कोविड आणि राजकारण

कोविड आणि राजकारण

नियाल फर्ग्युसन यांचं डूम, पॉलिटिक्स ऑफ कॅटॅस्ट्रॉफी, हे पुस्तक कोविड आणि राजकारण या विषयावर आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक माणूस गोल्फ खेळताना दि

राज्यात ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाचे ८ रुग्ण
शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण आवश्यक
गोव्यात ऑक्सिजन अभावी ४८ तासांत ४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

नियाल फर्ग्युसन यांचं डूम, पॉलिटिक्स ऑफ कॅटॅस्ट्रॉफी, हे पुस्तक कोविड आणि राजकारण या विषयावर आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक माणूस गोल्फ खेळताना दिसतो, पार्श्वभूमीवर भीषण आग दिसते. गोल्फ खेळणारा माणूस म्हटलं की अलीकडं डोनल्ड ट्रंप यांची छबी डोळ्यासमोर येते. कोविडचं संकट दररोज हजारो माणसांना मारत होतं तेव्हां खरोखरच ट्रंप गोल्फ खेळत असत. रोम जळत असताना नीरो फीडल वाजवत होता असं म्हणतात तसंच हे गोल्फ. भीषण समस्या राजकारणी लोकांना सोडवता आली नाही, ते आपल्याच खेळात मग्न होते असं हे मुखपृष्ठ सुचवतं.

कोविडच्या हाहाकाराला राजकारण जबाबदार आहे काय? सरकारांची अकार्यक्षमता कोविडमुळं झालेल्या महानुकसानीला जबाबदार आहे काय? असा प्रश्न जगभर चर्चिला जातोय. तोच प्रश्न समोर ठेवून लेखकानं पुस्तकाची रचना केलीय.

एकादी घटना घडत असताना किंवा नुकतीच घडून गेली असताना  त्या विषयावर पुस्तक वाचायला लोकाना आवडतं कारण विषय ताजा असतो. पण ती घटना पुरेशी उलगडलेली नसतांना पुस्तक लिहिणं हे एक आव्हानच असतं. कारण पुस्तक बाजारात येईपर्यंत परिस्थिती बदललेली असते. कधी कधी परिस्थितीचं गांभिर्य कमी झालेलं असतं कधी कधी ते खूपच वाढलेलं असतं. अशा परिस्थितीत वाचकाची पुस्तक वाचनाची ओढ कमी झालेली असते, वाचकाच्या अपेक्षाही बदललेल्या असतात. शिवाय मधल्या काळात  बरीच नवी माहितीही लोकांना मिळालेली असते. त्यामुळं कित्येक वेळा अशी झटपट पुस्तकं वाचली जात नाहीत, बाजूला पडतात.

झटपट पुस्तकांच्या मर्यादा आणि शक्यता यांचा अंदाज घेऊनच लेखक नियाल फर्ग्युसन यांनी या पुस्तकाचा घाट घातलाय.

कोविड ही घटना जानेवारी २०२० मधे सुरु झाली आणि २०२१ च्या मे महिन्यात ती घटना अजूनही उलगडतेच आहे. अजूनही कोविडच्या विषाणूचं नेमकं रूप आणि वागणं समजलेलं नाहीये. कोविडचे परिणाम शरीरावर कसे होतात ते अजून पूर्णपणे समजलेलं नाहीये. कोविडची लस टोचली जातेय खरी पण तिचे परिणाम कसे, किती काळ टिकतील ते वैज्ञानिकांना पूर्णपणे माहित नाहीये.

अशा स्थितीत, हादरलेली, भांबावलेली, जनता एक दिलासा शोधतेय. कोणाला तरी, कशाला तरी या संकटाला जबाबदार ठरवून जनतेला मोकळं व्हायचंय. जनतेचं हे मन लक्षात घेऊनच नियाल फर्ग्युसन यांनी हे पुस्तक रचलंय.

मुळात कोविडच नीट समलेला नसताना नागरीक  आपापल्या सरकारांना  कोविड संकटासाठी जबाबदार धरतायत. सरकारांची अकार्यक्षमता, सरकारांनी पुरेशी काळजी घेतली नाही आणि व्यवस्थापन केलं नाही असे आरोप सर्रास होत आहेत.

अमेरिका, जर्मनी, इंग्लंड हे देश श्रीमंत आहेत. इन्फ्रा स्ट्रक्चर उभारणं त्यांना शक्य होतं, संकटकाळात पटापट साधनं जोडून लोकांना दुःखमुक्त करता येणं या देशांना शक्य होतं. तरीही तिथं फार माणसं मेली. असं कां घडलं?

चीन या देशातही समृद्धी आहे. पण तिथं माणसं कमी मेली. याचं कारण काय? तिथं लोकशाही नाही, एकाधिकारशाही आहे हे चीनच्या यशाचं कारण आहे काय?

पण द.कोरिया, जपान, तैवान या देशात तर लोकशाही आहे आणि समृद्धीही आहे. तिथं कोविडचा प्रकोप झाला नाही.

तेव्हा आर्थिक समृद्धी, राज्यव्यवस्था या कसोट्या लावून भागत नाही.

जनतेची ही समजुतीची कोंडी जनतेप्रमाणंच लेखकही  फोडायचा प्रयत्न करतो.या खटाटोपात लेखक नैसर्गिक आणि मानव निर्मिती अशा दोन्ही महासंकटांचा इतिहास पुस्तकात मांडतो.

माणूस आधुनिक झाल्यामुळं ही संकटं निर्माण झालीत काय? माणूस फार प्रवास करतो, फार वस्तू वापरतो. त्यामुळं हवेत कार्बन डायॉक्साईड इत्यादी घातक वायू वाढतात, निसर्गाचा तोल ढळतो, पर्यावरण प्रदुषीत होतं. त्यामुळंच नाना रोग निर्माण होतात असं काही लोकं म्हणतात. पण ते खरं मानलं तर प्रश्न असा पडतो की माणूस जेव्हा आधुनिक नव्हता, जेव्हा ना कारखाना होता ना विमान होतं, तेव्हा रोग नव्हते काय? अगदी शुद्ध निसर्गात रहात असताना माणसं खूप कमी जगत होती याचा अर्थ काय घ्यायचा?

उपाय शोधत असताना माणूस भावनेच्या आहारी जातो असाही एक मुद्दा आहे. रोग होतात हे माणसाला कळतं. पण त्याला कारण माणसं धर्माचरण नीटपणे करत नाहीत असं लोक म्हणतात. बुरखा वापरत  नाहीत, युखॅरिस्ट करत नाहीत, चर्चमधे जात नाहीत, यज्ञ आणि आरत्या करत नाहीत, पूजाअर्चा करत नाहीत,  असं सांगितलं जातं आणि त्यावर लोकं विश्वास ठेवतात. आरोग्य व्यवस्था सुधारण्याऐवजी माणसं शेण्या जाळतात, मंत्र जपतात, गोमुत्र पितात.

वरील भावनात्मक उपाय करूनही विषाणू शिल्लक उरतात आणि लस इत्यादी आधुनिक वैज्ञानिक उपाय करूनही विषाणू नवे अवतार घेतात किंवा नवेच विषाणू जन्मतात. हा पेच माणसाला गोंधळात टाकतो.

डूम या पुस्तकात ही सगळी वळणं आहेत. युवाल हरारी, जेरेड डायमंड यांच्या वर्गातले नियाल फर्ग्युसन हे इतिहासकार माणसाचा हज्जारो वर्षांचा इतिहास पुस्तकात मांडतात. तो इतिहास, त्यातली माहिती वाचकाच्या ज्ञानात भरपूर भर घालते. पण शेवटी लेखकाला काय म्हणायचंय इथे गाडी पोचते तेव्हां लोचा होतो.

पुस्तकाच्या शीर्षकातच राजकारण हा विषय आहे. राजकारणाबाबत एक स्पष्ट चित्र लेखक उभा करेल अशी वाचकाची अपेक्षा असते. पण तसं चित्रं उभं रहात नाही.

लेखक राजकारण, सरकार या मुद्द्याच्या सर्व बाजू मांडतो. अमर्त्य सेन यांच्या बंगाल दुष्काळावरील अभ्यासाचा उल्लेख लेखक करतो. बंगालमधला दुष्काळ आणि उपासमारी अन्नाच्या टंचाईमुळं नव्हती, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळं व सदोष कायद्यामुळं होती, याकडं अमर्त्य सेन लक्ष वेधतात.काही प्रमाणात तो मुद्दा आज भारतात सिद्ध झाला आहे. भारतातल्या  सरकारला महामारीपेक्षा स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचीच चिंता जास्त होती हे भारताचं उघड गुपीत आहे. एककल्ली सरकारनं वास्तवाकडं साफ दुर्लक्ष केलं, आपले दोष झाकण्यासाठी असत्याचा प्रचार करत राहिलं यामुळंही संकट अधिक भीषण झालं. तेव्हां सरकारला दोषी धरता येतं हे भारताच्या उदाहरणावरून निश्चितच म्हणता येतं.

परंतू संकट कधीच पूर्वसूचना देत नसतं हाही मुद्दा महत्वाचा आहे. अब्जावधी लोकांना फार पटकन लस द्यावी लागेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. ऑक्सिजनच्या इतक्या नळकांड्या लागतील याची कल्पना कोणालाच नव्हती. संकट येणार येणार अशी भाकितं नेहमी वर्तवली जातात. परंतू भाकितं गृहीत धरून नियोजन करता येत नसतं. साधार आणि विश्वासार्ह  माहितीच्या आधारे नियोजन करता येतं. भूकंप, विषाणू, पूर इत्यादी गोष्टी कधी तरी घडणारच, नाही तरी हे कलीयुगच आहे असं घोकत रहाणं वेगळं आणि त्यावर योग्य उपाययोजना करणं वेगळं. त्यामुळं संकटासाठी सरकारला झोडपणंही योग्य नसतं.

तेव्हां सरकारला झोडपणंही योग्य नाही पण सरकार अगदीच निर्दोष आहे असंही म्हणता येत नाही अशी स्थिती एव्हाना लक्षात आलं आहे. तेच लेखकानं मांडलं आहे.

लोचा असा की पुस्तकाचा बराचसा भाग लेखकानं अमेरिकेच्या परदेश धोरणावर खर्च केला आहे. शेवटी शेवटी तर अमेरिका आणि चीन यांच्या स्पर्धेवर बरेच शब्द खर्ची घातले असून भविष्यात अमेरिकाच नक्की यशस्वी होणार आहे असं म्हणून लेखक मोकळा झालाय.

खरं म्हणजे शीर्षक म्हणतं त्यानुसार सरकार, राज्यव्यवस्था ही गोष्ट केंद्रात ठेवून पुस्तक उभं रहायला हवं होतं. प्रत्यक्षात ते अमेरिकाकेंद्री झालंय.

मानवाचा हज्जारो वर्षांचा इतिहास ही गोष्ट म्हटलं तर उपयुक्त आहे म्हटलं तर फापटपसारा आहे, पुस्तक जाडजूड करण्याच्या अलीकडच्या फॅशनसाठी तो इतिहास घुसडला आहे असं वाटतं.

पुस्तकात माहिती भरपूर आहे, ती माहिती नवी नाही. लेखकानं ती संगतवार गुंफली आहे एवढंच.

सामान्यतः पुस्तक लिहितांना, माहिती देत असताना, लेखकाला काही तरी सांगायचं असतं, मजकुराला काही एक टोक असतं. या पुस्तकात मजकूर पसरलेला आहे, त्याला टोक नाही.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

(लेखाचे छायाचित्र ‘द गार्डीयन’च्या सौजन्याने साभार )

Doom: The Politics of Catastrophe 
Niall Ferguson

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0