चोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण

चोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे चोरीच्या संशयावरून दलित जातीतील एका आठ वर्षाच्या मुलाला नग्न करून तापलेल्या फरशीवर बसायला लावल्याची एक संतापजनक घटना उघडकीस आली.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे चोरीच्या संशयावरून दलित जातीतील एका आठ वर्षाच्या मुलाला नग्न करून तापलेल्या फरशीवर बसायला लावल्याची एक संतापजनक घटना उघडकीस आली. पीडित मुलाचे नाव आर्यन खडसे असून तो खेळण्यासाठी गावातील जोगन माता मंदिरात आला होता. आर्यन मंदिरात खेळत असताना अमोल ढेरे हा तरुण तेथे आला आणि त्याने आर्यनवर मंदिरातील पैसे चोरल्याचा संशय घेत मारहाण करण्यास सुरवात केली. ही मारहाण केल्यानंतर अमोल ढेरेने आर्यनचे कपडे काढले आणि त्याला मंदिरातल्या तापलेल्या फरशीवर बसायला लावले. काही वेळाने वेदनेने आर्यन ओरडू लागला तेव्हा अमोल ढेरेने त्याला सोडून दिले. नंतर दिवसभर आर्यन वेदनेने कळवळत होता. त्याने आपल्या आईला हा प्रसंग सांगितला. नंतर रात्री त्याने आपल्या वडिलांना झालेली घटना सांगितली.

या घटनेची माहिती मिळतात आर्यनच्या वडिलांनी पोलिसांमध्ये अमोल ढेरेच्या विरोधात तक्रार केली. आर्यन दलित जातीतील असल्याने त्याच्या प्रवेशावर अमोल ढेरेने आक्षेप घेतला आणि नंतर राग काढण्यासाठी त्याने आर्यनवर चोरीचा आळ घेऊन त्याचे कपडे काढून त्याला फरशीवर बसण्यास सांगितले, असे पोलिसांनी सांगितले.

अमोल ढेरे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे  सांगितले.

COMMENTS