भय, अनिश्चितता : लॉक डाऊनचा पहिला दिवस

भय, अनिश्चितता : लॉक डाऊनचा पहिला दिवस

मुंबई/ नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात कसलाच उल्लेख नसल्याने देश

कोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?
दोन खुराकांमधील विलंब; सरकारचा परस्पर निर्णय

मुंबई/ नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात कसलाच उल्लेख नसल्याने देशभरात जीवनावश्यक वस्तूंवरून जनतेमध्ये भय व अनिश्चितता दिसून आले. ते वातावरण बुधवारीही दिसून आले.

मोदींचे भाषण संपताच जनतेमध्ये २१ दिवस लॉक डाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तू आपल्याला लवकर मिळणार नाही असा अप्रत्यक्ष संदेश गेला  परिणामी मंगळवारी औषधाची दुकाने व किराणा माल दुकानांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसून आले.

अखेर नेमके काय घडलेय हे लक्षात आल्यानंतर मोदींनी जीवनाश्यक वस्तू सर्वांना मिळतील असे ट्विट केले व त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू सर्वांना मिळतील असे जाहीर करून दिलासा दिला, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लगेचच सोशल मीडिया, टीव्हीवरून लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे सांगितले पण लॉक डाऊनच्या पहिल्या दिवशी बुधवारी ही भीती कमी झालेली दिसली नाही.

बुधवारी सकाळी पुन्हा भाजी, किराणा, औषध विक्रीच्या दुकानांबाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. त्यात भाज्यांचे दरही वाढले. डाळीही भडकल्या होत्या. त्यात संचारबंदी असल्याने पोलिसांचा मारही लोकांना खावा लागला. अनेक शहरात पोलिस किराणा माल विक्रीची दुकाने बळजबरीने बंद करताना दिसत होते. रस्त्यावर दिसणार्या कोणालाही पोलिस सोडत नव्हते. काही ठिकाणी जीवनाश्यक वस्तू घरपोच देणार्यांवर, टेम्पो, ट्रकवाल्यांना पोलिस मारहाणीचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून आला.

महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये हे चित्र दिसून येत होते. पोलिस व नागरिकांमध्ये वादविवादाच्या फैरी घडताना दिसत होत्या. समाजमाध्यमातून पोलिस मारहाणीचे अनेक व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सरकारविषयी एक नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सबुरीचे सल्ले दिले. जीवनावश्यक वस्तूंचा सहा महिने पुरेल एवढा साठा सरकारकडे आहे असे त्यांनी बुधवारी दुपारी सांगितले.

महाराष्ट्र

राज्यात बुधवारी करोना रुग्णांची संख्या १२२ झाली असून सांगलीत एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना संसर्गातून करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मुंबईत पाच नवीन रुग्ण आढळले आहेत तर ठाण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात मंगळवारी भाजपचे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली. पण मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी इंदूर व भोपाळमध्ये लोकांमध्ये जीवनावश्यक वस्तूंवरून भय निर्माण झालेले दिसून आले. इंदूरमधील सर्व होलसेल बाजारात भाजीपाला, फळे, धान्यांचे दर वाढलेले दिसून आले.

काश्मीर

गेले सात महिने संचारबंदी असलेल्या काश्मीरमध्ये मंगळवारपासून पुन्हा २१ दिवसांचे लॉक डाऊन सुरू झाल्याने तेथेही अनिश्चितता दिसून आली. सध्या हा केंद्रशासित प्रदेश केंद्रीय राखीव दलाच्या ताब्यात देण्यात आला आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी श्रीनगर व अन्य शहरांत लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या. दूध, खाद्य तेल यांची टंचाई असल्याचे काही दुकानदार सांगत होते. काश्मीरमध्ये असे लॉक डाऊन अनेक वेळा पाहिले आहेत, त्याचा मुकाबला कसा करायचा आहे हे ही सामान्य नागरिकांना माहिती असल्याच्या प्रतिक्रिया श्रीनगरमध्ये दिसून येत होत्या.

तेलंगण, आंध्र

मोदींच्या अपुर्या संदेशामुळे तेलंगण व आंध्र प्रदेशात नागरिकांमध्ये अनिश्चितता पसरली. तेलंगण व आंध्रात अगोदर लॉक डाऊन पुकारण्यात आले होते पण आता महागाईची झळ नागरिकांना बसू लागल्याचे चित्र आहे. विजयवाड्यात भाजीपाल्याचे दर चौपट वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. हैदराबादमध्ये अनेक किराणा माल दुकानांपुढे लांबच्या लांब रांगा दिसून आल्या.

तेलंगण सरकारने गरीबी रेषेच्या खाली असलेल्या प्रत्येक कुटुंबांला १२ किलो तांदूळ व १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तर आंध्र प्रदेश सरकारने ५ किलो तांदूळ व १ हजार रु.ची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

केरळ

केरळमध्येही मंगळवारी रात्री व बुधवारी नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडले. दुकानांबाहेर मोठ्या रांगा दिसून आल्या. काही ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर दिसत होते. केरळ सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ५ पर्यंत उघडी ठेवण्यास सांगितले आहे. काही दुकानांना घरपोच सेवा देण्यास सांगण्यात आले आहे आणि त्यासाठी स्थानिक प्रशासन मदत करत आहे. डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया व मुस्लिम युथ लिगच्या कार्यकर्त्यांकडून गरजूंना मदत केली जात आहे.

राजस्थान

राजस्थाने काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनची घोषणा केली होती. जयपूरमध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी १२ पर्यत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवली जात आहेत. ग्रामीण भागातही जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडू नये याची खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. काही ठिकाणी भाववाढ झाल्याचीही वृत्त आहेत.

प. बंगाल

प. बंगालमध्ये मंगळवार रात्र व बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरून जीवनावश्यक वस्तू विकत घेताना दिसले. सिलिगुडी, बर्धमान, व कुचबिहार या शहरात दुकाने उघडी होती. पोलिसही नागरिकांना सहकार्य करताना दिसत होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: