शेल ऑइलचे उत्पादन अशक्य करण्यासाठी आपले उत्पादन वाढवले. त्यामुळे रशिया व सौदी अरेबियामध्ये दरयुद्ध सुरू झाले. सौदी अरेबियानेही उत्पादन वाढवून किमती कमी केल्याने सर्व बाजारांमध्ये घबराट पसरली. ज्या कंपन्यांनी कच्च्या तेलावर लक्ष केंद्रित केले होते, त्यांना अतिरिक्त मार्जिन्स मोजावी लागली. जगभरातही कच्चे तेल व इक्विटीतील नुकसान भरून काढण्यासाठी विक्रीची झुंबड उडाली.

तेलावरून पेटलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचा मोठा भर तेलाच्या किमती कमी करण्यावर आहे आणि त्यांनी ओपेकला वारंवार तसे आवाहनही केले आहे. मात्र, या किमती दीर्घकाळ पडत राहिल्या तर टेक्सास आणि नॉर्थ डाकोटासारख्या वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यांसाठी यातून आर्थिक संकट उभे राहू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कच्च्या तेलाच्या किमती दुपारच्या काळात २९ टक्के घसरल्यानंतर अॅल्युमिनियम, निकेल, तांबे आणि झिंक या धातूंच्या किमतीही पडल्या. कृषीमालालाही याचा फटका बसला. एकंदर कच्चे तेल हा जागतिक वाढीतील प्राथमिक चालक घटक आहे. करोना विषाणूची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी अनेक राष्ट्रे झगडत असताना कच्च्या तेलाच्या किमती पडल्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच जागतिक मंदीची शक्यताही दाट झाली आहे, असे मत आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

जगभरातील बाजार कोसळले

सौदी अरेबिया व रशिया यांच्यातील दरयुद्धामुळे जगभरातील शेअर बाजार सोमवारी कोसळले. युरोपातील बाजार सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये चांगलेच घसरले. लंडन शेअर बाजारात ८ टक्क्यांहून अधिक, तर फ्रँकफर्ट बाजारात ७ टक्क्यांहून अधिक घट झाली. पॅरिस शेअर बाजारातील परिस्थितीही जवळपास हीच होती. इटलीची आर्थिक राजधानी मिलानसह उत्तर इटलीतील बहुतेक भागांत करोना साथीमुळे लॉकडाउनचे आदेश सरकारने दिल्यामुळे इटलीतील अनेक स्टॉक्स सोमवारी उघडलेच नाहीत.

आशियामध्ये शेअर बाजार तसेच उदयोन्मुख बाजारांतील चलनांमध्ये तेलाच्या किमती कमी झाल्याने घसरण झाली, तर येनसारखी सुरक्षित चलने वधारली.

वॉल स्ट्रीटवर विक्रीचा सपाटा कायम राहिला. यूएस फ्युचर्सनेही तळ गाठला.

त्यातच उत्तर कोरियाने सोमवारी आपल्या पूर्व किनाऱ्यावरील तीन प्रक्षेपणास्त्रे उद्ध्वस्त केल्याची बातमी आल्याने जगभरांतील बाजारांमधील वातावरण अधिकच बिघडले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: