कोविड-१९ : मानसिक आरोग्याच्या समस्यांत वाढ

कोविड-१९ : मानसिक आरोग्याच्या समस्यांत वाढ

आत्महत्येचा विचार करणाऱ्यांच्या किंवा स्वत:ला ईजा करून घेणाऱ्यांच्या संख्येत अलीकडील काळात वाढ झाली आहे, असे एका ऑनलाइन सर्वेक्षणात आढळून आले आहे. सुइ

राज्यात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही
भारतात कोरोनाचे एकूण रुग्ण ३० लाखांवर
काही दिवस स्वत:ला कोंडून घेऊया

आत्महत्येचा विचार करणाऱ्यांच्या किंवा स्वत:ला ईजा करून घेणाऱ्यांच्या संख्येत अलीकडील काळात वाढ झाली आहे, असे एका ऑनलाइन सर्वेक्षणात आढळून आले आहे. सुइसाइड प्रिव्हेन्शन इंडिया फाउंडेशन (एसपीआयएफ) या संस्थेने मे महिन्यात या सर्वेक्षणासाठी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या १५९ जणांच्या मुलाखती घेतल्या. या अहवालात मानसिक ताणाखाली असलेल्यांसाठी, त्यांच्या आजूबाजूच्यांसाठी आणि थेरपिस्टसाठी काही शिफारशीही करण्यात आल्या आहेत.

गुगलवर “सुइसाइड” हा सर्च देणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ दिसून आल्यामुळे, कोरोनाशी संबंधित आत्महत्यांच्या बातम्या आल्यामुळे तसेच आत्महत्येची कल्पना व भावनिक ताणासंदर्भातील फोनकॉल्स व ईमेल्समध्ये तिपटीने वाढ झाल्यामुळे संस्थेने हे सर्वेक्षण सुरू केले.

कोरोनाच्या साथीमुळे देशभरातील लोकांना वेगळ्या जीवनपद्धतीशी जुळवून घेणे भाग पडत आहे आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा ताण येत आहे. एरवीही जगात सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या देशात लॉकडाउनचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्सेसमधील (एनआयएमएचएएनएस) मनोविकार विषयाचे प्राध्यापक शिवराम वारंबल्ली (हे या सर्वेक्षणात सहभागी नव्हते) म्हणाले, “समाजाच्या वंचित घटकांमध्ये आत्महत्येचा विचार नक्कीच वाढीस लागलेला आहे.” “मानसिक आजार, आर्थिक असुरक्षितता आणि कामाचा ताण या पूर्वीपासून प्रचलित धोक्यांमध्ये लॉकडाउनमुळे आणखी वाढ झाली आहे. त्यात नियंत्रण गमावल्याची भावना, सामाजिक संबंधांमध्ये झालेली घट, नोकरीबाबत अनिश्चितता आणि सामाजिक विलगता यांची भर पडली आहे,” असे एसपीआयएफचे संस्थापक नेल्सन विनोद मोझेस म्हणाले. या समस्या लोकसंख्येच्या सर्व स्तरांमध्ये, सर्व आर्थिक व सामाजिक गटांमध्ये जाणवत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

चिंताजनक वाढ

कोविड-१९ साथ पसरल्यापासूनच्या काळात मृत्यूची इच्छा व्यक्त करणाऱ्यांच्या किंवा आत्महत्येची कल्पना बोलून दाखवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे या सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक थेरपिस्टनी नमूद केले. काही थेरपिस्टच्या मते आत्महत्येचा विचार करणाऱ्यांच्या संख्येत १० टक्क्यांहून कमी वाढ झाली आहे, तर काहींच्या मते ही संख्या ५० टक्क्यांनी वाढलेली आहे.

स्वत:ला ईजा करून घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सुमारे दोन-तृतीयांश थेरपिस्ट्सनी सांगितले. यातील २९ टक्क्यांनी खात्रीपूर्वक वाढ झाल्याचे सांगितले, तर ३६ टक्क्यांनी तशी शक्यता व्यक्त केली. यापूर्वी मानसिक आरोग्यविषयक समस्यांतून बाहेर आलेल्या किंवा बाहेर येण्याच्या प्रक्रियेत असलेल्या रुग्णांमध्ये मानसिक आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे, असे ६० टक्के थेरपिस्ट्सनी सांगितले. “यातील अनेक रुग्णांना औषधे किंवा उपचार मिळवणे कठीण झाले असल्याने त्यांचे आजार पुन्हा डोके वर काढत आहेत. हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे,” असे वरंबल्ली म्हणाले.

चिंता (८८.७ टक्के), नोकरी जाणे (७६.१ टक्के), ताण (७३.६ टक्के), एकाकीपणा (७३ टक्के) आणि आर्थिक असुरक्षितता (७३ टक्के) ही मानसिक आजारांसाठी उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांनी दिलेली प्रमुख कारणे आहेत.

“बहुतेक प्रकरणांमध्ये चिंतेचा स्तर खूप अधिक आहे. हा बहुतेकदा कोरोनाशी थेट संबंधित नाही पण पूर्वीच्या समस्यांची तीव्रता या कालखंडात नक्कीच वाढली आहे. यामुळे दडपल्यासारखी भावना निर्माण होत आहे आणि त्यातून आत्महत्येचा विचार वाढीस लागत आहे,” असे जून थॉमस या बेंगळुरूस्थित समुपदेशकांनी सांगितले. एकंदर देशातील मानसिक आरोग्याची स्थिती गंभीर आहे असे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे.

मानसिक आरोग्यासाठी मदत मागणाऱ्यांमध्ये तरुण व्यावसायिक, विद्यार्थी आणि स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. मानसिक आजारांचे प्रमाण मात्र लोकसंख्येच्या सर्व वर्गांमध्ये, सर्व स्तरांवर खूप आहे. काही वर्गांतील लोक त्यासाठी वैद्यकीय मदत घेत आहेत एवढेच,” असे एसपीआयएफचे रिसर्च कन्सल्टण्ट नूर मलिक म्हणाले.

विज्ञान शाखेच्या एका विद्यार्थिनीसाठी लॉकडाउनचा काळ खूपच खडतर जात आहे. ही विद्यार्थिनी २०१४ सालापासून बायपोलर डिसऑर्डरसाठी वैद्यकीय मदत घेत आहे. “कोविडपूर्व काळात मी बहुतेक वेळ माझ्या लॅबमधील कामात व्यग्र असायचे आणि बाकी गोष्टींची चिंता करायला वेळ नसायचा. तेव्हा मी शांत असायचे. लॉकडाउनच्या काळात घरात बसावे लागत आहे आणि घरगुती कामे सोडल्यास करण्यासारखे काही नाही. मग माझ्या मनात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाबद्दलचे विचार येत राहिले आणि त्यामुळे माझी चिंता वाढून नैराश्य आले” असे तिने नमूद केले. ती फेब्रुवारीपासून तिच्या डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटू शकलेली नाही. व्हॉट्सअॅपवरून तिची थेरपी सत्रे सुरू आहेत पण आभासी उपचार सामान्य उपचारांहून खूप वेगळे आहेत. आपण प्रत्यक्ष संभाषणात जे व्यक्त करू शकतो, ते व्हिडिओमध्ये करू शकत नाही, असे ती म्हणाली. मुसळधार पावसामुळे इंटरनेटची कनेक्टिविटी कमी झाल्यामुळे अडचणींत भर पडल्याचेही तिने सांगितले. अर्थात ती मित्रमंडळींशी बोलत आहे, नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे, तिच्या प्रोजेक्टचे नियोजन करत आहे, अधिक झोप घेत आहे आणि याची तिला मदत होत आहे.

प्रथमच उपचार घेणारे अनेकजण

उपचारांची मागणी करणाऱ्यांपैकी अनेकजण प्रथमच ही मागणी करत आहेत, असे निम्म्याहून अधिक थेरपिस्ट्सनी सांगितले. अधिकाधिक लोक पूर्वीच्या तुलनेत सत्रासाठी अधिक वेळ देत आहेत, असेही ६९ टक्के थेरपिस्ट्सनी सांगितले. मानसिक आरोग्यासाठी अधिकाधिक लोक मदत मागत आहेत हे चांगले लक्षण असले तरी या संख्येत अचानक झालेली वाढ आणि दीर्घ थेरपी सत्रे यांमुळे मानसिक आरोग्य व्यावसायिकांवर ताण येत आहे. साथीचा कालखंड, लॉकडाउनमुळे येणारा ताण आणि व्हर्च्युअल थेरपी यांमुळे केअरगिव्हर फटिग जाणवत ६२ टक्क्यांहून अधिक थेरपिस्ट्सनी नमूद केले. यामुळे त्यांची सर्वोत्कृष्ट काम देण्याची क्षमता कमी होत आहे, असे ७५.८ टक्क्यांनी मान्य केले.

वरंबल्ली आणि थॉमस या दोघांनीही या संशोधनाची पुष्टी केली. समुपदेशक याबद्दल बोलत आहेत आणि या काळात स्वत:ची अधिक काळजी घेत आहेत तसेच वर्क-लाइफ समतोल साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. थेरपिस्ट्सनीही त्यांच्या तणावपूर्ण व्यवसायाचा ताण कमी करण्यासाठी सुपरवायजर्स आणि समुपदेशकांची मदत घ्यावी अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

मानसिक ताण जाणवत असलेल्यांनी हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करून मदत मागावी, लोकांच्या संपर्कात राहावे, व्यायाम करावा आणि गरज भासेल तेव्हा थेरपिस्ट्सची बोलावे, अशी सूचना अहवालात करण्यात आली आहे. लोकांनी आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांशी सक्रियपणे बोलत राहावे, नैराश्याची आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीची लक्षणे दिसल्यास सावध व्हावे, योग्य ते प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घ्यावे व मानसिक आरोग्याचे उत्तम “गेटकीपर्स” व्हावे असे आवाहनही या अहवालात म्हटले आहे.

“सध्याच्या खडतर परिस्थितीत असे गेटकीपर्स फार महत्त्वाचे आहेत. मानसिक समस्यांसाठी तत्काळ वैद्यकीय मदत मिळवू शकत नाहीत अशा अनेक लोकांसाठी जीवन आणि मृत्यू यांच्यातील अंतर हे गेटकीपर्स ठरू शकतात,” असे वरंबल्ली म्हणाले.

कोविड-१९ साथीच्या काळात एसपीआयएफने ६००हून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे, यातील ३५०हून अधिक मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत, तर अन्य विद्यार्थी वा सामान्य लोक आहेत. मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या देखरेखीखाली गेटकीपर्सचा एक समुदाय तयार करण्याची संस्थेची योजना आहे.

कोविड-१९ साथीला राष्ट्रीय स्तरावर द्यावयाच्या प्रतिसादाचा मानसिक आरोग्य सेवा हा अत्यावश्यक भाग करावा अशी संयुक्त राष्ट्रांची शिफारस आहे आणि सरकारी तसेच खासगी संस्था यासाठी हेल्पलाइन्स वगैरे सुरू करत आहे. तरीही हे प्रयत्न मानसिक आरोग्याच्या समस्या हाताळण्यासाठी पुरेशा नाहीत. कॉल घेऊ शकतील अशा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे समस्या अधिक बिकट झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मानसिक आरोग्य हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला आला पण या विषयाला चिकटलेला कलंक अजूनही दूर झालेला नाही.

“मानसिक आरोग्याबद्दलची संभाषणे मुख्य धारेत आणण्याची, जागरूकता वाढवण्याची, यावर असलेला कलंक पुसून टाकत वैद्यकीय मदत घेण्याची प्रवृत्ती वाढण्याची प्रकर्षाने गरज आहे,” असे मत नूर मलिक यांनी व्यक्त केले. सरकारनेही सामाजिक-आर्थिक सुरक्षितता जाळी वाढवणे तसेच मानसिक आजारांचा सामना करणाऱ्यांना आधार देण्यासाठी आणखी काही मार्गांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

“सरकारद्वारे मानसिक आरोग्यसेवा कायदा, २०१७ गांभीर्याने अमलात आणला जाण्यासाठी ही कदाचित चांगली वेळ आहे. सर्वांना हक्काधारित दृष्टिकोनातून मानसिक आरोग्यसेवेचा वायदा या कायद्यामध्ये करण्यात आला आहे,” असे मोझेस यांनी स्पष्ट केले.

जर तुमच्या मित्रांपैकी किंवा कुटुंबियांपैकी कोणाबद्दल आत्महत्येची शक्यता तुम्हाला वाटत असेल तर कृपया त्यांच्या संपर्कात राहा. सुइसाइड प्रिव्हेन्शन इंडिया फाउंडेशनकडे टेलिफोन क्रमांकांची यादी आहे. (www.spif.in/seek-help/) ते या क्रमांकांवर फोन करून विश्वासाने बोलू शकतात. किंवा तुम्ही त्यांना जवळच्या रुग्णालयातही नेऊ शकता.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: