नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी रविवारी रात्री राजकीय कार्यकर्ता उमर खालीद याला बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायद्याखाली अटक केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी रविवारी रात्री राजकीय कार्यकर्ता उमर खालीद याला बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायद्याखाली अटक केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीदरम्यान दिल्लीत जातीय दंगलींचा कट रचल्याचा आरोप खालीदवर ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर देशद्रोह तसेच भारतीय दंड संहितेच्या अन्य १८ कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या व हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांचाही समावेश आहे.
खालीदचा दिल्ली दंगलीचा कट रचण्यामध्ये सहभाग आहे असा दावा पोलिसांनी दंगलीशी निगडित अनेक फिर्यादी व आरोपपत्रांमध्ये केलेला होता आणि त्याला अनेकदा चौकशीसाठी समन्सही धाडले होते. मात्र, रविवारी रात्री ११ वाजता त्याला अटक करण्यात आली.
राजधानी दिल्लीत फेब्रुवारी २३ ते २६, २०२० या काळात भडकलेल्या दंगलीत एका पोलिसासह ५३ जणांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या ५२ नागरिकांपैकी ४० मुस्लिम होते. मुस्लिमांच्या घरांचे व प्रार्थनास्थळांचे अपरिमित नुकसान झाल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
या हिंसाचाराची सर्वाधिक झळ मुस्लिमांनाच बसली असताना, या दंगलींचा कट मुस्लिम कार्यकर्त्यांनीच रचला असा दावा पोलिस तपासात सातत्याने केला जात आहे. नागरिकत्व (सुधारणा) कायद्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दंगलींचे खापर फोडले जात आहे. कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवीण वर्मा आदी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांविरोधात हिंसाचाराच्या धमक्या दिल्या असूनही त्यांच्या वक्तव्यांची चौकशीही झालेली नाही.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहास विषयात पीएचडी संपादन केलेल्या उमर खालीदवर, त्याने १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील अमरावती शहरात केलेल्या भाषणावरून, प्रथम आरोप सुरू झाले. त्याच्या भाषणाची क्लिप सर्वत्र फिरवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खालीद आणि युनायटेड अगेन्स्ट हेट या नागरी संस्थेविरोधातील आरोपांना तातडीने पुष्टी दिली. मात्र, भाजपने प्रसारित केलेली खालीदच्या भाषणाच्या क्लिपमध्ये केवळ शेवटच्या ४० सेकंदांचे फूटेज होते व त्याची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनेच ही क्लिप संपादित करण्यात आली होती.
“डोनाल्ड ट्रम्प २४ तारखेला भारतात येतील तेव्हा आपण सांगू की भारताचे पंतप्रधान व भारत सरकार देशाचे विभाजन करण्याच्या प्रयत्नात आहेत, महात्मा गांधींची मूल्ये उद्ध्वस्त करत आहेत. सत्ताधाऱ्यांना देशात दुही माजवायची असेल, तर जनतेला देश एकत्र बांधून ठेवण्यासाठी एकत्र येण्यास सज्ज व्हावे लागेल. आम्ही रस्त्यावर उतरून ते करू. तुम्ही काय कराल?”
खालीदचे हे भाषण म्हणजे हिंसाचार भडकावण्याच्या हेतूचा पुरावा आहे, असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. त्याने ताहीर हुसेन व खालीद सैफी यांच्याशी गुप्त मसलती केल्याचाही आरोप ते ठेवत आहेत. दिल्ली दंगलींंसंदर्भातील दोन आरोपपत्रांमध्ये खालीदच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र, ट्रम्प यांच्या भारतभेटीच्या तारखेची घोषणा भारत किंवा अमेरिकेच्या सरकारांतर्फे झालेली नसताना ट्रम्प यांच्या भारतभेटीदरम्यान दंगली भडकावण्याचा कट कसा रचला जाऊ शकेल याचे स्पष्टीकरण पोलिस देऊ शकलेले नाहीत.
“मी अद्याप आरोपपत्र वाचलेले नाही पण माध्यमांमध्ये त्यातील आलेला मजकूर बघता, त्यात अजिबात सत्य नाही हे मी सांगू शकतो,” असे खालीदने ‘द वायर’ला सांगितले.
पोलिस आपल्या जवळच्या लोकांना यूएपीएखाली अटक करण्याची धमकी देत आहेत असे खालीदने गेल्या आठवड्यात ‘द वायर’ला सांगितले होते. त्यासंदर्भात त्याने १ सप्टेंबर रोजी पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांना पत्रही लिहिले होते.
शनिवारी पोलिसांनी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, विख्यात अर्थतज्ज्ञ जयती घोष, दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद आणि चित्रपटदिग्दर्शक राहुल रॉय यांच्यावर दिल्ली दंगलींसंदर्भातील पुरवणी आरोपपत्रात आरोप ठेवले. तीन महिन्यांहून अधिक काळापासून पोलिस कोठडीत असलेल्या नताशा नरवाल, देवांगना कलिता आणि गुल्फीश फातिमा या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक जबाबाच्या आधारे या सर्वांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे जबाब पोलिसांनीच लिहिलेले आहेत हे नरवाल व कलिता यांच्या जबाबातील तंतोतंत सारख्या भाषेवरून वाटते. या दोन विद्यार्थ्यांनी जबाबपत्रावर ‘रिफ्युज्ड टू साइन’ असे लिहिण्याचा प्रयत्नही केल्याची समजते.
२०१६ मध्ये खालीदवर जेएनयू स्टुडंट्स युनियनचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यासोबत देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. २०१८ मध्ये खालीदला दिल्लीत गोळीबाराचे लक्ष्यही करण्यात आले होते.
मूळ बातमी
COMMENTS