पत्रकारितेसाठी भारत धोकादायक

पत्रकारितेसाठी भारत धोकादायक

नवी दिल्लीः पत्रकारितेसाठी भारत हा जगातील एक धोकादायक देश बनला असल्याचे ‘रिपोर्टिंग विदाऊट बॉर्डर्स’ने (Reporters Without Borders) आपल्या वर्ल्ड प्रेस फ्रिडम इंडेक्स २०२१च्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला. या अहवालानुसार १८० देशांच्या यादीत भारताचे स्थान १४२ वर आले आहे. गेल्या वर्षीही भारताचे स्थान १४२ क्रमांकावर होते.

भारताचे स्थान इतके खाली असण्याच्या अनेक कारणांपैकी काही कारणे सत्ताधारी भाजप पक्ष व त्यांच्या समर्थकांकडून पत्रकारांना मिळणार्या सततच्या धमक्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताब्यात घेतलेली देशातील मीडिया हाऊसेस, सरकारविरोधी वृत्ते, लेख लिहिल्यास अशा पत्रकारांना देशद्रोही, सरकारविरोधी ठरवण्याचे प्रकार आणि काही दिवसांपूर्वी सरकारने डिजिटल मीडियावर आणलेला अंकुश ही असल्याचे या ‘रिपोर्टिंग विदाऊट बॉर्डर्स’चे म्हणणे आहे. या कारणांव्यतिरिक्त सरकारविरोधी बातम्या दिल्यानंतर पोलिसांकडून पत्रकारांवर सतत गुन्हे दाखल केले जात असून पोलिस अत्याचाराचाही पत्रकारांना जाच सोसावा लागत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला आहे. भारतातील हिंदुत्ववादी झुंडशाहीही पत्रकारितेला मोठे आव्हान असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अशा झुंडशाहीमुळे पत्रकारितेला सरकारच्या सोबत सतत राष्ट्रवादाची भूमिका घ्यावी लागते, सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना होणारी शिवीगाळ, धमक्या, फोनवरून निनावी येणार्या धमक्या यांचाही परिणाम पत्रकारितेवर झाला आहे.

२०२०मध्ये चार पत्रकारांच्या सरकारविरोधी बातम्या दिल्यामुळे हत्या झाल्या होत्या. त्यामुळे भारत हा पत्रकारिता करण्यासाठी सर्वात धोकादायक देश असल्याचे या अहवालात निरीक्षण मांडण्यात आले आहे.

भारतासारखी परिस्थिती ब्राझील, मेक्सिको व रशियामध्ये आहे.

भारताच्या शेजारील देशांमधील पत्रकारितेसाठीची परिस्थिती चांगली नाही. नेपाळचे स्थान १०६ असून श्रीलंका १२७ व लष्करी बंड होण्यापूर्वी म्यानमारचे स्थान १४० होते. त्याच बरोबर पाकिस्तानचे स्थान १४५ व बांगला देशचे स्थान १५२, चीनचे १७७ इतके आहे.

या यादीत फिनलंड व नॉर्वेतील राजकीय, सामाजिक परिस्थिती पत्रकारितेला अनुकूल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दोन देशांनी या यादीत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.

मूळ बातमी

COMMENTS