जर्मनीने आटोक्यात राखला करोनाग्रस्तांमधील मृत्यूदर

जर्मनीने आटोक्यात राखला करोनाग्रस्तांमधील मृत्यूदर

गेल्या काही आठवड्यांच्या काळात जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या साथीचा विळखा प्रथम युरोपीय राष्ट्रांना व नंतर अमेरिकेला घट्ट बसला आहे. गेल्या दोन आठव

भारतात कोरोनाचे एकूण रुग्ण ३० लाखांवर
साथीचे रोग प्रतिबंध कायदा कसा अस्तित्वात आला…
राज्याने गाठला ४ कोटी लस मात्रांचा टप्पा

गेल्या काही आठवड्यांच्या काळात जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या साथीचा विळखा प्रथम युरोपीय राष्ट्रांना व नंतर अमेरिकेला घट्ट बसला आहे. गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जगभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त राष्ट्रांच्या यादीत आज अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार स्पेन, इटली आणि जर्मनी या युरोपीय राष्ट्रांचे क्रमांक आहेत. अर्थात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या बघितल्यास जर्मनीमध्ये हे प्रमाण अन्य करोनाग्रस्त राष्ट्रांच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी दिसून येते.

आजघडीला अमेरिकेत कोरोनाचे ३६७,६५९ रुग्ण असून, १०,०००हून अधिक जणांचा कोरोनाच्या प्रादुर्भावने मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये १४०,५१० जणांना कोरोनाची लागण झालेली आहे, तर करोनामुळे १३,७९८ जण दगावले आहे. इटलीमध्ये लागण झालेल्यांची संख्या १३२,५४७ आहे. मृतांचा आकडा मात्र तब्बल १६,५२३ आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये १०३,३७५ जणांना करोनाची लागण झालेली असली, तरी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या मात्र १,८१० एवढी मर्यादेत आहे. आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये कोरोनामुळे दगावणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड असताना जर्मनीने मृत्यूदर कसा आटोक्यात ठेवला असावा, यावर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.

मुळात इटली आणि जर्मनी या दोन देशांमध्ये ६५ वर्षांवरील नागरिकांची संख्या युरोपात सर्वाधिक आहे. इटालियन लोकांची जीवनशैलीही जर्मन लोकांच्या तुलनेत आरोग्यकारक असल्याचे एकंदर म्हटले जाते. मग कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दरामध्ये या दोन देशांत एवढा फरक कसा पडला असावा, या विषयावर मोठे मंथन सुरू आहे.

सुरुवातीपासून जर्मनीचा मृत्यूदर इटली व स्पेनच्या तुलनेत कमी राहिला आहे. मात्र, मार्चच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जर्मनीतील अधिकारी यंत्रणा यावर बोलण्यास तयार नव्हत्या. सध्या साथीचा सुरुवातीचा टप्पा असल्याने यावर भाष्य करण्याची घाई करू नये, असे मत जर्मनीतील आरोग्यसेवा अधिकारी व्यक्त करत होते. २२ मार्च रोजी जर्मनीतील कोरोनाग्रस्तांची संख्या २२,३६४ होती व ८४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. आज हे आकडे अनुक्रमे १०३, ३७५ आणि १८१० एवढे आहेत. म्हणजेच जर्मनीतील मृत्यूदर अन्य कोरोनाग्रस्त राष्ट्रांच्या तुलनेत कमी आहे या विधानास आता जागा आहे. यामागे माहिती संकलनातील त्रुटींचाही भाग असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र, जर्मनीने मृत्यूदर आटोक्यात कसा राखला याच्या कारणांवरही तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे.

 व्यापक प्रमाणावर चाचण्या

जर्मनीत पहिले कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर लगेचच युद्धपातळीवर चाचण्या घेणे सुरू झाल्याच्या बातम्या अनेक आंतरराष्ट्रीय एजन्सींनी दिल्या आहेत. अगदी सुरुवातीपासून जर्मनीच्या सर्व सीमांवर कोरोना टॅक्सी’ तैनात करून ऑस्ट्रिया, इटली आदी देशांतून आलेल्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. कोरोना टॅक्सीमध्ये सुसज्ज वैद्यकीय कर्मचारी सर्व संरक्षक उपकरणांसह उपलब्ध होते. ते ठिकठिकाणी जाऊन कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्यांच्या रक्तांचे नमुने गोळा करत होते, आवश्यक वाटल्यास त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा स्वत:ला क्वारंटाइन करून घेण्याचा सल्ला देत होते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव कितपत होऊ शकतो याचा अंदाज आरोग्यव्यवस्थेला घेता आला आणि त्यानुसार रुग्णालये, अतिदक्षता विभाग सुसज्ज करण्यासाठी जर्मनीला पुरेसा अवधी प्राप्त झाला. याउलट इटलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या अनेक तरुणांची चाचणीच झाली नाही आणि त्यांच्यामार्फत हा आजार पसरत गेला. अखेरीस रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागाच नाही अशा भीषण परिस्थितीत इटली हा देश जाऊन पोहोचला.

 विकेंद्रीकृत आरोग्यसेवा प्रणाली

जर्मनीत दररोज ५०,०००हून अधिक कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे रुग्ण ओळखून त्यांना क्वारंटाइन करण्याचे काम प्रभावीरित्या होत आहे. जर्मनीतील आरोग्यसेवा प्रणाली आधीपासूनच विकेंद्रीकृत (डिसेंट्रलाइझ्ड) असल्याने देशाच्या सर्व भागात चाचण्या घेतल्या गेल्या आणि जात आहेत. याशिवाय, चाचण्या पॉझिटिव ठरलेल्यांना त्वरित क्वारंटाइन करण्याची प्रक्रियाही प्रभावीरित्या होत आहे.

 जर्मनीतील करोनाग्रस्त तुलनेने तरुण

जर्मनीत हा विषाणू प्रथम बर्फाळ प्रदेशात स्कीइंगसाठी गेलेल्या तरुणांमार्फत आला. मात्र, त्यांच्या त्वरेने चाचण्या झाल्याने त्यांच्यामार्फत होणाऱ्या संक्रमणाला बांध घातला गेला. विलगीकरणाचे पालन जर्मनीत कसोशीने झाले. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना लस देणाऱ्या डॉक्टरला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मर्केल यांनी दोन आठवड्यांचे विलगीकरण पाळले. तीच गोष्ट अन्य नागरिकांबाबतही. त्यामुळे जर्मनीतील वयोवृद्ध नागरिकांपर्यंत कोरोना कमी प्रमाणात पोहोचला. इटलीत कोरोनाची लागण झालेल्यांचे सरासरी वय साठ आहे, तर फ्रान्समध्ये साडेबासष्ट. जर्मनीत याहून तरुण नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तरुण रुग्ण या विषाणूचा उत्तम सामना करत असल्याने मृत्यूचे प्रमाण या देशांच्या तुलनेत कमी राहिले असावे, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जर्मनीतील अतिदक्षता विभाग तसेच व्हेंटिलेटर सुविधा आधीपासूनच सक्षम असल्याने कोरोनाचा सामना चांगल्या पद्धतीने करणे शक्य होत आहे, असे चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी नमूद केले आहे. अन्य देशांमध्ये जागरूकता निर्माण होण्यापूर्वीच जर्मनी सरकारने या कामासाठी मोठा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा द्रष्टेपणा दाखवल्याचा फायदाही मृत्यूदर रोखण्यात झाला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0