निरामय कामजीवनाचे समुपदेशक

निरामय कामजीवनाचे समुपदेशक

भारतासारख्या देशात जिथे आजही स्त्रियांची अंतर्वस्त्रं सुकण्यासाठी स्वच्छ हवेत टाकली जात नाहीत तिथे सेक्ससारख्या विषयावर स्तंभ चालवणं आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे सोप्पं काम नक्कीच नव्हतं. डॉ. महिंदर वत्स यांनी हे आपल्या नर्मविनोदी शैलीत, खुमासदार पद्धतीने सोपं केलं. त्यांचे स्तंभ, त्यांनी लोकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं वाचताना आपल्याकडे आजही लैंगिक ज्ञानाचा किती अभाव आहे हे पदोपदी जाणवत राहतं.

मुजफ्फरपूर – सामाजिक विषमतेचे बळी
न्यायालयांच्या वार्षिक सुट्ट्या
भाषिक अंतराचे काय ?

२००५ मध्ये ‘मुंबई मिरर’मध्ये ‘आस्क दि सेक्सपर्ट’ नावाचा स्तंभ सुरू झाला. त्या स्तंभाने खळबळ माजवली. लोक प्रचंड प्रश्न विचारायचे आणि त्याला ८० वर्षीय डॉ. महिंदर वत्स आपल्या हजरजबाबी पद्धतीने उत्तरं द्यायचे. हे प्रश्न वाचणाऱ्यांना कदाचित मूर्खपणाचेही वाटू शकतात. पण त्यांना दिलेली उत्तरं तितकीच धमाल, मिश्किल आणि त्याचबरोबर वाचकांना एक शिकवण देणारी असायची.

सेक्ससारखा विषय अलीकडच्या काळात शहरांमध्ये तरी थोड्या खुलेपणाने चर्चिला जाऊ लागला आहे. पण तरीही या विषयाभोवती असलेलं एक टॅबूचं वलय, काहीतरी अत्यंत गोपनीय असल्यासारखं आणि प्रचंड खासगी असलेलं हे सेक्सचं जग खऱ्या अर्थाने कुणालाही उलगडलेलं नाही. भारतासारख्या देशात जिथे आजही स्त्रियांची अंतर्वस्त्रं सुकण्यासाठी स्वच्छ हवेत टाकली जात नाहीत तिथे सेक्ससारख्या विषयावर स्तंभ चालवणं आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे सोप्पं काम नक्कीच नव्हतं. वत्स यांनी हे आपल्या नर्मविनोदी शैलीत, खुमासदार पद्धतीने सोपं केलं. त्यांचे स्तंभ, त्यांनी लोकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं वाचताना आपल्याकडे आजही लैंगिक ज्ञानाचा किती अभाव आहे हे पदोपदी जाणवत राहतं. लोकांना असेही प्रश्न पडू शकतात, याचं आश्चर्य वाटून घ्यायचं की डॉ. वत्स यांनी त्यांना दिलेली उत्तरं वाचून हसत बसायचं असा प्रश्न वाचकांना पडतो. ‘मुंबई मिरर’ने आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी खोटे प्रश्न तयार करून पाठवले आणि त्यांची उत्तरं डॉ. वत्स यांच्याकडून घेतली असे आरोप ‘मुंबई मिरर’वर झाले. परंतु डॉ. वत्स यांनी आपल्या काळात साधारण २०,००० प्रश्नांची उत्तरं दिली असं ‘मुंबई मिरर’च्या संपादक मीना बघेल द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत सांगतात.

डॉ. वत्स यांचा जन्म १९२४ साली कोलकात्यात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश सैन्यात वैद्यकीय संशोधक होते. आपल्या वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचं शिक्षण भारतभरात विविध ठिकाणी झालं. आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर आणि वयाची तिशी उलटल्यानंतर डॉ. वत्स यांनी स्तंभलेखक म्हणून आपल्या करियरला सुरूवात केली.

मुंबईत एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपल्या कुटुंबाच्या मित्रांकडे डॉ. वत्स राहत होते. त्यांच्यामार्फत त्यांची प्रोमिला यांच्याशी ओळख झाली. डॉ. वत्स हे पंजाबी होते तर प्रोमिला या मूळच्या सिंध प्रांतातल्या होत्या. काही वर्षांनंतर त्यांनी पारंपरिक अरेंज मॅरेज पद्धतीला छेद देऊन लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला आणि १९५०च्या काळात ते ब्रिटनमध्ये राहिले. या काळात डॉ. वत्स यांनी हॉस्पिटल हाऊसमन आणि रजिस्ट्रार म्हणून काम केलं. त्यांचे वडील आजारी पडल्यावर ते भारतात परतले आणि ग्लॅक्सोमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर त्यांनी काम करायला सुरूवात केली. त्याचबरोबर त्यांनी स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून खासगी सेवाही सुरू केली. वत्स यांना १९६० च्या दशकात महिलांच्या मॅगझीनसाठी वैद्यकीय सल्ल्याचा स्तंभ लिहिण्यासाठी विचारणा झाली. त्यांनी त्यानंतर ‘फेमिना’, ‘फ्लेअर’ आणि ‘ट्रेंड’ अशा अनेक महिलांच्या मॅगझीन्समध्ये आरोग्यविषयक स्तंभ लिहिले. १९७० च्या दरम्यान त्यांना एका संपादकांनी लैंगिक आरोग्याबद्दलच्या प्रश्नांबाबत प्रतिबंध केला. मात्र वत्स यांनी विविध पर्यायांद्वारे आपलं लेखन सुरूच ठेवलं. फँटसीसारख्या पुरूषांच्या नियतकालिकांसाठीही त्यांनी लिहिलं.

‘फेमिना’मधल्या त्यांच्या स्तंभाच्या एका वाचकाने एक अश्लीलतेसंदर्भात खटला दाखल केला होता. त्यांनी असा आरोप केला होता की प्रकाशक आपली वाचकसंख्या वाढवण्यासाठी खोटी पत्रं लिहित आहेत. सत्या सरन या संपादकांनी एक मोठी बॅग भरून न उघडलेली पत्रं न्यायाधीशांना दाखवल्यानंतर हा खटला रद्दबातल करण्यात आला.

ते १९७४ साली ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ (एफपीएआय) मध्ये काम करत असताना त्यांनी भारतात तेव्हा उपलब्ध नसलेला लैंगिक समुपदेशन आणि शिक्षण उपक्रम आणण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन ‘एफपीएआय’ने भारतातील पहिलं लैंगिक शिक्षण, समुपदेशन आणि उपचार केंद्र सुरू केलं. त्याला लोकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. १९७६ साली त्यांनी मानवी लैंगिकता आणि कौटुंबिक आयुष्य या विषयावरची पहिली कार्यशाळा योजित केली. भारतातले ख्यातनाम ‘एलजीबीटी’ हक्कांचे कार्यकर्ते अशोक राव कवी यांनीही या कार्यशाळेत भाषण केलं होतं. १९८०च्या सुरूवातीला वत्स यांनी आपलं काम बंद करून फक्त समुपदेशन आणि लैंगिक शिक्षण या क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्यास सुरूवात केली.

सुरूवातीला या उपक्रमाविरोधात लोकांनी बंड केलं, नाराजी दाखवली, अपमान केला. त्यानंतर लोकांमध्ये कुतूहल, स्वारस्य आणि सहनशक्ती निर्माण झाली. लोकांनी उदासीनतेने हा विषय स्वीकारला आणि त्यानंतर उत्साहाने सहभाग घेतला, असं डॉ. वत्स यांनी २००४ मध्ये आपल्या लेखात लिहिलं. ‘बीबीसी’ला दिलेल्या एका मुलाखतीत वत्स यांनी त्याच्या विचारसरणीला आकार देणारा एक महत्त्वाचा क्षण सांगितला. ‘काँग्रेस ऑफ प्लॅन्ड पॅरंटहूड’च्या १९५७ सालच्या एका सभेत त्यांची भेट एका जपानी डॉक्टरांशी झाली. त्यांनी गर्भवती झाल्यानंतर मुलींच्या आत्महत्या कशा प्रकारे थांबवल्या हे सांगितलं. या मुली एका रेल्वे ट्रॅकवरून डोंगराच्या कड्यावरून उडी मारून आत्महत्या करत असत. या डॉक्टरने डोंगरावर मरण्याची गरज नाही असे पोस्टर्स लावले. त्याने गर्भपात करून त्या मुलींचा जीव वाचवला. डॉ. वत्स यांना त्या डॉक्टरांकडून प्रेरणा मिळाली.

२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटातल्या बोमन इराणी यांनी साकारलेल्या डॉ. वर्दे या सेक्सॉलॉजिस्टची भूमिका डॉ. वत्स यांच्यावर बेतलेली आहे. बोमन इराणी आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक मिखाइल मुसळे यांनी या भूमिकेची तयारी करण्यासाठी अनेकदा डॉ. वत्स यांच्या कार्यालयाला भेट दिली. डॉ. वत्स हे अत्यंत प्रामाणिक आणि हजरजबाबी व्यक्तिमत्व असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

वैशाली सिन्हा यांनी डॉ. वत्स यांच्यावर ‘आस्क दि सेक्सपर्ट’ नावाचा एक ९० मिनिटांचा लघुपटही बनवला आहे. हा लघुपट २०१७ साली मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. त्यात वत्स यांचं समाजाच्या आरोग्यासाठीचं योगदान दाखवण्यात आलं आहे. वत्स ९२-९३ वर्षं वयातही आपल्या मॅग्निफाइंग ग्लासमधून लोकांचे इमेल वाचतात, आपल्या सहाय्यकाला प्रश्नांची उत्तरं टाइप करायला सांगतात आणि ती पाठवतात, हे आपल्याला दिसतं. तसंच त्यांच्याकडे सल्ला विचारायला येणारे लोकही खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन आलेले दिसतात. वत्स कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रश्न ऐकतात आणि कोणताही निवाडा करण्याच्या थाटात उत्तरं देत नाहीत. ते नीट समजावून सांगतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे असं सिन्हा यांनी या लघुपटात नमूद केलं आहे.

‘मुंबई मिरर’च्या संपादक मीना बघेल म्हणाल्या की, वत्स यांनी कायम एकाच गोष्टीवर भर दिला. ‘संमती, संमती आणि संमती.’ संमतीशिवाय कोणतीही गोष्ट आनंद देऊ शकत नाही असं त्यांचं मत होतं.

वत्स यांच्या कुटुंबाने त्यांना अत्यंत योग्य शब्दांत आदरांजली देताना म्हटलं की, ‘डॅडचं आयुष्य विविधांगी होतं. ते आपल्या अटींवर एक दिमाखदार आयुष्य जगले. आज ते आपल्या प्रिय प्रोमिलासोबत गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या आयुष्याचा उत्सव साजरा करत आहोत. त्यांना आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले आणि एक समुपदेशक, मार्गदर्शक, गाइड आणि इतर अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या. ‘

डॉ. वत्स यांनी अनेकांच्या लैंगिक समस्यांवर समुपदेशन केलं. त्यांचं लैंगिक आयुष्य आनंदी आणि सुखी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत वाचकांसाठी सेक्सपर्टचं एक वेगळं जग खुलं करून दिलं. त्यासाठी अनेकांनी त्यांना मनापासून आदरांजली वाहिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: