शाहीन बाग आंदोलनातील मुलांचे कौन्सलिंग करा- बाल संरक्षण आयोग

शाहीन बाग आंदोलनातील मुलांचे कौन्सलिंग करा- बाल संरक्षण आयोग

नवी दिल्ली : शहरातील शाहीन बागमध्ये वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पुकारलेल्या जनआंदोलनात लहान मुले दिसत आहेत. या मुलांची ओळख पटवून त्यांचे कौन्सलिंग करावे, असे आदेश राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने दक्षिणपूर्व दिल्लीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आंदोलनात बसलेल्या मुलांच्या मनावर अफवा व दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रभाव पडण्याची भीती आहे, असे आयोगाचे म्हणणे आहे. वेळ पडल्यास अशा मुलांच्या पालकांचेही कौन्सलिंग करावे असे बाल संरक्षण अधिकार आयोगाच्या अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी असे आदेश जारी केले आहेत.

हे आदेश देण्यामागचे कारण सोशल मीडियात पसरलेल्या अनेक व्हिडिओमध्ये असून या व्हिडिओत अनेक मुले नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातून आपल्याला हद्दपार करतील अशी विधाने करताना दिसत आहेत. ही माहिती नक्कीच अफवा व दिशाभूल करणारी आहे व त्याचा परिणाम बालमनावर दिसून येत आहे. दिल्लीत कौन्सलिंग केंद्रे आहेत तेथे मुलांना पाठवावे असे या आदेशात म्हटले गेले आहे.

शाहीन बागमध्ये आंदोलनासाठी बसलेल्या मुलांची ओळख पटवून घेण्यासाठी बाल आयोगाने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पोलिस बालकल्याण अधिकारी अशा अन्य प्रशासकीय खात्यांनाही घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यकता वाटल्यास मुलांच्या पालकांनाही कौन्सलिंग केंद्रावर घेऊन जावे व मुलांना बाल कल्याण समितीपुढे उपस्थित करावे असेही या आदेशात म्हटले गेले आहेत. येत्या १० दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल बाल संरक्षण आयोगाकडे पाठवावा असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS