अवलिया लेग स्पिनरः शेन वॉर्न

अवलिया लेग स्पिनरः शेन वॉर्न

बिल ओरेली, रिची बेनॉ यांच्यासारख्या बोटावर मोजता येण्यासारख्या लेग स्पिनर्सची परंपरा असलेल्या देशातून शेन वॉर्न आला. पदार्पणाच्या कसोटीत एका बळीसाठी तब्बल दीडशे धावा मोजल्यानंतर मात्र त्याने इतिहास घडवण्यास सुरूवात केली.

कुटुंब व समाजामधील स्त्री-पुरुषाच्या भूमिकेकडे भारतीय कसे पाहतात?
राज्यात नवे निर्बंध लागू
‘शाहीन बाग’ला भाजपकडून कट्‌टर हिंदुत्वाचे प्रत्युत्तर

फिरकी गोलंदाजीचे परिपूर्ण कौशल्य, त्या कौशल्याचे नाविन्य आणि लेग स्पिन गोलंदाजीच्या या नाविन्यपूर्ण कौशल्याचा क्रिकेटच्या ‘कॅनव्हास’वरचा नाट्यपूर्ण आविष्कार म्हणजे ‘शेन वॉर्न!’

कसोटी क्रिकेटच्या क्षितिजावर तो सिडनी क्रिकेट ग्राउंडवर अवतरला आणि तेथेच अस्ताला गेला. क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून नावारुपाला आला. तब्बल ७०८ बळी घेऊन विक्रम केला. पदार्पणाच्या कसोटीत भारताविरुद्ध एक बळीसाठी त्याला तब्बल १५० धावा मोजाव्या लागल्या. अखेरच्या कसोटीतही त्याला दोन डावात प्रत्येकी एकच बळी मिळवता आला. पण लेग स्पिन गोलंदाजीच्या या चमत्काराने दरम्यानच्या १४३ कसोटीमध्ये धुमाकूळ घातला. त्यात ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीतील माइक गॅटिंगच्या ढेंगातून गेलेल्या चेंडूने दांडी उडवली, तो चेंडू शतकातील सर्वोत्तम चेंडू म्हणून प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या आठवणीच्या कप्प्यात अजूनही जिवंत असा आहे.

वॉर्न जन्मला-खेळला ऑस्ट्रेलियात ज्यांची फिरकी गोलंदाजीची नव्हे तर वेगवान गोलंदाजांची परंपरा आहे. बिल ओरेली, रिची बेनॉ यांच्यासारख्या बोटावर मोजता येण्यासारख्या लेग स्पिनर्सची परंपरा असलेल्या देशातून तो आला. पदार्पणाच्या कसोटीत एका बळीसाठी तब्बल दीडशे धावा मोजल्यानंतर मात्र त्याने इतिहास घडवण्यास सुरूवात केली. त्या आधीचा वॉर्न वेगळा होता. बीअरमध्ये आकंठ बुडालेला, ‘जंकफूड’चा दिवाना. असा शेन जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षक टेरी जेन्नर समोर आला तेव्हा, टेरीची पहिली प्रतिक्रिया होती, “तू जाडा आहेस! ओव्हरवेट आहेस!, तुझ्या आयुष्याला शिस्तीचे काहीच वळण लागलेलं दिसत नाही. तू स्वतःला आहेस त्या पेक्षा अधिक लायकीचा समजतोस, तुझी ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची लायकीही नाही! ” अशा स्वरुपाची.

टेरीने केलेल्या अपमानाने वॉर्न खचला नाही तर पेटून उठला. अँलन बॉर्डर आणि मार्क टेलर हे दोन ऑस्ट्रेलियाचे कप्तान त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आणि नंतर स्टीव्ह वॉ देखील.

त्यानंतर घडलं ते विपरितच. ज्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीमुळे कसोटी सामने व मालिका जिंकण्याची ऑस्ट्रेलियाला सवय लागली होती, त्या परंपरेला वॉर्नने छेद दिला. फिरकीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून देण्यास सुरूवात केली. क्रिकेट विश्वाला आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट रसिकांना विश्वास ठेवायला लावणारी ही अविश्वसनीय गोष्ट होती. माइक गॅटिंगचा त्रिफळा उडाला हे फलंदाजासह प्रेक्षकानांही जसं विश्वसनीय वाटलं नव्हतं तसंच.

वॉर्नची फिरकी गोलंदाजासाठी योग्य अशी शरीरयष्टी नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्याही फिरकी गोलंदाजीसाठी अनुरूप नव्हत्या. तरीही त्याने तब्बल दोन दशके आपल्या फिरकीच्या तालावर जगातील तमाम प्रथितयश फलंदाजांना नाचवले.

एखाद्या गायकाला जसा सूर गवसला की तो मैफल जिंकतो, तसा शेनचा प्रत्येक सामन्यातला टप्पा अचूक पडायला लागला. आणि तो क्रिकेटच्या मैफिली रंगवत नायचा. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारासारख्या जगज्जेत्या फलंदाजांबरोबरचा त्याचा संघर्ष इरेला पेटायचा. दोन्ही बाजूकडून क्रिकेट कौशल्यांची उधळण व्हायची. एकमेकांना नामोहरम करणारे डावपेच लढवले जायचे.

शेनची शस्त्रे होती, चेंडूच्या टप्प्याची अचूकता. लेन स्पिनरच्या भात्यातील प्रभावी अस्त्र गुगली त्याच्याकडे नाईलाजाने राहात होते. मात्र लेग स्पिनचे सारे आविष्कार त्यांचे मांडलिकत्व स्वीकारून होते. लेग स्पिन टाकताना त्याने अनेक कोनांचा वापर केला. क्रीझचा वापर केला. चेंडू वळवताना कोनांमध्ये भरपूर वैविध्य आणले. चेंडूवरची त्याची हुकूमत वादातीत होती. त्याचे नियंत्रण अफलातून होते.

शेनने क्रिकेटचे स्वरुपही बदलले. वेस्ट इंडियन आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या वेगवान चेंडूंनी स्टम्प उडताहेत, बेल्स हवेत गिरक्या घेताहेत, बाउन्सर्सनी फलंदाजांची त्रेधातिरपीट उडते आहे, असं दृश्य पाहणाऱ्यांची अभिरुची शेन वॉर्नने क्षणार्धात बदलली. एखादे सावज टिपताना शिकाऱ्याने रचलेले सापळे पाहताना लोकांना आनंद मिळायला लागला. वॉर्नने त्या काळच्या दिग्गज फलंदाजांची आपल्या लेग ब्रेकने शेळी केली आणि तमाम क्रिकेट विश्व त्याच्या या जादुई गोलंदाजीचे दिवाने झाले. त्यामुळे शेनच्या फिरकीच्या कौशल्या इतकाच त्याचा फलंदाजांसाठी लावलेला सापळा पाहण्यात व त्याचा आनंद लुटण्याचा ‘थ्रील’ क्रिकेट रसिकांना सतत मिळू लागला.

वॉर्नची सलामीच जबरदस्त असायची. तो नव्या फलंदाजाला आपला पहिलाच चेंडू सर्व सामर्थ्याने टाकायचा. तो चेंडू वेगात उसळायचा आणि झपकन वळायचा. पहिलाच चेंडू खेळताना अनेक अनुभवी, दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडायची. पहिल्याच चेंडूवर समोरच्याला चकीत करणे ही वॉर्नची खासियत होती. त्यानंतर शेन समोरच्या फलंदाजाशी मानसिक युद्ध खेळायचा. ती युद्धे, चकमक नेहमीच तो जिंकत होता. मोठमोठ्या फलंदाजांचा त्याने बकरा अशा मानसिक युद्धाद्वारे केला.

मानसिक दडपणाचे अस्त्र फक्त तो फलंदाजांवरच नव्हे तर पंचांवरही वापरायचा. पंचावर तो एवढे प्रचंड दडपण आणायचा की वॉर्नच्या दबावाला बळी न पडलेल्या पंचांची वरच्या दर्जाचा पंच म्हणून गणना व्हायला लागली. खेळपट्टी संथ असणे, तिला वेग नसणे व ती उसळीला साथ देत नसल्याचे लक्षात येताच वॉर्नचे स्वतःचे प्रयोग सुरू व्हायचे. चेंडू टाकण्यासाठी पुढे येता येता तो अचानक थांबायचा आणि यष्टीरक्षक किंवा फलंदाजाजवळ उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या कानात काहीतरी कुजबूजायचा. फलंदाजाला वेगळा विचार करायला भाग पाडायचा. कधी कधी कारण नसताना, क्षेत्ररक्षकांच्या जागेची अदलाबदल करायला लावायचा. यश मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असायची. सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजाची विकेट काढण्यासाठी वेळप्रसंगी त्याने खोटे अपील करून विकटेही मिळवली होती. अशा वेळी एरवी मोठेपणाचा आव आणणाऱ्या शेनची भूमिका ‘नरो वा कुंजरोवा’ अशी असायची. नंतर तो त्या फलंदाजाची माफी देखील मागायचा. पण त्या आधी त्याने मोठा ‘ब्रेक’ मिळवला असायचा.

यशासाठी असा तो आसुसलेला होता. त्याचे दबावतंत्रही त्याच्या प्रभावी लेगस्पीन इतकेच परिणामकारक होते. चेंडूचा वेग कमी-अधिक करणे, चेंडूला कमी अधिक उंची देणे, क्रीझचा अनेक पद्धतीने वापर करणे आणि कधी कधी विचित्र क्षेत्रव्यूह लावून फलंदाजाला संभ्रमित करणे, यासारखे त्याचे प्रयोगही यशस्वी होत होते.

मैदानावरच्या कर्तृत्वाप्रमाणेच मैदानाबाहेरच्या वर्तणूकीमुळेही तो कायम वादग्रस्त राहिला. खेळपट्टी आणि हवामानाविषयी बुकींना पैशाच्या मोबदल्यात माहिती दिल्याचे त्याने खुलेआम सांगितले होते. क्रिकेटच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाला स्थैर्य देणारा हा धीरोदात्त क्रिकेटपटू वैयक्तिक जीवनाची नौका मात्र यशस्वीरित्या पैलतीरी नेऊ शकला नाही. कौटुंबिक कलाहात तो वाहवत गेला. आयुष्याला स्थैर्य देऊ शकणाऱ्या स्त्रीच्या शोधात राहिला. ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा त्याने दाखवला.

आपल्या आत्मचरित्रात त्याने म्हटलंय, “किशोरावस्थेत मी खूप चुका केल्या. आजता-गायत करतोच आहे. पण मी अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसूही फुलवलं,”

क्रिकेट विश्वाला आपल्या जादुई फिरकीचा आनंद देणारा हा अवलिया आज अचानक आपल्यातून निघून गेला. इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलवणाऱ्या शेनने स्वतःची दुःखे मात्र सदैव लपवली. इंग्लंड-न्यूझीलंड २०१९च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत निकराची झुंज सुरू असताना लॉर्डसवर सिगारेटी मागून सिगारेटी फुंकून स्वतःला संपवताना मी त्याला पाहिले होते.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: