काश्मीरच्या तिघा छायाचित्रकारांना पुलित्झर सन्मान

काश्मीरच्या तिघा छायाचित्रकारांना पुलित्झर सन्मान

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमधील दर यासिन, मुख्तार खान व चन्नी आनंद या तिघा छायाचित्रकारांची यंदाच्या सर्वोच्च पुलित्झर पुरस्कारासाठी छायाचित्र विभागा

‘काश्मीर : शैक्षणिक संस्थांमधील माध्यमबंदी उठवा’
३७० कलम : दक्षिण आशियातील बदलती समीकरणे
शाह फैजल यांच्यावरील पीएसए मागे

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमधील दर यासिन, मुख्तार खान व चन्नी आनंद या तिघा छायाचित्रकारांची यंदाच्या सर्वोच्च पुलित्झर पुरस्कारासाठी छायाचित्र विभागात निवड करण्यात आली आहे. पुलित्झर पुरस्कार साहित्य, पत्रकारिता व संगीत रचनेसाठी देण्यात येतो.

दर यासिन व मुख्तार खान हे श्रीनगरमध्ये राहात असून चन्नी आनंद हे जम्मूमध्ये राहातात. हे तिघेही असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेचे छायाचित्र प्रतिनिधी आहेत. या तिघांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाल्यानंतर असोसिएट प्रेसचे कार्यकारी संपादक सॅली बुझबी यांनी या तिघा छायाचित्रकारांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे, कल्पकतेमुळे व सामूहिक प्रयत्नामुळे हा पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.

गेल्या वर्षी भारतीय संसदेने ५ ऑगस्ट २०१९ला जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे भारतीय राज्यघटनेतील ३७० कलम रद्द करत या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले पण त्याचबरोबर जनक्षोभ उसळू नये म्हणून राज्यात सर्वत्र अघोषित अशी इंटरनेटबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली होती. या सर्व काळात जम्मू व काश्मीरचे जनजीवन पूर्णपणे ढवळून गेले, सरकारी दमनकारी यंत्रणांनी सामान्य नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार काढून घेतले. काश्मीरचा जगाशी संपर्क पूर्णपणे तोडण्यात आला. आता गेले ९ महिने या राज्यातील परिस्थिती अद्याप पूर्ववत झालेली नाही. त्यात लॉकडाउनही पुकारण्यात आला आहे. अशा गेल्या ७-८ महिन्यातील काश्मीरमधील जनजीवनाचे यथार्थ वास्तववादी चित्रण या तीन छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेर्यात टिपल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

जेव्हा या तिघा छायाचित्रकारांना पुलित्झर पारितोषिक मिळाल्याची घोषणा झाली तेव्हा या सर्वांनी हा आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगितले. हे अपेक्षित नव्हते, पुलित्झर पुरस्कार छायाचित्रकारांसाठीही असतो अशी माहिती होती, पण मला तो मिळेल असे कधीही वाटले नव्हते, मला काय प्रतिक्रिया द्यावी यासाठी शब्द सूचत नसल्याचे चन्नी आनंद यांनी हिंदूस्तान टाइम्सला सांगितले.

तर यासिन यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना हा पुरस्कार मनाला सुखद आनंद देणारा तर आहेच पण आमच्या कामाची ही पावती मिळाल्याचे मत व्यक्त केले.

मुख्तार खान यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या सर्व सहकार्यांचे आभार मानले. हा आमच्या कामाचा गौरव असून आयुष्यात कधी असे काही मिळेल याची कल्पनाही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पत्रकारितेतील अत्यंत कठीण काळातले काम

गेल्या ऑगस्टमध्ये काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर तेथे लगेचच अघोषित संचारबंदी लावण्यात आली व देशाशी असलेला काश्मीरचा संपर्कही तोडण्यात आला. काश्मीरमध्ये सर्व दळणवळण यंत्रणा बंद करण्यात आल्या, इंटरनेटही बंद करण्यात आले. अशा कठीण प्रसंगात संपर्क यंत्रणाच नसल्याने असोसिएट प्रेसच्या छायाचित्रकारांना कुठे निदर्शने आहेत, कुठे लाठीमार सुरू आहे, कुठे लोक रस्त्यावर येऊन सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत, याची माहिती मिळत नव्हती. अशा प्रसंगी मुख्तार खान व यासिनने श्रीनगर व त्याच्या आसपासचा परिसर पायीच फिरण्यास सुरुवात केली. जेथे निदर्शने होत असत तेथील छायाचित्रे घेत असताना पोलिस व आंदोलक अशा दोघांचाही अविश्वास त्यांना जागोजागी झेलावा लागत होता. या काळात अनेक दिवस घरी जाता येत नव्हते. त्यामुळे या छायाचित्रकारांचे कुटुंबिय नेहमी चिंतेत असतं. आपल्या कुटुंबाला ख्याली खुशाली कळवल्यानंतर मग घरातील चिंता निवळत असे.

पण काश्मीरमध्ये सर्वच संपर्क यंत्रणा बंद असल्याने छायाचित्रे वृत्तसंस्थेला पाठवायची कशी हा एक मोठा प्रश्न या छायाचित्रकारांपुढे उभा असायचा. अशावेळी श्रीनगर विमानतळावर जाणार्या प्रवाशांकडे ही छायाचित्रे सोपवावी लागत व तेथून ती वृत्तसंस्थेकडे जात असतं. यासिनच्या मते १९९०च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवाद चिघळला होता, त्या काळाची आठवण आता पुन्हा होत होती.  त्यावेळी फोटोचे रोल दिल्लीकडे जाणार्या कुणाएकाकडे द्यावे लागत होते व नंतर ते ऑफिसमध्ये जात होते. मग ती छायाचित्रे जगापुढे जात असतं.

सध्याच्या काश्मीरमधील परिस्थिती आम्ही कॅमेर्यात टिपली असली तरी ती केवळ काश्मीरी जनतेची गोष्ट नाही तर ती माझी स्वतःचीही एक कथा असल्याचे यासिन सांगतात. आता जगापुढे माझी छायाचित्रे पोहचली आहेत, पुलित्झरच्या नामांकितांमध्ये आमचेही नाव आले, हा माझा गौरव समजतो, अशी प्रतिक्रिया यासिन देतात.

राजकीय नेत्यांकडून विजेत्यांचे अभिनंदन

काश्मीरमधील तिघा छायाचित्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला असून काश्मीरमधील पत्रकारिता ही अत्यंत कठीण काळातून जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकारांच्या कॅमेर्याला अधिक बळ मिळो अशीही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

तर पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनीही या तिघा छायाचित्रकारांचे अभिनंदन केले. एकीकडे जग आमच्या पत्रकारांच्या कामगिरीचे कौतुक करत असताना काश्मीरमध्ये मात्र दमनशाही  सरकारकडून राबवली जात असल्याची टीका त्यांनी केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0