चक्रीवादळामुळे ४६ लाख वीज ग्राहकांवर परिणाम

चक्रीवादळामुळे ४६ लाख वीज ग्राहकांवर परिणाम

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील १०,७५२ गावांत

मुंबईत मोसमातील पावसाचा उच्चांक
मुंबईसह कोकण किनारपट्टीवरचे ‘निसर्ग’ संकट
बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील चक्रीवादळे

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील १०,७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ६,०४० गावातील वीजपुरवठा मंगळवार संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाने गेल्या दोन दिवसांत राज्यात जवळपास साडेपाच हजार विजेचे खांब पडले, तारा तुटल्या व जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाले.

राज्यात एकूण १,५४६ उच्चदाब पोल वादळामुळे पडले व क्षतीग्रस्त झाले. त्यापैकी ४२५ पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे. राज्यात एकूण ३,९४० लघुदाब पोल वादळामुळे पडले व क्षतीग्रस्त झाले त्यापैकी ९७४ पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहे. वादळ व पावसामुळे राज्यात ९३ हजार ९३५ रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता त्यापैकी ६८ हजार ४२६ दुरुस्त करण्यात आले आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर अविरत काम करून चक्रीवादळामुळे अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला. या कामात स्थानिकांनी गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांना खूप सहकार्य केले. त्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन डॉ. राऊत यांनी एक कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ या कामी लावण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार कोल्हापूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आदींसाठी २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर ४६ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नुकसानीची व्याप्ती बघता सुमारे ६२२ रोहित्रे, सुमारे ३५० किमी लांबीचे केबल, तसेच साडे तीन हजार किमी इतक्या लांबीचे वायर्स व २० हजार ५०० खांब उपलब्ध करून दिलेले आहेत.

नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने १३ हजार तंत्रज्ञांची मोठी फळी मैदानात उतरवली आहे. ज्यामध्ये स्वतःचे ९ हजारहून अधिक तसेच कंत्राटी पद्धतीवर कार्यरत ४ हजारहून अधिक इतके मनुष्यबळ सध्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यरत आहे. हे काम करताना पाऊस, सोसाट्याचा वारा, उन्मळून पडलेली झाडे, बिघाड असलेली दूरसंचार यंत्रणा, खराब झालेले रस्ते या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या कामासाठी २०० हून अधिक लहान मोठे ट्रक, सुमारे ५० क्रेन व जेसीबी मशीन आणि सर्व उपकरणांनी सज्ज अशा २०० चमू या कामासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. 

४६ लाख ग्राहकांवर परिणाम

या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला तर ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून यामुळे ७ लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर मंगळवार संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले आहे. या चक्रीवादळाचा दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून यामुळे ७ लाख ७३ हजार ७६० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर मंगळवार संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख १० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. पालघर जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर मंगळवार संध्याकाळपर्यंत जवळपास २ लाख ४४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.

रत्नागिरी जिल्ह्यात ५ लाख ४५ हजार १२१ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर आज संध्याकाळपर्यंत जवळपास ४ लाख १८ हजार ३६० ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख ६६ हजार ११ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर मंगळवार संध्याकाळपर्यंत जवळपास ६७ हजार १६६ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. नाशिक जिल्ह्यात ३ लाख २९ हजार ३०४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर २ लाख ७२ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २ लाख ९६ हजार ९६५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर २ लाख ४९ हजार ६०१ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार ७६८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता तर ४ लाख ८ हजार ८९ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर १ लाख ४८ हजार ११२ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात १ लाख ५५ हजार ५४३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर १ लाख ५३ हजार ७१५ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

विदर्भात एकूण ५३ हजार ३९२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर जवळपास ५० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात १ लाख ५ हजार १४२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर १ लाख ३ हजार ९२४ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: