भारतामध्ये होऊ शकतात पाऊण कोटी मृत्यू

भारतामध्ये होऊ शकतात पाऊण कोटी मृत्यू

इतर देशांच्या आलेखांनुसार भारताच्या ‘एपिडेमिक कर्व्ह’चा आरंभबिंदू हा जवळपास दहा ते वीस हजार घोषित ‘कोव्हिड-१९’ मृत्यू झाल्यानंतर म्हणजेच कदाचित जुलै महिन्यामध्ये येईल. म्हणजे भारतात ही साथ जुलै २०२० पासून वेग धारण करील आणि सहसा एप्रिल - मे २०२१ या कालावधीपर्यंत क्रियाशील राहील, असा अंदाज बांधता येतो. यातील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे तीन महिने साथीच्या अत्युच्य कालावधीचे (पिक फेज) राहू शकतील.

रशियाच्या स्पुटनिक लसीचे परिणाम सकारात्मकः लँसेट
कोरोना मदतीत भेदभाव नको, संयम हवा : सरसंघचालक
कोणतीही कोविड चाचणी १०० टक्के बिनचूक नाही!

साथीचा प्रसार होत असताना तिच्याविषयी असे अनेक अभ्यासही पुढे येत असतात ज्याद्वारे साथीचे स्वरूप अधिकाधिक स्पष्ट होत जाते. आज जगभरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. भारताच्या तुलनेत युरोप व अमेरिकेत ही महामारी पुढच्या टप्प्यांवर आहे, असे म्हणावे लागेल. या देशांच्या वर्तमान स्थितीवरून भारतात येऊ घातलेल्या संकटाबाबत काही अंदाज बांधता येतात.

अरिष्टाचे नेमके स्वरूप पुढे आले तर त्याआधारे कार्यक्षम उपायांच्या अधिक जवळ जाता येते. या साथी दरम्यान पुढील काळात भारतात काय स्थिती असू शकेल, याबाबतची अनेक प्रारूपे मांडण्यात येत आहेत. त्याबद्दल मतभिन्नता जाणवते. प्रस्तुत लेखात भारतातील कोरोनाबाबतच्या भावी स्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे .

१) ‘कोव्हिड-१९’ : काही मूलभूत संकल्पना

विषाणू हे मुळातच अतिसूक्ष्म व कमकुवत प्रकारचे जीव असतात. संक्रमण झाल्यानंतर आपले शरीर विषाणूविरोधात अॅन्टीबॉडीज् (विशिष्ट प्रोटिन मॉल्युक्युल्स) तयार करते. हे मॉल्युक्युल्स बाधा पोहचविणाऱ्या विषाणूस नष्ट करतात आणि काही दिवसांत आपण आजारातून बरे होतो.  लक्षणांवर आधारित उपचार तेव्हढे घ्यावे लागू शकतात. विषाणू कुठलाही असो त्याच्या विरोधातील मूळ औषध (अॅन्टीबॉडीज्) हे शरीर स्वतःच तयार करते आणि त्याची एक प्रत जपूनही ठेवते. त्यामुळे सहसा बहुतांश विषाणू हे आपणास दुसऱ्यांदा बाधित करू शकत नाहीत.

वृध्द व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती तुलनेने कमी झालेली असते. त्यामुळे त्यांची विषाणू संक्रमणानंतर दगावण्याची शक्यता अधिक असते. इतरांमध्ये मात्र विषाणू हे सहसा सौम्य  आजार घडवून आणतात आणि सोबतच त्यांना आयुष्यभराची रोगप्रतिकारशक्तीदेखील प्रदान करतात .

लस उपलब्ध असेल तर लसीकरणाद्वारेही आपण एखाद्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करू शकतो. रोगप्रतिकारशक्ती मिळविण्याकरिता आपल्याकडे प्रत्यक्ष विषाणू संक्रमण किंवा लसीकरण असे दोन मार्ग उपलब्ध असतात.

विषाणूजन्य साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक रुग्ण जर इतर दोन निरोगी लोकांना बाधित करत असेल तर या संख्येस त्या विषाणूचा ‘बेसिक आरनॉट’ असे म्हणतात. ‘बेसिक आरनॉट’ हा विषाणू-विशिष्ट असतो. जसे की फ्ल्यूचा आरनॉट १.५, ‘कोव्हिड-१९’ चा आरनॉट २ तर गोवरचा आरनॉट हा १० असा आहे. ‘बेसिक आरनॉट’ ही संख्या खरे तर त्या-त्या विषाणूच्या पसरण्याच्या शक्तीचे निर्देशक असते.

जेव्हा एखादा नवा विषाणू मानवजातीत प्रवेश करतो तेव्हा त्याच्याविरोधात कुणाकडेही प्रतिकारशक्ती नसते. त्यामुळे विषाणूचा ‘बेसिक आरनॉट’ जेवढा असेल तेवढा लागण करण्याचा वेग तो धारण करतो आणि साथीचे रूप घेतो. ‘आरनॉट’ दोन असेल तर पहिला रुग्ण दोघांना मग हे दोघे चौघांना आणि हे चौघे पुढे आठ लोकांना बाधित करतात; हे चक्र मग याप्रकारे चालू राहते. या पध्दतीने केवळ काही महिन्यांच्या कालावधीत विषाणू करोडो लोकांना रोग संक्रमित करत जातो.

शेवटी एकूण लोकसंख्येच्या एका विशिष्ट प्रमाणात विषाणूची लागण होऊन त्यांना रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होते. रोगप्रतिकारशक्ती प्राप्त झालेले हे  लोकच मग विषाणूच्या पुढील मार्गक्रमणामध्ये अडथळा ठरतात आणि विषाणूचा वेग कमी होत जाऊन साथ ओसरते. अशाप्रकारे उर्वरित लोकसंख्या ही संक्रमित न होताच अप्रत्यक्षरित्या साथीच्या तडाख्यातून वाचते. साथीचा जोर ओसरण्याकरिता लोकसंख्येचा नेमका जेवढा टक्के भाग संक्रमित होणे गरजेचे असतो, यास त्या लोकसमूहाची ‘हर्ड इम्युनिटी’ किंवा ‘सामुदायिक रोगप्रतिकारशक्ती’ असे म्हणतात. ‘हर्ड इम्युनिटी’चे प्रमाण हे आजाराच्या ‘आरनॉट’वर म्हणजेच पसरण्याच्या शक्तीवर अवलंबून असते. दोन, तीन किंवा चार ‘आरनॉट’ असेल तर आवश्यक ‘हर्ड ईम्युनिटी’चे प्रमाणही अनुक्रमे ५० टक्के, ६६ टक्के किंवा ७५ टक्के असे वाढते असते.

विषाणूजन्य साथी सुरूवातीच्या टप्प्यात चांगलाच वेग धारण करतात. पुढे काही कालावधीनंतर मात्र रोगप्रतिकारशक्ती प्राप्त झालेल्या लोकांची संख्या वाढत गेल्यामुळे तो वेग कमी होत जातो. शेवटी आवश्यक ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाल्यानंतर तर प्रसाराचा वेग जवळजवळ शून्य होऊन साथ ओसरते. अशा साथींमधील नव्या रूग्णांच्या किंवा अॅक्टिव्ह केसेसच्या आलेखास त्या आजाराचा ‘एपिडेमिक कर्व्ह’ असे म्हणतात. हा कर्व्ह एखाद्या पर्वताच्या आकाराचा  असतो. साथीचा हा आलेख जेव्हा निश्चितपणे वर चढायला लागतो, तेव्हा त्या बिंदूस आपण साथीचा आरंभबिंदू म्हणू शकतो. कारण त्यापूर्वी फारच तुरळक प्रमाणात लोक संक्रमित झालेले असतात. पुढे शिखरबिंदू गाठून आलेख खाली घसरत, जेंव्हा पूर्वपदावर येतो तेव्हा त्याला आपण साथीचा अंत्यबिंदू म्हणू शकतो. अंत्यबिंदू नंतरही काही काळ संक्रमण होत राहते. परंतु तेदेखील तुरळक स्वरूपाचे असते.

‘कोव्हिड-१९’ सारखी साथ एकूण शंभर लोकांना बाधित करून मग ओसरणार आहे, असे गृहीत धरल्यास यातील सुरूवातीचे तीस-चाळीस लोक हे चढत्या गतीने संक्रमित होत जाऊन “एपिडेमिक कर्व्ह” त्याचा शिखरबिंदू गाठेल आणि मग हा आलेख खाली घसरायला लागेल. उर्वरित साठ-सत्तर लोक हे पुढे ओसरत्या गतीने संक्रमित होत जातील. आपण जर लॉकडाऊन वगैरे असा कुठलाच हस्तक्षेप केला नाही तर या प्रकारच्या साथी अत्यंत वेगाने पसरतात आणि जवळपास तीन-चार महिन्यांतच अंत्यबिंदू गाठतात. परंतु या स्थितीत अतिशय कमी वेळात प्रंचड संख्येने रुग्ण तयार होतात. वैद्यकीय संसाधने अपुरी पडतात व साथीच्या मूळ मृत्युदरापेक्षा अनेक पट जास्त मृत्यू घडून येतात. जे एरवी टाळता येण्याजोगे असतात. त्यामुळे आपण विविध प्रकारे हस्तक्षेप करून साथीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच एरवी तीन-चार महिने चालणारी साथ मग आठ-दहा महिन्यांपर्यंत लांबते. या स्थितीत शिखरबिंदू देखील उशिरा म्हणजे दोन-तीन महिन्यांनंतर गाठला जातो. तसेच त्याची उंची देखील बरीच कमी राहते. सुरूवातीच्या या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीस पिक फेज (शिखरकाल) असे म्हणतात. तर त्यानंतरच्या सात-आठ महिन्यांच्या कालावधीस पोस्टपिक फेज (शिखरोत्तरकाल) असे म्हणतात.

२) ‘कोव्हिड-१९’ : काही दिशादर्शक अभ्यास

डिसेंबर २०१९ च्या दरम्यान ‘कोव्हीड-१९’ या साथीची सुरुवात चीनमध्ये झाली. तिथून ती सुरुवातीस युरोप व अमेरिका खंडात पसरली आणि नंतर तिने आफ्रिका व आशिया खंडात प्रवेश केला. जगभरातील प्रतिष्ठित संस्थांनी ‘कोव्हिड-१९’ संबधी काही मूलभूत अभ्यास आपल्यापुढे मांडले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनांनुसार ‘कोव्हिड-१९’ चा ‘बेसिक आरनॉट’ हा दोनच्या आसपास असल्याचे स्पष्ट होते. ‘डायमंड प्रिन्सेस क्रुझ शिप’ या जहाजावरील प्रवाशांचा अभ्यासही यास दुजोरा देतो.

‘कोव्हिड-१९’ रूग्णांचा तसा पहिला मोठा अभ्यास हा फेब्रुवारी २०२० मध्ये चीनमधील ‘सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल’ (सीडीसी) या संस्थेने केला. यामध्ये जवळपास ४४,हजार रुग्ण सहभागी होते. या अभ्यासात ८० टक्के रुग्ण सौम्य, १६ टक्के मध्यम तर उर्वरित ४ टक्के हे गंभीर आजारगटात मोडतात, असे आढळले. सरासरी रुग्ण मृत्युदर किंवा ‘केस फॅटालिटी रेट’ (सिएफआर) हा दोन टक्के एवढा होता. मृतांमध्ये बहुतांश, हे साठपेक्षा अधिक वयाचे होते. अमेरिकेतील सीडीसी संस्थेने मार्च २०२० मध्ये साधारण ४ हजार रूग्णांचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढले ते देखील चिन ‘सिडीसी’च्या या अभ्यासाशी साधर्म्य दाखवतात.

‘सायन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ‘कोव्हिड-१९’मध्ये जवळपास ७५ टक्के पेक्षाही अधिक संक्रमित व्यक्ती, या एकतर लक्षणविरहित किंवा मग नगण्य लक्षणे असलेल्या आहेत. पुरेशी  लक्षणेच नसल्यामुळे या संक्रमितांची तपासणी किंवा कुठे नोंददेखील होत नाही. युरोपातील ‘आईसलॅण्ड’ या छोट्याशा  देशामध्ये एप्रिल २०२० दरम्यान झालेले संशोधनही अशाच अभ्यासास दुजोरा देते. या देशाने लोकसंख्येच्या सहा टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेची ‘कोव्हीड-१९’ तपासणी करून घेतली. त्यात असे आढळले की, जवळजवळ ५० टक्के संक्रमित लोक हे लक्षणविरहित आहेत तसेच इतर बऱ्याच जणांनाही नगण्य लक्षणे आहेत. दुसरी एक महत्त्वाची बाब पुढे आली ती अशी की, एकूण संक्रमितांपैकी केवळ अर्धा टक्का लोक दगावत आहेत. म्हणजेच संक्रमितांचा मृत्युदर (केवळ रूग्णांचा नव्हे.) ज्यास ‘इन्फेक्शन फॅटालिटी रेट’ (आयएफआर) असे म्हणतात तो ०.५ टक्के एवढा अल्प आहे.

सीडीसी, चीन सीडीसी, अमेरिका, सायन्स नियतकालिक व आईसलॅण्ड यांनी केलेले अभ्यास एकत्रित केल्यास ‘कोव्हिड – १९’ संक्रमितांचे खालील पाच गट तयार होतात :

गट (लक्षणविरहित गट – ५० टक्के) : या गटातील संक्रमित व्यक्तीस कुठलाच त्रास होत नाही व तो संक्रमित असूनही ‘कोव्हिड-१९’ रुग्ण न बनता लक्षणविरहितच राहतो. या गटात सहसा लहान मुले व तरूण मोडतात.

गट (नगण्य – लक्षण गट – २५ टक्के) : या गटातील संक्रमित व्यक्तीस अत्यल्प लक्षणे असतात ज्यांस उपचारांची आवश्यकता भासत नाही. अत्यल्प लक्षणे असल्यामुळे एक प्रकारे या गटातील लोकदेखील संक्रमित होऊनही रुग्ण बनत नाहीत असे म्हणता येते. या गटात सर्व वयोगटांतील लोक आढळतात.

गट ( सौम्य – आजार गट – २० टक्के) : या गटातील संक्रमित रूग्णांना ताप व खोकला ही लक्षणे जाणवतात. यांना ओपीडी उपचार पुरेसे असतात. या गटातही सर्वच वयोगटांतील रुग्ण आढळतात.

गट (मध्यम – आजार गट – ०४ टक्के) : या गटातील संक्रमित रूग्णांना ताप, खोकला तसेच दम लागत असल्यामुळे त्यांना जनरल वार्डात भरती करून उपचार करावे लागतात. या गटातील बहुतांश रुग्ण हे साठपेक्षा अधिक वयोगटात मोडतात. उपचार उपलब्ध झाले, तर यातील सर्वच रुग्ण वाचतात.

गट ( गंभीर – आजार गट – ०१ टक्के) : या गटातील संक्रमित रूग्णांना ताप-खोकल्याशिवाय अत्याधिक दमही लागत असतो. या रूग्णांना आयसीयूमध्ये भरती करून उपचार करावे लागतात. उपचार उपलब्ध झाले, तरीदेखील यातील अर्धे रुग्ण हे दगावू शकतात (आयएफआर ०.५ टक्के). या गटातील सर्वच रुग्ण हे सहसा ६० पेक्षा अधिक वयाचे आहेत. त्यातही ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि दमा यांसारखे आजार आहेत. त्यांची दगावण्याची शक्यता, ही अधिक आहे. तसेच केवळ साठपेक्षा अधिक वयोगटाचाच आयएफआर तपासल्यास तो २.५ टक्के एवढा असणार, जो तरीही बराच जास्त ठरतो. साठपेक्षा कमी वयोगटातील संक्रमितांचा आयएफआर मात्र ०.०५ टक्के एवढा नगण्य असणार. म्हणजेच साठपेक्षा कमी वयोगटातील एकूण दहा हजार संक्रमितांपैकी केवळ पाच जण जण तेवढे दगावतील.

इटली, स्पेन, फ्रांस, इंग्लंड तसेच अमेरिका या देशांमध्ये मार्चच्या मध्यापासून साथीने वेग धारण केला. वर नमूद केल्याप्रमाणे गट अ, ब आणि क मधील संक्रमितांची तपासणी करणे हे कुठल्याही देशास सहज शक्य नाही. तेंव्हा देशातील एकूण संक्रमित व्यक्तींचा खरा आकडा पुढे येणे ही अशक्यप्राय बाब ठरते. जेथे तपासण्यांचे प्रमाण चांगले आहे अशा विकसित देशांतही घोषित आकड्यांपेक्षा एकूण संक्रमितांची संख्या कित्येक पट अधिक आहे. ‘कोव्हिड-१९’च्या बहुतांश मृत्यूंची मात्र नोंद होते कारण या रूग्णांना गंभीर बाधा झालेली असते व त्यांना रूग्णालयात येऊन उपचार घ्यावेच लागतात. अमेरिकेतील ‘सीडीसी’ संस्थेने न्यूयॉर्क शहरात मार्च-एप्रिल २०२० या कालावधीत झालेल्या अतिरिक्त मृत्यूसंबधी केलेला अभ्यास तसेच ‘फाईनान्शल टाइम्स’ या दैनिकाने १४ वेगवेगळ्या देशांमधील अतिरिक्त मृत्यूंच्या संदर्भात  छापलेला अहवाल असे सुचवतो, की एखाद्या देशाने ‘कोव्हिड-१९’ चे जेवढे मृत्यू घोषित केलेले आहेत, त्यापेक्षा ते जवळपास १.६ पट अधिक आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, एखाद्या देशाने घोषित केलेल्या मृतांच्या आकड्यास जवळपास दीडपटीने वाढवल्यास तो ‘कोव्हिड-१९’ मृतांच्या खऱ्या संख्येच्या बराच जवळ जातो.

अशा साथींमध्ये साथ नेमकी कुठल्या टप्प्यावर आहे हे समजून घेण्याकरिता मृतांची आकडेवारी ही संक्रमितांच्या आकडेवारीपेक्षा जास्त विश्वासार्ह असते. ‘कोव्हिड-१९’ मृत्युसंख्या तसेच ‘एपिडेमिक कर्व्ह’ची वाटचाल यांच्या अभ्यासातून साथीत खरेच किती लोक संक्रमित झाले असावेत, साथ सध्या कुठपर्यंत येऊन पोहचलेली आहे, भविष्यात तिचे मार्गक्रमण काय असणार याबाबतचे अंदाज बांधता येतात. असे अंदाज हे त्या-त्या देशांना उपाय-योजनांच्या बांधणीबाबतीत मार्गदर्शक व सहायक ठरतात.

इटलीची लोकसंख्या ही सहा कोटी आहे. म्हणजे या साथीत जवळपास तीन कोटी लोक संक्रमित होणार आणि ०.५ टक्के संक्रमण मृत्युदरानुसार अंदाजे दीड लाख लोक दगावतील. इटलीने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास ३०,००० घोषित ‘कोव्हिड-१९’ मृत्युनंतर (१.६ पटीने वाढवल्यास ४८,००० मृत्युनंतर) शिखरबिंदू गाठला. स्पेनची लोकसंख्या ही ४.७ कोटी आहे. म्हणजेच जवळपास २.३ कोटी लोक संक्रमित होतील व त्यांपैकी १,१८,००० दगावतील. स्पेनने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास २५,००० घोषित मृत्युनंतर (१.६ पटीने वाढवल्यास ३७,००० मृत्युनंतर) शिखरबिंदू गाठला. म्हणजे या दोन्ही देशांनी एकूण संभाव्य मृत्युंपैकी जवळपास ३५ टक्के एवढ्या मृत्युंनंतर शिखरबिंदू गाठलेला आहे.

यानुसार असे म्हणता येईल, की अमेरिकेतील घोषित ‘कोव्हिड-१९’ मृत्यू जेव्हा दीड लाखाच्या आसपास आणि  इंग्लंड व फ्रांस या देशांमधील घोषित मृत्यू जेव्हा चाळीस हजारांच्या आसपास पोहोचतील, तेव्हा तेथील शिखरबिंदू गाठले जातील व ‘एपिडेमिक कर्व्ह’ खाली घसरण्यास सुरूवात करेल.

३) ‘कोव्हिड-१९’ : भारतातील स्थिती

भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचे व परिचारिकांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने नेमून दिलेल्या किमान पातळीच्या मागे-पुढे आहे. म्हणजे आपले वैद्यकीय मनुष्यबळ हे जेमतेम पुरेल इतकेच आहे. विकसित देशांसोबत थेट तुलना केल्यास, तर ते जवळपास तिपटीने कमी आहे. मनुष्यबळाच्या व्यतिरिक्त जी वैद्यकीय यंत्रणा व संसाधने लागतील, तिचा अंदाज आपण खाटांच्या एकूण संख्येवरून घेऊ शकतो. भारतात शासकीय रूग्णांलयांत जवळपास ७ लाख खाटा आहेत. खासगी रूग्णालयांच्या बाबतीत खात्रीशीर आकडेवारी उपलब्ध नाही. वेगवेगळ्या अभ्यासांनुसार खासगी रूग्णालयांमधील खाटा या एकूण खाटांपैकी ३० टक्के ते ६० टक्के या दरम्यान असाव्यात असे स्पष्ट होते. विश्लेषणाकरिता आपण हे प्रमाण जवळजवळ ५५ टक्के इतके गृहीत धरल्यास असे म्हणता येईल, की खासगी रूग्णालयांतील एकूण खाटा या अंदाजे ८ लाखांपर्यंत असाव्यात. म्हणजे भारतात एकूण १५ लाख खाटा आहेत असे म्हणता येईल. सहसा पाच ते सात टक्के खाटा या आयसीयू खाटा असतात. यानुसार बघितल्यास या खाटांपैकी एक लाख खाटा या आयसीयू खाटा असणार. या सर्व खाटांना आपण विवेचनाकरिता ‘सक्रिय खाटा’ असे म्हणूया. कारण या खाटा रूग्णालय परिसरात आहेत तसेच उपचारांकरिता गरजेच्या असलेल्या इतर आवश्यक घटकांनी जसे, की मनुष्यबळ, ऑक्सीजन, औषधी, यंत्रसामग्री व इतर यंत्रणा यांनी युक्त आहेत. देशातील ही आरोग्ययंत्रणा मागील ७० वर्षात वर्षांमध्ये तयार झालेली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत आपण फार फार तर आणखी काही लाख खाटा सहज उभ्या करू शकू. परंतु या खाटा सक्रीय खाटा नसणार कारण काही महिन्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उभे राहू शकत नाही. तरीदेखील दंतरोगतज्ज्ञ, इतर डॉक्टर्स व पॅरामेडिक्स यांना जर आपण युद्धपातळीवर प्रशिक्षित करून देशभरात शंभर खाटांची जवळपास १,५०० रूग्णालये उभी करू शकलो तर आपल्या सक्रीय खाटांची संख्या ही १० टक्क्यांनी वाढेल.

एका अभ्यासानुसार भारतात शासकीय व खासगी रूग्णालयांमधील सरासरी ७५ टक्के खाटा या रूग्णांनी व्यापलेल्या असतात. जूननंतरच्या सहा-सात महिन्यांच्या कालावधीत मात्र आरोग्यसेवेवरील ताण हा आणखी वाढतो. परंतु या कालावधीतही एकूण २० टक्के खाटा या रिकाम्या राहतील असे जर आपण गृहीत धरले, तर या २० टक्के खाटा आणि वाढविलेल्या १० टक्के अशा मिळून एकूण ३० टक्के इतक्या जनरल खाटा या वापराकरिता उपलब्ध होतील, असे म्हणता येऊ शकते. ही परिस्थिती लक्षात घेऊनच आपणास साथीचे नियोजन करावे लागेल.

भारताची लोकसंख्या १३८ कोटी इतकी प्रचंड आहे. यातील निम्मे म्हणजे जवळजवळ ७० कोटी लोक संक्रमित झाल्यावर आवश्यक ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईल. विकसीत देशांचे सरासरी आयुर्मान ८० वर्षाच्या आसपास आहे. त्यामुळे ६० पेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांची संख्या तेथे जवळपास २० टक्के आहे. भारतातील सरासरी आयुर्मान ६७ वर्षे आहे आणि त्यामुळे देशातील वृध्दांचे प्रमाण हे केवळ ८ टक्के म्हणजेच विकसित देशांच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आपण बघितले, की वर नमूद गट ‘ड’ मधील बहुतांश रुग्ण, तर गट ‘इ’ मधील जवळजवळ सर्वच रुग्ण हे वृध्द आहेत. ‘कोव्हिड-१९’चे सर्व मृत्यूदेखील गट ‘इ’ मधील लोकांमध्येच होत आहेत. आता भारतातील वृध्दांचे प्रमाण लक्षात घेता गट ‘ड’ मधील एकूण संक्रमित हे ४ टक्क्यांवरून ३ टक्यांवर येतील. तर गट ‘इ’ हा १ टक्क्यांवरून ०.५ टक्के इतका खाली घसरेल. त्याचप्रमाणे आयएफआरदेखील निम्मा होऊन ०.२५ इतका होईल. याचा अर्थ भारतात ७० कोटींपैकी ३.५ टक्के लोकांना म्हणजेच जवळजवळ २.५ कोटी रुग्णांना भरती करून उपचार करावे लागतील. ओपीडी रूग्णांवर उपचारांकरिता अत्यल्प मनुष्यबळ व संसाधने लागत असल्याकारणाने या रूग्णांमुळे अडचण निर्माण होणे शक्य नाही. खरी समस्या ही भरती कराव्या लागणाऱ्या रूग्णांमुळे निर्माण होते जे आत्यंतिक गंभीर व मुख्य संकट आहे. इतर देशांच्या आलेखांनुसार भारताच्या ‘एपिडेमिक कर्व्ह’चा आरंभबिंदू हा जवळपास दहा ते वीस हजार घोषित ‘कोव्हिड-१९’ मृत्यू झाल्यानंतर म्हणजेच कदाचित जुलै महिन्यामध्ये येईल. म्हणजे भारतात ही साथ जुलै २०२० पासून वेग धारण करील आणि सहसा एप्रिल – मे २०२१ या कालावधीपर्यंत क्रियाशील राहील, असा अंदाज बांधता येतो. यातील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे तीन महिने साथीच्या अत्युच्य कालावधीचे (पिक फेज) राहू शकतील. तर त्यापुढील सात महिन्यांचा कालावधी हा पोस्टपिक फेजचा राहील. पिक फेजच्या महिन्यांत पोस्टपिक फेझच्या तुलनेत दुप्पट ते अडीच पट रुग्ण असू शकतात.

भारतात एकूण १४ लाख जनरल व १ लाख आयसीयू खाटा आहेत. आपण २.५ कोटी कोव्हिड रुग्ण समान पद्धतीने १० महिन्याच्या कालावधीवर विभागले तर प्रतिमाह २५ लाख रुग्ण तयार होतील. परंतु वर नमूद देशांच्या आलेखांवरून असे म्हणता येते, की भारतात पिक फेजमध्ये प्रतिदिन अंदाजे सव्वालाख या प्रमाणे महिन्याला साधारण ३८ लाख रुग्ण तयार होतील आणि यांमध्ये ३३ लाख जनरल वार्ड तर ५ लाख हे आयसीयूचे रुग्ण असतील. साथीच्या दरम्यान ‘कोव्हिड-१९’ रूग्णांकरिता फार फार तर १० टक्के आयसीयू खाटा उपलब्ध असू शकतील. परंतु आपल्या विश्लेषणाकरिता असे गृहीत धरूयात, की या साथीच्या दरम्यान ५० टक्के आयसीयू खाटा या रिकाम्या असणार आहेत. म्हणजेच एक लाख खाटांपैकी ५० हजार खाटा या ‘कोव्हिड-१९’ रूग्णांकरिता उपलब्ध असणार आहेत. ‘कोव्हिड-१९’ आयसीयू रुग्ण सरासरी दोन आठवडे भरती असतो. म्हणजे या उपलब्ध खाटा ‘कोव्हिड-१९’ च्या एक लाख गंभीर रूग्णांनाच पुरेशा असतील. म्हणजे पिक फेजमधील ५ लाखांपैकी ४ लाख गंभीर रूग्णांना शेवटी जनरल वार्डातच शक्य होतील तसे उपचार द्यावे लागतील. आता जनरल वार्डातील एकूण रुग्ण हे ३७ लाख होतात. ‘कोव्हिड-१९’ मध्ये जनरल वार्ड रुग्ण हा सरासरी एक आठवडा भरती असतो, तेंव्हा या रूग्णांना अंदाजे ९ लाख खाटा लागतील. याचाच अर्थ देशातील १४ लाख जनरल खाटांपैकी ६५ टक्के खाटांची मागणी असेल. वर नमूद केल्याप्रमाणे ३० टक्के खाटा उपलब्ध झाल्या, तर मग त्यातून प्रत्येक महिन्याच्या ३७ लाख रूग्णांपैकी अंदाजे निम्म्या रूग्णांना म्हणजे १७ लाख रूग्णांनाच उपचार मिळू शकतील. म्हणजेच तीन महिन्यांच्या या पिक फेजमध्ये प्रतिमाह २० लाख याप्रमाणे जवळपास ६० लाख रूग्णांवर संसाधनांच्या अभावी उपचार करणे शक्य होणार नाही.

पोस्टपिक फेजमध्ये प्रतिमाह १९ लाख रुग्ण तयार होतील. त्यांपैकी १६.५ लाख जनरल वार्ड तर २.५ लाख आयसीयू रुग्ण असतील. पुन्हा पिक फेजप्रमाणे या आयसीयू रूग्णांपैकी एक लाख रूग्णांना आयसीयू खाटा मिळाल्या, तर उर्वरित १.५ लाख रूग्णांना जनरल वार्डात उपचार करावे लागतील. म्हणजे एकंदरीत जनरल वार्ड रूग्णांचा आकडा हा १६.५ लाखांवरून १८ लाखांवर जाईल आणि यांना मग जवळपास ४.५ लाख खाटा लागतील. म्हणजेच एकूण जनरल खाटांपैकी साधारण ३३ टक्के खाटांची मागणी असेल. वरील प्रमाणे ३० टक्के खाटांची पूर्तता जरी झाली, तरी १८ लाखांपैकी जवळजवळ १.८ लाख रूग्णांना खाटा मिळणे शक्य होणार नाही. म्हणजे पोस्टपिक फेजमधील सात महिन्यांत जवळजवळ १२ लाख रूग्णांवर उपचार करणे शक्य होणार नाही!

तेव्हा दोन्ही फेजेसचा एकत्रित विचार केल्यास ६० लाख व १२ लाख अशा एकूण ७२ लाख रूग्णांना संसाधनांच्या अभावात उपचार मिळणे शक्य झाले नाही, तर यातील बहुतांश रुग्ण हे दगावतील. यातील बहुतांश मृत्यू हे टाळता येण्याजोगे असतील. त्याचप्रमाणे साथीच्या दहा महिन्यांच्या कालावधीत प्रतिमाह एक लाख प्रमाणे एकूण १० लाख आयसीयू उपचार घेणार्‍या रुग्णांपैकी निम्मे म्हणजे ५ लाख रुग्ण हे योग्य उपचार मिळूनही दगावू शकतात. तेव्हा एकूण पाऊण कोटीपेक्षा अधिक मृत्यूंची शक्यता निर्माण होत आहे.

आपल्याला जर जनरल खाटांची उपलब्धता केवळ २० टक्के पर्यंतच वाढवता आली तर मात्र सव्वाकोटींपेक्षा अधिक मृत्यू संभवतात. ही उपलब्धता जर ४० टक्क्यांपर्यंत वाढवता आली तरी जवळजवळ अर्धा कोटींपेक्षा अधिक लोक दगावण्याची शक्यता शिल्लक राहणार आहे.

४) ‘कोव्हिड-१९’ : इतर काही शक्यता

वरील विश्लेषण हे काही मूलभूत गृहीतकांवर आधारलेले आहे. या गृहीतकांतील बदलांनी संपूर्ण विश्लेषणातच बदल संभवतात. काही संस्थांचे अभ्यास हे ‘कोव्हिड-१९’ चा आरनॉट हा तीन किंवा त्यापेक्षाही अधिक असावा असे दर्शवतात. असे असेल तर एकंदरीत समस्या ही अधिक तीव्रतर बनते. आरनॉट जर ३ गृहीत धरला तर आता दहा महिन्यांमध्ये भारतात ७० कोटींच्या जागी जवळजवळ ९० कोटी लोक संक्रमित होतील. कोव्हीड – १९ चा आरनॉट हा २ पेक्षा बराच कमी आहे, असे कुठला अभ्यास नमूद करत नाही. तसेच ज्या वेगाने ‘कोव्हिड-१९’ ने जागतिक साथीचे रूप घेतले आहे, त्यानुसार आरनॉट २ पेक्षा कमी असण्याची शक्यता धूसर बनते.

कुठल्याही विषाणूजन्य आजारानंतर प्राप्त होणारी रोगप्रतिकारशक्ती ही दीर्घकाळ टिकते. ‘कोव्हिड-१९’ देखील यास अपवाद ठरण्याची शक्यता नाही. परंतु ‘कोव्हिड-१९’ संबंधित रोगप्रतिकारशक्ती काही वर्षांपर्यंत टिकून राहिली, तरी साथ ओसरण्याकरिता ती उपयोगाची ठरते. तसेच पुढे लस उपलब्ध झाल्यानंतर या समस्येचे मुळातून निराकरण होऊ शकते.

प्रस्तुत लेखात पाच देशांच्या ‘एपिडेमिक कर्व्ह’चे संदर्भ वापरण्यात आलेले आहेत. या सर्व देशांची ‘कोव्हिड-१९’ टेस्टींग क्षमता ही भारताच्या तुलनेने तशी चांगली आहे. तसेच त्यांनी घोषित केलेल्या मृत्यूंची संख्यादेखील साथीच्या आयएफआरसोबत जुळते आहे. या साथीत हे देश भारतापेक्षा साधारणपणे तीन-चार महिने पुढे आहेत तेव्हा त्यांचे मार्गक्रमण हे आपणास सहायक ठरू शकते. सदरील देशांच्या ‘एपिडेमिक कर्व्ह’ची वाटचाल आपणास पिकफेज व पोस्टपिक फेज संबंधित ढोबळ अंदाज बांधण्यास मदत करू शकते. या बाबतचे अंदाज काही प्रमाणात जरी मागेपुढे झाले तरी एकंदरीत विश्लेषणावर त्याचा जास्त प्रभाव पडत नाही.

साथीचा संक्रमण मृत्युदर हा विकसित देशांकरिता ०.५ टक्के आहे. कदाचित तो थोडा कमी-अधिकदेखील असू शकेल. परंतु वर नमूद केलेल्या पाच देशांतील घोषित मृत्यूंची संख्या बघता तो ०.४ टक्के पेक्षा कमी असू शकेल असे संभवत नाही. तसेच जर घोषित मृत्यूंपेक्षा खरे मृत्यू हे दीडपटीहून जास्त असतील, तर मग साथीचा संक्रमण मृत्युदर अधिक असणार हे नक्की. या स्थितीत मूळ समस्या ही अधिक गंभीर बनते.

भारतातील एकूण खाटांची संख्या वर नमूद केलेल्या संख्येपेक्षा कमी असेल तर समस्या अधिक गंभीर बनते. खाटांची संख्या थोडी अधिक असली तरीही वरील विश्लेषणात सदरील संख्या ही २० ते ४० टक्के या प्रमाणात कमी-अधिक करण्यात आलेली आहे.

भारतात वैद्यकीय संसाधने ही राज्या-राज्यांमधे एकसमान पध्दतींनी विभागली गेलेली नाहीत. सहसा उत्तरेपेक्षा दक्षिणेकडील राज्यांची स्थिती जास्त बरी असल्यामुळे या राज्यांत साथ कदाचित कमी गंभीर रूप धारण करेल. वरील विश्लेषण हे भारताला एकंदरीत पध्दतीने लागू पडते; एखाद्या राज्याची लोकसंख्या व तेथील संसाधनांची आकडेवारी यांनुसार त्यातील निष्कर्ष हे सरासरीच्या मागे किंवा पुढे जातील.

भारतात हा विषाणू वेगळे गुणधर्म दाखवतो आहे. तो काही प्रमाणात सौम्य झालेला आहे असे कुठल्याही अभ्यासात आढळलेले नाही; तेव्हा या शक्यतेचा विचार करता येणार नाही. तापमानाचा या विषाणूवर नेमका काय परिणाम होईल, हेदेखील अजून पुरेसे स्पष्ट नाही; जरी तसे काही असले तरी या दरम्यान साथीची गती तेवढी मंदावेल परंतु मे-जूनमधील उष्णता साथीस पुर्णपणे घालवू शकत नाही.

५) ‘कोव्हिड-१९’ : संभाव्य उपायांची समीक्षा

विश्लेषणाकरिता आपण उपायांना दोन गटांत विभागू शकतो. त्यातील एक म्हणजे सैध्दांतिक पातळीवरील उपाय व दुसरे म्हणजे व्यावहारीक पातळीवरील उपाय. पहिल्या गटातील उपाय हे सैध्दांतिक दृष्टिकोनातून बघितल्यास उत्तम वाटत असले तरी ते व्यवहार्य नाहीत. तर दुसऱ्या गटातील उपाय हे शक्य कोटीत मोडतात.

५.१.) सैध्दांतिक पातळीवरील उपाय :

साथीस प्रवेशच न देणे (Nil Exposure) : बाधित देशांसोबतचे दळणवळण खंडित करणे तसेच बाहेरील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांपैकी संभाव्य संक्रमितांचे आवश्यक कालावधीकरिता विलगीकरण करून मगच त्यांस प्रवेश देणे अशाप्रकारच्या नीती एखादा देश साथीने देशात प्रवेश करण्यापूर्वीच अमलात आणू शकतो. तसेच अगदी सुरूवातीच्या टप्प्यात तुरळक प्रमाणात काही रुग्ण तयार झालेच, तर त्या रूग्णांची व त्याच्या संपर्कातील लोकांची टेस्टिंग करून त्यांचे विलगीकरण करता येते. त्यामुळे विषाणू साखळी मुळात जेंव्हा तोडावयास सोपी किंवा शक्य बाब असते, त्याच वेळी ती खंडीत करणे हा अधिक कार्यक्षम उपाय ठरतो. हा उपाय काही देशांनी यशस्वीपणे राबवलेला असला तरीही साथीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या प्रमाणात सतर्कता बाळगणे ही बहुतांश देशांकरिता सहजसाध्य बाब नाही. त्याचप्रमाणे दिर्घ कालावधीकरिता इतर देशांसोबत दळणवळण तोडणेही शक्य नसल्याने भविष्यात साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता नेहमीच शिल्लक राहते.

लसीकरणाचा वापर करून ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे (Exposure to Vaccine) : सहसा अशा जागतिक साथी अतिशय वेगाने पसरतात. लस उपलब्ध होण्याकरिता कमीतकमी एखाद्या वर्षाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे या मार्गाने साथ नियंत्रणात आणणे शक्य होत नाही.

साथीच्या नैसर्गिक गतीने ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे (Exposure to Virus) : यात विषाणूच्या नैसर्गिक गतीमध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप न करता साथीची वाढ होऊ दिली जाऊ शकते. या परिस्थितीत साथ वेगाने वाढेल आणि केवळ चार-पाच महिन्यांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार करून मग ही साथ ओसरेल. या उपायात संसाधने अपुरी पडून मृत्युदरापेक्षा अनेक पटींनी अधिक मृत्यू घडून येतील.

५.२.) व्यावहारिक पातळीवरील उपाय :

मानवी हस्तक्षेपांद्वारे साथीची गती कमी करणे (Slow Exposure / Flattening the Curve) हा एक व्यावहारिक उपाय आहे. याद्वारे आपण साथीचा वेग कमी करतो. अनेक प्रकारच्या एकत्रित हस्तक्षेपांनी ही गती कमी करता येते. उदाहरणार्थ, लॉकडाऊन करून लोकांचा संचार कमी करणे, अधिकाधिक टेस्टिंग करून रूग्णांचे व त्यांच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करणे, वैयक्तिक संरक्षण देणारे मास्क आदी उपकरणे वापरणे, शारीरिक अंतर बाळगणे, फोमाईट संक्रमण टाळण्याकरिता वारंवार हात धुणे इत्यादी. या सर्व उपाययोजना अगदी उत्तम प्रकारे अमलात आणल्यास साथीची गती बऱ्याच प्रमाणात कमी होऊन ती दहा-बारा महिन्यांपर्यंत लांबू शकते. कुठल्याही देशाला आर्थिक कारणांमुळे अनेक महिन्यांकरिता तीव्र स्वरूपाची संचारबंदी करणे अशक्य असते. तसेच जागतिक स्वरूपाची महामारी निर्माण करणाऱ्या विषाणूची गतीदेखील बरीच जास्त असते तेव्हा साथीचा कालावधी यापेक्षा अधिक लांबवणे सहज संभव होऊ शकत नाही.

साथीच्या आलेखाने आरंभबिंदू गाठण्यापूर्वीच्या काही महिन्यांत उपलब्ध संसाधने तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ हे पिकफेज व पोस्टपिक फेजमध्ये पुरतील, याप्रमाणे किंवा शक्य असेल त्या प्रमाणात वाढविणे गरजेचे असते. साथीचा लांबवलेला कालावधी आणि सोबत वाढवलेली संसाधने यातून मग टाळता येण्याजोगे मृत्यू हे मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.

साथीची गती कमी करणे आणि सोबत वृध्दांचे विलगीकरण करणे (Differential Exposure in Addition to Flattening the Curve) : भारतासारख्या काही देशांच्या बाबतीत साथीचा कालावधी लांबवला आणि संसाधने वाढवली तरीदेखील असे उपाय अपुरे ठरतात. कारण ज्या प्रमाणात मनुष्यबळ व इतर संसाधने लागणार असतात त्या प्रमाणात ती उपलब्ध करणे शक्य होत नाही. परिणामी अशा देशांनी महामारीमुळे होणारी हानी कमी करण्याकरिता वरील उपायांसहीत अधिक काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

आपण बघितले, की गट ‘ड’ मधील बहुतांश तर गट ‘इ’ मधील सर्वच रुग्ण हे वृध्द आहेत. साथीतील जवळपास सर्वच मृत्यूदेखील याच वयोगटात होत आहेत. डॉ. जयप्रकाश मुलियल (सीएमसी, वेल्लोर) यांच्यासारखे काही ज्येष्ठ साथतज्ज्ञ हे सुरूवातीपासूनच वृध्दांच्या विलगीकरणाबाबत आग्रही आहेत. तेव्हा एनकेनप्रकारे वृध्दांचे विलगीकरण करता आले तर गट ‘इ’ मधील रुग्ण तर जवळजवळ तयारच होणार नाहीत. तसेच साथीचा मृत्युदरही ०.०५ टक्के एवढा अल्प राहील. गट ‘ड’ रुग्णसंख्या देखील तीन टक्क्यांवरून दीड टक्क्यांवर येईल. म्हणजे पिकफेज व पोस्टपिक फेज दोन्हीं फेजेसमध्ये आयसीयू विभागांवरील कोरोनाचा ताण जवळपास नगण्य असेल, तर जनरल वार्डांवरील ताणसुध्दा मोठ्या प्रमाणात कमी होईल. पिकफेजध्ये प्रतिमाह पंधरा लाख तर पोस्टपिकफेज मध्ये प्रतिमाह सात-आठ लाख जनरल वार्ड (गट ड) रुग्ण तयार होतील. खाटांची उपलब्धता ३० टक्के एवढी असल्यास दोन्ही फेजेसमध्ये खाटा कमी पडणार नाहीत. म्हणजेच आता वैद्यकीय संसाधनांवरील ताणही कमी राहील. त्यामुळे बहुतांश रूग्णांना योग्य उपचार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतील आणि प्रत्यक्षात होणारे मृत्यूंचे प्रमाणही खूपच कमी राहील (०.०५ टक्के).

भारतात वृध्दांची लोकसंख्या ८ टक्के आहे. यातील ७० टक्के वृध्द ग्रामीण भागात राहतात. त्यांचे आपापल्या गावांत विलगीकरण करणे तसे फार अवघड जाणार नाही. एखाद्या दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात जवळजवळ २०० ते ३०० वृध्द असू शकतात. ज्यांच्या विलगीकरणाकरिता शाळेच्या किंवा अन्य कुठल्या इमारतीचा वापर केला जाऊ शकतो. अशा कॅम्पकरिता आवश्यक असलेले सर्व कर्मचारीदेखील तेथेच वास्तव्य करतील. काटेकोर विलगीकरणाकरिता सुरक्षा कर्मचारी लागतील. परंतु अशा कॅम्पशिवाय साथीसंदर्भात अन्यत्र फार जास्त सुरक्षाबल लागणार नाही. छोट्या व मोठ्या शहरांमध्ये सरसकटपणे असे विलगीकरण शक्य झाले नाही, तरी जिथे लोकसंख्येची घनता जास्त असेल अशा काही झोपडपट्टी क्षेत्रांतील वृध्दांचे विलगीकरण नक्कीच करता येऊ शकते.

कॅम्प जर आकाराने छोटे ठेवले तर चुकून साथीचा प्रादुर्भाव जरी झाला तरी तो सीमित राहील व लगेच नियंत्रणातही आणता येऊ शकेल. पुढील आठ-दहा महिन्यांकरिता म्हणजेच ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईपर्यंत जर आपण बहुतांश वृध्दांचे विलगीकरण करू शकलो तर मग बाहेर मोठ्या प्रमाणावर संचारनिर्बंध घालणे गरजेचे असणार नाही. लोकांचे रोजगार हे सुरळीतपणे चालू राहतील. वृध्दांच्या विलगीकरणाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक व इतर संसाधने लागतील; परंतु सोबतच वैद्यकीय क्षेत्र, सुरक्षायंत्रणा तसेच अन्य विभागांवर अतिरिक्त ताण येणार नाही, अर्थव्यवस्था सुरळीत राहील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाळता येण्याजोगे मृत्यू हे फार मोठ्या प्रमाणावर कमी होतील.

विविध पातळ्यांवरील उपायांयोजनांचे वेगवेगळ्या प्रमाणात संयोजनदेखील करता येऊ शकेल. उदाहरणार्थ,  वृध्दांपैकी ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब आदी आजार आहेत. त्यांचेच केवळ विलगीकरण करणे किंवा मग ज्या राज्यांतील आरोग्यव्यवस्था तुलनेने अविकसित आहेत केवळ तेवढ्याच राज्यांमध्ये वृध्दांचे विलगीकरण करणे इत्यादी.

प्रत्येक देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व जनसांख्यिकीय जडणघडण ही वेगवेगळी असते. त्यामुळे विकसित देशांनी अवलंबिलेले उपाय जशास तसे अंमलात आणणे, हे आपल्याकरिता फायदेशीर ठरेलच असे नाही. म्हणून सतर्क प्रशासकीय यंत्रणा, उच्च दर्जाचे व्यवस्थापनतज्ज्ञ, झपाटलेले साथतज्ज्ञ, सक्षम वैद्यकीय मनुष्यबळ आणि खंबीर राजकीय इच्छाशक्ती या सर्व घटकांना युध्दपातळीवर कार्यरत राहावे लागेल. विविध माध्यमांचा कल्पक व कार्यक्षम वापर करून लोकांना या आजाराप्रती शिक्षित करून या लढ्यातील जनसहभाग हा मोठ्या प्रमाणात वाढवावा लागेल. संकटाप्रमाणेच उपाययोजनादेखील अभूतपूर्व असाव्या लागतील तेव्हाच कोरोनामुळे होणारी हानी किमान पातळीवर नेता येऊ शकेल .

डॉ. सचिन सरोदे, हे नांदेड येथे प्रॅक्टिसिंग फिजीशियन आहेत आणि सार्वजनिक आरोग्याचे अभ्यासक आहेत.

संदर्भ

१. Anantnarayan and Panikars Textbook of Microbiology , 10th edition

२. Park’s Textbook of Preventive and Social Medicine , 23rd edition

३. Journal of Travel Medicine , volume 27, issue 2 , March 2020 , taaa21 , http://academic.oup.com/jtm/article/27/2/taaa021/57355319

४. International Journal of infectious Diseases 93 (2020) 201- 204 , https://doi.org/10.1016/j.ijid.2020.02.033

५. China CDC Weekly / vol. 2 / No. 8

६. US Department of health and Human services / Center for Disease Control and Prevention MMWR / March 27, 2020 / vol. 69 / No. 12

७. http://science.sciencemag.org/content/early/2020/03/24/science.abb3221#BIBL

८. https://nordiclifescience.org/covid-19-first-results-of-the-voluntary-screening-in-iceland/

९. www.worldometer.com

१०. http://www.cdc.gov/mmwr/volumes/69/wr/mm6919e5.htm

११. https://www.ft.com/content/6bd88b7d-3386-4543-b2e9-0d5c6fac846c

१२. https://data.worldbank.org/indicator/SH.MED.PHYS.ZS

१३. https://data.worldbank.org/indicator/SH.MED.NUMW.P3

१४. http://ijmedph.org/article/50

१५. http://data.worldbank.org/indicator/SH.MED.BEDS.ZS

१६. http://www.japi.org/t2d4e494/icu-care-in-india-status-and-challenges

१७. IOSR Journal of Dental and Medical sciences (IOSR-JDMS) e-ISSN: 2279-0853, p-ISSN: 2279-0861. volume 18 , issue 4 ser.2 (April 2019) , pp 49-55 www.isorjournal.org

१८. https://cddep.org/publications/covid-19-in-india-state-wise-estimates-of-current-hospital-beds-icu-beds-and-ventilators/

१९. https://papers.ssrn.com/sol3/papers.cfm?abstract_id=3556998

२०. https://thewire.in/health/jayaprakash-muliyil-karan-thapar-interview-coronavirus-herd-immunity

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0