पुण्यातील कोविड सेंटर गायब

पुण्यातील कोविड सेंटर गायब

पुण्यात दररोज साधारण ३५ मृत्यू होत असताना, पुण्यातील मानाची गणपती मंडळे पुढे आली. जागा ठरली. ५० लाख जमा करण्याची तयारी झाली. डॉक्टरांच्या नियुक्त्या झाल्या. पत्रकार परिषद झाली. उद्घाटन झाले. पण कोविड सेंटर अचानक गायब झाले आणि त्याची कोणी दखलही घेतली नाही.

कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर
इंदूरमध्ये डॉक्टरांवर दगडफेक व थुंकणाऱ्या ४ जणांवर रासुका
१४३ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही

पुण्यात सध्या कोरोना वेगाने पसरत आहे. दर दिवशी किमान १ हजार रुग्ण नव्याने बाधित होत  आहेत. दररोज किमान ३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. वाजत गाजत सुरू केलेल्या जंबो कोविड रुग्णालयातील अव्यवस्था उघड झाली आहे. अशातच आता एक कोविड सेंटर गायब करण्यात आल्याची घटना पुढे आली आहे.

पुण्यातील मानाच्या ८ गणपती मंडळांनी एकत्र येऊन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहांमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी त्यांनी ५० लाख रुपये उभे करण्याची तयारी केली. महापालिकेने या प्रस्तावाचे स्वागत करून मान्यता दिली. त्यासाठी सेंटरमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. पदाधिकाऱ्यांनी त्याचे उद्घाटन केले. फोटोही काढण्यात आले. पत्रकार परिषद झाली. त्याच्या बातम्याही आल्या. महापौरांनी आपल्या फेसबुक पेजवर त्यासाठी पोस्ट लिहिली आणि अचानक महापालिकेनेच हे कोविड सेंटर गायब केले.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यामध्ये ३ सप्टेंबरला नव्याने सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) जाहीर केले आहेत. त्यामध्ये ५ रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी अडथळे उभे करण्यात येऊन तो भाग सील करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हंटले आहे. त्यामध्ये कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील भाग, मंगळवार पेठ, पार्वती, गणेश पेठ, भवानी पेठ, कात्रज, धनकवडी अशा एकूण ७४ भागांचा समावेश आहे. या भागात घरे लहान असल्याने एकाचा दुसऱ्याला संसर्ग होत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी विलगीकरण करण्याची गरज असून त्यासाठी गणपती मंडळांनी कोविड सेंटरचा प्रस्ताव पुणे महापालिकेला दिला होता.

३५० ते ४०० खाटांचे कोविड केअर सेंटर, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये उभारले जाणार होते. त्यासाठी मंडळांनी मदतीसाठी १२ डॉक्टरांची टीम तयार केली होती. आयुर्वेदिक औषधे मंडळे पुरविणार होती. स्वयंसेवक, सुरक्षा, दोन वेळचे जेवण, नाष्टा, चहा मंडळे पुरविणार होती. याशिवाय त्याठिकाणी १० ऑक्सीजन बेडची व्यवस्थाही करण्यात आली होती. आवश्यकतेनुसार बेडची संख्या वाढविली जाणार होती.

कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ, केसरी वाडा गणपती मंडळ हे मानाचे पांच आणि भाऊ रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, दगडूशेट गणपती मंडळ या प्रमुख मंडळांनी एकत्र येऊन पुणे महापालिकेबरोबर संयुक्तरित्या कोविड केअर सेंटर उभारण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेला २५ जुलै रोजी पाठवला. २७ जुलै २०२० रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने ८ मंडळांना प्रस्ताव मिळाल्याचे आणि त्यांना आभाराचे पत्र पाठवले.

पुणे महापालिका डॉक्टर्स पुरविणार होती. त्यासाठी ३ डॉक्टर, ३ नर्स, २ सहाय्यक नर्स आणि २ आया यांची नियुक्ती करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी ४ ऑगस्ट २०२० रोजी काढले.

१ ऑगस्ट २०२० रोजी पत्रकार परिषद घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

१ ऑगस्ट २०२० रोजी पत्रकार परिषद घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

१ ऑगस्ट २०२० रोजी पत्रकार परिषद घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे  अध्यक्ष हेमंत रासने, नितीन पंडित, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली. आणि त्यामध्ये हे सेंटर सुरू झाल्याचे त्यांनी म्हंटले. सेंटरचा तपशीलही त्यांनी पोस्ट मध्ये दिला.

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये मोठ्या बातम्या आल्या. त्यामध्ये ‘करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या अशा कोविड केंद्रांची आवश्‍यकता’ असल्याचे म्हंटले होते.

६ ऑगस्ट २०२० ला मात्र पुणे महापालिकेने या सेंटरची आवश्यकता नसल्याचे पत्र दिले. अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेचे मालमत्ता अधिकारी राजेंद्र मुठे यांनी हे पत्र दिले. आणि एक सेंटर सुरू होण्याआधीच गायब झाले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट

महापौर मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट

या संदर्भात कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले, “१३ जुलै २०२० ला सर्व मंडळांची विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याबरोबर एक बैठक झाली. त्यावेळी मी माझ्या नऱ्हे-आंबेगाव येथील नव्याने बांधलेल्या १०० सदनिका कोविड सेंटरसाठी देण्याची तयारी दाखवली तसेच त्याचवेळी सर्व मंडळे कोविड सेंटर उभे करू शकतील का अशी चर्चा झाली आणि आम्ही त्यासाठी तयारी दाखवली.”

शेटे पुढे म्हणाले, “आम्ही सतत सामाजिक कामामध्ये पुढाकार घेतला आहे. गणपती उत्सवाचा उपयोग हा नेहमीच सामाजिक काम पुढे नेण्यासाठी केला आहे. यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व मंडळांनी एकत्र येऊन हा गणपती उत्सव आरोग्य आणि सेवा उत्सव म्हणून साजरा करायचे ठरविले होते. मानाच्या गणपती आणि प्रमुख मंडळांच्याबरोबरच शहरातील अनेक मंडळांनी सहकार्य करण्यासाठी तयारी दाखवली होती. सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली होती. दर महिन्याचा खर्च सर्व मंडळे करणार होती. पण अखेर महापालिकेने आयत्यावेळी नकार दिला. हे आम्हाला समजत नाही, की उद्घाटन झाल्यावर त्यांनी नकार कसा दिला आणि ४ दिवसांत त्यांना आवश्यकता का वाटली नाही.”

भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले, की पुण्यामध्ये अशा अनेक सेंटरची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व मंडळांनी एकत्र येऊन सेंटर उभे करण्याचा प्रस्ताव दिला होता. मी स्वतः खाण्याचा खर्च करण्याची तयारी केली होती. हा खर्च १० लाख रुपये आणि सर्व मानाच्या मंडळांनी प्रत्येकी १ लाख असे ८ लाख रुपये उभे करण्याची तयारी केली होती. हा खर्च दर महिन्यासाठी होता. अगोदर आम्हाला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि नंतर पत्र देऊन अशा सेंटरची आवश्यकता नसल्याचे कळविले.”

बालन म्हणाले, “आमची हे सेंटर उभे करण्याची आजही तयारी आहे. महापालिकेने आम्हाला संपर्क केल्यास आम्ही हे उभे करू शकतो.”

श्रीमंत दगडूशेट गणपती मंडळाचे खजिनदार महेश सूर्यवंशी म्हणाले, की कसबा-विश्रामबाग परिसरात आम्ही २७५ मंडळांना बरोबर घेऊन ‘जय गणेश व्यासपीठ’ स्थापन केले असून, कोरोना नियंत्रणासाठी काम सुरू केले आहे. आम्ही ८ रुग्णवाहीका तयार ठेवल्या आहेत. तसेच सासून रुग्णालयात रुग्णांना जेवण देण्यात येत आहे. सर्व मंडळांनी एकत्र येऊन कोविड सेंटर उभारणे, हे मोठे काम होते. त्याचा शहराला उपयोग झालं असता. पण महापालिकेला त्याची आवश्यकता वाटली नाही.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की याबाबत माहिती घेऊन बोलता येईल.

महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांना वारंवार संपर्क करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल या प्रक्रियेमध्ये सहभागी होते. त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका केल्या होत्या. त्यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, “मला स्वतःला कोविडची बाधा झाली असल्याने, मी रजेवर आहे. त्यामुळे या विषयावर २-३ दिवसांनंतर बोलता येईल.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, की मंडळांनी प्रस्ताव दिला होता. तो मंजूर होईपर्यंत परिस्थिती बदलली. कोविड सेंटरची आवश्यकता दुय्यम झाली. त्यामुळे त्यांना पत्र देऊन तूर्तास थांबण्यास सांगितले आहे. पुन्हा आवश्यकता वाटल्यास त्यांना सेंटर उभारण्यास सांगितले जाईल.

महापौर मुरलीधर मोहोळ आणि केसरी वाडा गणपती मंडळाचे रोहीत टिळक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकलेला नाही. संपर्क झाल्यावर हे वृत्त अपडेट केले जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: