महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत करोनामुळे बंदसदृश परिस्थिती

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत करोनामुळे बंदसदृश परिस्थिती

मुंबई : करोना विषाणू साथीचा प्रसार वाढू लागल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या  महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृ

कोरोना आणि तृतीयपंथी समुदाय
राज्यात ४३ दिवसांत ७६ हजार लहान मुलांना कोरोना
२० हजार कोटी खर्च : नव्या संसदेसाठी सरकारची अधिसूचना

मुंबई : करोना विषाणू साथीचा प्रसार वाढू लागल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या  महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा (जिम) आणि जलतरण तलाव शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १९ झाल्यामुळे हे प्रतिबंधात्मक उपाय जारी करण्यात आले आहेत. अहमदनगरमध्ये करोनाचा एक रुग्ण सापडला आहे.

मात्र, करोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी एकाचीही परिस्थिती गंभीर नाही. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहनही राज्य सरकारने केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली.  पुढील १४ दिवस राज्यातील व देशातील जनतेसाठी महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले.

मॉल्स आणि रेस्टोरंट्स बंद ठेवली जाणार नाहीत. मात्र,  या ठिकाणी जाणे लोकांनी टाळावे, असे सरकारने म्हटले आहे. सार्वजनिक वाहतूक (रेल्वे, बसेस आदी) ही अत्यावश्यक सेवा असल्याने ती बंद ठेवणे शक्य नाही. मात्र, जनतेने तारतम्य बाळगून अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करणे टाळावे, असेही सरकारने म्हटले आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणेही नागरिकांनी पुढील काही दिवस टाळावे असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

सर्वाधिक करोनाबाधित पुण्यात

पुण्यात ११, मुंबईत ३, ठाण्यात १, तर नागपूरमध्ये ३, अहमदनगरमध्ये १ असे करोनाचे एकूण १९ रुग्ण राज्यात सापडले आहेत. ही शहरे वगळता अन्य राज्यांत करोनाचा प्रसार झालेला दिसत नाही. देशातील करोनाबाधितांची संख्या ८१ झाली आहे.

इटली आणि स्पेनमध्ये गेल्या दोन दिवसांत करोनामुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या देशांत बंदसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

सौदी अरेबियाहून कर्नाटकातील कलबुर्गी या आपल्या शहरात परतलेल्या एका ७६ वर्षीय रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला होता. तो रुग्ण करोनाबाधित होता, असे निष्पन्न गुरुवारी रात्री झाले. त्यातच दिल्लीतही एका ६९ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त शुक्रवारी रात्री उशीरा  हाती आले आहे. जगभरात आत्तापर्यंत ५०००हून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

विलगीकरण कक्ष स्थापन

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. राज्यात विविध विलगीकरण कक्ष मिळून एकूण ५०२ बेड्स उपलब्ध आहेत.

अमेरिका, दुबईतून आलेल्यांना लागण

चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि इराण या सात देशांना केंद्र सरकारने करोनाबाधित म्हणून जाहीर केले होते व या देशांतून येणाऱ्यांची कसून तपासणी करण्याचे निर्देश होते. महाराष्ट्रात मात्र या सात देशांतून नव्हे, तर अमेरिका व दुबईहून आलेल्या लोकांना करोनाची लागण झाल्याचे दिसते. त्यामुळे या दोन देशांचा यादीत समावेश करण्याची सूचना केंद्र सरकारला केली जाणार आहे, असे राज्य सरकारतर्फे सांगितले गेले.

या सात देशांना १५ फेब्रुवारीनंतर भेट देणाऱ्या व शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत परतणाऱ्यांना विलगीकरण नव्हे, तर अलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन गुंडाळले

करोनाच्या साथीमुळे महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही आवरते घेण्यात आले आहे. करोनाच्या भीतीमुळे नव्हे, तर या आपत्कालीन परिस्थितीत आमदारांना आपल्या मतदारसंघात थांबता यावे म्हणून हा निर्णय केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

न्यायालयांतही खबरदारी

केवळ तातडीने सुनावणी आवश्यक आहे अशीच प्रकरणे चालवली जातील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनीही आवश्यक असेल तरच कोर्टात या, अशी नोटीस राज्यभरातील वकील, पक्षकार व सामान्य जनतेसाठी काढली आहे.

अफवा पसरवणाऱ्यांना चाप

आधीच करोना साथीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, सोशल मीडियावर याबद्दलचे घबराट पसरवणारे तसेच चुकीच्या माहितीच्या आधारावरील मेसेज पसरवले जात आहेत. लोक कोणतीही शहानिशा न करता ते फॉरवर्ड करत आहेत. असे मेसेज पसरवण्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट

करोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या वस्तूंच्या खरेदी गेले काही दिवस प्रचंड प्रमाणात होत आहे. याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेत, केंद्र सरकारने या वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत केला आहे, जेणेकरून या वस्तूंची साठेबाजी किंवा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करता येईल. हा निर्णय तात्पुरत्या काळासाठी लागू असेल, असे ग्राहक संरक्षण व नागरी पुरवठा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

क्रिकेट स्पर्धा रद्द

भारतीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध होणारे दोन वनडे सामने, करोना साथीच्या पार्श्वभूमीवर, रद्द करण्यात आले आहेत. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. उर्वरित दोन सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. मात्र, त्यानंतर सामने रद्दच करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. जगभरात अनेक ठिकाणी चाललेल्या सुमारे आठ क्रिकेट स्पर्धांना करोना साथीचा फटका बसला आहे.

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे २९ मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे अन्य स्पर्धांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन अनेक आर्थिक गणिते कोलडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: