गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांची याचिका फेटाळून लावताना विशेष एनआयए न्यायालयाने म्हटले आहे, की अर्जदाराविरुद्ध उपलब्ध पुरावे पाहता ते जामीन घेण्यास पात्र नाहीत.

तेलुगू कवी वरवरा राव यांना कोविड-१९ची लागण
वुडहाउसच्या पुस्तकांना धोकादायक म्हणणे ‘विनोदी’: उच्च न्यायालय
वैद्यकीय कारणांवरून वरवरा राव यांना कायमस्वरुपी जामीन

मुंबई: एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला, कारण या प्रकरणात त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राजेश जे. कटारिया यांनी सोमवारी नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावताना म्हटले, की त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.

न्यायालयाच्या आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. त्यात न्यायालयाने म्हटले आहे, की आरोपपत्राच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे, की अर्जदाराच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत. कथित गुन्ह्यात अर्जदाराचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, ‘गुन्हा अत्यंत गंभीर आहे. गुन्ह्याची गंभीरता आणि अर्जदाराविरुद्धचे प्रथमदर्शनी पुरावे पाहता,  ते जामीन मिळण्यास पात्र नाहीत.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) यापूर्वी या मानवाधिकार कार्यकर्त्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता आणि बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा (माओवादी) सदस्य म्हणून त्याचे वर्णन केले होते.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, नवलखा हे प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा (माओवादी) सदस्य असून तो त्याच्या सदस्यांच्या संपर्कात होता.

त्यांच्याकडे प्रतिबंधित गटाशी संबंधित कागदपत्रेही सापडल्याचा दावा आणि त्याने विद्यार्थी आणि इतरांमध्येही माओवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण केली होती, असा दावा दहशतवादविरोधी संस्थेने केला आहे.

तथापि, नवलखा यांच्या याचिकेत म्हटले आहे की, एनआयएचे आरोपपत्र, त्यांना एका मोठ्या कटाशी जोडण्यात अपयशी ठरले आहे. नवलखा यांच्यावर कोणत्याही दहशतवादी कृत्याची योजना, तयारी, खरेदी, निधी पुरवणे किंवा सुरू करण्यात सहभाग असल्याचा एकही आरोप नाही.

याचिकेनुसार, आरोपपत्रात असे कोणतेही साहित्य नाही, की नवलखा यांनी कुठेही बोलून किंवा लिखित किंवा थेट निवेदनाद्वारे भारत सरकारविरुद्ध द्वेष आणि असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

कार्यकर्त्याच्या जामीन अर्जात असा दावा करण्यात आला आहे की ते उच्च रक्तदाब आणि छातीत दुखणे, मान आणि पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदनांसह इतर आजारांनी ग्रस्त आहे.

मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने ७ जुलै रोजी एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आणि सागर गोरखे यांची तुरुंगात मच्छरदाणी वापरण्याची परवानगी देण्याची याचिका फेटाळून लावली होती.

गेल्या मे महिन्यात, गौतम नवलखा यांना प्रसिद्ध इंग्रजी लेखक पीजी वुडहाऊस यांनी लिहिलेले पुस्तक तळोजा कारागृह प्रशासनाने “सुरक्षेला धोका” असल्याचे कारण देत नाकारले होते.

६९ वर्षीय नवलखा यांना २८ ऑगस्ट २०१८ रोजी या प्रकरणातील सहभागाबद्दल अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते, परंतु नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. ते नवी मुंबईच्या शेजारील तळोजा कारागृहात आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: