भिवंडीत अडकले लाखो कामगार

भिवंडीत अडकले लाखो कामगार

भिवंडी : शहरातील कोंडाचीवाडी भागात सध्या कोण नवखा दिसल्यास त्याच्या जवळपास काही लोक जमा होतात आणि विचारतात, ‘कहां से आये हो, रेशन लाये हों क्या, कुछ ख

‘करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार’
शतमूर्खांचा लसविरोध
कोरोना महासाथ आणि अनाथ बालकांचे प्रश्न

भिवंडी : शहरातील कोंडाचीवाडी भागात सध्या कोण नवखा दिसल्यास त्याच्या जवळपास काही लोक जमा होतात आणि विचारतात, ‘कहां से आये हो, रेशन लाये हों क्या, कुछ खानें का इंत्तेजाम कर सकते हो क्या?’

जर अन्नधान्याचा साठा कमी होत असेल व लोकांना आपले भविष्य अंधूक दिसत असेल तर अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग हे अशक्यप्राय असते.

कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून गेले ८ दिवस महाराष्ट्र लॉकडाउन आहे. जीवनावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे, कार्यालये बंद आहेत. या लॉकडाउनचा परिणाम भिवंडीतली सुमारे ६ लाख पॉवरलूम कामगारांवर झालेला दिसून येतो. भिवंडीत रोजंदारीवर काम करणारे लाखो कामगार आहेत. त्यांच्यावर आता भूकबळीची टांगती तलवार आहे.

“आम्ही पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनतेला उद्देशून केलेली भाषणे पाहिली. त्यानंतर आम्ही येथेच राहण्याचा निर्णय घेतला. पण आता आमच्याकडे अन्नाचा साठा कमी होत चाललाय, सरकारकडून मदतही मिळत नाहीये. अशा परिस्थितीत आम्ही कोरोनामुळे नव्हे तर अन्नाविना मरू असे वाटू लागलेय,’ असे ५० वर्षीय मोहम्मद सज्जाद अन्सारी उद्वेगाने बोलतात.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अन्सारी व त्यांच्या सोबत असलेले सहा जण केवळ ७ चौरस फूट रुममध्ये कोंडले गेलेले आहेत. हे सर्व जण बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातले आहेत. एका पिंजर्यात कोंडल्यासारख आम्हाला वाटतेय. बाहेर जाऊन हवा खावी असे वाटतेय पण बाहेर दिसताच पोलिस मारतात. आता जवळचे पैसे संपत आले, अन्न नाही, अशा परिस्थितीत इथे कसे राहता येईल, असा प्रश्न अन्सारी विचारतात.

मुंबईपासून केवळ ३० किमी अंतरावर भिवंडी नावाचे एक शहर आहे. पॉवरलूमचे शहर म्हणून हे ओळखले जाते. प. बंगाल, उ. प्रदेश, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून लाखो कामगार येथे काम करतात.

भिवंडी शहरातील प्रत्येक गल्लीत छोटे, मोठे पॉवरलूम आहे. या शहरात १५ लाख पॉवरलूम असून तेथे सुमारे ६ लाखाहून अधिक कामगार काम करतात. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख रोंजदारीवर काम करणारे येथे येतात. हे रोजंदारी करणारे प्रामुख्याने वाहतूक, हमाल व अन्य कामे करणारे आहेत.

२१ मार्चला महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शहरातील सर्व पॉवरलूम शांत झाले. हे लॉकडाऊन दोन आठवड्यासाठी असेल असे आम्हाला वाटले होते, त्यामुळे आम्ही आमच्या कामगारांना घरी जाऊ नका असे सांगितल्याचे शदाब सांगतात. शदाब हे २०० पॉवरलूम चालवतात. पण दोन दिवसानंतर रेल्वे सेवा बंद झाली व २४ मार्च पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली, असे शदाब सांगतात.

मोदींच्या घोषणेनंतर हजारो कामगारांनी घरी परतण्यासाठी भिवंडीपासून १४ किमी अंतरावर असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली पण रेल्वे, अन्य वाहतूक सेवा बंद असल्याने कामगारांना परत येण्याशिवाय पर्याय नव्हता. आता आम्ही असे आणखी काही दिवस राहिलो तर अन्नासाठी दंगली होतील, अशी भीती २५ वर्षाचा शाम मोहम्मद इस्लाम व्यक्त करतो. शाम हा एका पॉवरलूममध्ये काम करतो.

भिवंडीत काम करणारे बहुसंख्य कामगार एका दशकाहून येथे काम करतात. कामावर त्यांना पगार मिळतो. त्यामुळे डबल शिफ्ट करणारे येथे असंख्य कामगार आहेत. त्यामुळे दिवसाचे ३०० ते ५०० रु. मिळतात. आता शटडाऊनमुळे रोजंदारी बंद झाली. त्यात बहुसंख्य पॉवरलूम मालकांनी कर्फ्यू मागे घेतला जात नाही तोपर्यंत वेतन मिळणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

एखाद्या महिन्याचा पगार मिळाला नाही, तर आमचे बजेट कोसळते असे २६ वर्षीय सादिक शेखचे म्हणणे आहे. मोदींनी आमच्यासारख्या लाखो जणांचा विचार करून निर्णय घ्यायला हवा होता, त्यांच्या अशा निर्णयाने देश वाचणार नसून भूकेचा तो बळी ठरेल, असे शेखचे म्हणणे आहे.

शेख हा आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील असून भिवंडीत गेले १० वर्षे तो काम करतोय. शेख सोबत त्याचे सहा सहकारी आहेत. ते ८ चौ. फूटच्या रुममध्ये राहतात. सध्या अन्न शिजवायला त्यांनी काही लाकडे जमा केली आहेत, तांदूळ, डाळ अगदी थोडीच शिल्लक आहे, त्याच्यावर पुढील दोन दिवस जातील, असे शेख म्हणतो. त्यापुढे आम्ही काय करू असा सवाल शेख विचारतोय.

लॉकडाऊनमुळे भिवंडीतील पॉवरलूम इंडस्ट्री डबघाईला जाण्याची भीती असून हजारो पॉवरलूम मालकांना मोठ्या प्रमाणात तोट्याला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी नोटबंदी व जीएसटीचा फटका या इंडस्ट्रीला बसला होता. त्यात आता लॉकडाऊन आल्याने त्याचे गंभीर परिणाम या उद्योगावर होणार आहेत. नोटबंदी व जीएसटीचा फटका बसल्याने या अगोदर आमचा उद्योग डबघाईला आला होता, गेले दशकभर ही इंडस्ट्री मंदीतून जात आहे, त्यात अशा निर्णयाने आम्ही आता असहाय्य झालो आहोत, प्रत्येक कामगाराच्या पाठीमागे उभे राहण्याचा आमचा प्रयत्न असतो पण आम्हालाही मर्यादा आहेत, असे ४५ वर्षीय इश्तियाक अहमद अन्सारी सांगतात. अन्सारींनी यांना त्यांच्या मालकीचे १०६ पॉवरलूम भंगारात विकावे लागले होते.

सध्या इश्तियाक व त्यांच्या काही सहकार्यांनी कामगारांसाठी मदत कक्ष उघडले आहेत. त्यातून ते जेवण व अन्नधान्य गरजूंना देतात.

भिवंडी शहर नेहमीच राज्यकर्त्यांकडून दुर्लक्षित, उपेक्षित राहिले आहे. शहरातील सांडपाणी व्यवस्था, बेकायदा बांधकामे, वाहतूक व्यवस्था व आरोग्य व्यवस्था कमालीच्या नित्कृष्ट आहेत. या शहरात राहणारी सुमारे ८० टक्के लोकसंख्या स्थलांतरितांची आहे. येथे येणारे बहुसंख्य पासमंदा या मुस्लिम धर्मातील खालच्या जातीतले आहेत. त्याचबरोबर तेथे कुरेशी व मोमीन जातीचेही स्थलांतरित आहेत. लोकसंख्येचा मोठा हिस्सा स्थलांतरितांचा असल्याने हे शहर विकसित झालेले नाही.

लॉकडाऊन पुकारल्यानंतर काही पॉवरलूम मालकांनी आपल्या कामगारांना अधिक वेतन दिले. काहींनी स्थानिक खानावळींना पैसे देऊन आपल्या कामगारांच्या जेवणाची सोय केली. पण मोहम्मद इस्रार सारखे खानवळ मालक म्हणतात, आम्ही अशा कामगारांना किती दिवस जेवण देऊ? आमच्याकडचेच पैसे आता संपत आलेत, त्यानंतर आम्ही काही करू शकत नाही..

या शहरातील कामगार ८ ते १० महिने काम करून परराज्यातल्या आपापल्या घरी दोन महिने जातात. तेथे कुटुंबासमवेत राहतात. प्रत्येक कामगाराचे स्वतःचे रेशनकार्ड, आधारकार्ड आहे, पण त्यावर त्यांच्या घराचा पत्ता आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0