कोरोना – उपाय एकसूत्र हवेत

कोरोना – उपाय एकसूत्र हवेत

जगातील बहुतेक सर्व देशांत कोरोनाच्या विषाणुंनी थैमान घातले आहे. जगभरात साडे आठ-नऊ हजार बळी घेतले असून, दोन लाखाहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.

कोरोनाः मजुरांच्या जप्त सायकली विकून २३ लाख कमावले
म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार
राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण

जगातील बहुतेक सर्व देशांत कोरोनाच्या विषाणुंनी थैमान घातले आहे. जगभरात साडे आठ-नऊ हजार बळी घेतले असून, दोन लाखाहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना महामारी संकट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जात आहे, मात्र त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज आहे.

फ्ल्यूची कुठलीही साथ अत्यंत संसर्गजन्य असते आणि फ्ल्यूच्या एक दोन प्रजाती व्यतिरिक्त आज आपल्याकडे त्यासाठी औषध नाही आणि कोरोनाच्या विरुद्ध तर लस आणि औषध दोन्हीही नाही. म्हणजे आजार होउच न देणे आणि त्यासाठी संसर्ग टाळणे एवढंच करू शकतो.

या पार्श्वभूमीवर सरकार संयत पणे आणि निर्धाराने लढतंय, जनता ही उत्स्फूर्तपणे या लढाईत उतरली आहे. हे अत्यंत आशादायक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॅा. राजेश टोपे हे गेले अहोरात्र प्रयत्न करीत असून, जनतेला धीर देत आहेत. कोरोनाचा व्हायरस आणि त्याचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य लढतंय, काही बेजबाबदार परदेशातून आलेले नागरिक चक्क विलगिकरणातून पळून जातायेत, रशियाहुन ट्रिप करून आलेले डॉक्टरांचाही त्यात समावेश आहेच. या बेजबाबदार लोकांना आळा घालणं शक्य असतानाही, आपल्याला ते शक्य झालेलं नाहे.

गर्दी टाळण्यासाठी जिथं कामासाठी किंवा समारंभांसाठी लोक एकत्र येतात, असे मनोरंजन किंवा इतर समारंभ सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. पण दवाखाने (बाह्यरुग्ण विभाग,ओपीडी) देखील बंद ठेवा, असे आदेश काढले आहेत. याचे सखेद आश्चर्य वाटत आहे. उलट अशा परिस्थितीत अशा अत्यावश्यक सेवा या २४ तास सुरू किंवा उपलब्ध असल्या पाहिजेत. दुसरे असे की कोरोना सदृश लक्षण असणारे असंख्य आजार आहेत, फ्लूचेच किती तरी प्रकार आहेत आणि त्यात ही अगदी कोरोनामुळे होणाऱ्या आजारासारखी लक्षणे दिसतात. अशा सगळ्याच रुग्णांची कोरोनासाठीची तपासणी करणे  आपल्याकडे कधीच शक्य नाही.

डॉक्टरच्या स्वतःच्या क्लिनिकल ज्ञानावर, अनुभवावर तो संशयित रुग्ण वेगळे करतो आणि अशा रुग्णांची पुढील तपासणी होते. जर बाह्यरुग्ण विभागच बंद ठेवले, तर आपण लवकर निदानाची संधी गमावून परिस्थती आणखीन बिकट करून ठेऊ. शिवाय कोरोना सोडून इतर आजाराच्या रुग्णांवर, हा अन्यायच आहे. ग्रामीण भागात सर्व ठिकाणी आजही सरकारी डॉक्टर उपलब्ध नाहीत, खाजगी डॉक्टर तिथं सेवा देतात. अशा भागाला प्राथमिक आरोग्य सेवा(तातडीच्या)मिळायलाच हव्यात आणि एखादा आजार तातडीचा आहे की नाही, हे रुग्ण न तपासता डॉक्टरने कसे ठरवायचे? फक्त आयसीयु आणि हॉस्पिटल्सच चालू ठेवून मर्यादित लाभ होईल. पण जिथं या दोन्ही सोयी नाहीत, अशा ठिकाणी तुटपुंज्या प्राथमिक पण अत्यावश्यक असलेल्या सोयी बंद करण्यामागचे गृहीतक न समजणारे आहे. दवाखान्यात एकाच वेळी गर्दी होणार नाही, याचे नियोजन करता येण अशक्य आहे का? केवळ गर्दी होऊन संसर्ग पसरू नये म्हणून जर दवाखाने बंद ठेवणार असाल, तर हा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखच आहे. गर्दी होणार नाही याच नियोजन करणे हे गरजेचं आहे, पण ओपीडी सेवा बंद करणे म्हणजे संशयित रुग्ण सापडण्याची यंत्रणाच बंद करण्याचा प्रकार आहे.

मुंबईच्या लोकल अजूनही चालू आहेत! खरे तर फक्त तातडीच्या सेवांमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांची ओळखपत्रे त्यांच्यासाठी स्पेशल लोकल ट्रेन किंवा बस ठेवता येतील, त्याही दिवसातून तीनदाच चालवता येतील. (सगळ्या तातडीच्या सेवा यंत्रणाच्या शिफ्टच्या वेळा तशा पद्धतीच्या ठेवाव्या लागतील. ते सहज शक्य आहे.) जो पर्यंत लोकल आणि बस सेवा सुरू आहे, तो पर्यंत मुंबई टाइम बॉम्ब आहे, हे नक्की!

ग्रामीण भागात लोकसंख्या तुलनेने दूर दूर राहते. मात्र मुंबईतील धारावी, मुंब्रा, भिवंडी सारख्या गर्दीच्या वस्तीत संसर्गजन्य आजार पसरला, तर काय होईल याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो.

अजून एक गोष्ट, बहुतेक उद्योग, मोठ्या कंपन्या बंद असताना, साखर कारखाने मात्र चालू आहेत. एक तर ऊसतोड कामगार आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट अवस्थेत असतात. त्यात ऊस वाहतूक, गाळप, कार्यालय यामध्ये सगळे फिरस्ते लोक असतात. साखर कारखाने बंद ठेवले तर शेतकऱ्याच्या उसाचे काय? जिथं जिवाचा प्रश्न आहे, तिथं शेतकरी नक्की समजून घेतील. असंही वेळेवर ऊस न तुटण्याची सगळ्यानाच सवय असते.

काही ठिकाणीच खाजगी उद्योग बंद आणि काही ठिकाणी सुरु. तसेच सहकारी उद्योग चालू. यामागचे गणितही समजत नाही. कोरोनाला थोडेच कळते, की हा उद्योग खाजगी हा सहकारी? सहकारी उद्योगही बंदच ठेवले पाहिजेत. एकाच जिल्ह्यात एक एमआयडीसी सुरु आणि त्याच जिल्ह्यात दुसरीकडे चालू, असे असेल, तर काय उपयोग? सर्व राज्यात ग्रामीण शहरी अशी दोनच धोरणे हवीत आणि निर्णयामध्ये सुसूत्रता हवी. ती सध्या दिसत नाही. कारण शनिवारीही अनेक ठिकाणी अनेक उद्योग सुरूच होते.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या तक्त्यांवर आपण संसर्गाच्या दुसऱ्या पातळीच्या शेवटात आणि तिसरी सुरू होण्याच्या स्थितीमध्ये आहोत. या टप्प्यावर थेट कृती, औषोधपचार आणि संसर्ग टाळण्यासाठीच्या सगळ्या कृती करणे अपेक्षित आहे. ते ही व्यवस्थित नियोजन करून, म्हणजे सगळे विभाग एकत्र येऊन, हे नियोजन व्हायला हवे. मुख्यमंत्री दिलासा देत आहेत, हे उत्तम आहे. पण आता प्रत्यक्ष कृती करावी लागेल. कदाचित जनमत नाराजीकडे जाईल, हेही सहन करून राज्याचे प्रमुख म्हणून थेट कृती करावी लागेल. काही अप्रिय वाटले तरी विनाविलंब निर्णय घ्यावे लागतील. लालफित ढिली करावी लागेल आणि हे आपल्याला करायचे आहे, सगळे मिळून आपण करू शकतो, हे बिंबवावे लागेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: