ताहीर हुसेनच्या दाव्यावर दिल्ली पोलिसांत मतभेद

ताहीर हुसेनच्या दाव्यावर दिल्ली पोलिसांत मतभेद

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीतील हत्या प्रकरणात फरार असलेला आपचा नेहरु विहार प्रभागातील नगरसेवक ताहीर हुसेन याने पोलिसांकडे दंगलीतून सुटका करण्याची मागणी

दिल्ली दंगलः १७,५०० पानांचे आरोपपत्र दाखल
महाराष्ट्रातल्या सत्तेची सूत्रे दिल्लीतून फिरतात तेव्हा..
शीला दीक्षित यांचे निधन

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीतील हत्या प्रकरणात फरार असलेला आपचा नेहरु विहार प्रभागातील नगरसेवक ताहीर हुसेन याने पोलिसांकडे दंगलीतून सुटका करण्याची मागणी केली होती व त्यानुसार त्याची व त्याच्या कुटुंबियांची सुटका केली होती असे विधान दिल्ली पोलिस अतिरिक्त आयुक्त ए. के. शिंगला यांनी केले होते पण हा घटनाक्रम व ए. के. शिंगला यांचे म्हणणेच दिल्ली पोलिसांनी फेटाळले आहे.

ताहीर हुसेनच्या म्हणण्यानुसार त्याने २४ व २५ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या घरासमोर जमाव जमला असून आपली व कुटुंबियांची सुटका करावी असे अनेक फोन दिल्ली पोलिसांना केले होते. एक जमाव आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगण्यासाठी मी स्टेशन हाऊस ऑफिसर, पोलिस उपायुक्त यांना अनेक फोन केले पण या फोनला कुणीही उत्तर दिले नाही. नंतर मी राज्यसभेतील आपचे खासदार संजय सिंग यांना फोन करून त्यांना परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांची व्यवस्था करून आपल्याला घरातून बाहेर सुखरूप काढल्याचे सांगितले.

ताहीर हुसेन यांनी कथन केलेला संपूर्ण घटनाक्रम दिल्ली पोलिस अतिरिक्त आयुक्त शिंगला यांनी जशाचा तसा प्रसार माध्यमांना सांगितला होता. ते म्हणाले होते की,‘ ताहीर हुसेन यांच्याकडून सतत कॉल आल्यानंतर पोलिसांचे एक पथक त्यांच्या घरापाशी गेले. पण ताहीर हुसेन यांनी पोलिस संरक्षण असेल तर घराबाहेर पडेन अशी अट पोलिसांना घातली होती. त्यानुसार पोलिस संरक्षणात ताहीर हुसेन यांना घराबाहेर काढले.’

आता शिंगला यांचेच विधान दिल्ली पोलिस खोडून काढत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘२४-२५ फेब्रुवारीच्या रात्री काही नागरिकांनी चांद बाग येथील दिल्ली पोलिस कक्षाला फोन करून ताहीर हुसेन जमावामध्ये अडकले असल्याची माहिती दिली होती. पण ही माहिती चुकीची असून ताहीर हुसेन हे त्यांच्या घरात होते. ताहीर हुसेन हे आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असून त्यांच्या घरात पोलिसांनी छापा टाकला असता ते तेथे आढळलेले नाहीत. ते अद्याप फरारी आहेत. त्यांना पकडण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत.’

ताहीर यांचा दावा

ताहीर हुसेन यांनी २४ फेब्रुवारीला नेमके काय घडले त्याचा घटनाक्रम सांगितला होता. ‘२४ फेब्रुवारीला रात्री ८च्या सुमारास दिल्ली पोलिस माझ्या घरात आले. त्यांना दंगलीला कारणीभूत ठरणारी एकही वस्तू घरात सापडली नाही. त्यानंतर पोलिसांनी मला व माझ्या कुटुंबियांना संरक्षण देत रात्री ११.३० च्या सुमारास घराबाहेर काढले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी व माझी पत्नी माझ्या घरात गेलो तेव्हा पोलिस तेथे उपस्थित होते. माझ्या पत्नीने घरातून काही जीवनावश्यक वस्तू घेतल्या व नंतर आम्ही एका नातेवाईकांकडे राहायला गेलो. त्या दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला संध्याकाळी ४ पर्यंत पोलिस माझ्या घरात उपस्थित होते.

ताहीर हुसेनवर तीन फिर्यादी दाखल

दरम्यान दिल्ली पोलिसांनी बुधवारी ताहीर हुसेन याच्यावर दिल्ली दंगलीत आयबी कर्मचाऱ्याची हत्या केल्या प्रकरणात दयालपूर पोलिस ठाण्यात पुन्हा एक फिर्याद दाखल केली आहे. या पोलिस ठाण्यातील ही दुसरी फिर्याद आहे तर तिसरी फिर्याद खजुरी खास पोलिस ठाण्यात दंगल घडवणे व हिंसाचार करण्याप्रकरणात दाखल करण्यात आली आहे. ही फिर्याद दंगलीत जखमी झालेल्या अजय गोस्वामी याच्या जबाबावर दाखल करण्यात आली आहे.

गोस्वामीने असा दावा केला आहे की, ताहीर हुसेन याच्या घरातून दगडफेक व पेट्रोल बॉम्ब फेकले जात होते.

तर खजुरी खास पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा पोलिस हवालदार संग्राम सिंह यांच्या जबाबावर आधारावर आहे.

न्यायालयाच्या बाहेर जय श्रीराम, हर हर महादेवच्या घोषणा

फरार ताहीर हुसेन यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होती पण दिल्ली पोलिसांनी ताहीर हुसेन यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे सत्र न्यायाधीश सुधीर कुमार जैन यांनी आदेश दिले व गुरुवारी दुपारी १२.३० वाजता जामीन अर्जावर सुनावणी होईल असे न्यायालयाने सांगितले. न्यायालयात ताहीर हुसेन याचा जामीन अर्जावर सुनावणी होत असताना न्यायालयाबाहेर जय श्रीराम, हर हर महादेवच्या घोषणा दिल्या जात होत्या. घोषणा देणाऱ्यांमध्ये वकील दिसत होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0