१६६५ मध्ये लंडनमध्ये प्लेगची साथ आली होती त्यावेळी आयझॅक न्यूटन फक्त २० वर्षाचे होते. पण १६६५-६६ हा एक वर्षाचा कालावधी न्यूटनसंबंधी ‘आश्चर्यवर्ष' म्हणून ओळखला जातो. कारण या कालावधीत न्यूटन यांनी विश्वासंबंधी अनेक शोध लावले ज्याचे दूरगामी परिणाम नंतर दिसून आले.
१६६५ साली लंडनमध्ये भयानक प्लेगची सुरुवात झाली होती. मात्र त्या काळच्या प्रशासनाने सुरुवातीच्या काळात, या आजाराची दाहकता व जास्त असणारा मृत्युदर लोकांपासून लपवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. गरीब व सामान्य लोक सुरुवातीच्या काळात या माहितीपासून अनभिज्ञ राहिले होते, पण श्रीमंत व वजनदार लोकांना याची कुणकुण लागली. त्यांना कळले की हा आजार फार घातक आहे व तो दीर्घकाळ या शहरात टिकून राहणार आहे. म्हणून त्यांनी आपल्या गावाकडील घरात जाऊन राहण्याचा पर्याय अवलंबला. त्यात आपले महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन हे सुद्धा होते.
लंडनचा प्लेग
आपण न्यूटन यांच्याकडे नंतर जाऊया. त्या आधी या प्लेगसंबंधी थोडी माहिती घेऊया. प्लेग सुरू व्हायच्या दरम्यान इंग्लंडचा व्यापार इतर देशांच्या तुलनेत अतिशय भरभराटीला आला होता. त्यांचा माल इतर शहरात व देशात पोहोचवला जात होता. या व्यापाराला प्लेगमुळे कोणतीही बाधा येऊ नये व परदेशी बंदरात माल उतरवण्यासाठी कोणतीही आडकाठी येऊ नये, यासाठी या प्लेगची वास्तविकता लोकांपासून दूर ठेवण्यात येत होती. गरिबांना त्याची झळ पोहोचत होती, पण रोजंदारीच्या आशेने ते या संकटाकडे दुर्लक्ष करत होते. पण जून १६६५ येतायेता त्यांनाही या संकटापासून किती धोका आहे हे लक्षात आले. या संकटापासून वाचायचे असेल तर या आजाराच्या प्रभाव क्षेत्राबाहेर पडणे हाच एक परिणामकारक उपाय आहे हे लक्षात आले.
जशी श्रीमंत माणसे लंडनबाहेर पडली तशी आपल्यालाही बाहेर पडायची वेळ आलेली आहे हे त्यांना उमगले. पण त्यांना लंडनबाहेर पडणे शक्य झाले नाही. का? त्या वेळपर्यंत प्रशासनालाही जाग आली होती व या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. त्यातलाच एक भाग म्हणून लंडनबाहेर ज्यांना जायचे असेल त्यांना ते एक परवाना देत असत. अर्थातच त्याला शुल्क मोजावे लागत होते. पण हे शुल्क इतके जास्त होते की फक्त श्रीमंतांनाच ते परवडत असे. त्यातच ते हा परवाना फक्त निरोगी व धडधाकट लोकांनाच देत होते. गरिबांना परवान्यासाठीचे शुल्क देणे जमत नसल्याकारणाने लंडनमध्येच राहून या आजाराला सोसणे व टिकून राहणे हेच फक्त त्यांच्या हाती राहिले होते.
सामाजिक अलगीकरण
त्याकाळीसुद्धा लस किंवा औषधांचा मारा करून या आजाराला जेव्हा आटोक्यात आणणे जमणार नाही हे समजल्यानंतर प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे करून त्यांना त्यांच्या घरात किंवा खोलीत बंद करून ठेवण्याचा उपायच अंमलात आणला जात होता. निरोगी लोकांना या रोगाची लागण होऊ न देणे हा या उपायामागचा हेतू होता. या प्लेगदरम्यान सामाजिक अलगीकरणाचा कालावधी ४० दिवसांचा होता. ज्यांच्या घरात प्लेगचा रुग्ण आढळत असे, त्याला अलगीकरणाखाली घरात कोंडून ठेवले जात होते. अशा घरांना लाल फुलीने अधोरेखित केले जात असे.
पण हा एक राक्षसी उपाय ठरला. कारण प्लेगच्या रुग्णाबरोबरच त्याचे अख्खे कुटुंब या अलगीकरणात भरडले जात होते. त्याच्या साऱ्या कुटुंबालाच घरात राहणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे निरोगी लोकांनाही काही ठिकाणी या प्लेगची लागण झाली. या अतार्किक उपायामुळे बळींची संख्या नाहक वाढली. पण सप्टेंबर १६६५ येता-येता अलगीकरणात प्रशासनालाही रस राहिला नाही. याला कारण लंडनमध्ये तोपर्यंत इतके रुग्ण वाढले होते की क्वारंटाईनचा काही उपयोग होणार नव्हता हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला.
लंडनच्या बाहेर प्लेगचा प्रसार
लंडनच्या बाहेर हा प्लेग बाधित लोकांबरोबर गेला असला तरी व्यापारी साधनांमुळेही त्याचा प्रसार झाला होता. एका बोटीतून काही प्लेगविषाणू चिकटलेले कपडे निर्यात झाले ज्यामुळे हा आजार इतर ठिकाणीही पोहोचला. हा साथीचा रोग जंगलच्या वणव्यासारखा इतक्या जलदगतीने सर्वदूर पसरत होता की काही जणांना तो कुत्री-मांजरांमुळे पसरतो आहे, अशी शंका आली. मग काय सर्वजण दिसेल त्या मांजर कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी त्यांनी काही महिन्यातच, एका अंदाजानुसार, २० लाख मांजरं आणि ४० हजार कुत्र्यांच्या कत्तली केल्या. हा एक आत्मघातकी प्रयत्न होता कारण या साथीच्या आजाराचा प्रसार उंदरांच्या अंगावर खेळणाऱ्या पिसवांपासून होत होता. कुत्री-मांजरे या उंदरांना मारून खात असत व अप्रत्यक्षरीत्या प्लेगचा प्रसार काही प्रमाणात रोखून ठेवत असत. आताही कोरोना माराचा दणका जेव्हा आपल्यावर पडायला सुरुवात झाली होती तेव्हा काही महाभागांनी या मुक्या प्राण्यांना वेठीस धरायचा प्रयत्न केला होता. पण आपण त्याकाळच्या लोकांसारखे अक्कल गहाण टाकल्यासारखे वागलो नाही हे बरे झाले.
पण त्याकाळी ब्युबॉनिक प्लेगने मरणे हे अतिशय वाईट असायचे. या आजारात आधी डोकं दुखण्याचा त्रास सुरू व्हायचा व त्यानंतर ताप, उलट्या, थंडी वाजून येणे, जीभ जड होणे व अंगाच्या विविध भागांना सूज येणे हे चढत्या क्रमाने होत राहायचे. या आजारात संपूर्ण अंगावर काळे ठिपके उमटायचे व त्यामुळे या आजाराला ‘काळा आजार’ असेही म्हटले जायचे. या आजारात अंगावरही गाठी तयार व्हायच्या म्हणून या आजाराला ‘ब्युबॉनिक प्लेग’ असेही म्हणतात. आणि हा प्लेग इतका भयानक होता की फक्त १८ महिन्यात याने सुमारे एक कोटी लोकांचा खात्मा केला होता.
आयझॅक न्यूटन आणि प्लेग
आता आपण आपले लक्ष या महान शास्त्रज्ञाकडे वळवूया. १६६५ मध्ये जेव्हा प्लेग विषाणू लंडनमध्ये उपटला तेव्हा न्यूटन फक्त २० वर्षाचे होते. त्यावेळी ते लंडनच्या ट्रिनिटी महाविद्यालयात शिकत होते. आधी पाहिल्या प्रमाणे त्याकाळच्या जाणकार व वैज्ञानिकांना सुद्धा हा आजार कशामुळे निर्माण झाला आहे किंवा होतो आहे हे निःसंदिग्धपणे माहित नव्हते. हा आजार अनेक माध्यमातून व कारणामुळे होतोय अशी त्यांना शंका होती. पण एक शंका त्यांच्या मनात अजिबात नव्हती व ती म्हणजे सामाजिक विलगीकरण. ज्यांची ऐपत होती ते सारेच लंडनबाहेर वाईट वेळ यायच्या आधीच पडले. न्यूटन यांनीही उलथोर्प मॅनॉर या आपल्या गावाकडील वडिलोपार्जित आलिशान बंगल्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. केम्ब्रिज पासून ही जागा उत्तर-पश्चिम दिशेला सुमारे ४० मैल दूर आहे.
वैज्ञानिक संशोधन व शोधाच्या दृष्टीने विचार केला तर १६६५-६६ हा एक वर्षाचा कालावधी न्यूटनसंबंधी ‘आश्चर्यवर्ष’ म्हणून ओळखला जातो. कारण या कालावधीत न्यूटन यांनी विश्वासंबंधी अनेक शोध लावले ज्याचे दूरगामी परिणाम नंतर दिसून आले. या वर्षात त्यांना कोणाचेही मार्गदर्शन लाभले नव्हते. बहुदा त्यामुळेच त्यांची बुद्धी अनेक परिमाणावर व कसोट्यांवर विचार करू शकली. त्यावेळी विद्वान प्रोफेसर जर त्यांच्याबरोबर असते तर बहुदा त्यांनी न्यूटन यांना अभ्याक्रमातील विषयांवर स्वतःचे लक्ष केंद्रित करायला सांगितले असते.
तसे झाले असते तर आपल्याला न्यूटन यांच्याकडून कॅल्क्युलस ही गणितीय प्रणाली मिळाली नसती. या पद्धतीच्या मदतीने एखादी गोष्ट वेळेनुसार कशी बदलते किंवा बदलणार याचा अभ्यास करता येतो. कोरोनाच्या बाबतीतच बघा ना. हा विषाणू किती जणांना किती वेळेत बाधित करेल, जगाच्या कोणत्या देशात तो का व कसा पसरेल, त्याची वाढ व पसरण्याची क्रिया केव्हा कमी होईल या सारख्या प्रश्नांची उत्तरे कॅल्क्युलसच्या मदतीने शोधून काढता येतात. त्याचबरोबर इंटरनेटवर जेव्हा आपण एखादी गोष्ट शोधत असतो तेव्हा सुद्धा कॅल्क्युलसचे समीकरण आपली शोधण्यासाठी मदत करत असतात.
या ‘आश्चर्य वर्षा’तला दुसरा महत्त्वाचा शोध जो आहे तो प्रकाशासंबंधी आहे. न्यूटने आपल्या घरी काही लोलक आणले व त्यातून त्यांनी प्रकाश सोडला. या प्रयोगातूनच त्यांना प्रकाश ७ रंगांपासून बनला आहे हे समजले. त्यातूनच त्यांचा प्रकाशासंबंधीचा सिद्धांत जन्माला आला. त्या वर्षातला सर्वात महत्वाचा शोध जो त्यांनी लावला तो गुरुत्वाकर्षणाचा होता. त्यांच्या बागेत ते प्रसिद्ध सफरचंदाचे झाड होते. पण सफरचंद त्यांच्या डोक्यावर पडल्यानंतर त्यांना हा शोध लागला ही बहुदा एक आख्यायिका आहे. पण गुरुत्वाकर्षणामुळे जर सारे पदार्थ खाली पडत असतील तर ही शक्ती फक्त काही अंतरापर्यंतच मर्यादित का राहील. ती चंद्रापर्यंत आणि त्याच्याही पुढे आपला प्रभाव टाकू शकेल, असा विचार न्यूटन यांनी केला. हा दावा त्यांच्या सहकाऱ्याने, जॉन कौंडुईत, यांनी नंतर काही वर्षानंतर केला होता. गुरुत्वाकर्षणाचे महत्त्व विश्वाला समजण्यासाठी किती आवश्यक आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही.
आपल्या एक वर्षाच्या शोधाची शिदोरी घेऊन जेव्हा न्यूटन परत एकदा लंडनला गेले तेव्हा त्यांच्या महाविद्यालयाच्या शिक्षकांना या शोधांची महत्ती समजली होती. सहा महिन्याच्या आतच त्यांना फेलो बनवण्यात आले व दोन वर्षानंतर प्राध्यापक.
आत्ताच्या लॉकडाऊन मध्ये काय करता येईल?
आधुनिक विज्ञान क्षेत्र पूर्वीसारखे राहिले नाही. ते फार बदलले आहे. न्यूटन, आइनस्टाइन व रमण सारख्या शास्त्रज्ञांना वैचारिक प्रयोग करायची सवय होती. पण आता मोठमोठ्या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत आणि त्यात खर्चिक प्रयोग होत असतात. आजचे प्रयोग फक्त एकाच वैज्ञानिक धारेचे नसतात. त्यांची आता सरमिसळ झालेली आहे. त्यामुळे घरात बसून प्रयोग करणे हा पर्याय बहुतेक वैज्ञानिकांच्या हाती उरलेला नाही.
पण जे सैद्धांतिक व तात्त्विक क्षेत्रात काम करतात त्यांना या लॉकडाऊनमुळे फारसा फरक पडणार नाही. ते आपलं काम चालू ठेऊ शकतात. ज्यांचे प्रयोग पूर्ण करता येणार नाहीत ते शोधपत्र व आपल्या क्षेत्रातील संशोधनाबद्दल वाचन करू शकतात.
या भीषण महामारीत पुन्हा एखादा न्यूटन उभारी घेईल का? काही वर्षानंतर सर्वानाच समजेल.
प्रवीण गवळी, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन कार्यरत नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.
COMMENTS