सोमवारी (कथित) ‘विक्रम’, मंगळवारी लसीकरणात घसरण

सोमवारी (कथित) ‘विक्रम’, मंगळवारी लसीकरणात घसरण

भाजप-शासित अनेक राज्यांमध्ये दररोज दिल्या जाणाऱ्या कोविड-१९ लशींची संख्या मंगळवारी नाट्यमयरित्या घसरल्यामुळे, सोमवारचा लसीकरणाचा 'विक्रम' कृत्रिमरित्य

उ. प्रदेशात गंगा किनारी शेकडो मृतदेहांचे दफन
कोरोना : राज्यातील आकडा ४१
करोना. विकलांग समाजावर रोगाचा हल्ला

भाजप-शासित अनेक राज्यांमध्ये दररोज दिल्या जाणाऱ्या कोविड-१९ लशींची संख्या मंगळवारी नाट्यमयरित्या घसरल्यामुळे, सोमवारचा लसीकरणाचा ‘विक्रम’ कृत्रिमरित्या घडवलेला होता या शंकेला चांगलेच बळ आले आहे.

स्क्रोल.इन या न्यूजपोर्टलने मंगळवारी दिलेल्या बातमीनुसार, सोमवारच्या आधी अनेक दिवस भाजप-शासित राज्यांमध्ये दररोज दिल्या जाणाऱ्या लशींच्या सरासरी संख्येच्या तुलनेत खूप कमी लशी दिल्या जात होत्या. त्यामुळे सोमवारी या राज्यांमध्ये खूप मोठ्या संख्येने लशी देणे शक्य झाले आणि ‘विक्रम’ प्रस्थापित झाला.

२१ जून रोजी केंद्र सरकारने बहुसंख्य लशींची खरेदी करण्यावरील व त्या राज्यांना मोफत वितरित करण्यावरील नियंत्रण पुन्हा आपल्या हाती घेतले. एकंदर सोमवारी घडवण्यात आलेला हा विक्रम केंद्र सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी होता. गेल्या दोन महिन्यांत लशींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, हा विक्रम ठरवून घडवण्यात आला असावा, अशी शंका घेण्यास जागा आहे.

को-विन पोर्टलवरील मंगळवारचा डेटा बघता, अनेक मोठ्या भाजपशासित राज्यांमध्ये देण्यात आलेल्या लशींचा आकडा सोमवारच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी होता. हा फरक मध्य प्रदेशात अधिक प्रकर्षाने दिसून आला. सोमवारी राज्यात १७.४४ लाख लशी देण्यात आल्या होत्या, तर मंगळवारी देण्यात आलेल्या लशींचा आकडा ५०००हून कमी होता. याचा अर्थ मंगळवारी देण्यात आलेल्या लशींचे प्रमाण सोमवारी देण्यात आलेल्या लशींच्या केवळ ०.३ टक्के होते.

हरयाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्येही सोमवारी देण्यात आलेल्या लशींच्या तुलनेत मंगळवारी देण्यात आलेल्या लशींची संख्या खूपच कमी होती. हरयाणात सोमवारी ५.४५ लाख डोस देण्यात आले, तर मंगळवारी केवळ ७६,००० लशी देण्यात आल्या. ही तब्बल ८५ टक्के घट आहे. कर्नाटकात सोमवारी ११.५९ लाख लशी दिल्यानंतर मंगळवारी केवळ ३.९५ लाख लशी दिल्या गेल्या.

गुजरातमध्ये मात्र सोमवारी देण्यात आलेल्या लशींच्या तुलनेत मंगळवारी देण्यात आलेल्या लशींच्या प्रमाणात किंचित घट दिसून आली. सोमवारी ५.२ लाख लशी देण्यात आल्या, तर मंगळवारी ४.२७ लाख लशी देण्यात आल्या. इतपत चढउतार यापूर्वीही अनेकदा अनेकविध घटकांमुळे आढळून आले आहेत. आसाममध्येही हीच स्थिती होती. सोमवारी आसाममध्ये २.७४ लाख लशी देण्यात आल्या, तर मंगळवारी २.४९ डोस देण्यात आले. उत्तरप्रदेशात तर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अधिक लशी देण्यात आल्या. सोमवारी ७.६८ लाख, तर मंगळवारी ८.२१ लाख लशी देण्यात आल्या.

भाजपची सत्ता नसलेल्या मोठ्या राज्यांमध्ये हा प्रवाह दिसत नाही. केरळमध्ये सोमवारी २.६३ लाख डोस देण्यात आले, तर मंगळवारी २.३० लाख डोस देण्यात आले. पश्चिम बंगालमधील सोमवार व मंगळवारचे आकडे अनुक्रमे ३.३४ लाख व ३.०१ लाख होते. तेलंगणमध्ये सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी सुमारे १.५ लाख डोस देण्यात आले.

तमीळनाडूत मात्र लक्षणीय फरक दिसून आला. सोमवारी ४.४४ लाख लशी देण्यात आल्या, तर मंगळवारी २.२३ लाख लशी देण्यात आल्या.

आंध्रप्रदेशानेही रविवारीच ‘विक्रम’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रविवारी राज्यात १३.७४ लाख डोस देण्यात आले. कोविन पोर्टलवरील डेटावरून असे दिसते की, हा आकडा साध्य करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी लशींची चांगलीच साठेबाजी केली आहे. ‘विक्रमी’ दिवसाच्या आधीचे पाच दिवस बघितले असता, १५ जून रोजी सर्वाधिक ८१,६९५ डोस देण्यात आले होते. रविवारी विक्रमी लसीकरण केल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी राज्यांतील लसीकरणाचे आकडे पुन्हा घसरले. या दोन्ही दिवशी केवळ ४०,००० डोस राज्यात देण्यात आले.

महाराष्ट्राची मात्र मंगळवारची कामगिरी सोमवारच्या तुलनेत चांगली होती. राज्याने सोमवारी ३.८७ लाख लशी दिल्या, तर मंगळवारी ५.५९ लाख डोस देण्यात आले.

या डेटावरून असे दिसून येते की, लसीकरणाचे नियंत्रण केंद्र सरकारने पुन्हा हाती घेतल्याचा लाभ दोन काँग्रेस-शासित राज्यांना झाला. छत्तीसगढ आणि पंजाब या राज्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी लसीकरणात लक्षणीय वाढ झाली. छत्तीसगढमध्ये दोन्ही दिवस सुमारे १ लाख लशी देण्यात आल्या. यापूर्वीच्या ३० दिवसांत कधीही राज्यामध्ये एका दिवशी १०,०००हून अधिक लशी दिल्या गेल्या नव्हत्या. पंजाबमध्येही या दोन्ही दिवशी १ लाखाहून अधिक डोस देण्यात आले. यापूर्वीच्या आठ दिवसांतील आकडेवारी बघितली, तर पंजाबमधील एका दिवसातील लसीकरणाचा सर्वोच्च आकडा ३४,१४३ होता.

राजस्थान या तिसऱ्या काँग्रेसशासित राज्यामध्ये लसीकरणाच्या प्रवाहात कोणताही लक्षणीय बदल दिसून आला नाही. सोमवारी राजस्थानात ४.७३ लाख डोस देण्यात आले, तर मंगळवारी हा आकडा घटून ३.८ लाख झाला. रविवारी देण्यात आलेल्या लशींची संख्याही साधारण एवढीच होती.

‘द वायर’चे अजोय आशीर्वाद महाप्रशस्त यांनी लिहिल्याप्रमाणे, लशींची ‘विक्रमी’ संख्या दाखवणे म्हणजे लसीकरण मोहिमेचे रूपांतर राजकीय अभियानात करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. याचा विशेष भर पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या उत्तरप्रदेशसह अन्य सात राज्यांवर आहे.

सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट दिली. विरोधी पक्षांनी जनतेमध्ये लशीबद्दल साशंकता निर्माण केल्याचा आरोप यावेळी नड्डा यांनी केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. महाप्रशस्त यांच्या विश्लेषणातील हे उद्धृत:

“नड्डा यांनी आरएमएलएचला दिलेली भेट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, येत्या काही महिन्यांत भाजपने भारतातील लसीकरण मोहिमेभोवती रचलेल्या सुसंघटित प्रसिद्धी ब्लिट्झक्रिगची सुरुवात आहे.”

“भारतात गेल्या वर्षी कोविड साथ सुरू झाल्यापासून केंद्रातील भाजप सरकारने हे संकट हाताळण्याबद्दल होत असलेली टीका प्रभावहीन करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. आता या नकारात्मकता दूर करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक पाऊल पुढे टाकून भाजप जनसंपर्क वाढवण्याच्या कामाला लागला आहे.”

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: