सोशल डिस्टन्सिंग: कोरोनाविरुद्ध एकमेव प्रभावी अस्त्र

सोशल डिस्टन्सिंग: कोरोनाविरुद्ध एकमेव प्रभावी अस्त्र

९०% लोकं घरात स्वतःला कोंडून घेत असतील तर कोरोनाचा संपूर्ण प्रभाव सुमारे ५० दिवसांनंतर कमी होतो पण ८०% लोकांनी हा उपाय अवलंबला तर ५० पेक्षा काही जास्त दिवसानंतर त्याचा प्रभाव कमी होतो.

कोरोना मृत्यू : एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखाची मदत
तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
औषध साठेबाजीः गौतम गंभीरवर कारवाई होणार

कोरोनाचा प्रवास आता जगभर सुरू आहे आणि तो जाईल त्या ठिकाणी स्थिर होऊ पाहतो आहे. अमेरिकासारख्या देशांनी या विषाणूला जास्ती गांभीर्याने घेतले नाही. त्यांना वाटले की दुसरे सारे देश उगीचच बाऊ करत आहेत. पण जेव्हा या विषाणूचा जलदगतीने प्रवास सुरू झाला व अनेक अमेरिकी नागरिकांना आपल्या प्रभावाखाली घेऊ लागला तेव्हा तिथल्या प्रशासनाला जाग आली. त्यांनी आणीबाणी जाहीर केली. ऑस्ट्रेलियात जेव्हा हा विषाणू दाखल झाला तेव्हा तिथल्या वैज्ञानिकांनी हा कसा पसरतो व का पसरतो याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की जर १० पैकी किमान ८ लोक घरात राहिल्यास, इतरांच्या संपर्कापासून दूर राहिल्यास या विषाणूचा प्रसार थांबवता येतो. त्यांनीही महाराष्ट्र व भारताप्रमाणे लॉकडाऊन आरंभला आहे. त्यांना असंही जाणवलं आहे की १० पैकी ७ जणांनीच फक्त घरात राहाण्याचा पण केला तर हा विषाणूप्रसार अजिबात थांबत नाही. सिडनी विद्यापीठाने जे मॉडेलिंग केले आहे त्यात ९०% लोकं घरात स्वतःला कोंडून घेत असतील तर कोरोनाचा संपूर्ण प्रभाव सुमारे ५० दिवसांनंतर कमी होतो व ८०% लोकांनी हा उपाय अवलंबला तर ५० पेक्षा काही जास्त दिवसानंतर त्याचा प्रभाव कमी होतो. आपल्यालाही ऑस्ट्रेलियाच्या या संशोधनाचा फायदा करून घ्यावा लागेल. तरच आपली धडगत आहे.

कोरोना व आपली प्रतिकारशक्ती

या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आपल्यालाच आपली प्रतिकारशक्ती वाढवावी लागेल व त्यासाठी संतुलित आहार व व्यायामाला कोणताही पर्याय नाही. पण कोरोना सर्वांनाच आपल्या कवेत घेतो आहे. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे व ज्यांची नाही असे दोघेही या विषाणूच्या विषारी प्रभावाखाली आले आहेत, येत आहेत. या दोन्ही समूहांना या विषाणू विरुद्ध प्रभावी मारा करणारी लसच खात्रीने वाचवू शकते. पण सद्यातरी कोणतीही प्रभावी लस निर्माण झालेली नाही. त्यामुळे संतुलित आहार, व्यायाम व पूर्ण झोप या तीन गोष्टी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवू शकतात.

एखादा विषाणू आपल्या रोगप्रतिकार प्रणालीत घुसल्यानंतर काय होते?

आपली रोगप्रतिकार प्रणाली अनेक पेशी व अणुरेणूंपासून बनलेली असते, ज्याला आपण प्रतिद्रव्य किंवा अँटीबॉडी असे म्हणतो. ही आपली पहिली अंगभूत रोगप्रतिकारक प्रणाली असते. या प्रणालीत जेव्हा एखादा आगंतुक प्रवेश करतो तेव्हा शरीरातील प्रत्येक पेशीतून विषाणू-विरोधी अणू- ज्याला इंटरफेरॉन म्हटले जाते, ते तयार होतात. हे नव्याने निर्माण झालेले विषाणू-विरोधी इंटरफेरॉन त्या विषाणूला आपली स्वतःची प्रतिकृती करण्यापासून रोखायला सुरवात करते. हे द्वंद्व जेव्हा सुरू होते तेव्हा सायटोकिन नावाचा नवीन पदार्थ तयार होतो. या प्रक्रियेमुळे शरीराचे तापमान वाढते व काही उती (टिशू) सुजतात. ते स्वतःलाच मारतात कारण त्यांना जाणीव होते की त्यांना काहीतरी वाईट संसर्ग किंवा संक्रमण झाले आहे.

आपल्या शरीरात पांढऱ्या पेशी सुद्धा असतात जे शरीराला मारक जीवाणू ज्या पेशीत विसावलेले असतात त्या पेशींना मारून टाकत असतात.

आपल्या शरीराच्या सुरक्षेसाठी एक दुसरी संरक्षक फळी सुद्धा कार्यरत असते. यात पांढऱ्या पेशीतील मोनोसायट, माइक्रोफेज व न्यूट्रोफिल्स सारख्या पेशी शरीरात भ्रमण करत असतात व जेव्हा त्यांना संसर्गदोष झालाय याचा अंदाज येतो तेव्हा ते रोगप्रतिकारक संप्रेरक निर्माण करतात. या संप्रेरकांचे काम आपल्या शरीरातील इतर अवयवांना या संसर्गदोषाची सूचना देण्याचे असते. कालांतराने इतरही भागांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो हे त्यांना सुचवायचे असते.

आपल्या शरीरात तिसरी प्रतिकार फळी असते. ती आहे संयोगक्षमता. पण या प्रणालीला सक्रिय व्हायला थोडा वेळ लागतो. या प्रणालीत पांढऱ्या पेशी कार्यरत असतात व या ‘टी’ व ‘बी’ प्रकारच्या असतात. ‘टी’ पेशी संसर्ग झालेल्या पेशींना पूर्णपणे मारून टाकतात व ‘बी’ पेशी या संसर्ग झालेल्या पेशींना निष्प्रभ करतात किंवा त्या पेशींच्या बाह्यांगावर एका विशिष्ट पदार्थाचे आवरण चढवतात. या आवरणामुळे ‘टी’ पेशींना कोणत्या संसर्ग झालेल्या पेशींना नष्ट करायचे आहे ते बरोबर समजते.

पण जेव्हा आपल्या संयोगक्षमतेला या विखारी विषाणूंची वाढ रोखणे शक्य होत नाही तेव्हा ते आपली प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अशावेळी आपल्या शरीरातील काही भागात सूज वाढते, खासकरून आपल्या आतड्यात. या अवस्थेत आपल्याला ‘वायरल निमोनिया’ झाला असे डॉक्टर निदान करतात.

प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती वेगळी असते

वयाने खूप कमी व खूप जास्त लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. वयाचा प्रभाव आपल्या पेशींवर पडत असतो व वयस्कर व्यक्तींच्या पेशी जीर्ण झालेल्या असतात. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते त्यामुळे त्यांना संसर्ग सहजपणे होऊ शकतो. पण या दोन समुहाव्यतिरिक्त इतरही काहीजण असतात ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. ज्यांना आधीच काही रोग जडलेले असतात किंवा धूम्रपान करणारे असतात त्यांची प्रतिकारशक्ती सीमित असते. जर हृदयाची शक्ती कमी झाली तर ती पूर्ण ताकदीने आपले कार्य करू शकणार नाही व त्यामुळे शरीराला आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. ती कमतरता पुरी करण्यासाठी हृदय आपली पूर्ण ताकद लावायचा प्रयत्न करते व हार्टअटॅकला बळी पडतो. जर आतड्यात काही कमजोरी असेल तर ऑक्सिजन वाहण्याची त्याची क्षमताही सीमित राहते.

लॉकडाउन व व्यायाम

इतर देशातील संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की जर डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांती, घर-कोंडणे किंवा संसर्ग झाला नसेल तर अशा लोकांना चालणे, पळणे किंवा इतर बाह्यखेळ खेळता येतील. पण यासाठी योग्य सामाजिक अंतर राखणे आणि घरी आल्यानंतर साबणाने आंघोळ किंवा हात धुणे बंधनकारक आहे. सुरक्षेची ही काळजी घेतली तर बाहेर जाऊन ताजी हवा खाणे कधीही हितकारकच आहे. पण बाहेर गर्दी होत असेल तर घरात करता येतील असे व्यायामाचे हजार प्रकार आहेत. नेटवर सुद्धा शेकडो पर्याय आहेत.

कोरोना संकटावर कशा प्रकारे व केव्हा मात करता येईल?

कोविड-१९ हा एक प्रकारचा कोरोना विषाणू आहे. तो पूर्णतः नवीन असल्याकारणाने त्याच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. हा विषाणू इतर कोरोनापेक्षा वेगळा असल्याकारणाने जेव्हा तो आपल्या शरीरात पहिल्यांदा शिरतो तेव्हा त्याच्या विरुद्ध आपले शरीर कोणतीही प्रतिचढाई आखू शकत नाही. फ्लू हाही एक प्रकारचा विषाणू आहे. त्याने जेव्हा पहिल्यांदा आपल्या शरीरात शिरकाव केला होता तेव्हा कोरोनासारखीच स्थिती उत्पन्न झाली होती. पण एकदा लस बाजारात आल्यानंतर व शरीराने फ्लू विरोधात प्रतिकारशक्ती विकसित केल्यानंतर काही प्रमाणात मृत्युदर कमी झालेला आहे.

विषाणू-निर्मित आजार बरा करणं जीवाणू-निर्मित आजार बरा करण्यापेक्षा अवघड असतं. कारण विषाणूंवर अँटिबायोटिकचा फारसा प्रभाव पडत नसतो. आज कोरोनाग्रस्त रुग्णांना त्यांच्या द्वितीय लक्षणांवर उपचार देण्यात येत आहेत. अशाप्रकारे त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीला उर्जित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. एखादी लस तो रोग होणारच नाही याची दक्षता घेतो.

जगातील अनेक प्रयोगशाळेतून कोविड-१९वर संशोधन सुरू आहे. ज्या लोकांना हा आजार झाला त्यांचे सॅम्पल सूक्ष्मपणे अभ्यासल्यानंतर वैज्ञानिकांच्या असे लक्षात आले आहे की मानवाची रोगप्रतिकार प्रणाली फ्लूवर जशी कार्य करते तशीच कोविड-१९वर सुद्धा करते. संक्रमण झालेल्या काही हजार लोकांच्या दूषित पेशी तपासल्यानंतर कोविड-१९चे रोगी किती दिवसात बरे होतील, याचा अचूक अंदाज बांधणं त्यांना शक्य झाला आहे. ते प्रगतीपथावर आहेत व लस निर्मिती प्रवासात अग्रेसर आहेत. ऑस्ट्रेलियातील काही संशोधक कोविड-१९ रुग्णांवर एड्स व मलेरिया विरोधी औषधांचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. रुग्णांवर त्याचा किती सकारात्मक फरक पडतो हे तपासल्यानंतर लस निर्मितीची योजना बनवण्यात येईल. इतरही अनेक औषधांची चाचणी घेण्यात येत आहे. इबोलाची जी औषध प्रणाली विकसित करण्यात आली होती त्याचीही चाचणी कोविड-१९ विरुद्ध घेण्यात येत आहे. ही लस येत्या काही महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. चीनमध्ये आधीच आल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

कोविड-१९ दोनदा होऊ शकतो का?

पीटर डोहर्टी यांना १९९६चे विषाणूवरील कामासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार एका रुग्णाला दोनदा कोविड-१९चा संसर्ग होऊ शकत नाही. आणि जरी झाला तरी त्याचे शरीर उपयुक्तरीत्या त्या विषाणूचा प्रतिकार करू शकतो. त्यांच्या मते हा विषाणू द्रुतगतीने रूपांतरित होत नाही त्यामुळे जी लस याच्याविरुद्ध वापरात येईल ती दीर्घकाळ वापरात राहील.

प्रवीण गवळी, हे भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग कार्यरत नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: